यकृत

यकृत

पचनक्रिया व्यवस्थित होण्यासाठी महत्त्वाचे योगदान असणारा एक अवयव म्हणजे यकृत. म्हणूनच शरीरस्थ अग्नी किंवा जाठराग्नीचे फक्‍त रक्षण करणे, त्याची नीट काळजी घेणे आपल्या हातात असते. बिघडलेल्या अग्नीला पूर्ववत करणे तितके सोपे नसते, त्याचप्रमाणे यकृताची कार्यक्षमता टिकून राहील यासाठी अगोदरपासून दक्ष राहणे आवश्‍यक असते. 

‘आपल्याला दारूचे व्यसन नाही, त्यामुळे आपल्याला यकृताचा रोग व्हायची भीती नाही’ असे सर्वसामान्यांच्या मनात सहसा ठसलेले असते. मात्र यकृताची कार्यक्षमता कमी होण्यामागे याव्यतिरिक्‍त अनेक कारणे असू शकतात. 
आयुर्वेदानुसार यकृत रक्‍तापासून तयार झालेले असते आणि ते रक्‍तवहस्रोतसाचे मूळ असते. यकृत हे पित्ताचेही स्थान असते. 
पित्तस्य यकृत-प्लीहानौ 
हृदयं दृष्टिस्त्वक्‌ पूर्वोक्‍तं च ।
...सुश्रुत सूत्रस्थान

यकृत, प्लीहा (स्प्लीन), हृदय, डोळे, त्वचा ही पित्ताची महत्त्वाची स्थाने होत.
पित्ताच्या पाच प्रकारांपैकी रंजक पित्त हे विशेषतः यकृतात राहते आणि रसधातूला रंग देऊन रक्‍त तयार करते, असेही आयुर्वेदात समजावलेले आहे. एकंदर पाहता यकृताचा आणि रक्‍ताचा खूप जवळचा संबंध असलेला दिसतो. प्रत्यक्षातही यकृतामध्ये बिघाड झाला तर त्यामुळे रक्‍त कमी होणे, रक्‍तातील दोषामुळे त्वचारोग होणे वगैरे होताना आढळते. आहाराचे पचन झाल्यावर जो आहाररस तयार होतो, तो सुद्धा सर्वप्रथम यकृताकडे जातो आणि नंतरच सर्व शरीराचे पोषण होते. थोडक्‍यात, खाल्लेल्या अन्नाचे पचन व्यवस्थित होण्यासाठी आणि नंतर त्याचे शरीरधातूत रूपांतर होण्यासाठी यकृताचे योगदान महत्त्वाचे असते. शरीरातील अनावश्‍यक गोष्टींचा, विषद्रव्यांचा निचरा करण्याची जबाबदारीही यकृतावर असते. विषद्रव्ये, रासायनिक द्रव्ये, खाद्यपदार्थातील अनैसर्गिक रंग वगैरेचा यकृतावर ताण येतो आणि यातून पुढे यकृतासंबंधी समस्या उद्‌भवू शकतात. 

यकृत बिघडते केव्हा?
यकृतामध्ये बिघाड होण्यामागे पुढील कारणे असू शकतात. 
 पचण्यास जड, तेलकट, चरबीयुक्‍त पदार्थांचे अतिसेवन करणे. 
 अस्वच्छ पाणी किंवा दूषित खाद्यपदार्थांचे सेवन करणे.
 रासायनिक पदार्थांचा अंतर्भाव असणारी पेये, खाद्यपदार्थ किंवा औषधांचे अति प्रमाणात सेवन करणे.
 पित्तदोषाचा प्रकोप करणाऱ्या गोष्टी करणे, उदा. चिडचिड, राग, शोक, भीती वगैरे मानसिक वेगांच्या आहारी जाणे; अति शारीरिक श्रम करणे; कमी खाणे किंवा पूर्ण उपवास करणे; अति मैथुन, तिखट, आंबट, खारट, तीक्ष्ण, उष्ण वगैरे अन्न सेवन करणे; रोज जागरण करणे; तीळ तेल, कुळीथ, मोहरी, पुदिना, लसूण, कांद्याची पात, दही, कांजी, मद्य, आंबट फळे यांचे सेवन करणे.
 रक्‍तवहस्रोतस बिघडविणाऱ्या गोष्टी, उदा. जळजळ करणारे अन्न-पेय सेवन करणे, अतिशय उष्ण, स्निग्ध आणि द्रव गोष्टींचे सेवन करणे, ऊन किंवा वाऱ्याचा फार संपर्क येणे.
 वजन फार जास्ती असणे, बऱ्याच वर्षांचा मधुमेह असणे.
 दीर्घकालीन व्याधीवर उपचार करताना फार दिवस तसेच फार तीव्र स्वरूपाची औषधे घ्यावी लागणे.
 रक्‍तामध्ये ट्रायग्लिसेराईड्‌चे प्रमाण जास्ती राहणे.
 रोजच्या दिनक्रमात व्यायाम, योगासने, चालायला जाणे वगैरेंचा अंतर्भाव नसणे, त्यामुळे अग्नी मंदावणे.
 यकृताला बिघडवू शकणाऱ्या विशिष्ट विषाणूंचा शरीरात प्रवेश होणे. 
 अंमली पदार्थांचे सेवन करणे.
 मलावष्टंभाची जुनी तक्रार असणे व त्यावर योग्य उपचार न करणे. 
 अंडी, मांसाहार, विशेषतः आकार वा वजन वाढण्यासाठी अनैसर्गिक उपचार केलेल्या मांसाचे सेवन करणे. 

