पथ्य पावसाळ्यातले !

जगातील सर्व खाद्यपदार्थ सगळ्यांनाच खाता येतात असे नाही, पचतात असे नाही, प्रत्येकाच्या प्रकृतीला मानवतात असे नाही व त्यातून प्रत्येकाला शक्ती मिळते असेही नाही.
Rain
Rainsakal

‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ ही आयुर्वेदाची एक विशेष संकल्पना. प्रत्येकाच्या बोटाचे ठसे ज्याप्रमाणे त्याच्यासाठी विशिष्ट असतात, त्याप्रमाणे आपल्या प्रत्येकाची एक विशिष्ट प्रकृती असते आणि आहार योजना ही प्रकृतीला धरून करणे आवश्यक असते.

जगातील सर्व खाद्यपदार्थ सगळ्यांनाच खाता येतात असे नाही, पचतात असे नाही, प्रत्येकाच्या प्रकृतीला मानवतात असे नाही व त्यातून प्रत्येकाला शक्ती मिळते असेही नाही. पण माणसाचे मन असे आहे की एखादी गोष्ट करू नको असे सांगितले असता ती गोष्ट मुद्दाम करण्याकडे प्रवृत्ती असते.

अमुक अमुक वस्तू खाऊ नका असे रोग्याला सांगितल्यावर पाठोपाठ प्रश्र्न येतो, 'अरे बापरे, मग खाऊ काय'? जणू काही त्याला वर्ज्य करायला सांगितलेल्या चार-पाच वस्तू (त्यात एक दोन भाज्या, एखादे फळ, एखाद-दुसरे कडधान्य, एखादे तयार पक्वान्न असू शकते, पण ते) सोडून जगात खाण्यासारखे काही नाहीच.

याच्या पुढचा हमखास प्रश्र्न असतो, 'डॉक्टर, आहाराचे पथ्य मी किती दिवस पाळायचे आहे?' या प्रश्र्नाचे खरे उत्तर आहे रोग बरा झाला तरी पथ्य जन्मभर पाळावेच लागेल. रोग झालेला असताना अपथ्यातील यादीत एखादी दुसरी वस्तू वाढविलेली असते हे खरे असले तरी अपथ्यकर गोष्टींच्या यादीत मुळात प्रकृतीला न मानवणाऱ्या गोष्टींचा समावेश असतो.

तेव्हा प्रकृतीप्रमाणे पथ्य पाळणे हे प्रत्येकासाठी आवश्यतक असतेच, पण मन ऐकत नाही. शरीरात ज्यावेळी रोग वा असंतुलन वाढण्याची शक्यता असते, निदान त्यावेळी तरी पथ्य पाळणे आवश्य क असते. पावसाळ्याच्या दोन महिन्यात म्हणजे निदान श्रावण व भाद्रपदात (साधारणपणे जुलै-ऑगस्ट-सप्टेंबर हा कालावधी) पथ्य पाळणे खूप महत्त्वाचे असते.

पावसाळ्यात वातप्रकोप होतो, पित्त साठायला सुरूवात होते. त्यामुळे पावसाळ्यात वात-पित्तवर्धक गोष्टी सेवन करता येत नाहीतच पण पावसाळ्यातील थंडीमुळे आणि मंदावलेल्या अग्नीमुळे पावसाळ्यात कफकारक गोष्टीही खाता येत नाहीत. त्यातल्या त्यात ज्यांची मूळ प्रकृती वाताची आहे म्हणजे ज्यांचे शरीर फार बारीक वा जाड आहे, ज्यांची उंची फार अधिक वा कमी आहे, ज्यांची हाडे दिसतात, ज्यांचे मन चंचल आहे, अशा सर्वांनी पावसाळ्यात वातकारक गोष्टी स्वप्नातही पाहू नयेत.

म्हणून पावसाळ्यात वा पावसाच्या आधी वा नंतर असे मिळून चार महिने काय खावे हे सांगण्यापेक्षा या ऋतूत काही खाऊ नये हे सांगण्यासाठी उपवासाचे तंत्र समजावलेले असते. त्यातल्या त्यात सोमवार, शनिवार हे थंड व वायुतत्त्वाचे वार उपवासासाठी सर्वश्रेष्ठ समजले जातात. उपवास करणे म्हणजे शारीरिक, मानसिक वात कमी करण्याचा प्रयत्न करणे. त्यासाठी या ऋतूत पचनास हलका आहार घेणे अपेक्षित असते व त्याचबरोबर मनाने सवय लावून घेतलेल्या वस्तू न खाता नेहमीच्या आहारापेक्षा वेगळी काहीतरी वस्तू खायची असाही दंडक घालून दिलेला दिसतो.

