
चातुर्मास म्हणजे चार महिन्यांचा काळ. आषाढातील देवशयनी एकादशीपासून ते कार्तिकातील प्रबोधिनी एकादशीपर्यंत चातुर्मास समजला जातो. शयनी एकादशीपासून भगवान विष्णू क्षीरसागरात शेषनागाच्या शय्येवर निद्रा घेतात म्हणून ही ‘शयनी’ एकादशी असे समजले जाते.
आयुर्वेदिक दृष्टिकोनातून विचार केला असता याच सुमाराला खरा पावसाळा सुरू झालेला असतो आणि त्याचा परिणाम म्हणून शरीरातील अग्नी मंदावलेला असतो. चेतनाशक्ती, वीर्यशक्ती इतर ऋतूंच्या मानाने कमी झालेली असते. प्रत्यक्षातही आपल्याला याचा अनुभव येत असतो.
साक्षात चैतन्यच मंदावले की ताकद, उत्साह, वीर्यता कमी होतात आणि जीवन जगताना, रोजचे व्यवहार करताना याचे भान ठेवणे गरजेचे असते. जणू हे लक्षात आणून देण्याचे काम चातुर्मासातील व्रतवैकल्यांच्या आधाराने होत असते.
चातुर्मास्य व्रते म्हणजे आषाढ एकादशीपासून कार्तिक एकादशीपर्यंतच्या चार महिन्यात करावयाची व्रते. यात मुख्यत्वे खालील व्रतांचा समावेश होतो.
1) एकवेळ भोजन - पावसाळ्यामध्ये अग्नी मंदावत असल्याने पचनसंस्थेवर ताण येऊ नये या दृष्टीने एक वेळ भोजन सुचविले आहे. आयुर्वेदातही वर्षा ऋतूत पचण्यास हलका व कमी प्रमाणात आहार घ्यायला सांगितले आहे. ज्या दिवशी खूप पावसामुळे सूर्यदर्शन होणार नाही त्या दिवशी शक्यतोवर जेवण करू नये असेही सांगितले आहे. यावरून चातुर्मासातील ‘एक वेळ भोजन’ या व्रतामागे आरोग्यरक्षणाची कल्पना असल्याचेच स्पष्ट होते.
दुपारी एकदा जेवून रात्री लंघन करणे हे सर्वांना मानवणारे व्रत होय. या ‘एकवेळ भोजन’ व्रतामुळे शरीरातील वाढलेले दोष पचून जातात, जाठराग्नी प्रदीप्त होतो, शरीर हलके होते, आरोग्य व्यवस्थित राहते, भूक-तहान नीट प्रतीत होतात, अन्नात रुची वाटते आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ताकद व ओज यांची वृद्धी होते.
‘एकवेळ भोजन’ यात जड म्हणजे पचण्यास अवघड अन्न अर्थातच निषिद्ध असते. म्हणूनच एकंदर संपूर्ण चातुर्मासात मांसाहार केला जाते नाही. उलट प्रकृतीला अनुकूल असे साधे-हलके अन्न सेवन करणे अपेक्षित असते.
2) मौनधारण - अर्थात न बोलणे. सध्याच्या आधुनिक व धकाधकीच्या जीवनात संपूर्ण मौन पाळणे अशक्यप्राय असले तरी निदान कमीत कमी म्हणजे जेवढे अगदी आवश्यक आहे तेवढेच बोलणे, वायफळ गप्पा न मारणे, इतरांची निंदा-नालस्ती न करणे या प्रकारे तरी मौन सांभाळता येऊ शकते. आरोग्याच्या दृष्टीतून मौनधारणाचे प्रयोजन शक्ती-ऱ्हास होऊ न देणे असे असते. कारण बोलण्यामुळे खूप शक्ती खर्च होत असते.
3) दीपध्यान - आषाढातील अमावास्येच्या निमित्ताने दीपपूजा केली जाते. दीप हे प्रकाशाचे, तेजाचे, अग्नीचे रूप असते. शिवाय दीपदर्शन हे मंगलदायक समजले जाते. वर्षाऋतूमुळे मंदावलेल्या अग्नीला उत्तेजना मिळावी, कमी झालेली शरीरशक्ती पुन्हा ताजीतवानी व्हावी म्हणून दीपपूजा उत्तम असते.
4) निसर्गाशी जवळीक - चातुर्मासात पिंपळ, तुळस या वनस्पतींची पूजा, सेवा, प्रदक्षिणा घालण्यास सांगितलेले आहे. आयुर्वेदात अनेक ठिकाणी वनस्पतींची पूजा, सेवा करायला सांगितली आहे. उदा. औषध म्हणून वनस्पती उपटण्यापूर्वी त्यांची पूजा केली जाते. औषध बनविताना विशिष्ट मंत्र म्हणून वनस्पती आत टाकल्या जातात वगैरे. चातुर्मासात नेमक्या याच दोन वनस्पती निवडण्यामागे आरोग्याचा विचार महत्त्वाचा दिसतो.
तुळस कफ-वातशामक असते, जंतुनाशक असते, अग्नीस उत्तेजित करते, सर्दी-खोकला-ताप-भूक न लागणे वगैरे पावसाळ्यात उद्भवू शकणाऱ्या विकारांवर रामबाण असते. तुळशीच्या नुसत्या अस्तित्वाने किंवा तुळशीच्या केवळ संपर्कात आल्याने सुद्धा आरोग्याचे रक्षण होऊ शकते, भूतबाधा वगैरे नष्ट होऊ शकते असे आयुर्वेदात सांगितले आहे. म्हणूनच चातुर्मासात तुळशीची पूजा-अर्चा, तुळशीला प्रदक्षिणा घालायला सांगितले आहे.
पिंपळ हाही सर्वांच्या परिचयाचा असतो. पिंपळाची साल स्तंभन करणारी म्हणजेच जुलाब, उलट्या, आव पडणे वगैरे विकारात औषध म्हणून वापरली जाते. पावसाळ्यात नेमके हेच विकार होण्याची शक्यता सर्वाधिक असते म्हणून चातुर्मासात पिंपळाच्या झाडाची पूजा-सेवा करायला सांगितली असावी, जेणेकरून पिंपळाच्या संपर्कात राहिल्याने शक्यतो हे विकार होणारच नाहीत.
याशिवाय श्रावणात मंगळागौरीच्या व भाद्रपदात हरितालिकेच्या निमित्ताने २१ पत्रींशी संबंध येतो. या सर्व पत्रींच्या संपर्काने आणि पूजेनंतर दुसऱ्या दिवशी प्रसाद म्हणून या पत्रींचा काढा करून पिण्याची प्रथा असल्याने आरोग्य नीट राहण्यास मदत मिळते.
आश्र्विनातील ललितापंचमीच्या दिवशी ललितादेवीची दूर्वा वाहून पूजा केली जाते. आश्र्विन-कार्तिक हे दोन महिने शरद ऋतूचे असतात. दूर्वा खुडणे, दूर्वांच्या संपर्कात राहणे पित्तशामक असते. शरदात वाढलेले पित्त कमी व्हावे म्हणून शीतल गुणाच्या दूर्वा वाहून ललितादेवीची पूजा केली जाते.
5) स्त्री संतुलनासाठी खास - श्रावणातील पंचमी म्हणजे नागपंचमी. या दिवशी स्त्रिया हातावर मेंदी काढतात. या महिन्यामध्ये शरीरात पित्त साठण्याची सुरुवात झालेली असते. हाता-पायांच्या तळव्यांवर मेंदी लावणे हे पित्तशामक असते. श्रावण-भाद्रपदात अशा प्रकारे पित्त साठूच दिले नाही तर नंतर येणाऱ्या शरद ऋतूत पित्ताचा त्रास होत नाही.
हरितालिकेच्या दिवशी स्त्रिया फक्त फलाहार करतात. फळे रसधातुपोषक असतात तसेच प्रकृतीनुरूप व योग्य प्रमाणात घेतल्यास विषद्रव्ये काढून टाकण्याचेही काम करतात. या दृष्टीने एक दिवस केवळ फलाहार उत्तम असतो.
आश्र्विनाच्या शेवटी व कार्तिकाच्या सुरुवातीला दिवाळीचा सण येतो. दीपपूजन, फटाके, फराळाचे पदार्थ, उत्सव यांच्या साहाय्याने पावसाळ्यात आलेली मरगळ पूर्णपणे दूर होऊ शकते. या दिवसात अग्नी प्रदीप्त झाल्याने लाडू, अनारसे, चकली, वगैरे पदार्थांचा आस्वाद घेता येतो. दिवाळीनंतर कार्तिकातील द्वादशीला चातुर्मासातील व्रताची सांगता करता येते.
अशाप्रकारे चातुर्मासाचा पाप-पुण्याशी, संस्कृतीशी, देवाधर्माशी संबंध जोडलेला आहे असे वरवर वाटत असले तरी त्यामागे मनुष्यमात्राच्या आरोग्याची, निसर्गसंवर्धनाची काळजी घेणे हा मुख्य हेतू आहे हे समजणे सोपे आहे. भारतीय संस्कृतीवर बाहेरून कितीही आघात झाले तरी आजही चातुर्मासातील व्रतवैकल्ये आदराने, प्रेमाने व श्रद्धेने सर्व लोक करत असतात.
या व्रतवैकल्यांमुळे शरीर-मनावर होणारे फायदे ताबडतोब दिसून येतात. तसे पाहिले तर केवळ चातुर्मासातील व्रतवैकल्ये वैज्ञानिक पायावर आधारित आहेत, शरीर-मन व आत्म्याचे आरोग्य मिळावे व उत्कर्ष व्हावा या हेतूने तयार केलेली आहेत असे नव्हे तर वर्षात येणारे सर्व सण व व्रतवैकल्ये कुठल्या ना कुठल्या फायद्यासाठी व विशिष्ट कारणानेच आयोजित केलेली दिसतात.
एकूणच सर्व व्रतवैकल्यांची सांगड आरोग्याशी घातली गेली असल्यामुळे त्यांची यथासांग माहिती करून घेऊन त्यातल्या विज्ञानावर व स्वतःच्या लाभावर लक्ष ठेवून स्वीकारली गेली तर देवाची कृपा, आरोग्यप्राप्ती व आनंदप्राप्ती होईल हे निश्र्चित !!
श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.