हनुमान - प्राण

Pranayam
Pranayam

आरोग्य व प्राण यांचा खूप जवळचा परस्परसंबंध आहे. आरोग्य टिकविणे म्हणजेच प्राणाचे रक्षण करणे आणि रोग बरा करणे म्हणजेच कमी झालेल्या प्राणशक्‍तीला पुन्हा पूर्ववत करणे. तेव्हा श्री हनुमंतांच्या साक्षीने प्राण-उपासना म्हणजेच प्राणायाम करण्याचा निश्‍चय केला तर ते आरोग्यरक्षण, रोगनिवारणासाठी उचललेले पहिले पाऊल असेल.

आज आहे श्री हनुमान जयंती. श्री हनुमान हे पवनपुत्र म्हणजे वायुदेवतेचे पुत्र. पिंड-ब्रह्मांड न्यायानुसार वायू जसा बाह्यसृष्टीला व्यापून असतो, तसाच शरीरातही असतो, ज्याला आयुर्वेदात ‘वात’ म्हणून संबोधले जाते.

वातरोग, वातदोष यातील वात म्हणजे बिघडलेला वात, मात्र संतुलनात असणारा वात शरीरधारणेसाठी, शरीराची सर्व कामे व्यवस्थित होण्यासाठी, मनसंतुलनासाठी, इंद्रियांच्या सक्षमतेसाठी, प्राणधारणेसाठी जबाबदार असतो. वाताच्या पाच प्रकारांपैकी सर्वांत महत्त्वाचा ‘प्राणवायू’ हाच असतो. श्री हनुमंतांच्या जयंतीच्या निमित्ताने आज आपण प्राण संकल्पना व प्राणायाम याविषयी जाणून घेऊ या. 

चरकसंहितेत एका ठिकाणी म्हटलेले आहे, 
सर्वां हि चेष्टा वातेन स प्राणः प्राणिनां स्मृतः ।
तेनैव रोगा जायन्ते तेन चैवोपरुध्यते ।।
...चरक सूत्रस्थान 

प्राकृत अवस्थेतील वात सर्व शारीरक्रिया करतो म्हणून ‘प्राण’ म्हणवला जातो. परंतु हाच वात बिघडला तर रोग निर्माण करतो, एवढेच नाही तर मृत्यूलाही कारणीभूत ठरतो. पंचप्राण म्हणताना त्यात प्राण, उदान, व्यान, समान व अपान या पाच वात प्रकारांचा समावेश होतो. 

प्राण आहे तोपर्यंत जीवन आहे. आणि त्यासाठी पंचप्राण सुस्थितीत असणे आवश्‍यक आहे.  

प्राणवायूचे कार्य श्‍वास आत घेणे व जीवन चैतन्यमय ठेवणे. खरे पाहिले तर जो वायू शरीरात प्राणाला ओढून आणतो, त्यालाच ‘प्राणवायू’ म्हणतात. तसेच अन्न तोंडात घातल्यानंतर ते आत ओढून पोटापर्यंत पोचवणे हे काम पण प्राणवायूचेच आहे. प्राणवायूचे मुख्य आधारस्थान डोके असून कर्मस्थान कंठ व छाती होय. याखेरीज हृदय, इंद्रिये, बुद्धी व मन यांना कार्यरत ठेवण्याचे व स्वास्थ्य कायम ठेवण्याचे काम प्राणवायूचे आहे. याच्या उलट अपान वायूचे आधारस्थान कमरेच्या खालील भागात असून त्याचे संचारस्थान मलाशय, मूत्राशय, लिंग, वृषण, मांडी अशा ठिकाणी असते. याची गती खालील दिशेला असते. मलविसर्जन, शुक्रस्खलन, स्त्रीमध्ये रजोस्राव वगैरे क्रिया अपानवायूच्या अधीन असतात. दैनंदिन जीवनात या वर जाणाऱ्या व खालच्या दिशेत काम करणाऱ्या शक्तीचे संतुलन फार महत्त्वाचे ठरते. 

