esakal | ‘बाल’कृष्णाच्या बाळलीला !
sakal

बोलून बातमी शोधा

Balkrishna

‘बाल’कृष्णाच्या बाळलीला !

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लहान मुलांवर संस्कार करण्यासाठी, त्या लहान बाळातून श्रीकृष्ण साकारण्यासाठी मुलावर योग्य ते संस्कार होणे अत्यावश्‍यक असते व ही जबाबदारी माता-पिता यांनी घेणे आवश्‍यक आहे. प्रत्येक मुलात शक्ती ओतप्रोत भरलेली असते, मुलाच्या आई-वडिलांना जर व्यासांच्या प्रतिभेचे सामर्थ्य असले तर त्या खोडसाळपणाला सृजनात्मक कलाटणी देता येते.

हजारों वर्षे उलटून गेली तरी श्रीकृष्णांची जादू जनमानसावर कायम आहे. श्रीकृष्णांच्या बाळलीला, त्यांचा पराक्रम, त्यांनी केलेला दुर्जनसंहार, यशस्वी जीवनासाठी श्रीमद्‌भगवद्‌गीतेद्वारा त्यांनी केलेले मार्गदर्शन, कशालाच तोड नाही. आजही प्रत्येक घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असते. घरातील लहान बाळाला प्रत्यक्ष बाळकृष्णाचे स्वरूप समजले जाते. त्याच्या खट्याळपाणात, खोड्या करण्यात बाळकृष्णाच्या लीला पाहिल्या जातात. निष्पाप, निरागस व जवळ जवळ निर्गुण, ज्यांना ममत्व, भीती, मोह असे विकार शिवलेले नाहीत अशी लहान मुले म्हणजे जणू परमेश्र्वराचे रूपच असते.

बाळलीलांमध्ये कृष्णाने गवळणींची घागर फोडणे, दही-लोणी चोरणे असे खेळ केले. यासाठी त्यांना रागवले तरी लुटुपुटीचेच आणि ह्या खट्याळपणासाठी गोपिकांनी आई-वडिलांच्या संगनमताने शिक्षा देण्याचा प्रयत्न केला तरी त्यातूनही जगदोद्धारच झाला. काही तरी चांगले रूप घेऊन किंवा उत्तम आवरणात आवेष्टित करून (सध्या कुठलेही उत्पादन सुंदर पॅकिंगमध्ये विकले जाते तसे) विष विकण्याचा उद्योग त्यावेळीही पूतनेसारख्या व्यक्ती करत असत. श्रीकृष्णांनी आपली बाळलीला दाखवून अशा दुष्ट शक्तींना पराभूत केले. यावेळी तर श्रीकृष्ण तान्हे बाळ होते. पाण्याची समस्या व पाण्यात मिसळलेले विष यावर उपाय करण्याच्या निमित्ताने बाळलीला करून कालियामर्दनानंतर गावाची पाण्याची चिंता दूर केली. श्रीकृष्णलीला ऐकण्याचा जसा कधी कंटाळा येत नाही, तसेच लहान मुलांच्या संगतीत वेळ कसा जातो हे सुद्धा कळत नाही.

लहान मुले खोड्या करणारच. प्रत्येक मुलात शक्ती ओतप्रोत भरलेली असते आणि त्यातूनच कुठलीही कृती घडते. पण त्यावेळी मुलाच्या आई-वडिलांना जर व्यासांच्या प्रतिभेचे सामर्थ्य असले तर त्या खोडसाळपणाला सृजनात्मक कलाटणी देता येते. तू नेहमी खोड्या करतोस म्हणून तुझ्याशी कोणी बोलणार नाही, मी तुला शिक्षा करीन, अमुक खाऊ नको कारण दात खराब होतील, तमुक खाऊ नको कारण पोट बिघडेल, अशा तऱ्हेचे दडपण मुलांवर सतत आणल्यास मुलांचा एकलकोंडेपणा वाढल्यास नवल नाही. ''वेळ नाही’ या नावाखाली आपल्या चिमुकल्या बाळाला तास न् तास दुसऱ्याला सांभाळायला देणे, ते काय खाते, किती खाते, सांभाळणारी व्यक्ती बाळाला प्रेमाने भरवते आहे की नाही याकडे लक्ष न देणे या सगळ्याचा मुलांवर मोठा परिणाम होत असतो.

