‘अन्न हे पूर्णब्रह्म’

निसर्गचक्राची गतिमानता म्हणजेच जीवन आणि ज्ञातातून अज्ञाताकडे, जडातून चैतन्याकडे शक्तीचे परिवर्तन ही या सतत चालणाऱ्या चक्राची गती.
food
foodsakal

निसर्गचक्राची गतिमानता म्हणजेच जीवन आणि ज्ञातातून अज्ञाताकडे, जडातून चैतन्याकडे शक्तीचे परिवर्तन ही या सतत चालणाऱ्या चक्राची गती. नैसर्गिक जीवनपद्धतीची आवश्यकता आज सर्वांना लक्षात आलेली आहे पण केवळ हर्बल, सेंद्रिय या शब्दांच्या मागे लागण्याने ती पूरी होत नाही. तर निसर्गचक्राशी समन्वय राखून स्वतः सतत कर्मरत राहणे, निसर्गचक्राला गतिमान ठेवणे हीच जीवनाची इतिकर्तव्यता होय! शक्तीचे उन्नत स्वरूपात परिवर्तन होण्यासाठी सुद्धा मुळात शक्तीची आवश्‍यकता असतेच.

चेतनाशक्ती म्हणजे अधिक उन्नत शक्ती असे म्हटले तर तीच सर्व वस्तूजातातील जडशक्तीवर काम करून त्या जडाची उत्क्रांती घडवते. भारतीय परंपरेने या क्रियेला ‘यज्ञ’अशी संज्ञा दिली आणि हा यज्ञ ज्या कर्मामुळे घडतो ते कर्म ज्ञानानुभवाधिष्ठित असते असेही सांगितले. श्रीमद्भगवद्गीतेत खालील श्लोक दिलेला आहे. " अन्नाद्भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसम्भवः यज्ञाद्भवति पर्जन्यो यज्ञः कर्मसमुद्भवः ॥३-१४॥ "

कर्मामुळे यज्ञ (शक्तिरूपांतरण क्रिया), यज्ञामुळे पर्जन्य, पर्जन्यामुळे अन्न आणि अन्नामुळे जीवमात्र अर्थात मनुष्यसुद्धा, असे हे निसर्गचक्र सतत चालू असते. ज्याअर्थी उत्पत्ती व जीवन अन्नावर अवलंबून असते त्याअर्थी जीवनात अन्नाचे महत्त्व असणार किंबहुना जीवनाचा स्तर किंवा जीवनातील सुख-दुःखे अन्नावरच अवलंबून असणार हे निश्र्चित. जे कोणी केवळ शरीरपोषणासाठी म्हणजेच फक्त भौतिक रूपांतरणासाठी अन्न सेवन करतात त्यांचे जीवन व्यर्थ असते असेही स्पष्टपणे सांगितले आहे. पण जी माणसे जडशक्तीरूपी अन्न खाऊन ते निसर्गचक्ररूपी यज्ञात अर्पण करून त्यापासून शरीर, मन व आत्मा यांच्यासाठी लागणाऱ्या उन्नत अशा शक्तीमध्ये रूपांतर करतील ती माणसे सुखी, समाधानी व आनंदी होतात.

सध्या बायो फूड, ऑरगॅनिक फूड, सेंद्रिय अन्न, सेंद्रिय शेती या संकल्पनांना खूप महत्त्व आले आहे. वैज्ञानिकांनी पण यावर विचार-मंथन व संशोधन सुरू करून या ऑरगॅनिक म्हणजेच नैसर्गिक अन्नाचा व आरोग्याचा संबंध जोडला व सध्या वाढत असलेल्या नवीन नवीन रोगांचे कारण अनैसर्गिक रासायनिक खते वगैरे वापरून केलेले अन्न ही निष्कर्षही प्रसिद्ध केला. निसर्ग म्हणजे त्यातील तीन महत्त्वाच्या गोष्टी. हवा (वातावरण), तहानेसाठी पाणी आणि भुकेसाठी अन्न. या तीन गोष्टी जर नैसर्गिक अवस्थेत राहिल्या तर आरोग्य अनुभवता येईल पण यात असंतुलन झाले तर मात्र मनुष्याच्या दुःखाला सीमा राहणार नाहीत.

‘अन्नाद्‌ भवन्ति भूतानि’ म्हणजे सर्व मनुष्यमात्राचे जीवन अन्नावरच अवंलबून असते. उत्क्रांतीच्या ओघात एक साधी अळी अन्नाच्या शोधात वणवण सुरू करते आणि नंतर ती अळी मोठी होऊन मनुष्याच्या पोटात जणू आतड्याच्या रूपाने सामावलेली असते. तिथून सुरू होतो अन्नाचा शोध. प्रत्येक प्राणिमात्र अन्नाच्या शोधात दाही दिशांना तोंड वासून पळत असतो. आयुर्वेदाने तर अन्न या संकल्पनेचा पूर्ण विकास करून मनुष्याची व अन्नाची प्रकृती यांचा अभ्यास करून काय खाल्ल्याने कल्याण होईल याचे मोठे शास्त्र विकसित केले.

दोन हातांचा उपयोग करून मनुष्याने जर कष्ट करण्याची तयारी ठेवली तर त्याच्यापुरते अन्न निसर्गाने आधीच तयार केलेले असते हे आपल्याला सहज दिसून येते. कारण सर्व सृष्टीच्या उत्पत्तीत प्राणिमात्र व मनुष्य उत्पन्न होण्यापूर्वी प्रथम तयार झाली वनस्पतीसृष्टी म्हणजेच जगाच्या उत्पत्तीच्या मुळाशी वनस्पतीरूप अन्न हेच कारण असते व त्यामुळे जसे अन्न खावे तशी प्रकृती, तसा स्वभाव व तशी माणसे तयार होतात. समर्थ श्रीरामदासस्वामींनी ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ असे म्हटले आहे तेही याच कारणाने आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रचारात असणारे उपास-तापास व सात्त्विक अन्नाची कल्पना आली ती सुद्धा यामुळेच.

अन्न सेवन केल्यानंतर त्याचे शारीरिक घटकद्रव्यात व शक्तीत रुपांतर व्हावे ही प्रत्येकाची अपेक्षा असते. अर्थात या शक्तिनिर्मितीच्या कारखान्यासाठी सुदृढ शरीराचे भांडवल पुरवावे लागते व जाठराग्नी, इंधन म्हणून पुरवावा लागतो. हे दोन्ही विषय मनुष्य व परमेश्र्वर यांच्या भागीदारीतून मिळतात आणि मग अन्नरूपी कच्चा माल योग्य पद्धतीने पुरवल्यावर मिळते जीवनशक्ती! हा कच्चा माल सात्त्विक स्वरूपाचा मिळाला तर त्यावर प्रक्रियेचा खर्च अगदी कमी येतो.

जर तो अगदी हीन प्रतीचा मिळाला तर त्यातून खर्च केलेल्या शक्तीपेक्षा उत्पन्न झालेली शक्ती कमी मिळते, इतकेच नव्हे तर त्याचा संपूर्ण यंत्रणेलाच त्रास होतो म्हणजे रोग वाढतात, अशा कच्च्या मालाला तामसिक अन्न म्हणतात. ज्या अन्नापासून दिलेल्या शक्तीएवढी किंवा थोडी अधिक शक्ती मिळते पण त्या शक्तीचा दर्जा कमी असतो म्हणजेच ती शक्ती शरीर बलवान करण्यासाठी शारीरिक पातळीवर उपयोगात आणली जाते म्हणून अशा अन्नाला राजसिक अन्न म्हणता येईल.

गेल्या ५० वर्षात शल्यकर्मशास्त्र किंवा एकूणच औषधी शास्त्र यावर खूप संशोधन झाले आणि नवीन नवीन औषधे बाजारात आली. या सर्व गोष्टी बाजारात उपलब्ध झाल्यानंतर २००० साली संपूर्ण मानवजात रोगमुक्त होईल असा अंदाजही जागतिक संघटनांनी व्यक्त केला, पण प्रत्यक्षात घडले भलतेच!नुसतेच नवीन नवीन असंख्य रोग त्रास देऊ लागले नाही, तर एकूणच मनुष्याची वीर्यशक्ती कमी झाली. पुरुषाला पुरुषत्वासाठी गोळ्या घ्यायची वेळ आली व स्त्रीला ज्यामुळे स्त्रीत्व प्राप्त झाले आहे ते गर्भाशय काढून टाकण्याची वेळ आली. सहसा याचा कोणी विचार केला नाहीच पण औषधाच्या दुष्परिणामांचा विचार करायचे सोडून वैज्ञानिक नवीन नवीन औषधे शोधण्याच्या मागे लागले.

पण मुळात हे सर्व रोग होण्याचे महत्वाचे कारण अनैसर्गिक औषधाबरोबरच अनैसर्गिक अन्न हेच होते. कलियुगाचा प्रभाव म्हणावा की काय, पण सध्या मनुष्यमात्राला सर्व अनैसर्गिक गोष्टीच आवडू लागल्या आहेत. सरळ चालणाऱ्या रहदारीत लोकांना रस नाही पण अपघात झाला की तो पाहण्याची सर्वांना घाई व त्याची बातमी. कलापूर्ण व अभिरुचीपूर्ण जीवन मनुष्याला आकर्षित करत नाही बातमी खून व दरोडा याबद्दलच्या बातम्या चघळण्यात आनंद वाटतो. एकमेकाला पूरक ठरून शक्ती वाढवणारे अन्नाचे ताट नकोसे वाटते पण उरल्या-सुरल्या वस्तूंचा चरबी घालून केलेला रगडा अधिक प्रिय वाटतो. ऋतुकाल न बघता प्लॅस्टिकच्या घरात उगवलेले अन्न, भाजीपाला असे सर्व अनैसर्गिक पदार्थ खाण्यात व उगवण्यात धन्यता वाटू लागल्यापासून रोगराई पसरून जीवनातील आत्माच हरवला.

पण सरतेशेवटी नैसर्गिक सात्त्विक अन्नाशिवाय सुखी जीवन जगण्याला पर्याय नाही हे माणसाच्या लक्षात आल्यावर खूप धावपळ सुरू झाली. पूर्वी वापरलेल्या अनैसर्गिक, रासायनिक खतांमुळे व कीटकनाशकांमुळे सर्व जमीनच खराब झाल्याचे लक्षात आले. तसेच संकरित व गुणसूत्र बदलण्याच्या प्रयोगापायी नैसर्गिक बियाणे व नैसर्गिक गाई-म्हशी वगैरेंचे वाण गडप झाल्याचे लक्षात आले. तेव्हा आता जमिनीची पारंपरिक मशागत करण्यापासून नैसर्गिक बियाणे मिळवणे आणि पुन्हा आपली पाळीव जनावरे प्रेमाने आपल्या बरोबर वाढवणे येथूनच सुरुवात करावी लागेल.

सात्त्विक, नैसर्गिक अन्न सर्व शरीराला म्हणजेच पर्यायाने सर्व इंद्रियांना शक्ती देणारे असते व ते कार्बन, हायड्रोजन व ऑक्सिजन या नैसर्गिक मूलद्रव्यांच्या सहयोगाने तयार झालेले असते. म्हणून त्यांना समर्पकतेने सेंद्रिय (स-इंद्रिय) किंवा ऑरगॅनिक (फॉर हेल्पिंग ऑर्गन्स) असे म्हटले जाते. श्रीमद्भगवद्गीतेने व आयुर्वेदानेही सात्त्विक अन्नाची खूप प्रशंसा केलेली आहे. सेंद्रिय पद्धतीने तयार केलेल्या सेंद्रिय अन्नालाच बायो फूड म्हणजे जीवनाभिमुख असेही म्हटले जाते. सेंद्रिय पद्धतीचे सात्त्विक अन्न सेवन करूनच शरीर, मन व आत्मा यांचे पूर्ण आरोग्य अनुभवता येईल.

(श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com