अग्र्यसंग्रह (श्रेष्ठत्व) ज्वर

डॉ. श्री बालाजी तांबे  www.balajitambe.com
Tuesday, 1 January 2019

ज्वर हा शरीर, इंद्रिये, तसेच मनालाही तापवतो. ज्वर सर्व रोगांचा प्रमुख असतो, बलवान असतो म्हणूनच अनादी कालापासून ज्वराला सर्व रोगांचा ‘प्रधान’ समजले जाते. सर्व प्राणिमात्रांच्या जन्माच्या व मरणाच्या वेळी ज्वर अवश्‍य असतोच, असेही म्हटलेले आहे. ज्वर उपचार करण्यास अवघड असतो, कारण त्याचे अनेक उपद्रव असतात. बल, वर्ण, उत्साह, हर्ष या सर्वांची हानी करणारा आणि श्रम, थकवा, अस्वस्थता, अग्निमांद्य निर्माण करणारा ज्वर सर्व रोगांचा प्रमुख समजला जातो.

ज्वर हा शरीर, इंद्रिये, तसेच मनालाही तापवतो. ज्वर सर्व रोगांचा प्रमुख असतो, बलवान असतो म्हणूनच अनादी कालापासून ज्वराला सर्व रोगांचा ‘प्रधान’ समजले जाते. सर्व प्राणिमात्रांच्या जन्माच्या व मरणाच्या वेळी ज्वर अवश्‍य असतोच, असेही म्हटलेले आहे. ज्वर उपचार करण्यास अवघड असतो, कारण त्याचे अनेक उपद्रव असतात. बल, वर्ण, उत्साह, हर्ष या सर्वांची हानी करणारा आणि श्रम, थकवा, अस्वस्थता, अग्निमांद्य निर्माण करणारा ज्वर सर्व रोगांचा प्रमुख समजला जातो.

अग्र्यसंग्रहात मागच्या वेळी तिन्ही दोषांमध्ये एकाच वेळी बिघाड होणे हे कसे दुःसह असते आणि उपचार करण्यासाठी अवघड असते हे पाहिले. आता या पुढचा भाग पाहू या.

ज्वरो रोगाणाम्‌ - ज्वर हा सर्व रोगांमध्ये प्रधान असतो.

आयुर्वेदात ज्वर या रोगाला खूप महत्त्वाचे समजले आहे, कारण त्यात ज्वराची व्याप्ती खूप मोठी केलेली आहे. सर्दीमुळे एक-दोन दिवस येणारा ताप हा जसा एक प्रकारचा ज्वर, तसा एकवीस दिवस सतत राहणारा ताप हा सुद्धा ज्वराचाच एक प्रकार असतो. ताप अंगात जिरला की त्यामुळे होणारे उपद्रव, निरनिराळ्या धातूंपर्यंत जाणारा ज्वर हे सुद्धा ज्वरातच समाविष्ट केलेले असतात. यामुळेच रोगनिदानाच्या सर्व ग्रंथांमध्ये ‘ज्वर’ हा पहिल्या क्रमांकाचा असतो आणि गुरुशिष्यपरंपरेनुसार आयुर्वेदाचे अध्ययन करताना असे समजले जाते की, एकदा ज्वर नीट समजला तर इतर सगळे रोग सहजतेने समजू शकतात. 

ज्वर सर्व रोगांमध्ये प्रधान का आहे हे चरकाचार्य पुढील सूत्रात सांगतात, 
देहेन्द्रियमनस्तापी सर्वरोगाग्रजो बली ।
ज्वरः प्रधानो रोगाणामुक्‍तो भगवता पुरा ।।
....चरक चिकित्सास्थान 

ज्वर हा शरीर, इंद्रिये तसेच मनालाही तापवतो. ज्वर सर्व रोगांचा प्रमुख असतो, बलवान असतो म्हणूनच अनादी कालापासून ज्वराला सर्व रोगांचा ‘प्रधान’ समजले जाते. 

सर्व प्राणिमात्रांच्या जन्माच्या व मरणाच्या वेळी ज्वर अवश्‍य असतोच असेही म्हटलेले आहे. ज्वर उपचार करण्यास अवघड असतो, कारण त्याचे अनेक उपद्रव असतात. बल, वर्ण, उत्साह, हर्ष या सर्वांची हानी करणारा आणि श्रम, थकवा, अस्वस्थता, अग्निमांद्य निर्माण करणारा ज्वर सर्व रोगांचा प्रमुख समजला जातो.

