स्मृती-विस्मृती ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Brain

स्मृती-विस्मृती !

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मानवाने मेंदूचे महत्त्व ओळखून त्याला प्रगत करण्यासाठी त्याकडे सर्वप्रथम लक्ष देणे आवश्‍यक आहे. सर्वप्रथम मेंदूची काळजी, नंतर बाहुसामर्थ्य कमावणे, नंतर पोट भरण्यासाठी काम करणे व सर्वात शेवटी बँकेचा लॉकर भरण्यासाठी वणवण करणे, हा क्रम लक्षात ठेवला, तर जीवनात कशाला महत्त्व द्यायचे ते लक्षात येईल.

मनुष्य चाणाक्ष नसल्यास वेळेवर काय उत्तर द्यावे; कोणती माहिती उपयोगाची, कोणती निरुपयोगी हे न आठवणे किंवा न समजणे; स्वतःचा नफा-तोटा न समजणे किंवा वेळ गेल्यावर आठवणे; अशा अवस्थेला लोक भोळेपणा म्हणतात व सोडून देतात. विसरभोळेपणा याहून वेगळा असतो. आवडीच्या विषयात विस्मरण झाले, छोट्या छोट्या गोष्टी विसरल्यामुळे जे गमतीशीर प्रसंग घडतात, त्याला विसरभोळेपणा म्हणतात. प्रा. विसरभोळे यांच्यावर अनेक व्यंग्यचित्रे, हास्य-चुटके सर्वांनीच ऐकलेले असतील.

सध्या मात्र हा विनोद राहिलेला नाही, सध्या हा रोग म्हणून सर्वसामान्यांपर्यंत, सर्व थरांत पोचलेला आहे. शेक्सपिअरने जरी म्हटलेले असले की ‘नावात काय आहे’ तरी नाव आठवले नाही तर खूप मोठा घोटाळा होऊ शकतो. मी अमुक आहे, मी अमुक तमुक बोललो आहे, हा अहं कमी करण्याइतपतच या उक्तीचा अर्थ आहे. पण स्वतःचे नाव, स्वतःच्या बंगल्याचे नाव, आपण राहतो त्या रस्त्याचे नाव, आपण कोणाशी बोललो त्या व्यक्तीचे नाव लक्षात राहावेच लागते. आपण कोणत्या घरात राहतो ते न आठवल्यामुळे अल्झायमरच्या प्रगत अवस्थेतील रोगी रस्त्यावर फिरत राहिले तर किती मोठी अडचण येईल; हलके हलके जर सर्व विसरून गेले, आपल्या कामाबद्दल काहीच आठवले नाही, तर केवढा घोर प्रसंग उद्भवेल याची कल्पनाच केलेली बरी. आपण नव्याने पाहिलेल्या गोष्टीचे ज्ञान आपल्या स्मृतीमध्ये असलेल्या पूर्वीच्या अनुभव व माहितीशी पडताळल्यावरच होत असते. म्हणून जर सर्व स्मृती निघून गेली तर दैनंदिन व्यवहार करणेसुद्धा मुश्‍कील होईल.

पण हे सर्व का घडते? हा रोग का वाढतो आहे? मेंदूची काळजी घेणारा तो सर्वश्रेष्ठ असे पूर्वीपासूनच मानले गेले आहे. माणसाच्या मेंदूचे महत्त्व ओळखूनच माणसाची किंमत केली जाते. माणसाला मिळणारा पैसा, मानसन्मान वगैरे सर्व गोष्टी मेंदूच्या कर्तबगारीवर, मेंदूच्या क्षमतेवरच ठरतात. अशा मेंदूची सर्वतोपरी काळजी घ्यायला नको का ? आयुर्वेदाने सांगितलेले संस्कार पाहिले असता एक लक्षात येईल की आयुर्वेदात शरीराचे सर्व अवयव व धातू व्यवस्थित वाढावे अशी योजना असली तरी मुख्य योजना मेंदूचा वाढ पूर्ण व्हावी, मेंदूचे कार्य व्यवस्थित चालावे यासाठीच केलेली असते.

