योग्य वजन

योग्य वजन

योग्य वजन हे आरोग्य, सौंदर्य, व्यक्‍तिमत्त्व या सर्वांसाठी महत्त्वाचे असते. आयुर्वेदात तर वजनाच्या बरोबरीने बांधेसूदपणा किंवा उत्तम शरीरसौष्ठव हे सुद्धा आवश्‍यक मानलेले आहे. त्यामुळे वजन हे मोजमापाच्या तराजूत न तोलता सर्व शरीरधातूंचे योग्य प्रमाण व त्यांची घनरचना, शरीराची ठेवण, शरीरावयवांची रचना, त्यांचा आकार हे सर्व पैलू विचारात घ्यायचे असतात. शरीराचा बांधेसूदपणा हा सप्तधातूंपैकी मधल्या तीन धातूंवर म्हणजे मांस, मेद, अस्थी या धातूंवर अवलंबून असतो. व्यक्‍तीची उंची, तसेच मुळातील साचा हा हाडांपासून बनलेला असतो आणि यावर मांस, स्नायू, मेद यांचे लिंपण होऊन शरीराचे सौष्ठव, शरीराचा आकार ठरत जातो.

वजन फार जास्त असणे हे जसे अनेक समस्यांना आमंत्रण देणारे असते, तसेच वजन फार कमी असणे हे सुद्धा त्रासदायक असते. म्हणजेच वजनाच्या बाबतीतही समत्व असणे, संतुलन असणे गरजेचे असते. असे समत्व असणाऱ्या व्यक्‍तींची प्रशंसा चरकाचार्यांनी खालील सूत्रात केलेली आहे, 

सममांसप्रमाणस्तु समसंहननो नरः ।
दृढेन्द्रियो विकाराणां च बलेनाभिभूयते ।।
...चरक सूत्रस्थान


ज्या व्यक्‍तीमध्ये मांसधातू संतुलित प्रमाणात असतो, तसेच इतर धातूंचे संघटन व्यवस्थित असते, पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, तसेच मन ही सर्व इंद्रिये दृढ असतात, अशा व्यक्‍तीचे मूळचे आरोग्य उत्तम असल्याने त्यांना रोग झाला तरी अधिक कष्ट होत नाहीत. 

धातूंना पोषण देणाऱ्या, संपूर्ण शरीर यथायोग्य प्रमाणात तयार होण्यास आणि ते तसेच टिकण्यास मदत करणाऱ्या उपचारांना आयुर्वेदात बृंहण उपचार म्हटले जाते. या उपचारांची विशेषता ही की यामुळे कमी असलेले वजन वाढण्यास मदत मिळते पण योग्य प्रकारे केलेल्या बृंहणामुळे अवाजवी, अनावश्‍यक वजन वाढत नाही, उलट ताकद वाढते, उत्साह, शक्‍ती, स्टॅमिना वाढण्यास मदत मिळते. 
धातूंचे बृंहण होण्यासाठी आयुर्वेदात पुढील उपचार सांगितलेले आहेत. 

क्षीरसिता-सर्पिर्मधुर-स्निग्ध-बस्तिभिःस्वप्नशय्या-सुखाभ्य-स्नान-निर्वृतिहर्षणैः।।
...अष्टांगहृदय सूत्रस्थान


दूध ः दूध सर्व धातूंना पोषक असते. भारतीय वंशाच्या गाईचे, कोणतीही अनैसर्गिक प्रक्रिया न केलेले दूध घेणे उत्तम होय. रोज दूध घेण्याने वात-पित्तशमन होऊन मांस, अस्थी, शुक्र वगैरे शरीरशक्‍तीला कारणीभूत धातूंचे पोषण होण्यास मदत मिळते. 

सीता ः म्हणजेच साखर ही चवीला गोड व गुणाने धातुपुष्टिकर असते. शरीरशक्‍ती टिकून राहावी, सर्व शरीरधातूंचे पोषण व्हावे यासाठी उसाची, केमिकल्सचा वापर न करता तयार केलेली साखर योग्य प्रमाणात खाणे चांगले होय. 

तूप ः दुधाप्रमाणे तूपसुद्धा सर्व धातूंना शक्‍ती देणारे, सर्व इंद्रियांना व महत्त्वाच्या अवयवांना ताकद देणारे असते. योग्य प्रमाणात तुपाची आवश्‍यकता सर्वांनाच असतेच.  व स्निग्ध द्रव्यांनी युक्‍त औषधांच्या बस्ती - यात शतावरी, ज्येष्ठमध, अनंतमूळ वगैरे मधुर चवीच्या द्रव्यांनी सिद्ध तेल किंवा दुधाच्या बस्तीचा अंतर्भाव होतो. आठवड्यातून एकदा किंवा वैद्यांच्या सल्ल्यानुसार अशा विशेष बस्तीची योजना करता येते. 

पुरेशी झोप : योग्य वेळी व योग्य प्रमाणात झोपणे हे सुद्धा धातूंच्या पोषणासाठी हितावह असते. कमी झोपणे, अवेळी झोपणे या दोन्ही गोष्टी वात वाढवू शकतात.

अभ्यंग ः अंगाला नियमित अभ्यंग करणेसुद्धा धातूंचे पोषण करणारे असते. वास्तविक नियमित अभ्यंग हा शरीरबांधा नीट राहण्यासाठी, कमी वजन वाढवण्यासाठी तसेच वाढलेले वजन कमी करण्यासाठीसुद्धा उपयुक्‍त असतो. 

निर्वृति हर्षण ः समाधानी वृत्ती व मनाची हर्षित अवस्था या दोन्ही गोष्टी धातू पोषणास सहायभूत असतात. 

