बाळकृष्णाच्या बाललीला
श्रावण महिन्याच्या कृष्णपक्षातील अष्टमी म्हणजे ‘गोकुळाष्टमी!’ श्रीकृष्ण म्हणजे एक आदर्श अपत्य. आज हजारो वर्षे उलटून गेली तरी श्रीकृष्णलीला पाहण्याचा, ऐकण्याचा वा वाचण्याचा मोह सर्वांना पडतो यावरूनच ही गोष्ट सिद्ध होते.
श्रीकृष्णांचे संपूर्ण जीवनचरित्र आदर्शांनी भरलेले सापडेल. थोडा बारकाईने व आयुर्वेदिक दृष्टिकोनातून विचार केला तर त्याची सुरुवात कृष्णजन्मापासूनच होताना दिसेल. आयुर्वेदाने निरोगी बाळासाठी करायला सांगितलेला गर्भाधान संस्कार शरीरशक्ती उत्तम असलेल्या ऋतूत म्हणजे हेमंत-शिशिर ऋतूत होणे आदर्श मानलेले आहे.
श्रावणात जन्म होण्यासाठी नऊ महिने अगोदर म्हणजे कार्तिक, मार्गशीर्ष महिन्यात गर्भाधान व्हायला हवे. आणि कार्तिक, मार्गशीर्ष हे दोन महिने हेमंत ऋतूचे असतात. ऋतूंचा राजा समजल्या जाणाऱ्या हेमंतात गर्भधारणा होऊ शकली तर आजही बाळकृष्ण जन्माला येणे अशक्य नाही, हेच जणू श्रावणातली गोकुळाष्टमी सांगत असावी.
ज्यावेळी लहान मुलांना गोष्टी शिकवायच्या असतात तेव्हा श्रीकृष्णांच्या बाललीला सर्वाधिक कामाला येतात. भारतीय चित्रकला असो, संगीतकला असो, नृत्यकला असो आजसुद्धा अनेकदा त्यातला विषय ‘श्रीकृष्ण’ हाच असतो. नवजात बालक घरात असले तर ती मुलगी असो किंवा मुलगा, एकदा तरी त्याला बाळकृष्णाच्या वेषात सजवले नाही असे होत नाही.
निष्पाप, निरागस व जवळ जवळ निर्गुण, ज्यांना ममत्व, भीती, मोह असे विकार शिवलेले नाहीत अशी लहान मुले म्हणजे जणू परमेश्र्वराचे रूपच असते.
लहान मुलांना कसे वाढवावे? त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी घरातले, आजूबाजूचे वातावरण कसे असावे हे समजण्याच्या दृष्टीने भारतीय परंपरेत, राम-कृष्णांचे दोन आदर्श दाखवले गेले. पहिले श्रीराम, त्यांची ऐट, चालणे, बोलणे, धाडस वगैरे गुण लहानपणापासूनच सर्वांच्या आकर्षणाचे विषय होते.
म्हणूनच त्यांनी लहानपणी आकाशातला चंद्र खेळण्यासाठी मागायचे धाडस केले आणि मोठेपणी सर्व पृथ्वीला त्रास देणाऱ्या रावणावर चढाई करून, सैन्य म्हणता येणार नाही अशा अत्यंत तुटपुंज्या लोकांसमवेत, बलाढ्य व सुसज्ज सैन्याने युक्त असलेल्या रावणावर चढाईचे धाडस केले.
तर बालपणी नैसर्गिक शुद्ध भाव ठेवून बाललीलांमार्फत चतुरस्र व्यक्तिमत्त्व दाखवत पुढे दुर्जनसंहार व भगवद्गीतेद्वारा जीवन यशस्वी करण्याचा मार्ग दाखवून श्रीकृष्ण ‘योगेश्र्वर’ अवस्थेला पोचले. बाळलीलांमध्ये कृष्णाने गवळणींची घागर फोडणे, दही-लोणी चोरणे असे खेळ केले. यासाठी त्यांना कोणी रागवले तरी ते लुटुपुटीचेच! ह्या खट्याळपणासाठी गोपिकांनी आई-वडिलांच्या संगनमताने शिक्षा देण्याचा प्रयत्न केला तरी त्यातूनही जगदोद्धारच झाला.
कृष्णाचे बालपण गोकुळात गेले. अगदी लहान वयापासून कृष्ण-बलराम गाईंना चारण्यासाठी वनात घेऊन जात असत. त्यांच्यासोबत गोकुळात राहणारे सर्व बाळ-गोपाळही आपापल्या गार्इंना घेऊन जात असत. आरोग्याच्या दृष्टीने यावरून एक गोष्ट ध्यानात येईल की लहान मुलांनी मोकळ्या हवेत खेळावे-बागडावे.
आजकाल मुलांमध्ये बसून राहण्याची, घरच्या घरी संगणकावर खेळ खेळण्याची, टीव्हीवरचे कार्यक्रम बघण्याची प्रवृत्ती वाढताना दिसते आहे. यामुळे लहान वयात कफदोषाचे असंतुलन होऊन कमी वयातच मुले जाड होतात, आळशीपणा जडतो, लहान वयातला स्वाभाविक चपळपणा व उत्साह लोप पावून त्याजागी मंदपणा, कंटाळा दिसू लागतो.
एका बाजूने वाढती स्पर्धा व दुसऱ्या बाजूने असा आळशीपणा या ताणाला सामोरे जाणे हे मुलां-पालकांसाठी एक दिव्य असते. हे टाळायचे असले तर लहानपणापासून बाळकृष्णांना आदर्श समजून मुलांना मोकळ्या हवेत वावरण्याची, पुरेशा प्रमाणात खेळ खेळण्याची आणि पशुपक्षी व प्राण्यांवर प्रेम करण्याची सवय लावणे आवश्यक असते.
लहानपणी कृष्ण इतर बाळगोपाळांसमवेत गोपींच्या घरी जाऊन दही-लोणी फस्त करत असत, ही गोष्ट सर्वांनाच माहिती आहे. मुलांना खेळकर, उत्साही आणि ताकदवान बनवण्यासाठी लहानपणी दूध, लोणी, तुपासारख्या गोष्टी मुबलक मिळायला हव्यात, ही त्यामागची खरी योजना असावी.
सर्वांच्या घरी या गोष्टी पुरेशा प्रमाणात मिळत आहेत हे पाहण्यासाठीच बहुधा श्रीकृष्ण घरोघरी शिंकी-मडकी शोधून त्यातले लोणी सगळ्यांना वाटायला जात असावेत.
श्रीकृष्णांचे ‘गोपाळ’ हे नाव गोमातेचा महिमा वाढवणारे आहे. ‘गो’ म्हणजे इंद्रिये, जी बाह्यवस्तूकडे आकर्षित होणारी असतात आणि त्यांना ‘पाल’ म्हणजे त्यांच्यावर विजय मिळवून तनाचे व मनाचे संपूर्ण आरोग्य देणारा तो ‘गोपाल’. दूध, दही, लोणी, तूप याशिवाय माणसाचे आणि गोमय, गोमूत्र यांच्याशिवाय वनस्पतींचे व शेतीचे आरोग्य नीट राहणारच नाही.
आयुर्वेदात गाईपासून तयार होणाऱ्या दूध, दही, तूप, गोमूत्र व गोमय या पाच द्रव्यांना मिळून ‘पंचगव्य’ संज्ञा दिली आहे. आयुर्वेदानुसार पंचगव्य शरीरशुद्धी करते, तसेच कफदोष संतुलित करते. पंचगव्याचा वापर पूजेसाठी केला जातो, पूजेच्या निमित्ताने तीर्थाच्या रूपात पंचगव्य प्राशन करण्याच्या प्रथेमुळे सरतेशेवटी आरोग्याचाच लाभ होतो.
श्रीकृष्णचरित्रात कदंबाचा उल्लेख अनेक वेळा येतो. कदंबाचे झाड उंच, कायम हिरवेगार असते व त्याची फुले सुंदर व मोहक सुगंध देणारी असतात. कदंब हा त्रिदोषशामक व विषनाशक असल्याचे आयुर्वेदात सांगितलेले आहे. कदंबाचे असे महत्त्व असल्याने श्रीकृष्ण लहानपणापासून कदंबवृक्षाच्या सान्निध्यात राहत असावेत.
श्रीकृष्ण कदंबाच्या झाडाखाली बसून बासरी वाजवत असत व कदंबफुलांची माला धारण करत असत असेही वर्णन वाचायला मिळते. वृक्षवल्लींचे महत्त्व व लहान वयापासून निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याची शिकवणच यातून श्रीकृष्ण मुलांना देतात.
यमुनेच्या डोहातल्या विषारी कालिया सर्पावर विजय मिळवण्यासाठी श्रीकृष्णांनी कदंबाच्या झाडावरून उडी घेतल्याचे वर्णन सापडते. कदंबाचा प्रभाव विषघ्न असल्यानेच बहुधा कृष्णांनी अगोदर कदंबाचा आश्रय घेतला असावा.
अन्यायाविरुद्ध व अत्याचाराविरुद्ध धर्मयुद्धाचे समर्थन करणारे ते श्रीकृष्ण. कोणाचीही जमीन न लाटता समुद्राकडून जमीन घेऊन प्रजेसाठी सोन्याची द्वारका वसविणारे ते श्रीकृष्ण.
कर्म करतानाच आनंददायी फळ मिळवून जेव्हा कर्माचे फळ प्रत्यक्ष मिळेल त्यावर परमेश्र्वराचा म्हणजेच पर्यायाने मनुष्यमात्रांचाही हक्क असतो असा कर्मयोगाचा पाठ देणारे ते श्रीकृष्ण व ‘ज्ञान भक्ती विना’ व ‘भक्ती ज्ञान विना’ उपयोगाची नाही हे सांगणारी श्रीमद्भगवद्गीता गाणारे श्रीकृष्णच सर्वांना आरोग्य व मनःशांती देऊ शकतात.
(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.