अगदी जन्मतः बालकाला द्यायला सांगितलेले मध व सोने चाटवण्याचा इलाज प्रथम मेंदूसाठी व नंतर हृदयासाठी असतो. लहान मुलावर स्मृती, मेधा, प्रज्ञा हे सर्व संस्कार होऊन मेंदू प्रगत व्हावा, मेंदूच्या पेशी आरोग्यवान राहून आयुष्यभर टिकून राहाव्यात, इंद्रियांमार्फत आलेल्या ज्ञानाचे मेंदूद्वारे आकलन व्हावे, इतकेच नव्हे तर इंद्रियांमार्फत न येऊ शकणारी माहिती इतर संवेदनांमार्फत कळावी अशी योजना मनात ठेवून उपाय सुचवलेले असतात. जडान्नाचे सेवन तर मेंदूला मुळीच चालत नाही. मेंदूमध्ये असणारे द्रव्य जणू तूप व मध एकत्र करून बनवलेल्या द्रव्यासारखे असते. तूप व मध हे मेंदूचे मित्र. बदाम सहाणेवर उगाळून सहा वर्षांपर्यंत मुलाला दिले तर मेंदूची विशेष प्रगती होते हे सिद्ध झालेले आहे.

१५ वर्षांपर्यंत मेंदूचा विकास होण्याची संधी असते. नंतरही आयुष्यभर मेंदूवर ताण पडू नये, मेंदूला उष्णता पोचू नये, पित्त गळ्याच्या वर जाऊ नये, मेंदूला विश्राम मिळण्याच्या दृष्टीने व्यवस्थित झोप व्हावी या सर्व गोष्टीं म्हणजे मेंदूची प्रगत अवस्था साधण्यासाठी केलेले इलाज आहेत. या उपरांत सतत खोटे बोलणे, मीच मोठा आहे असे समजून जग तुच्छ लेखणे, अहंकार वाढवणे, सारखा राग-राग करून शरीर व मेंदू तापवणे, सर्व जग माझ्या इच्छेप्रमाणे चालायला हवे या कल्पनेने त्रागा करत राहणे, दुसऱ्यावर अधिकार गाजवायच्या प्रयत्नात स्वतःचा ताण व आजार वाढवणे, मेंदूला पौष्टिक असलेला आहार न घेता स्वतःच्या प्रकृतीला न मानवणारे व न पचणारे जडान्न सतत सेवन करणे, मांसाहार करणे यामुळे मेंदूचे आरोग्य बिघडायला सुरुवात झाली की मेंदूच्या पेशी मरायला लागतात किंवा त्यांच्यामधले माहिती साठवून ठेवण्याचे सामर्थ्य निघून जाते.

अल्झायमरची व्याप्ती पाहिल्यानंतर मानवापुढे एक मोठे आव्हान (चॅलेंज) आहे हे कळते. म्हणून वेळेवर मेंदूचे महत्त्व ओळखून मानवाने त्याला प्रगत करण्यासाठी मेंदूला सर्वप्रथम महत्त्व देणे आवश्‍यक आहे. सर्वप्रथम मेंदूची काळजी, नंतर बाहुसामर्थ्य कमावणे, नंतर पोट भरण्यासाठी काम करणे व सर्वात शेवटी बँकेचा लॉकर भरण्यासाठी वणवण करणे, हा क्रम लक्षात ठेवला तर जीवनात कशाला महत्त्व द्यायचे ते लक्षात येईल आणि महत्त्व कशाला द्यायचे हे कळले की प्रत्येक जण या ‘ब्रह्मज्ञानासाठी’ म्हणजेच मेंदूला लागणारी ऊर्जा मिळवण्यासाठी योग, ध्यान-धारणेद्वारा कुंडलिनी जागृती, प्रज्ञासंस्कार यांचा आधार घेईल हे निश्चित!

श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या विपुल लेखनातून संकलित

loading image
go to top