अग्र्यसंग्रह

डॉ. श्री बालाजी तांबे  www.balajitambe.com
Friday, 13 April 2018

उपचाराचा किंवा आरोग्यरक्षणाचा नेमका उद्देश एकदा ठरला की, तो अधिकाधिक पूर्ण होण्यासाठी अग्र्यसंग्रहाचा आधार घ्यावाच लागतो. ऊस, जांभळे, कुळीथ, जव यांचा यासाठी उपयोग करता येतो.

चरकसंहितेतील ‘अग्र्यसंग्रह’ हा एक असा विभाग आहे की जो संपूर्ण आयुर्वेदाचा साररूप आहे असे म्हणता येईल. उपचाराचा किंवा आरोग्यरक्षणाचा नेमका उद्देश एकदा ठरला की, तो अधिकाधिक पूर्ण होण्यासाठी अग्र्यसंग्रहाचा आधार घ्यावाच लागतो. मागच्या वेळी आपण रानहरिख हे शरीरात कोरडेपणा हवा असेल तेव्हा योजना करण्यासाठी उत्तम असतो असे पाहिले. आता आपण पुढची माहिती घेऊ.

इक्षुर्मूत्रजननानाम्‌ - म्हणजे लघवीचे प्रमाण वाढविण्याऱ्या द्रव्यांमध्ये ऊस अग्रणी असतो. म्हणून उन्हाळ्यात शरीरातील रसधातू क्षीण होतो तेव्हा लघवी कमी होणे, जळजळणे वगैरे त्रास टाळता येतात. 

मधुरः मधुरविपाकः गुरुः शीतः स्निग्धः बल्यः वृष्यः मूत्रलः रक्‍तपित्तप्रशमनः कृमिकफकरश्‍च ।।
....सुश्रुत सूत्रस्थान

ऊस चवीला गोड असतो, विपाकाने मधुर, वीर्याने शीत, पचायला जड, शरीराला उचित तेवढी स्निग्धता देणारा, ताकद वाढविणारा, शुक्रधातूला पोषक, लघवी साफ करणारा असतो. रक्‍तपित्त म्हणजे नाक, मुख, मूत्रमार्ग वगैरे शरीरातील द्वारांवाटे रक्‍तस्राव होणाऱ्या रोगावर औषध म्हणून काम करतो. अतिप्रमाणात घेतल्यास मात्र कफदोष वाढविणारा व जंत तयार करणारा असतो.

उसाची एवढी प्रशस्ती केलेली असली तरी आयुर्वेदात ऊस दाताने चावून खाणे अधिक गुणकारी असते असे सांगितले आहे. ऊस दाताने चावून खाल्ल्यावर आलेल्या रसामुळे वातदोष व पित्तदोष कमी होतात, शुक्रधातूचे पोषण होते तसेच शरीरातील प्राकृत कफ परिपोषित होण्यास मदत मिळते. या उलट यंत्राच्या मदतीने व स्वच्छतेची काळजी न घेता काढलेला रस पचायला जड होतो, जळजळ व मलावष्टंभ करतो. 

यवाः पुरीषजननाम्‌ - म्हणजे यव हे मलभाग (विष्ठा) उत्पन्न करणाऱ्या द्रव्यांत श्रेष्ठ असतात. जव हे धान्य अनेक रोगांवर औषधाप्रमाणे उपयोगी पडणारे असते. विशेषतः मलप्रवृत्ती बांधून होण्यासाठी आणि मलनिःसारण सहजपणे होऊ शकेल यासाठी योग्य प्रमाणात तयार होण्यासाठी जवाचा आहारात समावेश करता येतो.