शाळा सुरू झाली की अगदी सुरुवातीपासून भरमसाठ गृहपाठ देणे ही सुद्धा सध्याची मोठी समस्या आहे. खरे पाहता मुलांना द्यायचा गृहपाठ सोपा असावा, त्यांची अभ्यास करण्याची प्रवृत्ती आहे का नाही इतके कळण्याइतपतच असावा. एखाद्या मुलाने एखाद्या दिवशी गृहपाठ करून न आणल्यास त्याला वर्गात बाकावर उभे करणे, सर्वांसमोर रागावणे, छडीने मारणे अशी अमानुष वागणूक दिल्यास त्याचे बालपणच नव्हे तर संपूर्ण आयुष्यच नासून जाऊन श्रीकृष्णांसारखा खोडसाळपणा किंवा खट्याळपणा करायला मिळणार नाही किंवा ज्ञानेश्र्वरांसारखी प्रज्ञाही मिळणार नाही. वारंवार मुलांना खोलीत कोंडून ठेवले किंवा बागुलबुवाची भीती घातली तर मुलांच्या मनावर किती ताण येत असेल ते आपल्याला समजू शकत नाही. संकटांचा ताण मोठ्या माणसांना कमी असतो, कारण त्यांना तो अपेक्षितच असतो. पण लहान मुलांना भीती ही भावना माहीतच नसल्यामुले त्याच्या मनावर केवढा आघात होत असेल याचा विचारच केला जात नाही.

लहान मुलांवर संस्कार करायला हवेत हे जेवढे खरे, तेवढेच हेही खरे की हे संस्कार कसे करायचे याचे ज्ञान आई-वडिलांना असावे. कोणाही जोडप्याला कोठलेही ज्ञान नसताना मूल होऊ शकते, पण त्या मुलावर संस्कार करण्यासाठी, त्या लहान बाळातून श्रीकृष्ण साकारण्यासाठी मुलावर योग्य ते संस्कार होणे अत्यावश्‍यक असते व ही जबाबदारी माता-पिता यांनी घेणे आवश्‍यक आहे. तेव्हा मुलांकडे लक्ष व वेळ न देता उलट त्यांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा ठेवणे, अमुक तमुक तू केलेस तर बक्षीस देईन अशी लालूच दाखवण्याची सवय लावणेही चांगले नाही. प्रोत्साहन व संस्कार खूप महत्त्वाचे असतात. ह्या दृष्टीने, भारतीय परंपरेतल्या परवचा-पाढे म्हणणे, स्तोत्र-कविता पठण व स्पष्ट उच्चारण, व्यायाम- योग, संगीत आणि प्रज्ञासंस्कार वगैरेंची मदत घेणे आवश्‍यक आहे. ही जबाबदारी आई, वडील व संगोपक या सर्वांनी संयुक्तपणे पेलणे आवश्‍यक आहे. अशा तऱ्हेने घरोघरी जर आपल्याला बालकृष्णाच्या लीला पाहायच्या असतील; श्रीकृष्णांसारखे जगाला तारणारे, मनुष्यमात्रावर प्रेम करून विघ्न वा दुष्टसंहारण करून जगाला काही तरी चांगले देणारे व्यक्तिमत्व घडवायचे असेल तर मुलांकडे बालपणापासूनच लक्ष देऊन, त्यांना ‘घडवावे’ लागेल.

श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे यांच्या विपुल लेखनातून संकलित

loading image
go to top