यावद्‌ वायुः स्थितो देहे तावज्जीवनमुच्यते । 
तस्य निष्क्रान्तिस्ततो वायुं निरोधयेत्‌ ।।
......हठयोगप्रदीपिका

जोपर्यंत वायू म्हणजे प्राण शरीरात आहे तोपर्यंत जीवन आहे आणि प्राणाचे सोडून जाणे म्हणजे मृत्यू. म्हणून प्रत्येकाने प्राणनियंत्रण म्हणजे प्राणायामाचा अभ्यास करावा.

हठयोगप्रदीपिकेत असेही म्हटलेले आहे की 
प्राणायामेन युक्‍तेन सर्वरोगक्षयो भवेत्‌ ।
अयुक्‍ताभ्यासयोगेन सर्वरोगस्य सम्भवः ।।
......हठयोगप्रदीपिका

प्राणायामाच्या योग्य अभ्यासाने सर्व रोगांचा नाश होतो, पण चुकीच्या प्राणायामामुळे सर्व रोग उत्पन्न होतात.

महामुनी पतंजलींच्या अष्टांग योगपद्धतीत प्रथम यम-नियम व त्यानंतर आसन-प्राणायाम यांचा अभ्यास करावा असे सांगितले आहे. प्राणायामाचा अभ्यास करण्यापूर्वी चार गोष्टींची तयारी करणे किंवा काळजी घेणे फार आवश्‍यक आहे. त्या चार गोष्टी म्हणजे स्थळ, ऋतू काळ, मिताहार व नाडीशुद्धी. 

१. स्थळ - प्राणायाम करण्यासाठी जागा स्वच्छ, सपाट, गरम किंवा खडबडीत नसलेली, गोंगाट नसणारी, जवळपास जलाशय असणारी, मनाला प्रसन्न करणारी, डोळ्यांना सुखद अशी असावी. जलाशयाच्या एकदम समोर न बसता मध्ये भिंतीसारखा अडथळा असावा. लहान, मोठे प्राणी त्या ठिकाणी येणार नाहीत असे संरक्षण असावे. फार उंच नाही व फार सखल नाही, ज्या ठिकाणी कीटक, मुंग्या, मच्छर नाहीत अशा जवळ जवळ एकांत स्थानी प्राणायामाचा अभ्यास चांगल्या रीतीने करता येतो.

२. काळ, ऋतू - योगाभ्यासाचा आरंभ कोणत्या ऋतूत करू नये हे शास्त्राने स्पष्ट सांगितलेले आढळते. अभ्यास नियमित सुरू झाला की बारा महिने योगाभ्यास व प्राणायाम करता येतो.

हेमन्ते शिशिरे ग्रीष्मे वर्षायां च ऋतौ तथा ।
योगारम्भात्‌ न कुर्वीत कृते योगे हि रोगदः ।।

हेमंत, शिशिर, ग्रीष्म, वर्षा या ऋतूत योगाभ्यासाची सुरवात करू नये. त्यामुळे रोग होतात. 

त्यामुळे वसंत व शरद ऋतूत योगाभ्यासाची सुरवात करावी. प्रातःकाळी सूर्योदयापूर्वीचा काळ, माध्यान्ह काळ (म्हणजे साधारणतः १० ते १२), सायंकाळी सूर्यास्तापूर्वीची वेळ आणि अर्धरात्रीचा समय प्राणायामासाठी चांगला असतो.

३. मिताहार - स्वतःच्या प्रकृतीस अनुरूप, अल्प व संतुलित आहार म्हणजे मिताहार. अल्प आहार या शब्दावरूनच अल्पोपहार म्हणजे नाश्‍ता हा शब्द रूढ झालेला आहे. अल्प म्हणजे नुसता कमी प्रमाणात असा अर्थ नसून, पचायला सोपा  सात्त्विक आहार हा अर्थ पण अभिप्रेत आहे. आहार स्वाद, सुगंधयुक्‍त, धातुपुष्टी करणारा आणि मुख्यतः मनाला आवडणारा असावा. मिताहार न करता जास्त खाऊन योगाभ्यास केला तर सफलता न मिळता वेगवेगळे रोग होतात. 

