यशाची गुरुकिल्ली श्रमप्रतिष्ठा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Success

स्वार्थ हा मनुष्याला भ्रष्टाचाराकडे नेतो तर सर्वांच्या कल्याणाचा विचार हा श्रमावर श्रद्धा दृढ होण्यास प्रवृत्त करणारा असतो. म्हणूनच श्रमप्रतिष्ठेवर उभ्या असलेल्या जीवनात आरोग्य व समृद्धी मिळते.

यशाची गुरुकिल्ली श्रमप्रतिष्ठा

भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्या दिवशी राज्यघटनेनुसार देशाचा व्यवहार चालवायला सुरुवात झाली, तो दिवस म्हणजे प्रजासत्ताक दिन किंवा गणतंत्र दिन. ‘पाचामुखी परमेश्र्वर’ या तत्त्वावर लोकशाही उभी असते. सर्वमताने सर्वांच्या कल्याणाचे निर्णय घेणे, पाच लोकांनी आपापले विचार मांडून त्यातील बरे-वाईट पाहून निर्णय घणे हे कधीही फायद्याचे आणि सर्वांच्या हिताचे असते. मात्र एकाच व्यक्तीच्या मनाप्रमाणे ज्या वेळी एखादी संस्था किंवा देश चालतो त्यावेळी त्या व्यक्तीमध्ये अहंकार प्रकट होऊ शकतो किंवा फक्त स्वतःच्या स्वार्थाचे निर्णय घेणे सुरू झाले तर सगळ्यांची अडचण होते. त्यातून पुढे आळस, अंधविश्र्वास बळावत जातात.

स्वार्थ हा मनुष्याला भ्रष्टाचाराकडे नेतो तर सर्वांच्या कल्याणाचा विचार हा श्रमावर श्रद्धा दृढ होण्यास प्रवृत्त करणारा असतो. म्हणूनच श्रमप्रतिष्ठेवर उभ्या असलेल्या जीवनात आरोग्य व समृद्धी मिळते. श्रम म्हणजेच कर्म. कर्म हे प्रत्येकाला करावेच लागते. कर्म न करता कोणीही राहू शकत नाही. मात्र कर्मामागचा हेतू शुद्ध असला, त्या कर्मातून फक्त माझा किंवा माझ्या कुटुंबाचा फायदा व्हावा एवढाच विचार न ठेवता सर्वांचा फायदा व्हावा. जनता जनार्दनाला त्याचा काही उपयोग व्हावा हे जेव्हा पाहिले जाते तेव्हा त्या श्रमांना प्रतिष्ठा लाभते.

श्रमप्रतिष्ठेचे महत्त्व अधोरेखित करणारा दिवस म्हणजे ‘प्रजासत्ताक दिन!’ श्रीमद्‌भगवद्‌गीतेमध्ये भगवंत म्हणतात की, ‘न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन। नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि ॥ ३-२२॥’ या लोकी मला काही मिळवायचे नाही पण मी कर्म म्हणजेच कष्ट करत राहतो. जर प्रत्यक्ष श्रीकृष्णांना कर्म करणे चुकले नाही, तर तेथे सामान्य मानवाची काय कथा? कर्मात श्रम आणि ते कर्म करण्यामागचा हेतू अशा दोन गोष्टी आवश्‍यक असतात. कर्म केल्यामुळे नुसते शरीरच आरोग्यवान राहते असे नव्हे, तर नैतिकतेने कर्म करण्याचा मनाला, बुद्धीला व मेंदूलाही खूप फायदा होत असतो.

सध्या समाजात नैराश्यादी मानसिक रोग, स्मृतिभ्रंशासारखे मेंदूचे विकार मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसतात त्यामागे श्रमांना प्रतिष्ठा नसणे, कर्मामागे नैतिकता नसणे हे एक मोठे कारण आहे. श्रम म्हणजे ढोर मेहनत नव्हे. युक्तीची योजना करून श्रम कमी करण्याच्या कल्पनेतूनच निरनिराळी यंत्रे साकार झाली. माणसाचे श्रम कमी करून भारी काम किंवा गुंतागुंतीचे अवघड काम पूर्ण करण्यासाठी उपयोगात आणले जाणारे साधन म्हणजे यंत्र. तसे पाहताना कडक जमीन उकरण्यासाठी फाळ जमिनीत घुसून जमीन नांगरली जाऊ शकते असे बैलाने ओढण्याचे नांगर माणसाने फार पूर्वी शोधून काढले. मातीचा वा वाळूचा ढीग इकडून तिकडे हलवायचा असेल तर एका माणसाने एक-एक घमेले भरून उचलून तरफ यंत्राचा वापर केल्यामुळे काम कमी श्रमात पूर्ण होते, हेही माणसाला कळले.

