तस्मै श्रीगुरवे नम:। | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Guru

साक्षात परमेश्वर आणि गुरू हे दोघे एकत्र पुढ्यात उभे राहिले तर आधी नमस्कार गुरूंना करावा असे निर्विवादपणे सांगणारी आपली संस्कृती.

तस्मै श्रीगुरवे नम:।

साक्षात परमेश्वर आणि गुरू हे दोघे एकत्र पुढ्यात उभे राहिले तर आधी नमस्कार गुरूंना करावा असे निर्विवादपणे सांगणारी आपली संस्कृती. गुरूंचे, सद्‍गुरूंचे स्थान सर्वोच्च असते. आषाढ शुद्ध पौर्णिमा (व्यास पौर्णिमा) हा सद्‍गुरूंच्या प्रति कृतज्ञता, समर्पणभाव व्यक्त करण्याचा दिवस.

जगण्याची तुलना अनेकदा तारेवरच्या कसरतीशी केली जाते. एखादा डोंबारी जोपर्यंत बिनदिक्कत, कुठल्याही काळजीशिवाय तारेवर चालू शकत नाही, तोपर्यंत त्याला पडण्याची भीती असते, परंतु जेव्हा तो डोळे मिटून अगदी सहजतेने तारेवरून चालू शकतो, तेव्हा तो भीतीतून मुक्त झालेला असतो. जीवनाचेही असेच आहे. नाना तऱ्हेच्या समस्यांमुळे जीवनात भीती उत्पन्न होते व भीती उत्पन्न झाल्यामुळे जीवन नकोसे वाटते, यातून सुटावे असे वाटते. जीवनातून सुटणे याचा अर्थ येथे जिवंत न राहणे असा नसून जीवनातून सुटणे म्हणजे भीती न वाटावी, आनंद निर्माण व्हावा व तो सर्वांना वाटून जीवनाची अनुभूती घेता यावी हा आहे. हाच मोक्ष व हीच मुक्ती. सद्‍गुरू श्रद्धेची वाट दाखवून, भीती नष्ट करून जीवन जगण्याची वाट सोपी करतात.

गुरू या शब्दाचा अर्थ आहे मोठा. पृथ्वीवर सर्वप्रथम जीव तयार झाला तो अगदी सूक्ष्म जंतूंच्या रूपात. नंतर त्याची जसजशी उत्क्रांती झाली तसतसे आकार, समज व शक्तीने मोठे असणारे प्राणी तयार झाले. जीवनात मोठेपणाला, विकासाला खूप महत्त्व असते. आकाशात कार्यरत असलेल्या ग्रहांपैकी गुरू हा सर्वांत मोठा ग्रह आहे. शनी हा सुद्धा त्याच्या कड्यांमुळे मोठा ग्रह असला तरी तो अति दूर, अति थंड असल्यामुळे त्याचा जीवनाशी संबंध केवळ अनुशासनापुरताच येतो. मात्र ज्या ज्ञानामुळे जीवन सुखकर होणार असते ते ज्ञान गुरुतत्त्वाने व्यापलेले असते म्हणजेच ते गुरू म्हणून प्रकट झालेले असते. जीवनात लागणारा जोडीदार व बरोबरची मित्रमंडळी; जीवनाचे अंतिम ध्येय म्हणजे समाधान, शांती व स्वातंत्र्य; हे सर्व मिळवून देण्यासाठी लागणारी जी शक्ती वा व्यक्ती तेच गुरुतत्त्व.

अडचणींतून मार्ग दाखविणारे ते गुरू, जीवन कसे जगावे हे सांगणारे ते गुरू. एखादी विद्या आत्मसात कशी करावी याचे मार्गदर्शन करणारे ते गुरू. अगदी सुरुवातीला लिहिण्या-वाचण्यास शिकविणारेही गुरू. बाळबोध शिकविणारे ते शिक्षक. भौतिक विश्वातील व बाह्य जगतासाठी असल्या तरी ज्या विद्या आत्मसमाधान देतात त्या विद्या देणारे ते गुरू. आत्मज्ञान करवून, सर्व विश्वाशी संबंध जोडून, जनता-जनार्दनात देवत्व दाखविणाऱ्‍या व अंतिमतः सर्व कष्टांतून, संकटांतून मुक्त करवून पुनर्जन्माच्या चक्रातून मुक्त करणारे ते सद्‍गुरू.

जे शिकण्यापासून फायदा होतो, अधिक पैसे मिळण्याची व भौतिक सुखे विकत घेता येण्याची शक्यता वाढते असे शिक्षण घेण्याची माणसाची तयारी असते. पुढे सुखाचे आमिष लटकत असल्याने माणूस असे शिक्षण घ्यायला तयार होतो. पुढे लटकत असलेल्या गुळाच्या लोभाने पळत सुटलेले गाढव जेव्हा थकून भागून बेशुद्ध पडते, तेव्हा गूळ मातीत मिसळलेला असतो. तसेच, केवळ पैशाच्या मागे लागून मिळविलेले ज्ञान कितीही मोठे असले तरी त्यापासून मिळणारी सुखे उपभोगायला मिळेपर्यंत मनुष्य दमलेला असतो, त्याचे अस्तित्व उरलेले नसते. हे सर्व दिसत असतानाही मनुष्य असे बाह्यसुख देणारे ज्ञान मिळविण्याच्या मागे का लागतो हे कळत नाही. एखादी वस्तू उपलब्ध झाली तर ती ठेवण्यासाठी खिसा, पिशवी असे काहीतरी असणे आवश्यक असते, शिवाय ती वस्तू पेलण्याची खिशाची वा पिशवीची ताकद असणेही आवश्यक असते. तेव्हा मिळणाऱ्या पैशांनुसार पिशवीचीही ताकद वाढविणे आवश्यक आहे, हे कळणे गरजेचे आहे. हे मार्गदर्शन करणारे असतात, ते सद्‍गुरू. साधनसामुग्री व पैशाशिवाय कार्यभाग उरकणे शक्य नाही. तेव्हा पैसा तर हवाच पण तो आरोग्य, प्रेम, शांती न गमावता मिळवायचा असेल तर त्यासाठी सद्‍गुरूंची आवश्यकता असते.

आयुर्वेद, संगीत, नृत्य, ज्योतिष, योग वगैरे जीवनशास्त्रांच्या अभ्यासासाठी गुरूतत्त्वाची निश्चित गरज लागतेच, परंतु सद्‍गुरूंचीही आवश्यकता असते. संगीत हे नुसते ऐकून किंवा रागाचे आरोह अवरोह पाठ करून शिकता येत नाही. गुरूंच्या मार्गदर्शनाखाली रियाज करण्याने, गुरूतत्त्व अंगी बाणवण्याने संगीत शिकता येते. मात्र संगीत हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते परमात्मतत्त्वापर्यंत पोचण्याचे, स्व-उन्नतीचे माध्यम आहे याचा अनुभव सद्‍गुरूंच्या कृपेशिवाय मिळत नाही.

एकूणच गुरूतत्त्वाशिवाय सुख-समाधान आणि परमआनंदाचा लाभ होऊ शकणार नाही. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सद्‍गुरूंना जीवनात आणि मनात परमोच्च मानले तर याचा अनुभव घेता येईल.

(श्रीगुरू बालाजी तांबे यांच्या विपुल लेख संग्रहातून)

Web Title: Article Writes God And Guru

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :articleFamily Doctor