बोनस : दीपावलीचा आणि आरोग्याचा! | Health | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dipawali
बोनस : दीपावलीचा आणि आरोग्याचा!

बोनस : दीपावलीचा आणि आरोग्याचा!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बरीच माणसे ‘मी काहीच चुका करत नाही, मी लवकर उठतो, योग्य आहार घेतो, मी कुणाच्या अध्यात ना मध्यात’... अशावरच संतुष्ट असतात. पण आरोग्याचा ‘बोनस’ मिळण्यासाठी कामात जसे विशेष कौशल्य ओतावे लागते, तसे आरोग्यबोनस मिळवण्यासाठी स्वतःवर प्रेम करणे आवश्‍यक असते. वर्षभर काही विशेष प्रयत्न न करता आरोग्याच्या बोनसची अपेक्षा ठेवणे सयुक्तिक ठरणार नाही.

सुख-समृद्धीचा उत्सव म्हणजे दीपावली. मैत्री वाढविणारी, प्रेम जागविणारी, आनंद करवणारी, शांती-समाधानाचा अनुभव देणारी ती दीपावली. दीपावली हा प्रकाशाचा तसाच अग्नीचाही उत्सव असतो. यात फराळाचे पदार्थ, गोडधोड पक्वान्ने, पाहुण्यांची सरबराई, घराची सजावट, नवीन कपडेलत्ते, प्रेमाच्या व्यक्तींना भेटी देणे-घेणे, अशा अनेक गोष्टी अध्याहृत असतात. वर्षभर येणारे इतर छोटे-मोठे सण प्रत्येक जण साजरे करेलच असे नाही, पण दीपावली मात्र घराघरात साजरी केली जाते. आपल्याकडे दीपावलीच्या आधी ‘बोनस’ संकल्पना असते. आपापले काम व्यवस्थित करणे हे तर प्रत्येकाचे कर्तव्यच असते पण एखाद्याने जीव ओतून व स्वतःची क्षमता, बुद्धी व कार्यक्षमता पुरेपूर वापरून कमी वेळात काम केले व त्या कामात ओतलेले प्रेम समोरच्याला दिसले व त्या कामाचे मूल्यमापन नेहमीच्या पद्धतीने न करता वेगळ्या रूपात करून दिलेले बक्षीस म्हणजे ‘बोनस’! दीपावलीसारख्या सणाला कामाच्या ठिकाणाहून बोनस मिळावा अशी अपेक्षा असते. आरोग्याचा बोनस तर अनेक प्रसंगी आवश्‍यक असतो. बरीच माणसे ‘मी काहीच चुका करत नाही, मी लवकर उठतो, योग्य आहार घेतो, मी कुणाच्या अध्यात ना मध्यात’... अशावरच संतुष्ट असतात. पण ‘बोनस’ मिळण्यासाठी कामात जसे विशेष कौशल्य ओतावे लागते, तसे ‘आरोग्यबोनस’ मिळवण्यासाठी स्वतःवर प्रेम करणे आवश्‍यक असते. वर्षभर काही विशेष प्रयत्न न करता आरोग्याच्या बोनसची अपेक्षा ठेवणे सयुक्तिक ठरणार नाही.

