स्तनाचा कर्करोग

Cancer
Cancer

स्त्रियांनो, स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण वाढते आहे, हे खरे आहे. पण त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. स्वतःच स्वतःची नियमित तपासणी करा. जर स्तनात गाठ आढळलीच, तर लगेच वैद्यकीय सल्ला घ्या. तुम्ही योग्य वेळी योग्य उपचाराने आजारमुक्त व्हाल.

भारतीय महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे वाढते प्रमाण दिसून येत आहे. महिलांमध्ये उद्भवणाऱ्या कर्करोगांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण बत्तीस टक्के इतके आहे. दर तीस महिलांमध्ये एका महिलेला स्तनाचा कर्करोग होण्याची शक्‍यता असते. हा आजार जरी गंभीर स्वरूपाचा असला, तरी वेळेत निदान झाल्यास व योग्य औषधोपचार झाल्यास हा आजार संपूर्ण बरा होऊ शकतो. हा आजार बरा झाल्यानंतर ग्रस्त महिला, इतर महिलांप्रमाणेच सामान्य आयुष्य जगू शकते. या आजाराचे वेळेत निदान झाल्यास औषधोपचार सोपे, कमी वेळेसाठी आणि कमी खर्चाचे होतात.

हा आजार कोणत्याही महिलेला होऊ शकतो. त्यामुळे वीस वर्षांवरील सर्व महिलांनी या आजाराशी संबंधित काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. वीस वर्षांवरील सर्व महिलांनी ‘सेल्फ ब्रेस्ट एक्‍झॅमिनेशन’ म्हणजेच स्तनाची स्वतः तपासणी करणे आवश्‍यक आहे. या मध्ये स्तनामध्ये कोणत्याही प्रकारची गाठ किंवा स्तनातून कोणत्याही प्रकारचा स्राव होतो आहे का याकडे लक्ष देणे गरजेचे असते. मासिक पाळीनंतर सातव्या दिवशी ही तपासणी करावयाची असते. चाळीस वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या महिलांनी महिन्यातून एकदा ‘सेल्फ ब्रेस्ट एक्‍झॅमिनेशन’च्या जोडीने वर्षातून एकदा  ‘मॅमोग्राम’ करून घेणे गरजेचे आहे. ज्या महिलांची मासिक पाळी बंद झाली असेल, त्यांनी महिन्याच्या एका ठराविक तारखेला स्वतः स्तनतपासणी करणे आवश्‍यक आहे. जर स्तनामध्ये कोणत्याही प्रकारची गाठ किंवा सूज आढळल्यास डॉक्‍टरांचा सल्ला घेणे आवश्‍यक आहे.

त्याच प्रमाणे स्तनातून कोणत्याही प्रकारचा स्राव होत असल्यासही त्याकडे दुर्लक्ष न करता, त्वरीत डॉक्‍टरांचा सल्ला घेणे उचित आहे. स्तनावर अचानक अल्सर्स, पुळ्या येऊ लागल्यास किंवा स्तनाच्या त्वचेचा रंग अचानक बदलू लागल्यासही वैद्यकीय सल्ला घ्यावा. कोणत्याही प्रकारच्या कर्करोगामध्ये सतत थकवा जाणवणे, अचानक वजन भराभर कमी होणे ही लक्षणे दिसून येतात. ही लक्षणे स्तनाच्या कर्करोगाच्या बाबतीतही जाणवतात. त्याशिवाय एक स्तन दुसऱ्यापेक्षा आकाराने लहान होणे, स्तनांमध्ये सतत दुखणे ही लक्षणे देखील होणाऱ्या आजाराची सूचक असू शकतात. लवकर निदान झाल्यास स्तनाचा कर्करोग बरा होऊ शकतो. 

स्तनाच्या कर्करोगासाठी केमोथेरपी दिली जाते. केमोथेरपीमुळे केसगळती होते, त्यामुळे स्त्रिया त्यासाठी मनापासून तयार होत नाही. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, केमोथेरेपीमुळे होणारी केसगळती ही कायमस्वरुपी नसते, काही महिन्यांनी पूर्ववत केस येण्यास सुरुवात होते. पूर्वी ल्युकोसाईट काऊंट कमी झाल्याने ताप, जुलाब, तोंडाचा अल्सर यासारखे त्रास उद्भवत. काही वेळा रुग्णाला रुग्णालयात दाखल करावे लागत असे. त्यामुळे पैसादेखील खर्च होत होता. आता मात्र अशा प्रकारच्या अडचणींपासून दूर राहता येते. इंजेक्‍शनच्या मदतीने ल्युकोसाईट काऊंट वाढविता येतो. पूर्वीसारखे थकवा येणे, उलटी होणे यांसारखे गंभीर परिणाम आता टाळता येऊ शकत असून याकरिता औषधे उपलब्ध आहेत.

