महती औषधांच्या संस्कारांची!

सध्या तर मूळ औषधाच्या प्रतीचा विचार बाजूला राहतो, उलट ‘पॅकिंग’ चांगले असण्यावर भर दिला जातो.
Medicine
MedicineSakal

सध्या तर मूळ औषधाच्या प्रतीचा विचार बाजूला राहतो, उलट ‘पॅकिंग’ चांगले असण्यावर भर दिला जातो. पॅकेजिंग जेवढे चांगले, जाहिरात जेवढी अधिक, तेवढी उत्पादनाची विक्री अधिक असा विचार करण्यापेक्षा मूळ घटकद्रव्ये जितकी संपन्न, सर्व संस्कार यथायोग्य पद्धतीने करण्यावर जितके अधिक लक्ष, तेवढा रुग्णाला येणारा गुण चांगला, तेवढी उत्पादनाला अधिक मागणी असा भाव मनात ठेवणे कधीही श्रेयस्कर होय.

जीवन जगताना ‘गुणवत्ता’ लक्षात घेणे आवश्यक असते. अन्न, पाणी, वस्त्र यांसारख्या दैनंदिन गरजा असोत, घर, वाहन, संगणकासारखी साधनसामग्री असो किंवा मित्रमंडळी, आप्तजन यांच्याबरोबरीचे नातेसंबंध असोत, प्रत्येक गोष्टीत गुणवत्तेचे भान ठेवले तरच जीवनाचा आनंद घेता येतो.

आरोग्यक्षेत्रामध्ये अन्न आणि औषध या दोन गोष्टींच्या गुणवत्तेला अनन्यसाधारण स्थान द्यायला लागते. २५ सप्टेंबर हा ‘आंतरराष्ट्रीय फार्मास्युटिकल दिन’ म्हणून ओळखला जातो. यानिमित्ताने आज आपण आयुर्वेदीय औषधनिर्माणशास्त्रातील काही महत्त्वाच्या संकल्पना समजून घेऊ. जसे हॉटेल / रेस्टॉरंटमधे कधीतरी खायला बरे वाटते, पण त्याला घरच्या जेवणाची सर नसते. हाच फरक विकून फायदा होण्याच्या उद्देशाने बनविलेल्या औषधांत आणि रुग्णाला गुण यावा, त्याची रोगापासून सुटका व्हावी या हेतूने बनविलेल्या औषधांत असतो. आयुर्वेदाच्या औषधांची निवड करताना हा फरक नक्कीच विचारात घ्यावा लागतो. गुणवत्ता संस्कारातून येते. संस्कार म्हणजे विशिष्ट प्रक्रिया. जसे पोळी मऊ व्हायला हवी असेल तर गहू चांगल्या गुणवत्तेचा हवा आणि कणीक मळण्याची प्रक्रिया व्यवस्थित, पुरेसा वेळ आणि शक्तीसह व्हायला हवी. तसेच कोणतेही आयुर्वेदिक औषध तयार करताना मुळातील घटकद्रव्ये चांगल्या प्रतीची हवीत आणि प्रक्रिया शास्त्रशुद्ध पद्धतीने व्हायला हवी.

