esakal | श्रावणात का करावा उप-वास?
sakal

बोलून बातमी शोधा

Uapvas

श्रावणात का करावा उप-वास?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उपवास हा नेहमी व्रत म्हणून करावा. संकल्प करून उपवास केल्याने व्रत पाळणे सोपे होते. एकंदरीत उपवासाने, केलेला निश्चय पाळण्याची मनाला सवय लावणे हा उद्देशही सफल होऊ शकतो. उपवासाचा मुख्य उद्देश हा शरीराची व मनाची शुद्धी करणे, जडत्व व आलस्य दूर करणे आणि शक्तीला वाट मोकळी करून देणे हाच असतो.

श्रावण महिना म्हणजे व्रतवैकल्यांचा, निरनिराळ्या उपासनांचा महिना. भारतीय संस्कृतीनुसार या दिवसांमध्ये उपवासही महत्त्वाचा समजला जातो. मात्र उपवास म्हणजे नेमके काय? ‘उप’ व ‘वास’ या दोन शब्दांपासून उपवास हा शब्द तयार झालेला आहे. याचा अर्थ आहे, जवळ राहणे. कोणाच्या जवळ? तर परमेश्र्वराच्या जवळ. उपवासाच्या दिवशी अनवधानाने काहीच करायचे नसते; किंबहुना संपूर्ण वेळ अवधान म्हणजे साक्षीत्व टिकावे आणि आपला आपल्याशी म्हणजे पर्यायाने परमेश्र्वराशी सान्निध्य व एकभाव असावा यासाठी उपवास असतो. उपवासाचे कारण धार्मिक समजले तरी सुदृढ शरीर हेच खरे धर्माचे साधन असते आणि आध्यात्मिक उपवास असला तरी शरीराचा हलकेपणा, मनाची तरलता आणि आत्मशक्तीचे संतुलन अपेक्षित असते. एकूणच जेवण स्वतःच्या प्रकृतीला मानवेल असे हलके आणि मोजके असले व रात्री काही घेतले नाही किंवा अल्प भोजन केले तरी तो दिवस उपवासाचा मोजता येईल. उपवासाने शरीरातील अग्नी प्रदीप्त झाला म्हणजे दोष जाळणे, शक्ती देणे व प्रकाश देणे अशी सर्व कामे तो करतो.

उपवासाचा मुख्य उद्देश हा शरीराची व मनाची शुद्धी करणे, जडत्व व आलस्य दूर करणे आणि शक्तीला वाट मोकळी करून देणे हाच असतो. शरीरात न पचलेले अन्न सडत जाते, त्याचे आमद्रव्यात (चिकट आम्लद्रव्य) रूपांतर होऊन साठत जाते व त्यामुळे शारीरिक आळस, मानसिक असमाधान व रोगाची उत्पत्ती होते. तेव्हा कितीही व्यवस्थित व नैसर्गिक राहणीमान असले तरी प्रत्येक व्यक्तीला उपवासाशिवाय गत्यंतर नाही. कुठल्यातरी स्वतःस अनुकूल असणाऱ्या कारणासाठी आठवड्यातून एक दिवस, वर्ष-सहा महिन्यातून ८-१५ दिवस उपवास अवश्‍य करावा. उपवासाच्या दिवसात राजगिरा, केळे-तूप-मध, मोसंबी, सफरचंद वगैरे अल्प प्रमाणात खाल्लेले बरे असते. साबुदाण्याची खिचडी, उपवासाचे थालीपीठ, वऱ्याचा भात वगैरे नाना पदार्थ खाल्ले तरी चालते; पण त्याचे प्रमाण अत्यल्प असावे. तसेच उपवास हा नेहमी व्रत म्हणून करावा. संकल्प करून उपवास केल्याने व्रत पाळणे सोपे होते. एकंदरीत उपवासाने, केलेला निश्चय पाळण्याची मनाला सवय लावणे हा उद्देशही सफल होऊ शकतो. कोठे उपवासाला तांदूळ चालतात; तर कोठे गहू. या सर्व खाण्या-पिण्याच्या गोष्टी स्थळ-काळाला अनुरूप व शरीरास बदल म्हणून ठरविलेल्या असतात.

पण काही झाले तरी उपवासामुळे शरीरशुद्धी व मनशुद्धी हीच अभिप्रेत असते. कधी कधी उपवासाचे व्रत घेतल्यानंतर प्रकृति अस्वास्थ्य जाणवत असेल किंवा एखाद्या रोगाचा त्रास असेल तर उपवास करू नये, किंबहुना अशा वेळी रोजच हलके अन्न थोड्या प्रमाणात खावे. वार्धक्यामुळे सुद्धा उपवासाचे तंत्र बदलून घ्यावे लागते. राजकीय व सामाजिक उद्देशांसाठी केलेले उपवास हे वेगळे व प्रदर्शनार्थ असतात. मला आठवते, बऱ्याच वर्षांपूर्वी पुण्यातील माझ्या केंद्रात एक बाई मला भेटायला आल्या होत्या. या मध्यमवयीन बाई फार घाबरलेल्या दिसत होत्या. त्यांनी सांगितले की त्या सोळा सोमवारचे व्रत करत होत्या आणि आता चौदाव्या सोमवारी त्यांच्याकडून एक चूक घडली. त्यांच्या लहान नातीने, प्रेमाने बोलत असताना, मध्येच येऊन त्यांच्या तोंडात बिस्कीट दिले व अनवधानाने त्यांनी ते चावून मोडले. लगेचच लक्षात आल्याने त्यांनी ते खाल्ले मात्र नाही. तेव्हा असा उपवास मोडल्यामुळे काय त्रास होईल व आता पुन्हा पहिल्यापासून सोळा सोमवार सुरू करावेत की काय, असा त्यांचा प्रश्र्न होता. मी त्यांना म्हटले, ‘मुळीच घाबरू नका. तुमचा उपवास मोडलेला नाही. मुळात तुमच्या स्वतःच्या हाताने तुम्ही बिस्कीट खाल्लेले नाही. नातीने प्रेमाने तुम्हाला बिस्कीट भरवले आणि तुम्ही ते वात्सल्यभावाने घेतले. पण आज आपला उपवास आहे हे तुमच्या एका क्षणात लक्षात आले. त्यामुळे तुम्ही असे समजा की बिस्कीट मोडले, उपवास मोडला नाही. या सर्व चर्चेनंतर बाई बऱ्याच शांत झाल्या.

त्यांना पूर्ण आश्र्वस्त करण्यासाठी मी म्हटले की माझी भगवान शंकरांशी चांगली ओळख आहे. झाला प्रकार मी त्यांना समजावेन व ते तुमच्या व्रताचा स्वीकार अवश्‍य करतील. तेव्हा उपवास हा केवळ उपवासाचे निरनिराळे पदार्थ खाण्याचा दिवस नसून खरे तर वैयक्तिक अनुशासनाचा भाग आहे. देव सुद्धा किती उपवास केले व काय खाल्ले याचा हिशोब न ठेवता व त्यानुसार गुण न देता उपवासाच्या उद्देशावरून व शरीर- मन-आत्मा यांचे संतुलन किती झाले यावरूनच फळ देतात.

(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या विपुल लेखनातून संकलित)

loading image
go to top