श्री भगवान बुद्धप्रार्थना

डॉ. श्री बालाजी तांबे
Tuesday, 9 May 2017

बुद्धी, मेधा, आकलनशक्‍ती या सर्व गोष्टी मेंदू आणि मनाशी संबंधित असतात. त्यामुळे मेंदूचे भरणपोषण आणि मनाचे अनुशासन हे बुद्धिसंपन्नतेसाठी आवश्‍यक होय. मेंदूला जितकी ताकद मिळेल, मेंदूच्या प्रत्येक पेशीपर्यंत प्राणशक्‍तीचे संचरण जितक्‍या चांगल्या प्रकारे होऊ शकेल, तितकी मेंदूची, बुद्धीची कार्यक्षमता सुधारण्यास मदत मिळेल हे नक्की. यासाठी दीर्घश्वसन, प्राणायाम, ॐकार गुंजन यांचा नियमित सराव करणे उपयोगी पडते.

सांप्रत, कलियुगातील पहिल्या भागात श्री भगवान बुद्ध अवताराचे माहात्म्य आहे. बुद्धीची उपासना संपूर्ण जगात चालू आहे. त्यासाठी मेंदू आणि बुद्धीची काळजी घेणे महत्त्वाचे. 

‘बुद्धिमन्त हो, यशवंत हो’  हा आशीर्वाद सर्वांना हवाहवासा वाटणे स्वाभाविक आहे. जीवन सर्वार्थाने जगण्यासाठी शारीरिक, मानसिक आरोग्याबरोबरच बौद्धिक क्षमता उत्तम असायला हवी हे सर्वच मान्य करतील. बुद्धी म्हणजे फक्‍त हुशारी किंवा लक्षात ठेवण्याची शक्‍ती नाही, परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळविण्याची खुबीसुद्धा नाही. आयुर्वेदात बुद्धीचे अतिशय समर्पक वर्णन दिलेले आहे, 

निश्‍चयात्मिका धीः बुद्धिः ।
.... सुश्रुत शारीरस्थान 

एखाद्या विषयाचे, एखाद्या वस्तूचे निश्‍चित, नेमके व खरे ज्ञान करून देते ती ‘बुद्धी’ होय. एखादा विषय समजावला, पण तो तर्कसंगत नसला तर त्यातली विसंगती बुद्धीला समजेल. आकलन झालेल्या दोन परस्परभिन्न गोष्टींमधली नेमकी खरी कोणती याचा निर्णय फक्‍त बुद्धीच घेऊ शकते. उदा. अंधारात पडलेली दोरी कितीही सापासारखी भासली, तरी अखेरीस तो साप नसून दोरी आहे हे बुद्धी सांगू शकते. म्हणूनच स्मृतिजन्य ज्ञानाला बुद्धीच्या नेमक्‍या निश्‍चिततेची जोड असणे आवश्‍यक असते.

अन्यथा दोरीला साप समजून कारण नसता घाबरण्याची पाळी येऊ शकेल.
बुद्धीची व्याप्ती खूप मोठी आहे. व्यवहारात, रोजच्या जीवनक्रमात अनेकदा ‘द्विधा’ परिस्थिती उत्पन्न होते, मन एका क्षणी एक म्हणते तर दुसऱ्या क्षणी भलतीकडेच धावते. अशा वेळेला मोहाच्या आहारी न जाता योग्य निर्णय देण्याचे काम बुद्धीचे असते. अगदी साधे उदाहरण द्यायचे झाले, तर तापातून नुकत्याच उठलेल्या व्यक्‍तीला समोर आइस्क्रीम दिसले, तर खायची इच्छा होईल. मन आइस्क्रीमच्या मोहात पडेल, पण त्याच वेळेला बुद्धी त्याला ‘आता आइस्क्रीम खाणे बरोबर नाही’ हा निर्णय देईल आणि प्रज्ञापराध घडण्यास प्रतिबंध होईल. आयुष्यातल्या सगळ्याच लहान-मोठ्या गोष्टी, दिनक्रम, व्यवसाय वगैरे गोष्टीं ठरवताना, नातेसंबंधातून जाताना, आयुष्याची दिशा ठरवताना बुद्धीचा अचूक निर्णय गरजेचा असतो.