क्षणोक्षणी क्षरण होत असल्याने शरीराला ‘शरीर’ म्हणतात. ‘जिवासवे जन्मे मृत्यू जोड जन्मजात’ हे वचनही सत्यच आहे. शरीर सावकाश वार्धक्याकडे जाणे, झिजणे, दुर्बल होणे, आरोग्य व शक्ती कमी होणे व शेवटी ते शरीर बदलून पुन्हा जन्म घेणे ही नैसर्गिक चक्रगती आहे. नियत जीवनक्रमानुसार जगता येणे हे रोजच्या अनुशासित जीवनक्रमावर अवलंबून असते. मात्र म्हातारपणी, रोगांच्या साथीच्या वेळी किंवा अडीअडचणीच्या वेळी ‘आरोग्यबोनस’ हवा असेल तर खास प्रयत्न करावेच लागतील. नियमित व्यायाम आरोग्याचा बोनस मिळवण्याच्या दृष्टीतून महत्त्वाचा ठरतो. वयाला साजेसा आणि प्रकृतीला अनुरूप असा व्यायाम करण्याने कार्यक्षमता व उत्साहशक्ती तर वाढतेच, बरोबरीने निरोगी दीर्घायुष्याचा पायाही रचला जातो. कदाचित व्यायाम न करण्याने तरुण वयात फारसे काही बिघडल्याचे लक्षात येणार नाही पण जसजसे वय वाढत जाईल व आरोग्यासाठी बोनसची आवश्‍यकता लागेल तेव्हा मात्र तरुणपणी व्यायामाचे सातत्य न ठेवण्याची चूक केल्याचे लक्षात येऊ शकेल. नियमित अभ्यंग करणे, मेंदू व पंचेंद्रियांची काळजी घेण्याच्या दृष्टीतून आठवड्यातून एखाद्या दिवशी नाकात तूप टाकणे, एखाद्या दिवशी कानात श्रुती तेलासारखे तेल टाकणे, डोळ्यात अंजन घालणे, एखाद्या दिवशी सुमुख तेलासारख्या तेलाने गुळण्या करणे असे अगदी साधे कमीत कमी वेळ लागणारे पण खूप चांगला फायदा देणारे उपाय असतात. कान, डोळे, नाक वगैरे पंचेंद्रिये आज व्यवस्थित काम करत असले तरी त्यांनी शेवटपर्यंत असेच व्यवस्थित कार्यक्षम राहावे यासाठी ही एक प्रकारची गुंतवणूकच होय, जी योग्य वेळेला लखलाभ झाल्याशिवाय राहणार नाही.

नियमित रसायनसेवन हीदेखील भावी आरोग्याच्या दृष्टीतून उत्तम गुंतवणूक असते. च्यवनप्राश, अमरप्राश, आत्मप्राश अशी योग्य पद्धतीने बनवलेली उत्तम प्रतीची रसायने पण तयार मिळू शकतात. रसायनाने प्राणशक्ती, जीवनशक्तीचा संचय करून ठेवलेला असला की आरोग्य अबाधित राहण्यास निश्र्चित हातभार लागतो. ऐन वेळी त्रास होऊ नये यासाठी आपण आपल्या गाडीचे वेळेवर सर्व्हिसिंग करतो, गाडी चालविताना अपघात होऊ नये यासाठी दक्ष राहतो. शरीराची काळजी सुद्धा त्रास होण्याआधीच घ्यायची असते. रोग उपटल्यानंतर, हृदयाचे त्रास सुरू झाल्यानंतर, रक्तदाब वाढल्यानंतर, मानसिक ताणाने मेंदूत बिघाड झाल्यानंतर, गुडघे सुजून दुखायला लागल्यानंतर केलेल्या पंचकर्माची तुलना पोट भरण्यासाठी केलेल्या कामाशी करता येईल. रोग झाल्यावर केलेले पंचकर्म हा रोगमुक्तीसाठी केलेला एक इलाज आहे. शरीर सुस्थितीत असताना जर पंचकर्म केले, शरीराची काळजी घेतली तर त्याचा बोनस म्हातारपणी मिळेल. झोपेचेही तसेच आहे. प्रत्येक मनुष्य झोपतो हे तर खरेच. पण रोज व्यवस्थित व आवश्‍यक तितके झोपण्याचाही बोनस मिळतो, हे आयुर्वेद व भारतीय परंपरेने दाखवून दिलेले आहे. फक्त एक दिवस प्रार्थना करून ‘मला मनःशांती कुठे मिळाली?’ म्हणजे रोजंदारीवर काम करण्यासारखे आहे. नोकरदारही महिन्याचा मोबदला महिन्यानंतर मागतो, मोठा मनुष्य मात्र वर्ष संपल्यावर मेहनताना घेतो. रोज योग, ध्यान, प्रार्थना केली, श्रद्धा वाढवली तर आयुष्याच्या उतारवयात ‘बोनस’ मिळेलच पण अडीअडचणीला गरज वाटेल तेव्हा याच श्रद्धेचा काया-वाचा- मने म्हणजे शारीरिक, मानसिक व आत्मिक आरोग्यासाठी बोनस मिळेल.

दीपावलीनिमित्त सर्वांना भरपूर ‘आरोग्यबोनस’ मिळो, सर्वांना सुखसमृद्धी, मैत्री व शांती मिळो, अशी प्रार्थना!

(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या विपुल लेखनातून संकलित)

loading image
go to top