ज्वर केवळ मनुष्यालाच होतो असे नाही, तर पशू, पक्षी, एवढेच नाही तर वृक्षांनाही ताप येतो असा उल्लेख आयुर्वेदात आहे. ‘हस्ती-आयुर्वेद’ नावाच्या ग्रंथात निरनिराळ्या प्राणिमात्रांना होणाऱ्या ज्वरांना वेगवेगळ्या संज्ञा दिलेल्या आहेत. उदा. हत्तीच्या तापाला पालक, घोड्याच्या तापाला अभिताप, गाईच्या तापाला ईश्वर, शेळी-मेंढीच्या तापाला प्रलाप, म्हशीच्या तापाला हारिद्र, हरणाच्या तापाला मृगरोग, जलचर प्राण्यांच्या तापाला इंद्रमद, सापाच्या तापाला अक्षिक, पक्ष्यांच्या तापाला अभिघात, वृक्षाच्या तापाला कोटर असे म्हटले जाते. 

आयुर्वेदात ज्वराच्या उत्पत्तीची कथा सांगितली आहे. 

ज्वर शंकराच्या क्रोधातून निर्माण झाला आहे अशी पौराणिक कथा सापडते. सतीने श्रीशंकरांचा अपमान सहन न झाल्याने पिता दक्ष प्रजापतीने मांडलेल्या यज्ञात प्रवेश केला, तेव्हा श्रीशंकरांनी रौद्ररूप धारण करून आपल्या तृतीय नेत्रातून दक्ष प्रजापतीचा यज्ञ नष्ट करण्यासाठी संतप्त बाण तयार केला. या बाणाने यज्ञाच्या नाशासह पृथ्वीवर ज्वराची उत्पत्ती केली. 
ज्वर शब्द कशापासून आला हे पुढीलप्रमाणे सांगितले आहे,
ज्या वयोहानौ इत्यस्य धातोः औणादिके वर प्रत्यये सति ज्वर ।
....वाग्भट निदानस्थान

‘ज्या’ धातूचा अर्थ आहे आयुष्याचा नाश होणे. ज्या रोगामध्ये आयुष्याचा नाश होतो, आयुष्याचा ऱ्हास होतो तो ‘ज्वर’ होय. 
ज्वर शब्देन देहमनःसंतापकरत्वम्‌ ।
....चरक निदानस्थान
शरीर आणि मन दोहोंचा संताप करणारा तो ज्वर होय. 

ज्वराचे वातज, पित्तज, कफज असे एकेकट्या दोषांचे तीन प्रकार होतात. तिघांपैकी कोणत्यातरी दोन दोषांच्या समन्वयातून अजून तीन प्रकार होतात, ते म्हणजे, 
१. वातपित्तज ज्वर
२. वातकफज ज्वर
३. कफपित्तज ज्वर 

जसे दोन दोषांच्या बिघाडापासून ज्वर होऊ शकतो, तसाच तो तिन्ही दोषांच्या बिघाडापासूनही होऊ शकतो. या ज्वराला सान्निपातिक ज्वर असे म्हणतात. हा सर्व प्रकारच्या ज्वरांमध्ये अवघड समजला जातो, बऱ्याचदा असाध्यतेकडे पोचणारा असतो. ‘सान्निपातिक’ शब्दाने तिन्ही दोषांचा संबंध स्पष्ट होत असला तरी त्यात कोणता दोष मुख्य, कोणता दोष मध्यम व कोणता दोष मंद यावरून त्याचे पुन्हा उपप्रकार होतात. निरनिराळ्या ग्रंथांमध्ये यांची नावे थोड्या फरकाने निरनिराळी दिलेली असली तरी ते संख्येने तेरा असतात. 

ज्वर जसा शरीरातील बिघाडामुळे, वात-पित्त-कफ दोषांच्या असंतुलनामुळे होतो, तसाच कधी कधी बाह्य कारणांमुळेही होऊ शकतो. याला ‘आगन्तु ज्वर’ म्हणतात. आगन्तु ज्वराचेही चार प्रकार सांगितलेले आहेत. 
१. अभिघातज ज्वर - अभिघात म्हणजे आघात होणे, मार लागणे.
२. अभिषंगज ज्वर - काम, शोक, भय वगैरे मानसिक कारणांमुळे येणारा ज्वर.
३. भूताभिषंगज ज्वर - ग्रहबाधा किंवा अदृष्ट शक्‍तींमुळे होणारा ज्वर.
४. अभिचारज ज्वर - जारण-मारण वगैरे प्रयोगांमुळे येणारा ज्वर.
    ज्वर जेव्हा एका विशिष्ट धातूच्या आश्रयाने होतो, तेव्हा त्याला ‘धातुगत ज्वर’ असे म्हणतात. धातू सात असल्याने धातुगत ज्वरही सात असतात. 

याशिवाय अंतर्वेगी, बहिर्वेगी, विषमज्वर, त्याचे पुन्हा पाच प्रकार याप्रकारे ज्वराचे अनेक निरनिराळे प्रकार असतात. आणि म्हणूनच ज्वर सर्व रोगांमध्ये मुख्य समजला जातो. 
अग्र्यसंग्रहातील यापुढची माहिती पुढच्या वेळी पाहू.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article on Fever