४. नाडीशोधन - इंद्रिये आपापल्या बाह्य जगतातील विषयांकडे शक्‍ती खेचत राहतात. तसेच एकूणच आहार, विहार व शारीरिक क्रिया संतुलित राहात नाहीत, त्यामुळे मलसंचय तर होतोच, पण शक्‍तिसंचाराचे मार्गही अवरुद्ध होतात. मध्यमार्गाने सुषुम्नेतून जाणारा प्राण डाव्या, उजव्या बाजूला आकर्षित होऊन आपल्या लक्ष्याकडे जाऊ शकत नाही. इंद्रियनिग्रह, ब्रह्मचर्य, लोम-विलोम, म्हणजेच नाडीशोधन. प्राणायाम करून नाडीशुद्धी करणे आवश्‍यक असते. 

प्रत्यक्ष प्राणायाम : पूरक-रेचक-कुंभक
प्राणायामासाठी स्थिर सुखासन म्हणजे पद्मासनात बसणे उत्तम मानले गेले आहे, पण साध्या सुखासनात बसूनही प्राणायाम करता येईल. पद्मासनामध्ये मेरुदंडाचा जमिनीला स्पर्श न झाल्याने त्यावर भार येत नाही. पाठीचा कणा ताठ ठेवून बसावे, दृष्टी समोर राहील अशी मान ठेवावी, डोळे पूर्ण बंद न करता नासिकाग्रावर म्हणजे नाकाच्या शेंड्यावर दृष्टी असावी (अर्धोन्मीलित). 

डाव्या नाकपुडीतून श्‍वास आत घेणे व उजव्या नाकपुडीतून बाहेर सोडणे (किंवा याच्या उलट) ही क्रिया करण्यासाठी नाकपुड्या उजव्या हाताचा अंगठा, करांगुली व अनामिका या तीन बोटांचा उपयोग करून (मध्यमा व तर्जनी उपयोगात आणू नये) नाकावर भार न येईल अशा पद्धतीने नाकपुडी बंद करावी.

पूरक -श्वास घेण्याच्या क्रियेला पूरक म्हणतात. सहसा श्वास घेण्याची क्रिया आपसूकच घडत असते.

रेचक - म्हणजे नाकाने श्वास बाहेर सोडणे. पोटाचे किंवा जणू सर्व शरीराचेच आकुंचन करून संपूर्ण श्वास बाहेर जाईल असे प्रयत्नपूर्वक करणे.
कुंभक - पूरक झाल्यानंतर श्वास आत कोंडून ठेवणे म्हणजे अंतर्कुंम्भक व रेचनानंतर ताबडतोब पूरक न करता थांबणे हा बहिर्कुम्भक. 
पूरक-कुंभक-रेचक करण्याचा काल म्हणजे मात्रा साधारणतः १पूरक ः ४कुंभक ः२रेचक ही उत्तम मानली जाते. म्हणजे थोड्याशा घेतलेल्या श्वासाला शरीरात शक्‍ती देण्यासाठी जास्तीत जास्त वेळ देणारा कुंभक व नंतर पूरकापेक्षा दुप्पट वेळ देऊन प्रयत्नपूर्वक अशुद्ध हवा बाहेर टाकणारा रेचक. पण सुरवातीला १पू. ः १ कुं. ः २ रे. या मात्रेत अभ्यास केल्यास सोपे जाते. आणि नंतर कुंभकाची मात्रा वाढवता येते. श्वास घेताना नासिकाग्रापासून खाली मूलाधारापर्यंत श्वास घेणे व श्वास सोडताना पुन्हा पूर्ण नासिकाग्रापर्यंत संपूर्ण श्वास बाहेर सोडणे या क्रियेवर पूर्ण लक्ष ठेवावे लागते.

