आरोग्यातील राम! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shriram

‘राम राम मंडळी, कसं काय?’ असे म्हणून समोरच्या व्यक्तीला संबोधण्याची पद्धत अजूनही अनेक ठिकाणी  दिसून येते.

आरोग्यातील राम!

‘राम राम मंडळी, कसं काय?’ असे म्हणून समोरच्या व्यक्तीला संबोधण्याची पद्धत अजूनही अनेक ठिकाणी  दिसून येते. यामागे श्रीरामांचे नाव ओठावर येणे हा हेतू तर असतोच, परंतु प्रत्येकामध्ये परमपुरुष-परमात्म्याचा अंश आहे, याचीही आठवण करून दिली जाते. कधी तरी आपण ‘त्यात काही राम नाही’ असे जे म्हणतो, तेव्हासुद्धा त्या वस्तूच्या शक्तीबद्दल, तेजाबद्दल आणि त्याच्या उपयुक्ततेबद्दल बोलत असतो. हनुमंतांची एक जी कथा आपल्याला प्रत्येक गोष्टीत ‘राम’ बघण्याचा बोध देते, ती अशी होय. राम-रावण युद्धात रावणावर विजय मिळवून जेव्हा श्रीरामचंद्र परत अयोध्येला आले, त्या वेळी सर्वांना यथायोग्य सत्कार करण्याचा, बक्षीस देण्याचा कार्यक्रम झाला. तेव्हा सीमाताईंनी हनुमंतांना विशेष मौल्यवान असा मोत्याचा कंठा भेट दिला असता, हनुमंतांनी एक एक मोती दाताने फोडून आत बघायला सुरुवात केली.

सीतामाई पाहातच राहिल्या. एवढ्या भारी मोत्यांच्या कंठा आणि हे वानरराज काय करत आहेत? एवढा मौल्यवान कंठा खराब झाला. सीमाताईंनी रागावून विचारले, ‘अरे मारुतीराया, काय करतो आहेस?’ मारुतीरायांनी सांगितले, ‘मी रामभक्त आहे. मला आता फक्त रामतत्त्व हवे आहे. तेव्हा मी या मोत्यांमध्ये राम आहे का हे बघत आहे.’ सीमाताई म्हणाल्या, ‘अरे मोत्यात राम कसा असेल? तू काय वेडा आहेस का? शेवटी तू एक मर्कटच राहिलास. मोत्यात कधी राम असतो का? आणि असे असेल तर तुझ्यात कोठे राम आहे?’ तेव्हा हनुमंतांनी स्वतःची छाती फाडली आणि मारुतीरायाच्या हृदयात सर्वांना रामाचे दर्शन झाले. ही कथा फार चांगले सार सांगणारी आहे. हनुमंत बुद्धिवंत आहेत, कारण ते सर्व ठिकाणी ‘राम’ पाहू शकतात. आपल्यालाही प्रत्येक गोष्टीतली शक्ती प्रत्येक गोष्टीतला खरा कस बघता यायला हवा.

पृथ्वीच्या पाठीवर रामायण चिरंतन राहील असे विधिलिखित आहे, पण याचा अर्थ केवळ कथापुराणात श्रीराम-सीतेची गोष्ट चालू राहील असा मर्यादित घेऊन चालणार नाही तर रामाची भक्ती करणाऱ्याला वस्तूच्या बाह्य स्वरूपाला न भूलता वस्तूतील राम, वस्तूतील शुद्धता आणि सकसता बघता यायला हवी. आयुर्वेदात एक शब्द आहे निरामयता. ‘निर्’ म्हणजे नाही आणि ‘आम’ म्हणजे न पचलेल्या अन्नातून तयार झालेला चिकट अम्लयुक्त पदार्थ, जो सर्व रोगांच्या उत्पत्तीचे कारण असतो. म्हणजेच निरामयता एकूण अर्थ रोगरहित स्वास्थ्य. पण सध्याच्या कलियुगात ‘नि’ म्हणजे ‘नाही’ आणि ‘रामयता’ म्हणजे ‘रामाचे अस्तित्व’ अशा प्रकारे रामाचे अस्तित्व डावलून जी जीवनशैली स्वीकारलेली आहे तिथे निरामयतेला स्थान काय असणार? जेथे राम नाही तेथे कसले आरोग्य? आपले स्वास्थ्य उत्तम असावे हा विचार सदा सर्वकाळ लहान-थोर, सुशिक्षित-अशिक्षित अशा सर्वांच्याच मनात घर करून बसला आहे. परंतु त्यासाठी निवडलेले मार्ग मात्र निसर्गनियमाला आणि विश्र्वचक्राला धरून नाहीत.

