
बृहदारण्यक उपनिषदामध्ये एक प्रार्थना आहे, ‘असतो मा सत् गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतं गमय।’ याचा अर्थ आहे, असत्याकडून मी सत्याकडे आकर्षित होवो, अंधकारातून मी प्रकाशाकडे जावो, मृत्यूपासून मी जीवनाकडे वाटचाल करो.
बृहदारण्यक उपनिषदामध्ये एक प्रार्थना आहे, ‘असतो मा सत् गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतं गमय।’ याचा अर्थ आहे, असत्याकडून मी सत्याकडे आकर्षित होवो, अंधकारातून मी प्रकाशाकडे जावो, मृत्यूपासून मी जीवनाकडे वाटचाल करो. ज्या जीवनामध्ये आशा असते ते जीवन प्रकाशाने भरलेले असते, पण नैराश्य अंधाराकडे घेऊन जाणारे असते. सध्या नैराश्य ही एक मोठी समस्या होऊन बसलेली आहे. समाजात नैराश्याच्या अंधारातून पुन्हा जीवनाच्या प्रकाशाकडे जायचे असेल तर त्यासाठी मुळात नैराश्य म्हणजे काय आणि त्यावर उपचार करण्याची आवश्यकता का आहे हे लक्षात घ्यायला हवे. आयुर्वेदानुसार मनाचा एकाकीपणा किंवा मनाची विफलता नैराश्याचे कारण असते. मन हा शरीर व चैतन्य यांच्यातील दुवा असल्याने मन शरीराचा आधार असते आणि चैतन्याचाही निदर्शक असते. आणि म्हणूनच नैराश्यावर उपचार करण्यासाठी शारीरिक आरोग्य व शक्तीचा विचार करणे आवश्यक असते. शरीर निरोगी असले तरच मनाचे काम व्यवस्थित होऊ शकते आणि मन स्वस्थ असले तरच शरीर निरोगी राहू शकते.
उदाहरण द्यायचे झाले तर पातळ कागदापासून बनविलेल्या दिव्यामध्ये पेटलेली मेणबत्ती ठेवली तर एक तर दिवा उलटेल तरी किंवा जळून खाक तरी होईल. म्हणजे सरतेशेवटी दिवा आणि मेणबत्ती दोघांचाही नाश होईल. शरीर व मनाचेही असेच असते. मन म्हणजे काय? तर मन हे एक तत्त्व आहे, ज्याचे विचार करणे हे कार्य आहे. ज्याप्रमाणे सिनेमाच्या पडद्यावर चित्र प्रक्षेपित होते, तसे मनात येणारे विचार शरीराच्या माध्यमातून कार्यरूपाने अभिव्यक्त होत असतात. त्यामुळे मन व शरीर एकमेकांपासून विभक्त करता येत नाहीत. शरीर मनाचे पोषण करते आणि मन शरीराचे पोषण करते. सध्याच्या संगणकयुगाच्या संदर्भात समजवायचे झाले तर नुसता प्रोग्राम संगणकाखेरीज जसा कामाचा नसतो, तसे शरीराखेरीज मन एकटे काही करू शकत नाही.
सप्तधातूंपैकी सर्वांत शेवटचा धातू म्हणजे शुक्रधातू व सातही धातूंचे सारस्वरूप असणारे ओज हे चैतन्याचे कारक असतात आणि त्यांच्यात मनावर प्रभाव टाकण्याची, मनाला ताकद देण्याची क्षमता असते. आणि म्हणून नैराश्य दूर करायचे असेल तर शुक्रधातू, ओज यांना पोषण मिळण्यासाठी प्रयत्न करणे भाग असते. पंचमहाभूतांच्या बाजूने विचार केला तर मन मुख्यत्वे वायू व आकाशतत्त्वापासून बनलेले असते आणि याच दोन तत्त्वांपासून वातदोष तयार होत असतो. त्यामुळे नैराश्यावर उपचार करताना वातदोषाला संतुलित करणारे उपचार गुणकारी ठरताना दिसतात. आत्मसंतुलन व्हिलेजमध्ये अशा प्रकारे केल्या जाणाऱ्या सर्वांगीण उपचारांचा उत्तम परिणाम मिळतो. नैराश्यग्रस्त व्यक्तींवर काम करताना एक गोष्ट लक्षात येते की इच्छा पूर्ण न झाल्याने मनात जे असमाधान तयार होते त्यामुळे अशा व्यक्ती शांतीचा अनुभव घेऊ शकत नाहीत.
