अन्नपानविधी- शाकवर्ग

Curtoli Vegetable
Curtoli Vegetable

मधुमेहामध्ये वारंवार लघवीला जावे लागत असेल व लघवीत साखरेचे प्रमाण जास्त येत असेल तर फरस बीच्या कोवळ्या शेंगा उकडून त्याला तूप, हळद, ओवा यांची फोडणी देऊन केलेली भाजी खाण्याचा उपयोग होतो. तर, कर्टोलीची भाजी मलदोष दूर करते, त्वचारोगात हितकर असते, मळमळ, अरुची, दमा, खोकला, ताप वगैरे त्रासात अतिशय हितकर असते, अग्नी प्रदीप्त करते. 

मागच्या आठवड्यात आपण फारशा प्रचलित नसणाऱ्या मात्र पथ्यकर असणाऱ्या परवर या भाजीची माहिती घेतली. आज अजून अशाच एका भाजीची माहिती करून घेऊ या. हिचे नाव आहे कर्टोली. कर्टोलीचे वेल जंगलात किंवा डोंगरभागात पावसाळ्यात येतात. आषाढ-श्रावणात कर्टोलीला फळे येतात, ज्यांची भाजी केली जाते. फळे हिरव्या रंगाची व वर काटे असणारी असते. कर्टोलीचे फळ पाहिले की छोट्या कारल्याची आठवण येते. कर्टोली दोन महिनेच मिळते, पण अतिशय पथ्यकर असते. 

कर्कोटी मलहृत्‌ कुष्ठहृल्लासारुचिनाशनी ।
श्वासकासज्वरान्हन्ति कटुपाका च दीपनी ।।
...भावप्रकाश

कर्टोलीची भाजी मलदोष दूर करते, त्वचारोगात हितकर असते,  मळमळ, अरुची, दमा, खोकला, ताप वगैरे त्रासात अतिशय हितकर असते, अग्नी प्रदीप्त करते. 

कर्टोलीची भाजी चवीला थोडी कडू लागली तरी रुचकर असते. विशेषतः जेव्हा अंगात कसकस वाटत असेल, तोंडाला चव नसेल त्या वेळी कर्टोलीची भाजी आणि ज्वारीची भाकरी खाण्याने बरे वाटते. 

जिभेवर पांढरा थर जमलेला असल्यास, जीभ जड झाल्यासारखी वाटत असल्यास हळद-आले-ओव्याची पूड टाकून तुपावर परतून घेतलेली कर्टोलीची भाजी चावून चावून व चघळून खाण्याचा उपयोग होतो.

ज्या मुलांना लाळ जास्ती सुटते, वारंवार सर्दी-खोकला-ताप येण्याची प्रवृत्ती असते त्यांच्यासाठी कर्टोलीची भाजी पथ्यकर असते. 

कर्टोलीची भाजी रक्‍तशुद्धीसाठीही प्रशस्त असते. त्वचारोग, अंगावर कंड येणे, चट्टे उठणे वगैरे त्रासांवर कर्टोलीची भाजी आहारात ठेवण्याचा तसेच शक्‍य असल्यास कर्टोलीच्या पानांचा रस बाहेरून लावण्याचा उपयोग होतो. 

मधुमेह, स्थूलता, अंगावर सूज येणे वगैरे विकारांमध्ये रात्रीचे जेवण न करता त्याऐवजी कर्टोली, पडवळ, परवर या भाज्या शिजवून त्याचे सूप करून त्याला जिरे, हिंग, हळद, ओवा वगैरेंची फोडणी देऊन घेण्याने रोगाची तीव्रता कमी होते, मेद, सूज कमी होते. 

कर्टोलीच्या ज्या वेलांना फक्त फुले येतात, फळ येत नाही त्या वेलीला वांझ कर्टोली असे म्हणतात. या वांझ कर्टोलीचा कंद विषनाशनासाठी उत्कृष्ट असतो. अगदी मण्यारीसारख्या विषारी सर्पाच्या विषावर उतारा म्हणूनही वंध्याकर्टोलीचा कंद मधात उगाळून देण्याची पद्धत दिसते. यावर अधिक संशोधन होण्याची गरज आहे. 

कर्टोलीच्या कंदाचे चूर्ण साखरेसह घेण्याने रक्‍त पडणाऱ्या मूळव्याधीवर उपयोगी असते. 

लघवीतून खर जात असल्यास वांझ कर्टोलीचा कंद पाण्यात उगाळून तयार केलेली पेस्ट एक चमचा व अर्धा चमचा मध हे मिश्रण काही दिवस घेण्याचा गुण येतो. 

विषारी किडी, कोळी, मधमाशी वगैरे चावल्याने त्वचेवर रॅश उठतो, दाह होतो, खाज येते त्यावर वंध्या कर्टोलीचे मूळ लिंबाच्या रसात उगाळून लावण्याचा उपयोग होतो. 

फरस बी - श्रावण घेवडा
फरस बीच्या कोवळ्या शेंगांची भाजी केली जाते. ही भाजी भारतात तसेच परदेशातही बहुतेक ठिकाणी उपलब्ध असते. शेंग हिरव्या रंगाची असते तसेच चार-सहा इंच लांब असते. भाजीसाठी कोवळी शेंग वापरली जाते. बी तयार झालेल्या निबर शेंग न वापरणे चांगले. ताजी कोवळी शेंग, जी मोडल्यावर कटकन तुटते ती भाजी करण्यासाठी उत्तम असते. 

ग्रामजा वातला रुच्या तुवरा मधुरा मता ।
मुखप्रिया कण्ठशुद्धिकारिणी ग्राहिणी मता ।।
...निघण्टु रत्नाकर


फरस बी वात वाढवते, चवीला गोड-तुरट असून रुचकर असते. फरस बीच्या कोवळ्या शेंगा कंठशुद्धी करण्यास मदत करतात, मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करतात. मात्र जून शेंगांमुळे पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. 

फरस बी सारक असते, त्यामुळे मलावष्टंभाची तक्रार असल्यास तुपावर फरस बीच्या शेंगा परतून घेऊन त्यावर सैंधव, जिरे पूड भुरभुरवून जेवणापूर्वी खाण्याचा उपयोग होतो. मात्र यासाठी फरस बी ताजी व कोवळी असणे आवश्‍यक होय.

भूक लागत नसले, जेवणानंतर पोट जड होत असेल तर कोवळ्या शेंगांची हळद, हिंग, आले, काळी मिरी टाकून केलेली भाजी वरून चवीनुसार सैंधव व लिंबू पिळून केलेला भाजी व भाकरी खाण्याचा उपयोग होतो. 

मधुमेहामध्ये वारंवार लघवीला जावे लागत असले व लघवीत साखरेचे प्रमाण जास्त येत असले तर फरस बीच्या कोवळ्या शेंगा उकडून त्याला तूप, हळद, ओवा यांची फोडणी देऊन केलेली भाजी खाण्याचा उपयोग होतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com