सुरवातीला उल्लेख केल्याप्रमाणे सप्तधातूंपैकी मांस, मेद, आणि अस्थी या धातूंचा शरीरबांध्यावर मोठा प्रभाव असतो. सध्या मेद वाढणार नाही ना याची सर्वांना धास्ती असते. मात्र मेद अवाजवी प्रमाणात वाढला तर शरीर बेढब होते हे जितके खरे तितकेच तो प्रमाणापेक्षा कमी होणे हे आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक असते, हे सुद्धा खरे. शरीराला मृदुता देणे, आवश्‍यक ती स्निग्धता देणे, महत्त्वाच्या अवयवांना आधार देणे, छोट्या सांध्यांना वंगण देणे वगैरे अनेक महत्त्वाची कामे मेदधातूच्या आधीन असतात. त्यामुळे इतर धातूंच्या बरोबरीने मेदधातूचे योग्य प्रकारे पोषण होण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. आहार व रसायनांचे योग्य नियोजन केले तर या मांस, मेद व अस्थी धातूंना योग्य प्रकारे परिपोषित करता येऊ शकतो. 

मांसधातूपोषक आहार व रसायन : खारीक, दूध, लोणी, बदाम, पंचामृत, पेठा, शिरा, खीर, लाडू तसेच शतावरी, अश्वगंधा, बदाम वगैरे मांसधातूला ताकद देणाऱ्या वनस्पतींपासून बनविलेले संतुलन शतदाम किंवा संतुलन चैतन्य कल्प, रसायन गुणधर्म असणाऱ्या आवळ्यापासून बनविलेले धात्री रसायन. 

शरीराचे पोषण होण्यासाठी, वजन व्यवस्थित राहण्यासाठी नियमित व योग्य व्यायाम हा सुद्धा हातभार लावत असतो. 

लाघवं कर्मसामर्थ्यं दीप्तोऽग्निर्मेदसः क्षयः । 
विभक्‍तघनगात्रत्वं व्यायामादुपजायते ।।
....वाग्भट


व्यायामाने शरीरसंहनन उत्तम होऊन घट्ट मांसधातू, बळकट संधी व अस्थी, तसेच प्रमाणशीर मेदधातू यांचा लाभ होतो. प्रत्येक अवयव रेखीव व पीळदार असतो. या दृष्टीने नियमित चालणे, सूर्यनमस्कार, ताडासन, शलभासन, धनुरासन, संतुलन समर्पण, भस्त्रिका वगैरे योगासने रोजच्या दिनक्रमात समाविष्ट करता येतात.
अशा प्रकारे वजन कमी नसावे तसेच जास्ती वाढू नये हेच आरोग्यासाठी श्रेयस्कर होय. आहार-आचरणात काळजी घेतली, व्यायाम-अभ्यंगादी आरोग्य सवयी लावून घेतल्या तर वजन समत्वात राहीलच, पण आरोग्य, प्रतिकारशक्‍ती, शरीरशक्‍तीसुद्धा उत्तम राहील. 

वजन वाढविण्यासाठी...
एखाद्याचे वजन कमी असेल तर त्याला त्याच्या प्रकृतीनुसार योग्य तेवढ्या प्रमाणात वजन वाढविण्यासाठी घरच्या घरी पुढील उपायांची योजना करता येते
सुक्‍या अंजिराचे तुकडे, पाण्यात भिजवून साल काढून सुकवलेले बदाम, बेदाणे, गोडांबी, खडीसाखर, वेलची, केशर हे सर्व गाईच्या तुपात आठ दिवस भिजत घालावे व रोज सकाळी घेत जावे यामुळे धातुवद्धी होते, शरीरधातू पुष्ट होतात, शक्‍ती भरून येण्यास मदत मिळते. 
गर्भवती स्त्रीचे गरोदरपणात दहा ते बारा किलो वजन वाढणे अपेक्षित असते. काही कारणाने वजन वाढत नसल्यास अश्वगंधाच्या मुळ्यांचा काढा साखरेबरोबर देण्याचा उपयोग होतो. 
उडदाच्या डाळीचे पीठ, गव्हाचे पीठ, तांदळाचे पीठ समभाग घेऊन भाजून घ्यावे. यात साजूक तूप, खडीसाखर व थोडे पिंपळीचे चूर्ण टाकून लाडू करावेत. रोज एक लाडू खाऊन वरून दूध प्यायल्यास वजन वाढण्यास मदत मिळते. 
कोहळा हा सुद्धा पुष्टिकर व तरीही पचायला हलका असतो. त्यामुळे कोहळेपाक किंवा पेठा नियमित खाल्ल्याने कमी असलेले वजन वाढण्यास मदत मिळते. 

मेद हवा अन्‌ नकोही
सप्तधातूंपैकी मांस, मेद आणि अस्थी या धातूंचा शरीरबांध्यावर मोठा प्रभाव असतो. सध्या मेद वाढणार नाही ना याची सर्वांना धास्ती असते. मात्र मेद अवाजवी प्रमाणात वाढला तर शरीर बेढब होते हे जितके खरे, तितकेच तो प्रमाणापेक्षा कमी होणे हे आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक असते, हे सुद्धा खरे. शरीराला मृदुता देणे, आवश्‍यक ती स्निग्धता देणे, महत्त्वाच्या अवयवांना आधार देणे, छोट्या सांध्यांना वंगण देणे वगैरे अनेक महत्त्वाची कामे मेदधातूच्या आधीन असतात. त्यामुळे इतर धातूंच्या बरोबरीने मेदधातूचे योग्य प्रकारे पोषण होण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. आहार व रसायनांचे योग्य नियोजन केले तर या मांस, मेद, व अस्थी धातूंना योग्य प्रकारे परिपोषित करता येऊ शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com