मुक्ती... आनुवंशिकतेपासून!

पत्रिकेतही राहू, केतू हे नेहमी १८० अंशाच्या कोनात म्हणजे समोरासमोर असतात. हे अमृतमंथन फक्त ब्रह्मांडाताच घडते का? ‘पिंडी ते ब्रह्मांडी’ या न्यायाने शरीरातही हे घडत असणार.
मुक्ती... आनुवंशिकतेपासून!
Updated on
Summary

पत्रिकेतही राहू, केतू हे नेहमी १८० अंशाच्या कोनात म्हणजे समोरासमोर असतात. हे अमृतमंथन फक्त ब्रह्मांडाताच घडते का? ‘पिंडी ते ब्रह्मांडी’ या न्यायाने शरीरातही हे घडत असणार.

अमृतमंथनाची कथा सर्वपरिचित असते. क्षीरसागराचे मंथन करण्यासाठी मेरु पर्वताची रवी, वासुकी सर्पाची दोरी करून एका बाजूला देव तर दुसऱ्या बाजूला दानव उभे राहिले आणि या समुद्रमंथनातून १४ रत्ने, सरतेशेवटी अमृतकुंभ हातात घेऊन साक्षात श्रीधन्वंतरी प्रगट झाले. पण कथा येथे संपली नाही. अमरत्व देणारे अमृत दुष्ट शक्तींना मिळू नये यासाठी देवांनी श्रीविष्णूंनी मोहिनीचे रूप घ्यायला सांगितले आणि फक्त देवांनाच अमृत मिळेल अशी क्लृप्ती लढवली, मात्र हे जेव्हा एका राक्षसाच्या लक्षात आले तेव्हा तो देवांच्या रांगेत जाऊन बसला. ओंजळीत मिळालेले अमृत पिताक्षणी श्रीविष्णूंनी मोहिनीचे रूप टाकून त्याचा शिरच्छेद केला, पण अमृताचा स्पर्श झाल्याने तो मृत झाला नाही. शिरसुद्धा जिवंत राहिले आणि धडसुद्धा. हेच ते राहू व केतू. मुळात राक्षस असणारे पण अमृताचा स्पर्श झाल्याने नष्ट न होऊ शकणारे.

पत्रिकेतही राहू, केतू हे नेहमी १८० अंशाच्या कोनात म्हणजे समोरासमोर असतात. हे अमृतमंथन फक्त ब्रह्मांडाताच घडते का? ‘पिंडी ते ब्रह्मांडी’ या न्यायाने शरीरातही हे घडत असणार. शरीरातील समुद्रमंथनाची कल्पना अशी की इंद्रियांकडून येणारे नाना तऱ्हेचे संदेश आपल्या मेरुदंडात पोहोचतात व ते मेरुदंडाच्या डाव्या-उजव्या बाजूंना जणू रवीच्या घुसळण्याप्रमाणे फिरतात. कूर्मावताररूपी आपल्या कमरेतील हाडांनी दिलेल्या आधारावर हे घुसळणे चालते व त्यायोगे सगळ्या संवेदना व चेतना मेंदूत पोचतात व मेंदूतील केंद्रांना हवी असलेली उत्तेजना मिळते. मेंदूतील केंद्रांना काम करायला लागणारी शक्ती मिळते. या संवेदना व चेतनेच्या वहनाबरोबर दोषसुद्धा वर पोचू शकतात. पण ते तसे पोहोचू नयेत यासाठी धड व मस्तक यांच्यामध्ये जय-विजय या ग्रंथींची योजना केलेली असते. या सर्वांच्या यथाव्यवस्थित कार्यावर शरीराच्या आरोग्याचे गणित अवलंबून असते.

शरीरात चक्राकार व नागमोडी, परस्परांना छेदत पुढे जाणारा आकार पुन्हा पुन्हा स्पष्ट होत असतो. आधुनिक विज्ञानाने गुणसूत्रांची रचना एकमेकांत गुंडाळलेल्या सर्पाकार पट्ट्यांसारखी दाखवलेली असते. या पट्ट्यांमधल्या विशिष्ट संरचनेला जनुक (जीन्स) असे म्हटले जाते. मनुष्याचा स्वभाव, त्याचे व्यक्तिमत्त्व, त्याचे आरोग्य, त्याच्या जीवनात घडणाऱ्या घटना वगैरे सर्व गोष्टी या गुणसूत्र व जनुकांमध्ये दडलेल्या असतात. आणि जनुकांवर राहू-केतूचा मोठा प्रभाव असतो. लहान मुलांचे एक सुंदर खेळणे सर्वांनी पाहिलेले असेल. दोन तारांना नागमोडी आकार देऊन, परस्परविरोधी पद्धतीने समोरासमोर ठेवून वर व खाली बांधलेले असते. वर एक दोरी असते. या दोरीच्या साहाय्याने ही रचना अधांतरी लटकवली आणि एकदा धक्का देऊन तिला गती दिली की या तारा गोल गोल फिरत राहतात. एका तारेकडे राहिले तर ती वर गेल्याचा भास होतो तर दुसरी तार खाली उतरल्याचा भास होतो. वर जाणाऱ्याला असेंडिंग नोड आणि खाली येणाऱ्याला डिसेंडिग नोड समजले तर ज्योतिषशास्त्रात पत्रिकेतील राहू-केतूंची योजना या पद्धतीनेच ध्यानात घेतली जाते.

पत्रिकेमध्ये परास्परविरुद्ध असणाऱ्या या राहू- केतूंचा परिणाम इतर सर्व ग्रहांवर होत असतो. म्हणूनच राहू-केतूच्या जोडीच्या एकाच बाजूला सर्व ग्रह आले तर त्याला कालसर्पयोग असे म्हटले जाते. चौऱ्याऐंशी लक्ष योनींच्या फेऱ्यात फिरत ठेवायचे सामर्थ्य या राहू-केतूंमध्ये असते. परंतु ज्याप्रमाणे जनुके सर्व विकृतींना जबाबदार नसतात, वातावरणे, सकारात्मकता, मानसिकता यांचा जसा जनुकातील दोष आटोक्यात ठेवण्यासाठी उपयोग करून घेता येतो, त्याप्रमाणे राहू-केतूच्या प्रभावातून सुटण्यासाठी मदत करणारेही राहू- केतूच असतात. बऱ्याचशा मानसिक शक्ती जनुकांमुळे म्हणजे या राहू-केतूंमुळे मिळालेल्या असतात. त्या शक्तीचा वापर कसा करायचा हे जर विवेकाने, गुरुकृपेने किंवा स्वतः मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग करून मिळालेल्या शक्तीचा उपयोग कसा करायचा हे योग्य रीतीने ठरवल्यास मनुष्याला स्वतंत्रता वा मोक्ष प्राप्त होऊ शकतो; अन्यथा विकृती व रोग उत्पन्न होणे अवघड नाही. या विषयाला नुसते बाजूला न ठेवता त्यावर डोळसपणे संशोधन होणे आवश्‍यक आहे, बऱ्याच वेळा वेगळ्या वेगळ्या क्षेत्रांत माणसे फसतात. रेल्वेचे तिकीट घ्यावे तेही बनावटी असते, मोठ्या मोठ्या कंपन्यांचे शेअर सर्टिफिकेट बनावटी विकले जातात, नोकरीचे आमिष दाखवून पैसे उकळणारी मंडळी असतातच म्हणून रेल्वेच्या तिकिटांच्या खिडक्या बंद करून चालत नाही किंवा नोकऱ्या सुचवणारी माणसे नसून चालणार नाही. फसवणूक प्रत्येक क्षेत्रात होते, पण म्हणून सर्वच विषय बंद करून टाकणे हा काही इलाज होऊ शकत नाही.

आपल्या वंशातून आलेले वेगवेगळे प्रोग्रॅम्स ज्या जीनमध्ये कार्यरत राहतात आणि त्याच्या प्रभावाखाली जीवनाचे इतर सर्व व्यवहारसुद्धा प्रभावित होतात, त्यावर इलाज तर शोधावाच लागेल. दिवंगत पूर्वजांना श्रद्धांजली देणे किंवा पितृपक्ष वा हॅलोविन सारखा एक विशिष्ट कालावधी ठेवून या पूर्वसंचितापासून सुटण्याचा इलाज करणे अशी परंपरा सर्व जगभर आहे. भारतात पितृपक्षात पाळलेले नियम किंवा श्राद्धपक्ष वगैरे हा या इलाजपद्धतींपैकी एक इलाज असण्याची शक्यता आहे. रोगापासून मुक्ती केवळ औषधोपचारांवर अवलंबून असेल असे वाटत नाही. त्यासाठी मनात असणारे आणि जुन्या संकल्पनांत दडलेले आदेश बदलून घ्यावे लागतील तेव्हाच या राहू-केतूंच्या विळख्यातून सुटका होऊन आरोग्य व आनंद मिळेल.

(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com