स्तनाच्या कर्करोगाची कारणे
    स्तनाच्या कर्करोगाला एक कौटुंबिक इतिहास असतो. आनुवंशिक कारणांमुळे स्तनाचा कर्करोग होण्याची शक्‍यता अधिक असते.
    वयाच्या बाराव्या वर्षापूर्वीच मासिक पाळी सुरु झाली असल्यास स्तनाच्या कर्करोगाची शक्‍यता वाढते.
    वयाच्या  ५५ व्या वर्षानंतर रजोनिवृत्ती झाल्यासही या आजाराचा धोका वाढतो.
    कुटुंबनियोजन औषधांच्या अतिरेकाने हा आजार होऊ शकतो.
    व्यसनाधिनता हेही एक कारण आहे.
    लठ्ठ महिला, अधिक चरबीयुक्त, स्नेहयुक्त आहाराचे सेवन करणाऱ्या स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोग होण्याची शक्‍यता सर्वाधिक असते.

स्तनाच्या कर्करोगाची प्रमुख लक्षणे -
    स्तनामध्ये ताठरता किंवा गोळा येणे.
    स्तनाना सूज किंवा बारीक खळगा पडणे.
    स्तनाच्या ठिकाणी न थांबणारी खाज येणे.
    स्तनाग्र किंवा त्याच्या बाजूच्या भागात पांढरेपणा किंवा तांबूसपणा येणे. स्तनांच्या त्वचेचा रंग बदलणे.
    स्तनाच्या आकारात लक्षणीय बदल. म्हणजे तो आक्रसला जाणे, लहान होणे वगैरे.
    स्तनाग्रातून स्राव वाहणे.
    स्तनामध्ये वेदना होणे.

स्तनाच्या कर्करोगाच्या निदानासाठी आवश्‍यक तपासण्या -
 मॅमोग्राफी - या तपासणीमध्ये क्ष-किरणांनी स्तनांची आतील रचना सुस्पष्ट करून दाखविण्याचे काम केले जाते. स्त्रियांनी चाळीशीनंतर वैद्यकीय सल्ल्याने ही तपासणी करून घेणे योग्य ठरते.
 बायॉप्सी - स्तनात गाठ आढळल्यानंतर ही तपासणी केली जाते. यामध्ये गाठीचा एखादा छोटा भाग काढून घेऊन त्याचे सूक्ष्मदर्शक यंत्राखाली परीक्षण केले जाते.
 रक्तपरीक्षण - संपूर्ण ब्लड काऊंट तपासणे.
उपचार
स्तनाच्या कर्करोगाचा उपचार पुढील घटकांवर आधारित आहे
    जर ती स्त्री रजोनिवृत्तीला पोचली असेल 
    कर्करोग किती पसरला आहे 
    कर्करोगाच्या पेशींचा प्रकार 
स्तनाच्या कर्करोगावर उपचार करण्यापूर्वी कर्करोगाच्या प्रसाराचे प्रमाण निश्‍चित करणे आवश्‍यक ठरत असते.
    स्तनात तो कुठे झाला आहे. 
    कर्करोग ज्या वेगाने गाठींपर्यंत पोहचला आहे. 
    कर्करोग स्तनातील खोलवरच्या स्नायूंमध्ये किती पसरला आहे.
    हा कर्करोग दुसऱ्या स्तनात पसरला आहे का ते पहाणे.
    हा कर्करोग इतर अवयव, जसे, हाडे किंवा मेंदूत पसरला आहे का ते पहाणे. 
    उपचार पद्धतींमध्ये शस्त्रक्रिया, केमोथेरपी, टारगेटेड थेरपी, हार्मोनल थेरपी, स्टेज आणि हार्मोन रिसेप्टर स्थितीनुसार रेडिओथेरपी समाविष्ट आहे.

स्त्रियांनो, काळजी घ्या. स्वतःच स्वतःची नियमित तपासणी करा. जर स्तनात गाठ आढळलीच, तर लगेच वैद्यकीय सल्ला घ्या. तुम्ही योग्य वेळी योग्य उपचाराने आजारमुक्त व्हाल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com