बुद्धीला पैलू
बुद्धीने आपले काम चोख बजावले तर आयुष्य जगणे किती तरी सोपे होईल. मात्र यासाठी प्रयत्न करणे क्रमप्राप्त असते. बुद्धीला पैलू पाडण्याचे काम काही अंशी तरी आपल्याला करावेच लागते. बुद्धी व मेधा (आकलनशक्‍ती) प्रगल्भ करण्यासाठी आयुर्वेदात काही उपाय सुचवले आहेत, 

सतताध्ययनं वादः परतन्त्रावलोकनं तद्‌ विद्याचार्य सेवा चेति बुद्धिमेधाकरो गणः । ...सुश्रुत चिकित्सास्थान

नियमित अभ्यास करणे, सहकाऱ्यांबरोबर किंवा मित्रमैत्रिणींबरोबर त्याबाबत चर्चा करणे, ज्या शास्त्राचा अभ्यास करावयाचा आहे, त्याला सहायक अशा इतर विषयांचे अवलोकन करणे, त्या शास्त्रातील पारंगत व्यक्‍तींची व आचार्यांची सेवा करणे यामुळे बुद्धि-मेधावर्धन होते. आजच्या आधुनिक काळात अशी गुरुजनांची, आचार्यांची प्रत्यक्ष सेवा करणे जरी शक्‍य झाले नाही तरी त्यांच्या उपदेशाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करणे, त्यांनी सांगितलेल्या मार्गावरून चालण्याचा प्रयत्न करणे, त्यांच्याबद्दल मनात आदराची भावना ठेवणे एवढे तरी नक्कीच करता येण्यासारखे आहे. बुद्धी, मेधा, आकलनशक्‍ती या सर्व गोष्टी मेंदू आणि मनाशी संबंधित असतात. त्यामुळे मेंदूचे भरणपोषण आणि मनाचे अनुशासन हे बुद्धिसंपन्नतेसाठी आवश्‍यक होय. 

मेंदू हा मज्जाधातूस्वरूप आणि शरीरातील अति महत्त्वाचा असा अवयव असतो. ‘प्राण’ ज्या अवयवाच्या आश्रयाने असतो, त्या मेंदूला प्राणशक्‍तीची अतिशय आवश्‍यकता असते. कोणत्याही कारणास्तव जर चार ते सहा मिनिटांपर्यंत मेंदूला प्राणवायू मिळाला नाही तर त्यामुळे मेंदूला गंभीर इजा पोचू शकते, मृत्यूही येऊ शकतो. म्हणूनच मेंदूचे कार्य व्यवस्थित होत राहावे असे वाटत असेल, तर केवळ प्राणवायूच नाही तर प्राणशक्‍तीचा पुरेसा पुरवठा मेंदूला होत राहण्याकडे लक्ष द्यायला हवे. ज्याप्रमाणे हाडांच्या आत मज्जाधातू असतो, त्याप्रमाणे डोक्‍याच्या कवटीच्या आत असणारा मेंदू हा मज्जाधातूच असतो. त्यामुळे मेंदूचे रक्षण करायचे तर मज्जाधातूला पोषण मिळण्याकडेही लक्ष द्यावे लागते. 

