महती श्रीफळाची!

नारळीपौर्णिमा लवकरच येते आहे. पावसाळ्यात खवळलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी नारळीपौर्णिमेच्या दिवशी समुद्राची पूजा करून नारळ अर्पण करण्याची पद्धत आहे.
Shrifal
ShrifalSakal
Summary

नारळीपौर्णिमा लवकरच येते आहे. पावसाळ्यात खवळलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी नारळीपौर्णिमेच्या दिवशी समुद्राची पूजा करून नारळ अर्पण करण्याची पद्धत आहे.

नारळ नुसताच भौतिक पातळीवर उपयोगी ठरणारा नव्हे, तर मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवरही उपयोगी पडतो. भारतीय संस्कृतीमध्ये आपल्यापेक्षा वयाने, ज्ञानाने किंवा अनुभवाने मोठ्या व्यक्तींप्रती असणारा आदर दर्शवण्यासाठी हळद-कुंकू लावून श्रीफळ देण्याची परंपरा आहे. बरोबरीने जरी काही फुले, एखादी भेटवस्तू द्यायची असली तरी श्रीफळाशिवाय त्यामागचा आदर व्यक्त होत नाही. म्हणून श्रीफळाचे महत्त्व खूप असते. एखाद्या नव्या वास्तूचे, वस्तूचे, यंत्राचे किंवा एखाद्या मोठ्या प्रोजेक्टचे उद्‌घाटन असल्यास नारळ द्यावा लागतो आणि वाढवावा लागतोच. अशा या श्रीफळाचे महत्त्व आपण आजच्या लेखात पाहणार आहोत.

नारळीपौर्णिमा लवकरच येते आहे. पावसाळ्यात खवळलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी नारळीपौर्णिमेच्या दिवशी समुद्राची पूजा करून नारळ अर्पण करण्याची पद्धत आहे. एरवी सुद्धा पूजा असो, सत्कार असो, ओटीभरणाचा कार्यक्रम असो, नारळ लागतोच. नारळाला श्रीफळ म्हटले जाते. कारण कोणत्याही मंगलप्रसंगी त्याची आवश्यकता असतेच. भारतीय संस्कृतीमध्ये आपल्यापेक्षा वयाने, ज्ञानाने, किंवा अनुभवाने मोठ्या व्यक्तींप्रती असणारा आदर दर्शवण्यासाठी हळद, कुंकू लावून श्रीफळ देण्याची परंपरा आहे. बरोबरीने जरी काही फुले, एखादी भेटवस्तू द्यायची असली तरी श्रीफळाशिवाय त्यामागचा आदर व्यक्त होत नाही. म्हणून श्रीफळाचे महत्त्व खूप असते. एखाद्या नव्या वास्तूचे, वस्तूचे, यंत्राचे किंवा एखाद्या मोठ्या प्रोजेक्टचे उद्‌घाटन असल्यास नारळ द्यावा लागतो व वाढवावा लागतोच.

‘नारळ फोडावा’ असा वाक्प्रचार केला जात नाही तर ‘नारळ वाढवावा’ असेच म्हटले जाते, ते याच कारणामुळे. नारळ नुसताच भौतिक पातळीवर उपयोगी ठरणारा नव्हे तर मानसिक व आध्यात्मिक पातळीवरही उपयोगी पडतो. एखाद्या अदृश्‍य शक्तीशी संभाषण सुरू करण्यापूर्वी किंवा त्या शक्तीला संतुष्ट करण्यासाठी नारळ द्यायची पद्धत असते. मनुष्यप्राण्याच्या उत्क्रांतीमध्ये एक मोठा फरक असा दिसून येतो की त्याचा मेरुदंड जमिनीशी काटकोनात असून आकाशाकडे सरळ उभा असतो. इतर सर्व प्राण्यांचा मेरुदंड जमिनीला समांतर असतो. हे माणसाचे विशेषत्व आहे. मेरुदंडाच्या वर असते डोके. नारळाच्या झाडाचे खोड म्हणजे मणके एकमेकांवर ठेवून तयार झालेला जणू मेरुंदड आणि त्याच्यावर येणारे नारळ हे जणू डोके, ही कल्पना अतिशय सुंदर व चपखल वाटते. डोक्यामध्ये कवटीच्या आत मेंदू व विशिष्ट पाणी असते तसेच नारळाच्या कवटीच्या आत खोबरे व पाणी असते. नारळालाही केस व डोळे असतात. म्हणूनच माणसाशी अत्यंत साधर्म्य असणारा वा प्रतीक वाटणारा असा हा नारळ वा श्रीफळ.