प्राणायाम करताना सावधानता - प्राणायामापूर्वी दीर्घ श्वसनाचा म्हणजे सावकाशपणे खोल श्वास घेऊन नंतर पुन्हा सावकाश सोडण्याचा अभ्यास करणे चांगले. झटपट काही अनुभव व गुण येईल असे नाही, त्यामुळे किंवा वेळेच्या अभावी जलद वेगाने श्वास-प्रश्वास करणे टाळणे आवश्‍यक. रक्‍तदाब, हृद्रोग असणाऱ्यांनी योग्य मार्गदर्शनाखाली प्राणायाम करणे श्रेयस्कर. नाक चोंदलेले असल्यास किंवा कफाने भरलेले असल्यास जलनेती वगैरे करून नंतर प्राणायाम करावा. 

‘प्राण’ हा शब्द आपण एकवचनी वापरत असलो तरी आयुर्वेदात ‘द्वादश प्राण’ सांगितले आहेत. अग्नी, सोम, वायू, सत्त्व, रज, तम, पाचही ज्ञानेंद्रिये आणि आत्मा असे बारा प्राण होत. ही बाराही तत्त्वे अशी आहेत की ज्यांच्यामुळे शरीर चैतन्यमय राहते, शारीरिक, बौद्धिक, मानसिक कामे (कार्यशक्‍ती) होण्यासाठी हीच बारा तत्त्वे जबाबदार असतात. म्हणूनच आयुर्वेदाने यांना ‘प्राण’ ही उपाधी दिलेली आहे. प्राणाला उद्देशून वेद-वाङ्मयात प्रार्थनाही आहेत. औषध कितीही प्रभावी असले, उपचार कितीही योग्य असले तरी त्यांचा लाभ प्राण असेपर्यंतच होऊ शकतो. म्हणून अथर्ववेदात प्राणालाच आवाहन केलेले सापडते, 

आथर्वणीः आंगिरसीः दैवीर्मनुष्यजां उत ।
ओषधयः प्रजायन्ते यदा त्वं प्राण जिन्दसि ।।
...अथर्ववेद

हे प्राण, जोपर्यंत तू प्रेरणा देतो आहेस, तोपर्यंतच आथर्वणी (जप, होम, दान, स्वस्तिवचन वगैरेंच्या साहाय्याने केले जाणारे उपचार), आंगिरसी (मानसिक शक्‍तीशी संबंधित उपचार), दैवी (वायू-जल-पृथ्वी वगैरेंच्या माध्यमातून केले जाणारे उपचार), मानुषी (औषधांच्या साहाय्याने केले जाणारे उपचार) वगैरे उपचारांचे फळ मिळते. प्राण असतात तोपर्यंतच औषधांचा लाभ होऊ शकतो. 

आरोग्यरक्षणासाठी प्राणाने उत्तम सहयोग द्यावा, यासाठीही काही प्रार्थना दिलेल्या आहेत, 

या ते प्राण प्रिया तनूर्या ते प्राण प्रेयसी ।
अथो यद्‌ भेषजं तव तस्य नो धेहि जीवीसे ।।

हे प्राणा, जे तुझे प्रिय शरीर आहे, जे तुझे प्रिय भाग आहेत व जे तुझे औषध आहे ते तू दीर्घजीवनासाठी आम्हाला दे. 

थोडक्‍यात काय तर सर्व शक्‍तिनिशी हे प्राणा, तू आम्हाला आरोग्याचे दान दे, आरोग्यप्राप्तीसाठी मदत कर. म्हणजेच आरोग्य व प्राण यांचा खूप जवळचा परस्परसंबंध आहे. आरोग्य टिकविणे म्हणजेच प्राणाचे रक्षण करणे आणि रोग बरा करणे म्हणजेच कमी झालेल्या प्राणशक्‍तीला पुन्हा पूर्ववत करणे.
तेव्हा श्री हनुमंतांच्या साक्षीने प्राण-उपासना म्हणजेच प्राणायाम करण्याचा निश्‍चय केला तर ते आरोग्यरक्षण, रोगनिवारणासाठी उचललेले पहिले पाऊल असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com