मेंदूच्या आरोग्यासाठी...
मधुर, शुक्रवर्धक, स्निग्ध द्रव्ये मज्जाधातूला पोषक असतात. त्यामुळे लोणी, तूप, दूध, खडीसाखर, पंचामृत, सुवर्ण वगैरे द्रव्ये मज्जाधातूसाठी हितकर समजली जातात. ज्या फळांच्या बीमध्ये बीजमज्जा असते ती फळे. विशेषतः फळातील बीजमज्जा धातूला पोषक असतात, उदा. बदाम, अक्रोड, जर्दाळू वगैरे. अस्थी, मज्जा, शुक्र वगैरे उत्तरोत्तर धातूंच्या पोषणासाठी विशेष आहारपदार्थांचे सेवन करणे अधिक जरूर असते. वरण-भात-भाजी-पोळी अशा नेहमीच्या आहारातून या उत्तरोत्तर धातूंचे हवे तेवढे पोषण होतेच असे नाही. म्हणून घरचे ताजे लोणी-खडीसाखर, तूप, बदाम वगैरे गोष्टी रोजच्या आहारात असणे, केशर, सोन्याचा वर्ख, शतावरी वगैरे बुद्धिवर्धक, स्मृतिवर्धक औषधांनी तयार केलेल्या ‘अमृतशतकरा’सह रोज पंचामृत घेणे, शंखपुष्पी, गुडूची, यष्टीमधू वगैरे मेधावर्धक द्रव्यांपासून तयार केलेली ‘ब्रह्मलीन सिरप’, ‘ब्रह्मलीन घृत’ अशी मध्ये रसायने घेणे, शतावरी कल्प, ‘चैतन्य’कल्प’ मिसळलेले एक-दोन कप दूध हे सर्व मज्जा पोषणासाठी तसेच मेंदूच्या आरोग्यासाठी उत्तम उपाय होत. 

व्यवहारात आपण ‘जडबुद्धी’ असा शब्दप्रयोग वापरतो. पण कुशाग्र बुद्धी हवी असेल तर मन व मेंदूला ज्या ज्या गोष्टींनी जडपणा येईल त्या सगळ्या टाळणे गरजेचे असते. उदा. दिवसा झोपल्याने, सकाळी फार उशिरा उठल्याने किंवा दिवसभर नुसतेच बसून राहिल्याने शरीर जड होऊन मन, बुद्धी वगैरेही निस्तेज व जड होऊ शकतात. त्यामुळे सुस्ती आणणारी जीवनशैली टाळणे, उलट सकाळी लवकर उठून तना-मनाला स्फूर्ती देईल, प्रेरणा देईल असा सूर्यनमस्कारासारखा व्यायाम करणे, मोकळ्या हवेत फिरायला जाणे, मेंदूला चालना देणाऱ्या, कल्पकतेला वाव देणाऱ्या गोष्टी करणे आवश्‍यक होय.

चेतासंस्था-मज्जासंस्था म्हणजे मेंदू, मेरुदंड आणि त्यातून संपूर्ण शरीराला चेतनेचा पुरवठा करणारे मज्जातंतू हे सर्व जितके संपन्न राहतील, तितकी मेंदूची कार्यक्षमता उत्तम राहण्यास हातभार लागत असतो. त्यादृष्टीने पाठीच्या कण्याला खालून वर या दिशेने प्रज्ञावर्धक व मज्जासंस्थेस बलदायक औषधांनी सिद्ध ‘कुंडलिनी तेला’चा अभ्यंग करणे उत्तम होय. मेंदूची ताकद वाढण्यासाठी रात्री झोपताना नाकात साजूक तुपाचे थेंब टाकणे, आठवड्यातून एक-दोन वेळा पादाभ्यंग करणे, डोक्‍याला- विशेषतः टाळूला ब्रह्मलीन तेलासारखे तेल लावणे हे सुद्धा मदत करणारे असते.

जितकी ताकद मिळेल, मेंदूच्या प्रत्येक पेशीपर्यंत प्राणशक्‍तीचे संचरण जितक्‍या चांगल्या प्रकारे होऊ शकेल, तितकी मेंदूची, बुद्धीची कार्यक्षमता सुधारण्यास मदत मिळेल हे नक्की. यासाठी दीर्घश्वसन, प्राणायाम, ॐकार गुंजन यांचा नियमित सराव करणे उपयोगी पडते. यांच्या सहयोगाने मन अनुशासित झाले, तर त्यामुळेही अचूक निर्णय घेणे आणि जीवनात कुठल्याही वळणार दुविधेत न पडता श्रेयसाचा अवलंब करणे शक्‍य होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article in Family Doctor by Dr. Shri Balaji Tambe