#FamilyDoctor अग्र्यसंग्रह (श्रेष्ठत्व) 

डॉ. श्री बालाजी तांबे  www.balajitambe.com
Friday, 31 August 2018

कोणताही रोग प्राथमिक अवस्थेत लक्षात येणे व त्यावर लागलीच योग्य ते उपचार करणे हे फार गरजेचे असते. उपचारांची वेळ निघून गेली तर नंतर रोग आटोक्‍यात आणणे फार अवघड होऊ शकते. म्हणून रोगावर उपचार करताना वेळेचा अपव्यय म्हणजेच काळाचा मिथ्यायोग होणार नाही यासाठी सजग राहणे चांगले. 

चरकसंहितेमधील अग्र्यसंग्रहाची माहिती आपण घेतो आहेत. मागच्या आठवड्यात आपण विश्रांती हे सर्वोत्तम पथ्य आणि अतिश्रम हे सर्वांत मोठे अपथ्य असते हे पाहिले. आता या पुढचा विषय पाहू.

रोग होऊ नये आणि आपण कायम निरोगी राहावे असे कोणाला वाटणार नाही? मात्र यासाठी आरोग्याचे अनुशासन पाळणे महत्त्वाचे असते. अग्र्यसंग्रहात छोट्या सूत्राद्वारा समजावले आहे,

मिथ्यायोगे व्याधिकराणाम्‌ - काल, बुद्धी व इंद्रिय यांचा अनुचित वापर रोगास कारणीभूत असतो. 

काळाचा मिथ्यायोग याचा याचा विचार करताना चुकीच्या कर्माचे फळ मिळणे, नैसर्गिक ऋतुचक्रामध्ये बिघाड होणे तसेच रोगावर उपचार करताना वेळ निघून जाणे अशा अनेक प्रकारांनी विचार करावा लागतो. 

‘कालः पुनः परिणाम उच्यते’ असे चरकाचार्य सांगतात. कारण काळच चांगल्या-वाईट कर्मांचे परिमणन, रूपांतर करून चांगले-वाईट फळ देत असतो.

रोगाच्या प्रकारात ‘कालज रोग’ म्हणून रोगाचा एक प्रकार सांगितला आहे. चुकीच्या कर्माचे, वाईट कृत्याचे फळ म्हणून रोग होतो तेव्हा त्याला ‘कालज रोग’ म्हणतात. ही कर्मे अशी असतात की ती लगेच, त्याच जन्मात

रोगाचे कारण ठरत नाहीत तर कर्माचा पाक झाला की कालांतराने रोग उत्पन्न करतात. म्हणून अशा रोगांना ‘कालज रोग’ म्हणतात.

रोगाचे कारण म्हणून काळाचा विचार करताना ऋतूंचा हीनयोग, अतियोग व मिथ्यायोग यांचाही समावेश केला जातो. 

मिथ्यातिहीनलिाश्‍च वर्षान्ता रोगहेतवः ।
...चरक शारीरस्थान

आयुर्वेदाने एकूण सहा ऋतू सांगितले असले तरी रूढार्थाने तीन ऋतू असतात, उन्हाळा, हिवाळा व पावसाळा. उन्हाळ्यात ऊन न पडणे, हिवाळ्यात थंडी नसणे किंवा पावसाळ्यात पाऊस न येणे हा काळाचा हीनयोग झाला. तर उन्हाळ्यात तीव्र ऊन पडणे, हिवाळ्यात कडाक्‍याची थंडी, पावसाळ्यात अतिवृष्टी होणे हा काळाचा अतियोग होय. ज्या ऋतूत जे हवामान अपेक्षित आहे त्यापेक्षा काहीतरी वेगळेच घडणे याला काळाचा मिथ्यायोग म्हटले जाते. उदा. उन्हाळ्यात पाऊस पडणे, हिवाळ्यात ऊन पडणे, पावसाळ्यात ऊन पडणे वगैरे. ऋतूंच्या या अशा हीन, अति वा मिथ्यायोगामुळे शरीराच्या स्वाभाविक चक्रामध्ये, गतीमध्ये अडथळा निर्माण होतो, अर्थात त्यामुळे असंतुलन निर्माण होऊन रोग उत्पन्न होऊ शकतात. 

रोगाचे निदान लवकरात लवकर होणे ही उपचारांची गुरुकिल्ली असते. वेळ निघून गेल्यावर कितीही चांगले उपचार असले तरी त्यांचा म्हणावा तसा उपयोग होत नाही. आयुर्वेदात हे ठिणगीची उपमा देऊन समजावले आहे. ज्याप्रमाणे अग्नी जोपर्यंत ठिणगीच्या रूपात असतो तोपर्यंत त्याला विझवणे सोपे असते, मात्र ठिणगीची अवस्था निघून गेली आणि अग्नीने रौद्र रूप धारण केले तर त्याला काबूत आणणे जवळजवळ अशक्‍य असते. तसाच कोणताही रोग प्राथमिक अवस्थेत लक्षात येणे व त्यावर लागलीच योग्य ते उपचार करणे हे फार गरजेचे असते.  उपचारांची वेळ निघून गेली तर नंतर रोग आटोक्‍यात आणणे फार अवघड होऊ शकते. म्हणून रोगावर उपचार करताना वेळेचा अपव्यय म्हणजेच काळाचा मिथ्यायोग होणार नाही यासाठी सजग राहणे चांगले. 

कालज रोगामध्ये अशाही रोगांची गणना होते, जे एका विशिष्ट वेळी प्रकर्षाने व्यक्‍त होतात. उदा. ‘विषमज्वर’ हा तापाचा प्रकार ‘कालज’ प्रकारात मोडतो. कारण तो पाळी-पाळीने २४ तासातून एकदा किंवा दर एक दिवसाने, दर दोन वा तीन दिवसाने असा येतो. 

कालज रोगांच्या उपचाराबाबत चरकाचार्य सांगतात, 
एते चान्ये च ये केचित्‌ कालजा विविधा गदाः ।
अनागते चिकित्स्यास्ते बलकालौ विजानता ।।
...चरक शारीरस्थान

रोग व रुग्णाचे बल तसेच काळ जाणणाऱ्या वैद्याने या प्रकारच्या कालज रोगांवर वेग येण्याअगोदरच उपचार करावेत.

यामुळे वेग टाळता आला तर उत्तमच असते, अन्यथा रोगाची तीव्रता तरी निश्‍चित कमी करता येते.

प्रत्यक्षातही याचा अनेकदा अनुभव येतो. उदा. दम्याचा त्रास असणाऱ्याने दमट, थंड हवा सुरू होण्यापूर्वीच श्वसनसंस्थेवर काम करणारे एखादे औषध वा रसायन सुरू केल्यास काळानुरूप होऊ शकणारा दम्याचा त्रास टाळता येतो किंवा किमान आटोक्‍यात तरी निश्‍चित राहू शकतो. एकदा त्रास सुरू झाला की हीच औषधे तेवढ्या प्रभावीपणे काम करू शकतीलच असे नाही. वाताचे दुखणे असणाऱ्याने पावसाळ्याची चाहूल लागताच बस्ती, अभ्यंग, शेक वगैरे वातसंतुलन करणारे उपचार करण्याचा अधिक चांगला उपयोग होतो. 

अशा प्रकारे काळाचे परिमाण असणारा प्रत्येक क्षण महत्त्वाचा समजून त्याला नीट हाताळणे हे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे होय. बुद्धी व इंद्रियांचा मिथ्यायोग म्हणजे काय हे आपण पुढच्या वेळी पाहू.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article on Disease