रामजन्मासाठी आवश्‍यक असलेले, ज्या ठिकाणी कोठलेही द्वंद्व नाही असे अयोध्येचे वातावरण सध्या नाही. त्याऐवजी चारी बाजूला बोकाळलेला चंगळवाद आणि त्यातून घडणारे अत्याचार आणि हिंसेचे वातावरण; पति-पत्नी यांच्यात प्रेम आणि आत्मीयतेऐवजी वाढलेला संशयभाव; प्रजेच्या सुखासाठी, मागण्यांसाठी एरवी जागरूकता नसताना अचानक एक दिवस निवडणुकीच्या दिवशी एकदम मतदाराला आलेले महत्त्व; यातून लोक आणि सरकार यांच्यात निर्माण झालेले फसवणुकीचे वातावरण; ‘अन्नाद्‌ भवन्ति भूतानि’ म्हणजे अन्नामुळे एकूण सर्व जीवमात्र, त्यांचे आरोग्य व स्वभाव तयार होतात हे माहीत असूनसुद्धा विकृत अन्नाला मिळणारी स्वीकृती, लोकसंख्या फार वाढू नये, ही मनाची धारणा ठेवून जन्माला आलेले मूल, पैसा सर्व सुखे आणतो, पैशाने सर्व जीवन उजळून निघते या एकच तत्त्वावर झालेले संगोपन व शिक्षण यातून हलके हलके जीवनातला राम कमी न झाला तरच नवल.

येन केन प्रकारेण नुसती संपत्ती जमा केली की ती ठेवण्यासाठी फक्त पोटच मोठे झाले, मोठ्या पोटामुळे पचन बिघडले, मेरुदंडावर पोटाच्या कँटिलिव्हरचा अवाजवी भार आला आणि हृदयावर दाब वाढला की सुरू होते जाणीवरूपी ‘राम’ नसलेले जीवन. यातून मग अनुभवाचे बोल, आप्तवाक्य आणि गुर्वाज्ञा जुनाट आणि बुरसटलेल्या वाटू लागतात. संतोष व आनंद न मिळाल्यामुळे नुसतीच चमक दमक असणाऱ्या पण खरे सुख न देणाऱ्या वस्तू मिळवण्यात स्वतःला धन्य समजले जाते. त्यातून वाढतो उत्शृंखलपणा व अनीतीची वागणूक. साहजिकच रोगांचे मूळ असणारा प्रज्ञापराध सुरू होतो.

प्रज्ञापराध म्हणजेच रावण आणि त्यातून झालेला दोषप्रकोप, म्हणजेच रोग त्याच्या इतर राग-लोभादी राक्षसरूपी सहकाऱ्यांबरोबर शरीररूपी सीतेला जिवापासून दूर आपल्या ताब्यात ठेवून, शरीर व मन दोघांनाही यातना भोगायला लावते. या परिस्थितीत बारीक-सारीक राक्षसांचा वध करण्याने किंवा भरकटलेल्या मनःस्थितीत सतराशे साठ उपाय करण्याने काहीच साधणार नाही. एक रोग दूर केला की त्या जागी नाव बदलून दुसरा रोग पुन्हा त्रास देण्यास हजर! दहा मस्तके उडवली तरी जोपर्यंत हृदयस्थानी मर्मात बाण मारत नाही तोपर्यंत हा रावण मरणार नाही. स्वतःच्या जीवनशैलीत बदल करून नैसर्गिक राहणीमान व आहार याला वनवास न समजता त्यांचा स्वेच्छेने स्वीकार करून रोगापासून होणाऱ्या त्रासासाठी जरी तात्पुरती व्यवस्था केली तरी त्याचे मूळ केंद्र कुठे आहे ते शोधून त्यावर व्यवस्थित इलाज केला तरच या रावण रोगाचा संपूर्ण निःपात होईल व शरीर व जीव यांचे मिलन होऊन आनंदात जगता येईल. रामनवमीच्या शुभदिनी प्रत्येक वस्तूत, प्रत्येक व्यक्तीत राम बघण्याचा संकल्प केला तर ती रामभक्ती खऱ्या अर्थाने आरोग्याचा आशीर्वाद देणारी ठरेल!

(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित)