#FamilyDoctor अग्र्यसंग्रह (श्रेष्ठत्व)

प्रज्ञेचा अपराध झाला की, मानसिक विकारांना सुरवात होते.
प्रज्ञेचा अपराध झाला की, मानसिक विकारांना सुरवात होते.

बुद्धी, संयमन शक्‍ती आणि स्मरणशक्‍ती या जेव्हा भ्रष्ट होतात, तेव्हा मनुष्य अशुभ कर्म करण्यास प्रवृत्त होतो. यालाच ‘प्रज्ञापराध’ असे म्हणतात. त्यामुळे सर्व दोषांचा प्रकोप होऊ शकतो, अर्थातच अनेक प्रकारचे शारीरिक, मानसिक विकार होऊ शकतात.

‘मिथ्यायोगो व्याधिकराणां ‘म्हणजे काल, बुद्धी व इंद्रियांचा चुकीचा योग किंवा चुकीचा वापर रोग होण्याचे मुख्य कारण असतो, हे सूत्र आपण पाहात होतो. मागच्या वेळी आपण काळाचा मिथ्यायोग म्हणजे काय हे पाहिले. आज बुद्धीविषयी माहिती करून घेऊ या. 

बुद्धीविषयी समजावताना चरकाचार्य आवर्जून उल्लेख करतात ते प्रज्ञेचा. प्रज्ञापराध हा सर्व दोषांचा प्रकोप करणारा असतो. 
धीधृतिस्मृतिविभ्रष्टः कर्म यत्कुरुते अशुभम्‌ ।
प्रज्ञापराधं तं विद्यात्‌ सर्वदोषप्रकोपणम्‌ ।।
... चरक शारीरस्थान

धी म्हणजे बुद्धी, धृती म्हणजे संयमन शक्‍ती, स्मृती म्हणजे स्मरणशक्‍ती. या जेव्हा भ्रष्ट होतात तेव्हा मनुष्य अशुभ कर्म करण्यास प्रवृत्त होतो. यालाच ‘प्रज्ञापराध’ असे म्हणतात व त्यामुळे सर्व दोषांचा प्रकोप होऊ शकतो, अर्थातच अनेक प्रकारचे शारीरिक, मानसिक विकार होऊ शकतात.
बुद्धी भ्रष्ट होते म्हणजे नेमके काय होते हेही या ठिकाणी चरकाचार्य स्पष्ट करतात, 
विषमाभिनिवेशो यो नित्यानित्ये हिताहिते ।
ज्ञेयः स बुद्धिविभ्रंशः समं बुद्धिर्हि पश्‍यति ।।
... चरक शारीरस्थान
जे जसे आहे तसे ज्ञात करून घेणे हे बुद्धीचे काम असते. बुद्धी भ्रष्ट झाली की काय हितकर आहे काय अहितकर आहे, काय क्षणभंगुर आहे, काय चिरंतन आहे हे समजू शकत नाही, उलट विषमज्ञान होते म्हणजे जे हितकर आहे ते अहितकर वाटते, जे चिरंतन आहे त्याकडे लक्ष न देता क्षणभंगुराची ओढ लागते, चांगले काय, वाईट काय हे कळेनासे होते, करायला पाहिजे त्या गोष्टी होत नाहीत, जे करायला नको ते करावेसे वाटते. मुख्य निर्णय देणारी बुद्धीच चुका करायला लागली की नंतर सगळेच शारीरिक, मानसिक व्यवहार चुकीचे होत जातात.

बुद्धी ही एकटी नसते, तर तिच्याबरोबर धृती व स्मृती यासुद्धा योग्य निर्णय घेण्यासाठी व त्याप्रमाणे योग्य क्रिया घडण्यासाठी जबाबदार असतात. बुद्धीने योग्य निर्णय घेतला तरी मनाला त्या बाजूला वळविण्याचे काम धृती करत असते.

विषयप्रवणं सत्त्वं धृतिभ्रंशान्न शक्‍यते ।
नित्यन्तुमहितादर्थाद्‌ धृतिर्हि नियमात्मिका ।।
...चरक शारीरस्थान
धृती भ्रष्ट झाली की विषयांकडे ओढ घेणाऱ्या मनावर नियंत्रण राहात नाही, अर्थात त्यामुळे चुकीची कर्मे घडतात.

प्रत्यक्षातही ही गोष्ट अनेकांनी अनुभवली असेल. आपण करतो आहे हे चुकीचे आहे हे माहिती असते, पण त्या क्षणी मनाला झालेला मोह आवरता येत नाही. बुद्धीने योग्य निर्णय दिला तरी धृतीची नियमनाची शक्‍ती अपुरी पडली की चुकीचीच गोष्ट घडते.

बुद्धी व धृतीनंतर येते स्मृती. यापूर्वी झालेल्या दुःखाचे, त्रासाचे जे कारण असेल ते लक्षात राहिले तर पुन्हा त्रास न होण्यासाठी टाळता येते. पण जर स्मृतीच भ्रष्ट झाली तर पुन्हा पुन्हा त्याच चुका होत राहतात. खोलात गेल्यास स्मृतिभ्रंशाचा एक वेगळा अर्थही दिलेला आढळतो. आत्म्याला असलेल्या यथार्थ ज्ञानाचे जिवाला विस्मरण झाले की त्यामुळेही अहितकर गोष्टी घडत राहतात. 

रज व तमाने मन युक्‍त झाले की याप्रकारे बुद्धी, धृती व स्मृती भ्रष्ट होतात, प्रज्ञेचा अपराध होतो व अनेक शारीरिक, मानसिक विकारांची सुरवात होते. यातून पुढे दुःख निर्माण होते व मनुष्य कर्मबंधनात अडकतो. 

या विवेचनावरून एक गोष्ट लक्षात येऊ शकते की सर्व चुकीची शारीरिक व मानसिक कर्मे प्रज्ञापराधामुळे घडतात, ज्यांचा आज ना उद्या त्रास झाल्याशिवाय राहात नाही. दुसऱ्याशी खोटे बोलता येते, स्वतःशी नाही, आत खरे काय आहे हे माहीत असताना बाहेर काहीतरी वेगळे सांगणे, चुकीचे बोलणे यामुळेही प्रज्ञापराध होऊ शकतो. चरकाचार्यांनी प्रज्ञापराधाची काही उदाहरणे दिलेली आहेत, 

मल, मूत्र, भूक, तहान वगैरे शारीरिक वेग बळजबरीने अडवून ठेवणे किंवा जबरदस्तीने प्रवृत्त करणे.
अति साहस करणे, स्वतःच्या आवाक्‍यापलीकडे जाऊन एखादे कार्य करणे.
 अतिमैथुन करणे.
 कर्मसमय अकारण वाया घालविणे म्हणजे ज्या वेळी जे काम करायला हवे ते न करता वेळ व्यर्थ घालविणे.
 पंचकर्मासारखे उपचार अयोग्य, अशास्त्रीय पद्धतीने करणे.
 विनयवृत्ती, सदाचार वगैरे मानसिक मूल्यांचा त्याग करणे.
 पूजनीय व्यक्‍ती, गुरुजनांचा अनादर वा अपमान करणे.
 चुकीचे आहे हे माहिती असूनही एखादी कृती करणे.
 मन उत्कंठित करणाऱ्या क्रिया अति प्रमाणात करणे.
 अवेळी, अयोग्य ठिकाणी भटकणे.
 चुकीचा व्यवहार करणाऱ्यांशी मैत्रीचे संबंध ठेवणे.
 मानसिक सद्‌वृत्ताचे पालन न करणे.
 ईर्ष्या, भय, क्रोध, लोभ वगैरे मनोविकारांच्या आहारी जाऊन चुकीची कर्मे करणे.
तेव्हा रोग होऊ नयेत यासाठी बुद्धी, धृती (संयमशक्‍ती) व स्मृती यांचा मिथ्यायोग होऊ न देणे महत्त्वाचे असते. पुढच्या आठवड्यात आपण इंद्रियांचा मिथ्यायोग म्हणजे काय हे पाहू.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com