प्रत्येक काम सोपे व कमीत कमी श्रमात व्हावे यासाठी जगात सर्वांची धडपड सुरू असते. यातूनच एखादे अचाट काम करणारे मशीन तयार होते. लोखंडाचा जाड पत्रा वाकवून त्याला आकार द्यायचा झाल्यास नुसते श्रम पुरेसे नसतात, तर त्यासाठी यंत्राची आवश्‍यकता लागते. जसजशा यंत्रांमध्ये सुधारणा होत गेल्या, तसतशा अनेक आश्र्चर्यकारक गोष्टी तयार झाल्या. एका दृष्टीने मनुष्याचे श्रम वाचले तर तेवढ्याच श्रमात माणसाला अधिक काम करता येईल, अशी अपेक्षा असणे स्वाभाविक आहे. पण यंत्रांमुळे श्रम वाचत असल्याने स्वतःला काही करायला नको अशा समजुतीतून माणसाचा आळस मात्र वाढला. त्यामुळे श्रम न केल्याने होणारे त्रास वाट्याला आले. अजिबात काम न केल्याने वजन वाढायला लागले, शरीर कमकुवत व्हायला लागले.

पाटा-वरवंट्यावर वाटणे, केर-वारे करणे, धुणे-भांडी वगैरे कामे मिक्सर, वॉशिंग मशिन वगैरे यंत्रांवर सोपवल्याने माणसाचे श्रम खूप कमी झाले. यामुळे शरीराचे आरोग्य टिकण्यासाठी वॉकिंग मशिन, सायकलिंग वगैरे प्रकार जिममध्ये मशिनवर जाऊन करण्याची वेळ आली. या सगळ्या अनुभवांवरून श्रमप्रतिष्ठा लक्षात यायला हवी होती. खाऊन-पिऊन शरीराची पुष्टी केली तरी त्यात ताकद भरण्याचे व आकार देण्याचे काम श्रमानेच होऊ शकते हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. शारीरिक श्रम करणाऱ्याला वेतन कमी मिळते असे सगळीकडे दिसते. कारण तो शरीरशक्तीचा वापर अधिक करतो आणि मेंदूचा वापर कमी करतो. एका दृष्टीने हे जरी बरोबर असले इतके कमी वेतन दिले जाऊ नये, श्रम करावेसेच वाटणार नाहीत. शारीरिक श्रमांचा मोबदला कमी असला तरी तो पुरेसा असणे मात्र आवश्‍यक आहे. गरीब-श्रीमंतांची दरी समाजात वाढते आहे असे आपण म्हणतो त्यावेळी त्यातून श्रमप्रतिष्ठा कमी झाली आहे असेच दिसते.

श्रमाचे महत्त्व सर्व समाजाला पटून त्याचे मूल्यमापन व्यवस्थित झाले पाहिजे. हे जेव्हा घडेल तेव्हा तो समाज सुखी होईल, समाधानी राहील आणि ‘एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ’ हे प्रत्यक्षात आले की त्यातून समृद्धी अनुभवता येईल. क्षणभर जरी हे सामाजिक व आर्थिक विषय बाजूला ठेवले तरी श्रम केल्यानंतर वैयक्तिक आनंद खूप मोठ्या प्रमाणावर अनुभवता येतो. शारीरिक श्रम न करता एखादे काम यंत्राद्वारे केले तर हा आनंद मिळतोच असे नाही. खरे तर श्रम करणाऱ्यास अन्न अधिक पौष्टिक व अधिक प्रमाणातही लागते. अन्न खाणे, मलविसर्जन, लैंगिक व शारीरिक सुख ही कर्मे प्रत्येकास स्वतःसच करावी लागतात. या कामास कितीही मोबदला देऊ केला तरी श्रम विकत घेता येत नाही.

या क्रियांमधला आनंद स्वतःच अनुभवावा लागतो व येथेच खरी श्रमप्रतिष्ठा कळते. कुठलेही कर्म फळाची अपेक्षा न ठेवता करावे असे श्रीमद्‌भगवद्‌गीतेत सांगितले आहे. कर्म करत असतानाच त्याचा आनंद घेऊन टाकावा म्हणजे नंतर फळ मिळेल या आशेवर राहण्याची गरज राहणार नाही. कर्माचे फळ मिळेलच याची शाश्र्वती नसते व फळ आल्यावर ते स्वीकारणारा तेथे असेलच असे नसते ज्या वेळी ते फळ मिळेल तेव्हा त्याची गरज असेलच असेही नाही म्हणून फळाच्या भरवशावर राहिलेली माणसे दुःखी होतात. सुखात राहण्यासाठी फलाशा सोडून काम करावे असे म्हटले आहे. कर्म करत असतानाच त्याचा आनंद घेतल्यास कर्म करण्याचा फायदा आपल्याला आधीच झालेला असतो असे श्रीकृष्णांनी सांगितले. हीच खरी श्रमाची प्रतिष्ठा व हाच खरा श्रमाचा आनंद.

(श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित)

टॅग्स :articleFamily Doctor