वातरोग पथ्य-अपथ्य

डॉ. श्री बालाजी तांबे  www.balajitambe.com
Friday, 22 September 2017

वाताचे दुखणे एक तर कायम तरी राहते, नाही तर अधून मधून उफाळतेच. अशा परिस्थितीत औषधोपचारांच्या जोडीला पथ्यकर  आहार असला तर बिघडलेल्या वाताला संतुलित ठेवणे  सोपे जाते. 

सांप्रत काळात सर्वाधिक आढळणारा रोग म्हणजे वातरोग असे म्हणायला हरकत नाही. गुडघे, पाठ, कंबर, मान, टाचा वगैरे दुखायला आजकाल ना वयाचे बंधन राहिलेले दिसते, ना ऋतुमानाचे. शिवाय वाताचे दुखणे एक तर कायम तरी राहते, नाही तर अधून मधून उफाळतेच. अशा परिस्थितीत औषधोपचारांच्या जोडीला पथ्यकर आहार असला तर बिघडलेल्या वाताला संतुलित ठेवणे सोपे जाते. आज आपण वातरोगांमध्ये आहारयोजना कशी करावी याची माहिती घेणार आहोत. 

वातरोगावर स्नेहन हा उत्कृष्ट उपचार सांगितलेला आहे. स्नेहनामध्ये अभ्यंग आणि स्नेह द्रव्याचे सेवन या दोन्ही गोष्टी अंतर्भूत होतात. स्नेहद्रव्यांमध्ये तूप हे सर्वोत्तम असते. त्यामुळे वातरोगावर, जर आमाचा संबंध नसला तर, आहारात साजूक तुपाचा समावेश असणे पथ्यकर असते. 

यूषैर्ग्राम्याम्बुजानूपरसैर्वा स्नेहसंयुतैः ।
पायसैः कृशरैः साम्ललवणैरनुवासनैः ।।
.....चरक चिकित्सास्थान

दूध, सूप, मांसाहारी व्यक्‍तीसाठी मांसाचे सूप यामध्ये तूप मिसळून घेणे वातरोगात हितकर असते. डाळिंब, कोकम वगैरे आंबट द्रव्ये, सैंधव मीठ यांचा वापर करून बनविलेली खिचडी तूप मिसळून खाणे सुद्धा वातरोगात पथ्यकर असते. 

रसां पयांसि भोज्यानि स्वाद्वम्ललवणानि च ।
बृंहणं यच्च तत्‌ सर्वं प्रशस्तं वातरोगिणाम्‌ ।।
....चरक चिकित्सास्थान

दूध पिणे, मांसाहारी व्यक्‍तींनी मांसाचे सूप पिणे, तसेच आहारात मधुर (गोड) आंबट चवीचे पदार्थ तसेच सैंधव समाविष्ट करणे, नेहमी धातुपोषक द्रव्यांचे सेवन करणे हे वातरोगावर पथ्यकर असते. 

वात बिघडतो तो बऱ्याचदा एकटा बिघडत नाही, तर बरोबरीने पित्ताला किंवा कफाला घेऊनही बिघडतो. अशा वेळी आहारयोजनेत थोडा बदल करता येतो. 

धन्वमांसं यवाः शालिर्यापनाः क्षीरबस्तयः ।
विरेकः क्षीरपानं च पञ्चमूलीबलाश्रृतम्‌ ।
....चरक चिकित्सास्थान

साठेसाळीचे तांदूळ, जव हे पित्ताला घेऊन बिघडलेल्या वातासाठी पथ्यकर असतात.
कफावृते यवान्नानि जांगला मृगपक्षिणः ।
जीर्णं सर्पिस्तथातैलं तिलसर्षपजं हितम्‌ ।।
....चरक चिकित्सास्थान

जवापासून बनविलेले अन्नपदार्थ, जुने तूप, तीळ आणि मोहरीचे तेल या गोष्टी कफाबरोबरीने बिघडलेल्या वातासाठी पथ्यकर असतात. 

वातरोगामध्ये दूध हितावह असतेच, ते जर वातशामक द्रव्यांनी संस्कारित करून घेतले तर अधिक गुणकारी ठरते. 

पञ्चमूलीबलासिद्धं क्षीरं वातामये हितम्‌ ।
....भैषज्य रत्नाकर 

बृहत्‌ पंचमूळ म्हणजे बेल, अग्निमंथ, श्‍योनाक, गंभारी, पाटला यांच्या मुळांनी किंवा बला नावाच्या वनस्पतीने संस्कारित दूध पिणे वातविकारात हितकर असते. 

वातरोगात अर्दित म्हणजे ‘फेशियल पाल्सी’ किंवा चेहऱ्याचा अर्धांगवायू हा एक प्रकार असतो. यावर पुढील आहार सुचविलेला आहे. 

रसोनकल्कं नवनीतमिश्रं खादेन्नरो योऽर्दित रोगयुक्‍तः ।
तस्यार्दितं नाशयतीह शीघ्रं वृन्दं घनानामिव मातरिश्वा ।।

लोण्यामध्ये बारीक केलेले लसूण मिसळून खाण्याने अर्दित रोग बरा होतो, जसा वारा ढगांना पळवून लावतो. 

अर्दिते नवनीतेन खादेन माषेण्डरी नरः ।

अर्दित रोगात लोण्याबरोबर उडदाचे वडे खाणे पथ्यकर असते.
वातरोगामध्ये अग्नी मंदावलेला असेल, गॅसेस होत असतील तर स्वयंपाक करताना आले, ओवा, हिंग, काळे मीठ, लसूण, दालचिनी, वेलची, तमालपत्र, दगडफूल, लवंग ही मसाल्याची द्रव्ये वापरणे हितकर असते. जेवणानंतर बाळंतशोपा, ओवा, सैंधव, बडीशेप, लिंबाचा रस या द्रव्यांपासून तयार केलेले मुखशुद्धीकर मिश्रण खाणेही हितकर असते.

वातव्याधीवर 
पथ्यकर आहार :
तूप, तीळ, एक वर्ष जुना तांदूळ, कुळीथ, पडवळ, शेवगा, लसूण, डाळिंब, बोर, मनुका, संत्री-मोसंबी, दूध, नारळाचे पाणी, गोमूत्र, खडीसाखर, विडा, गहू, मूग, तूर, दुधी, भेंडी, कोहळा, महाळुंग, लिंबू, गरम पाणी, आले, हळद, कोवळा मुळा, कोवळे गाजर, अहळीव, एरंडेल वगैरे.

वातव्याधीवर 
अपथ्यकर आहार : वरई, नाचणी, कारले, चवळी, वाटाणे, वाल, मटार, चणे, मटकी, जांभूळ, थंडगार पाणी, रताळी,  साबुदाणा, अळूचे पाने, सुपारी, अति प्रमाणात पालेभाज्या, अति प्रमाणात मध वगैरे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article Vaginal pain