देवाच्या भेटीसाठी मंदिरात जाताना किंवा सद्‌गुरुंच्या भेटीला जाताना कमीतकमी नारळ घेऊन जाण्याची पद्धत आहे. कारण नारळ हा अहंकाराचे प्रतीक असतो आणि यामुळेच ती जगातील सर्वांत मोठी भेट ठरते. देवाला, सद्‌गुरुंना शरण जाण्यासाठी आपण मस्तक नमवतो, त्यांच्यासमोर नारळ अर्पण करून पायावर डोके ठेवतो म्हणजेच आपला अहंकार, मीपण त्यांना समर्पित करून मी आपणास संपूर्ण शरण आहे हे दर्शवले जाते. नारळाचा सर्वोत्तम उपयोग अशा प्रकारे करून घेता येतो. नारळात पाणी असल्यामुळे म्हणा किंवा निसर्गाची योजना म्हणा, नारळावर प्रक्षेपित केलेल्या इच्छा टिकून राहतात असे म्हटले जाते. शुभ म्हणून नारळ घरात ठेवणे ही भारतीय संस्कृतीतील एक चांगली पद्धत आहे. नारळाच्या झाडाच्या प्रत्येक बारीक सारीक भागाचा उपयोग असतो.

मला आठवते, लहानपणी गावाकडे गेले असता नदी किनाऱ्यावर नारळाचे एक झाड आडवे ठेवलेले असायचे, ज्याचा उपयोग बोटीसारखा करून नदी पार करून जाता येत असे. नारळाच्या झाडाचे खोड दोन बाजूला लावून मध्ये भर टाकून चालण्यासाठी शेतात पायवाटा करता येतात. ओढ्यावर ४-५ नारळीची खोडे टाकून पुलासारखा उपयोग करता येतो. नारळाच्या झावळ्यांच्या चटया विणून घराच्या छतावर टाकल्या जातात किंवा भिंतीचे पावसापासून संरक्षण करण्यासाठी लावता येतात. नारळाच्या पानात असणाऱ्या कडक काडीचे खराटे बनवले जातात. नारळावर असणाऱ्या तंतुमय चोडणापासून दोरखंड, पायपुसण्यापासून ते गाद्या बनविण्यापर्यंत अनेक उपयोग होतात. करवंट्यापासून अनेक खेळणी होऊ शकतात.

नारळाच्या आतील खोबरे व पाणी निघून गेल्यावर उरलेल्या करवंटीत काहीही राहात नाही म्हणून फसविले गेल्यावर त्याच्या हाती करवंटी आली असे म्हटले जाते, मात्र करवंटीचा औषधातही खूप चांगला उपयोग होतो, नारळाच्या करवंटीचे तेल अप्रतिम औषध आहे असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. नारळ पूर्ण तयार होण्यापूर्वी हिरवी शहाळी वर्षभर सर्वांना गोड व थंड पाणी तर देतातच पण आतील मलईसारखे खोबरे म्हणजे तर स्वर्गीय आनंदच. सर्व प्रकारे खोबऱ्याचे तर अनेक उपयोग आहेतच. खोबऱ्यापासून निघणाऱ्या तेलावर आयुर्वेदीय संस्कार केल्यावर ते मालिशसाठी किंवा केशवर्धनासाठी अत्यंत उपयोगी असते. ओल्या नारळाचे दूध काढून केसाला लावल्यास केस वाढायला मदत होते, हेच दूध चेहऱ्याला लावले तर चेहऱ्याच्या त्वचेला वर्ण्य ठरते. खोबऱ्याचा रोजच्या स्वयंपाकात वापर केलेलाच असतो. नारळापासून खोबरेपाक, नारळीभात वगैरे पक्वान्नेही करता येतात. नारळाचे दूध हे तर शक्तिवर्धक असे रसायनच. रोज नैवेद्याची छोटी वाटीभर नारळाचे दूध व खडीसाखर घेण्याने शरीरातील उष्णता कमी होते, मज्जाधातूचे पर्यायाने मेंदूचे व नसांचे पोषण होते. अशा तऱ्हेने नारळाचे झाड बहुगुणी आहे. हे झाड समुद्रकिनारी लावल्यानंतर त्याचा विस्तार वर गेलेला असल्यामुळे खालचा समुद्र तर नीट दिसतो व झाडामुळे किनाऱ्याला शोभा येते.

नारळाचे सर्व उपयोग, त्याचे सौंदर्य, त्याची सर्व एकूण व्याप्ती पाहिल्यावर नारळाला श्रीफळ का म्हणत असावेत हे सहज लक्षात येते. पृथ्वीवर असलेल्या दोनतृतीयांश पाण्यापासून तयार झालेला खवळलेला महासागर श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनासारख्या दिवशी एका नारळाने शांत कसा होतो, हे सहज समजून येऊ शकते.

(श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे यांच्या विपुल लेखनातून संकलित.)

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com