तेव्हा आयुर्वेदिक दृष्टिकोनातून पावसाळ्यातील आहार आपल्याला वेगळा समजून घेता येईलच. पण मुख्यतः पावसाळ्यात उपवास करणे हेच सर्वश्रेष्ठ आहे. आहारापाठोपाठ मानसिक वात कमी करण्यासाठी श्रवणसंकीर्तन, ध्यान, योग, प्राणायाम वगैरे गोष्टी पावसाळ्यात वाढविलेल्या असाव्यात.

फिरायला जाणाऱ्या मंडळींना पावसाळ्यात बाहेर फिरायला जाणे गैरसोयीचे असते. त्यामुळे फिरणे बंद झाले असताना खाणे कमी करायचे भान ठेवले नाही तरी त्रास होऊ शकतो व खाणे कमी केल्यावर शरीराचे आरोग्य टिकून राहावे यासाठी योगासने, प्राणायाम वाढविण्यावरही भर द्यायला हवा.

पावसाळ्यामध्ये काय खावे हे अष्टांगहृदयात एका वाक्यात याप्रमाणे सांगितले आहे, भजेत्‌ साधारणं सर्वम्‌ उष्मणस्तेजनं च यत्‌ ॥...अष्टांगहृदय सूत्रस्थान वात-पित्त-कफ या त्रिदोषांना संतुलित करणारे, उष्णवीर्याचे व अग्नी प्रदीप्त करणारे अन्न सेवन करावे. आहाराचे नियोजन करताना त्याची चव, वीर्य, विपाक व गुण अशा सर्व गोष्टी ध्यानात घ्याव्या लागतात.

चवीचा विचार केल्यास पावसाळ्यात मधुर, आंबट व खारट चवीचे अन्न खाणे योग्य असते. मधुर रस वात शमवतो, पित्त कमी करतो आणि ताकदही वाढवतो. पचायला जड पडणार नाही असे मधुर चवीचे पदार्थ पावसाळ्यात खाणे योग्य असतात. चरकसंहितेत पावसाळ्यात मध खाण्यास सांगितले आहे. मध मधुर असतोच, शिवाय पचायलाही सोपा असतो.

मधात अतिरिक्त क्लेदाचे म्हणजे शरीरातील अनावश्यआक ओलाव्याचे पचन करण्याचीही क्षमता असतो. या दृष्टीने पावसाळ्यात योग्य प्रमाणात मध खाणे चांगले असते. सकाळी उठल्यावर कपभर पाण्यात चमचाभर मध मिसळून घेणे किंवा भाकरी-पोळीसह मध खाणे शक्य असते.

पावसाळ्यात प्यायचे पाणी निश्र्चितपणे उकळलेले असावे. या ऋतूत पालेभाज्या शक्यतो कमी खाव्यात. याबरोबरच विहारात कुठल्याही खोलीला ओल नसावी, खोलीत दमटपणा नसावा. थंड पडलेल्या अंथरुणावर रात्री झोपू नये. शक्यतो संध्याकाळचे जेवण सूर्यास्ताच्या आसपास असावे वगैरे नियम पाळणे आवश्य क आहे.

आहाराचा विचार करताना, खाणे म्हणजे आहार असे आपण धरून चालतो, पण डोळ्याने पाहणे, कानाने ऐकणे या गोष्टीही मनाच्या आहारात समाविष्ट होतात. सर्व इंद्रियांमार्फत केल्या जाणाऱ्या कर्मांमुळे व्यक्तीला नाना तऱ्हेचे अनुभव येतात म्हणजे ही कर्मे म्हणजे सुद्धा व्यक्तिमत्वाचा आहाराच होय.

या सर्वच प्रकारांच्या आहारावर पावसाळ्यात नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे आहे. म्हणूनच श्रावणात कथा-कीर्तन-श्रवणाला अधिक महत्त्व दिलेले असते. आयुर्वेदाने सुचविलेल्या गोष्टी आचरणात आणणे सोपे व्हावे म्हणून रूढी व परंपरा यांनी बरीच मदत केलेली असते. त्या दृष्टीने नागपंचमीची दिंडं, गोकुळाष्टमीचा दहीकाला यांचे उदाहरण पावसाळ्यातील आहारासाठी घेता येईल.

रोजच्या चहात गवती चहा, आले, पुदिना यांचा वापर करणे वा या वनस्पतींचा काढा घेणे या गोष्टी सुद्धा पावसाळ्यातील आहारातच मोजायला हरकत नाही. सुंठीचे चूर्ण, गूळ व तूप यापासून बनविलेल्या गोळ्या पावसाळ्यात उपयोगी ठराव्यात.

तेव्हा पावसाळ्यातील आहाराचा विचार करताना सकाळचा नाश्ताच व दोन्ही वेळचे जेवण यांचाच विचार करून चालणार नाही तर एकूण तोंडात टाकायच्या वस्तू, कानाने ऐकायचे शब्द, डोळ्यांनी पाहायच्या गोष्टी या सर्वांचा विचार करून शरीराचे पावित्र्य (शरीराचे आरोग्य) व मनाचे पावित्र्य (पुण्यसंचय) टिकवावे.

श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com