यकृताची शुद्धी
वर उल्लेख केल्याप्रमाणे, शरीरातील अनावश्‍यक गोष्टींचा, विषद्रव्यांचा निचरा करण्याचे काम यकृत करत असते. म्हणून एका बाजूने विषद्रव्य शरीरात जाणार नाहीत यासाठी प्रयत्न करणे आणि दुसऱ्या बाजूने वेळच्या वेळी शरीरशुद्धी करून यकृताला मदत करणे हे यकृताच्या आरोग्याला सहायक ठरणारे असते. यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने पंचकर्म करून घेणे, विशेषतः विरेचन, बस्तीसारखे उपचार करून घेणे हे उत्तम असते. 

शास्त्रशुद्ध पंचकर्मात अगोदर औषधी तूप पाजून, अभ्यंग, स्वेदन करून संपूर्ण शरीरात पसरलेली, पेशींमध्ये घर करून राहिलेली विषद्रव्ये सुटी केली जातात, कोठ्यामध्ये आणली जातात आणि तेथून वमन किंवा विरेचनाच्या मदतीने शरीराबाहेर काढता येतात. अर्थात यामुळे यकृताची शुद्धी तर होतेच, पण  यकृताच्या विषद्रव्यांचा निचरा करण्याच्या कामात मोलाचा मदत मिळते.

यकृतावर ताण येणार नाही यासाठी आहार-आचरणात काळजी घेणे चांगले असतेच, पण यकृतावर अतिरक्‍त भार येतो आहे हे दर्शविणारी लक्षणे उद्भवत नाहीत ना याकडेही लक्ष ठेवता येते. उदा. यकृताच्या ठिकाणी म्हणजे उजव्या बाजूच्या स्तनाच्या खाली, बरगड्यांच्या

आतल्या बाजूला किंवा नाभीच्या वरच्या बाजूला मंद मंद दुखत असले, कधीतरी तीव्र वेदना होत असल्या तर ते यकृतातील बिघाडाचे निदर्शक लक्षण असू शकते. या व्यतिरिक्‍त भूक न लागणे, तोंडाची चव बिघडणे, अन्नावर वासना न होणे, काम न करता किंवा थोडेसे काम करूनही फार थकवा जाणवणे, त्वचेवर तसेच डोळ्यांमध्ये किंचित पिंगट छटा दिसणे, लघवी गडद रंगाची होणे, पायांवर, विशेषतः घोट्याच्या भोवती सूज येणे, अंगावर कुठेही खाज येणे, वजन कमी होणे, निरुत्साह वाटणे यासारखी लक्षणे दिसू लागली तर ती यकृतातील अशक्‍ततेची किंवा यकृतरोगाची असू शकतात.

हे कराच! 
तेव्हा यापैकी कोणतीही लक्षणे जाणवली तर लवकरात लवकर तज्ज्ञांचा सल्ला घेणे, जीवनशैलीमध्ये यकृताला हितकर ठरतील असे बदल करणे, खाणे शुद्ध, ताजे व प्रकृतीला अनुकूल घेण्याचा प्रयत्न करणे, वैद्यांच्या सल्ल्याने नेमकी औषधे सुरू करणे चांगले होय. नेमके निदान करून घेण्यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली रक्‍ताची तपासणी सुद्धा करून घेता येते. बऱ्याचदा थोडा व्यायाम, योगासने सुरू केली, आहारात बदल केला, वजनावर नियंत्रण आणले की नुकतीच दिसू लागलेली लक्षणे नाहीशी होतात असे दिसते. मुळात यकृतासंबंधी दोष निर्माण होऊ नयेत यासाठी प्यायचे पाणी वीस मिनिटे उकळून घ्यावे, केवळ फिल्टर केलेले पाणी उकळलेल्या पाण्याप्रमाणे सुरक्षित नसते. शक्‍यतो कोमट पाणी पिणे, उघड्यावरचे, स्वच्छतेची व ताजेपणाची व प्रतीची खात्री नसलेले अन्न खाणे टाळणे चांगले. जेवणाच्या वेळा नियमित असण्यावर भर देणे. विशेषतः रात्री लवकर व पचण्यास सोपे अन्न घेणे, आठवड्यातून एक दिवस रात्रीच्या जेवणाला सुट्टी देणे आणि पचनसंस्थेला व यकृताला शिल्लक राहिलेले काम पूर्ण करण्यास वाव देणे, पंधरा दिवसांतून एकदा त्रिफळा चूर्ण किंवा एरंडेल तेल घेऊन दोन-तीन जुलाब होऊन पोट साफ करणे, कृत्रिम प्रिझर्वेटिव्हज्‌ टाकलेली खाद्य-पेय पदार्थ टाळणे, रासायनिक द्रव्यांनी युक्‍त औषधे, उत्पादने टाळणे, चालणे, पोहणे, वगैरे प्रकृतीला साजेसा व्यायाम, तसेच योगासने, अनुलोम-विलोम नियमितपणे करणे हे सर्व यकृताची कार्यक्षमता उत्तम राहावी यासाठी उपयुक्‍त असतात. 
पुढच्या अंकात आपण यकृताची कार्यक्षमता चांगली राहण्यासाठी आणि सुधारण्यासाठी आयुर्वेदाने सुचविलेली साधी औषधे, घरगुती उपचार यांची माहिती घेणार आहोत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com