अभ्यंगाने जरा-व्याधी दूर राहतात, दीर्घायुष्य मिळते. काही तेलांच्या पाठात तर श्री मिळते, सौभाग्यवृद्धी होते असे आयुर्वेदाच्या ग्रंथात दिलेले आढळते. पण यासाठी तेल आतपर्यंत जिरण्याच्या क्षमतेचे असावे लागते. तेलात थोड्याफार वनस्पती टाकून, एक कढ काढून आणि विशिष्ट सुगंध टाकून तयार केलेले असले तर त्याचा काही उपयोग होत नसतो. खरे तेल सिद्ध करताना त्यात पाठानुसार ताज्या वनस्पतींचा रस, काढा, वनस्पती कुटून तयार केलेला लगदा, दूध, दह्याचे पाणी वगैरे गोष्टी विशिष्ट क्रमाने, विशिष्ट वेळी टाकून अग्निसंस्कार करावा असे आयुर्वेदाच्या ग्रंथात सांगितलेले असते. ‘संतुलन’ची तेले अशा प्रकारे तयार केलेली असल्याने त्यांचा गुण येतो. सिद्ध तेल, तूप असो, आसव-अरिष्टे असोत, गोळ्या-चूर्णे असोत, कोणतेही आयुर्वेदिक औषध तयार करण्यामागे विज्ञान असते. हे विज्ञान समजून घेतले नाही किंवा त्याकडे जाणून-बुजून दुर्लक्ष केले तर त्याचा गुणवत्तेवर परिणाम होणारच. सध्या तर मूळ औषधाच्या प्रतीचा विचार बाजूला राहतो, उलट ‘पॅकिंग’ चांगले असण्यावर भर दिला जातो. पॅकेजिंग जेवढे चांगले, जाहिरात जेवढी अधिक तेवढी उत्पादनाची विक्री अधिक असा विचार करण्यापेक्षा मूळ घटकद्रव्ये जितकी संपन्न, सर्व संस्कार यथायोग्य पद्धतीने करण्यावर जितके अधिक लक्ष, तेवढा रुग्णाला येणारा गुण चांगला, तेवढी उत्पादनाला अधिक मागणी असा भाव मनात ठेवणे कधीही श्रेयस्कर होय. सर्व संस्कार मुळात शुद्धीकरणाचे व नंतर गुणवत्ता वाढविण्याचे काम करत असतात. अग्निसंस्कार हा सर्वांत महत्त्वाचा संस्कार. इंग्रजीत प्युरि-फायर शब्द यादृष्टीने समर्पक होय. सर्व मलद्रव्यांचा, अशुद्धीचा नाश करण्याची शक्ती अग्नीत असते. आयुर्वेदाच्या औषधशास्त्रातही संस्कारित तेल, तूप असो, वेगवेगळे कल्प असोत, आसवारिष्टे असोत, सिरप असोत, च्यवनप्राशसारखे रसायन असो, भस्मे असोत, अग्निसंस्काराला पर्याय नसतो. अध्यात्मातील ‘तपस्या’ सुद्धा उष्णतेच्या मदतीने अंतरंगातील अशुद्धीचा नाश करणारी असते.

संस्कारांनी गुणवत्ता वाढते, गुणवत्तायुक्त उत्पादनांचा गुण लवकर आणि चांगला येतो, मात्र संस्कारांचे मोजमाप नंतर सिद्ध करता येत नाही. जसा प्रेशरकुकर मध्ये शिजविलेला भात आणि पातेल्यात शिजविलेला भात रंगरूपाने सारखाच दिसत असला तर त्यांच्या गुणांमध्ये फरक असतो. कारण दोघांवर अग्निसंस्कार वेगळ्या प्रकारे आणि वेगळ्या कालावधीसाठी झालेला असतो. भात नुसता पाहून किंवा त्याच्या भौतिक तपासण्या करून तो कसा शिजवला हे समजू शकत नाही. मात्र दोघांच्या गुणात, चवीत, सेवन केल्यानंतर जाणवणाऱ्या हलकेपणात फरक असतो. औषधांच्या बाबतीतही हेच घडत असते. उदा. काही औषधांमध्ये भावना द्यायच्या असतात. भावना म्हणजे खलामध्ये मूळ औषध घेऊन त्यावर रस, काढा, दूध यासारखा द्रव टाकून तो पूर्ण जिरेपर्यंत खलत राहणे. काही पाठांमध्ये २१ - २१ भावना द्यायला सांगितलेल्या असतात. औषध तयार झाल्यावर १ - २ भावना दिल्या की खरोखर २१ भावना दिल्या हे शोधून काढता येत नाही, मात्र व्यवस्थित भावना दिलेले औषध सूक्ष्म होते, शरीराकडून सहज स्वीकारले जाते आणि अधिक गुणकारी ठरते. तेव्हा आयुर्वेदाचे औषध निवडताना गुणवत्तेचा निकष महत्त्वाचा असावा, पॅकिंग, जाहिरातीला मोहून न जाता औषधशास्त्रातील तत्त्वांना अनुसरून तयार झालेली उत्पादने, औषधे हीच तारणहार होत.

(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या विपुल लेखनातून संकलित)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com