मेदप्रमेहपीनसश्वासकासोरुस्तम्भकण्ठामयत्वग्रोगघ्नश्‍च ।

जव मेद कमी करण्यासाठी उत्तम असतात. प्रमेह, जुनाट कंठरोग, दमा, खोकला, उरुस्तंभ (मांड्या जखडणे), कंठरोग, त्वचारोग यामध्ये जव अतिशय पथ्यकर असतात. याशिवाय जव त्वचेसाठी हितकर असतात, जवाच्या पिठाचा लेप फेसपॅकप्रमाणे करता येतो. 

जव, बोरे आणि कुळीथ यांचे कढण घशासाठी, आवाजासाठी चांगले असते तसेच वातशमनासाठी उत्तम असते.

जाम्बवं वातजननाम्‌ - म्हणजे वातदोष वाढविणाऱ्या (फळांमध्ये) जांभूळ श्रेष्ठ होय. तुरट रस वात वाढविणारा असतो आणि जांभूळ तुरट चवीचे असल्यामुळे वात वाढवते. 

मधुरः अम्लः कषायः शीतो रुच्यो ग्राहि पित्तकफघ्नो भृशवातलः ।।
...चरक सूत्रस्थान

जांभळे चवीला आंबट, गोड, तुरट असतात, वीर्याने थंड, जिभेला रुची आणणारी, मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करणारी, पित्तदोष व कफदोष कमी करणारी आणि बऱ्याच प्रमाणात वातूळ असतात. 

तुरट चवीमुळे मधुमेही व्यक्‍तींमध्ये जांभूळ लोकप्रिय असले किंवा मधुमेही व्यक्‍तींनी जांभळाचा रस घेण्याची, जांभळाच्या बियांचे चूर्ण घेण्याची पद्धत रूढ होत असली तरी त्यामुळे शरीरात वात वाढणार आहे हे विसरून चालत नाही. रक्‍तातील साखर कमी आढळली तरी वातामुळे मूळ रोगात भर पडू शकते, धातूंची ताकद कमी होऊन इतर समस्याही उद्‌भवू शकतात. 

शष्कुल्यः श्‍लेष्मपित्तजननाम्‌ - शष्कुली पदार्थ कफदोष व पित्तदोष वाढविणाऱ्या द्रव्यांत श्रेष्ठ आहे.  

शष्कुली हे एका पाककृतीचे नाव आहे. तांदळाच्या पिठाच्या पुरीमध्ये गूळ व तिळाचे सारण घालून करंजीप्रमाणे आकार देऊन तेलात तळलेला हा एक पदार्थ असतो. सध्या ही पाककृती विशेष प्रचारात नसली तरी ज्या पाककृतीत हे पदार्थ असतील त्यांनाही हे गुण लागू पडतील. 

कुलत्थः  अम्लपित्तजननाम्‌ - कुळीथ आम्लपित्त वाढविणाऱ्या द्रव्यांत अग्रणी होत. कुळीथ हे एक प्रकारचे कडधान्य असून त्याची उसळ किंवा सूप, पिठले वगैरे तयार करण्याची पद्धत आहे. 

कुलत्थो मधुरो रक्‍तपित्तलो विपाके अम्लो विदाही लघुः शोफघ्नश्‍च ।।
....अष्टांगसंग्रह सूत्रस्थान 

कुळीथ चवीला मधुर असेल तरी विपाकाने आंबट असतात. शरीरात गेल्यावर जळजळ करणारे असतात. रक्‍तपित्त विकाराला कारण ठरू शकतात. पचायला मात्र हलके व सूज कमी करणारे असतात. 

कुळीथ मुतखड्यावर औषधाप्रमाणे उपयोगी असतात, कफदोषामुळे होणारा दमा, खोकला, सर्दी वगैरे त्रासांतही हितकर असतात. बाळंतिणीचा वातदोष आटोक्‍यात आणण्यास मदत करतात, मात्र अम्लपित्त, रक्‍तपित्त, पोटात किंवा गुदभागी आग होण्याची प्रवृत्ती असणाऱ्यांनी कुळीथ जपून खाणे चांगले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article on Sugarcane