छोट्या छोट्या गोष्टींमुळेही त्यांचे मन कायम विचलित होते. म्हणजे सकाळी उठल्यावर कपभर छान चहा मिळाला नाही तर संपूर्ण दिवस रागात व अशांतीत जाणार असला तर जीवनात ज्या अनेक छोट्या-मोठ्या इच्छा अपूर्ण राहतात त्याचा मानसिकतेवर किती बरे परिणाम होत असेल? असमाधान ही एक समस्याच असते आणि ती दूर करण्यासाठी आयुर्वेदाने योग व अध्यात्म यांचा आधार घेतलेला आहे. ‘कोऽहं?’ म्हणजे ‘मी कोण आहे?’ या प्रश्र्नाचे उत्तर प्रत्येकाने शोधायला हवे. जसे पावसाळ्याच्या सुरुवातीला येणाऱ्या पाखरांना प्रकाशाचे आकर्षण असते, पण जेथे प्रकाश आहे तेथे अग्नीसुद्धा असतो हे ते विसरतात. प्रकाशाच्या ओढीने ज्योतीकडे आकर्षित झालेली पाखरे क्षणात भस्मसात होतात. त्याप्रमाणे आपणही भलत्याच इच्छा ठेवल्या तर त्यातून शक्तिऱ्हास होऊन आपण नैराश्याला बळी पडू शकतो. आयुर्वेदातही म्हटले आहे, ‘आत्मानं अभिसमीक्ष्य’ म्हणजे आत्मपरीक्षण करून आपल्या इच्छा-आकांक्षांना तर्काच्या तराजूमध्ये तोलून पाहणे आणि बरोबरीने स्वतःची क्षमता समजून घेणे हे सुद्धा आवश्यक आहे. ज्यांची सहनशक्ती कमी असते किंवा जे जीवनातील चढ-उतार स्वीकारण्यात कमी पडतात, जे स्वतःच्या समजुतीवर अडून राहणारे असतात, जे ‘मी म्हणतो तेच खरे’ या धारणेचे असतात त्यांना नैराश्य येण्याची शक्यता सर्वाधिक असते.
आयुर्वेदानुसार, मन अशांत झाले की उपचार करताना एका बाजूने मनावर तर दुसऱ्या बाजूने शरीरावर, विशेषतः शुक्रधातूवर काम करणे गरजेचे असते. मनावर काम करण्यासाठी योग महत्त्वाचा होय, शाकाहार महत्त्वाचा होय, विशिष्ट मंत्र ऐकता ऐकता ज्योतिध्यान करणे उदा. सोमध्यान करणे हे सुद्धा उपयुक्त होय. आत्मसंतुलनमध्ये पंचकर्म करताना योग, मंत्र, अग्निउपासना, ॐकार ध्यान, सत्संग यांचा समावेश केला आहे तो याचसाठी. आणि त्याचे उत्कृष्ठ परिणाम पाहायला मिळतात. शारीरिक पातळीवर सॅन ब्राह्मी गोळ्या घेणे, जटामांसी पाण्यात भिजवून गाळून घेतलेले पाणी पिणे, सुवर्णसिद्ध जल पिणे या उपायांचा फायदा होतो.
ब्रह्मलीन घृत हे मन, बुद्धी, स्मृती वगैरे सूक्ष्म तत्त्वांवर काम करणाऱ्या वनस्पतींपासून बनविलेले संस्कारित तूप सर्व तऱ्हेच्या मानसिक विकारांवर, विशेषतः नैराश्यावर उत्कृष्ट परिणाम देऊ शकते. शरीराची शक्ती वाढविण्यासाठी, विशेषतः शुक्रधातूच्या पोषणासाठी पंचामृत, केशर, बदाम यांचे सेवन करणे हितावह असते. आहार संतुलित असणे, त्यात साजूक तुपाचा अंतर्भाव असणे, पंचकर्माच्या मदतीने शरीरशुद्धी करून घेणे, च्यवनप्राश, आत्मप्राश, धात्री रसायनसारखे रसायन सेवन करणे हे सुद्धा उपयुक्त असते. रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा त्रिफळा चूर्णात एक चमचा तूप व अर्धा चमचा मध मिसळून सेवन करणे, ताजे आवळे मिळतात तेव्हा एका आवळ्याच्या रसात चमचाभर खडीसाखर, एक चमचा तूप व अर्धा चमचा मध मिसळून घेणे अशी घरच्या घरी तयार करता येणारी रसायने घेणे हे सुद्धा उपयुक्त असते. कायम स्वतःपुरता विचार न करता आपण जेव्हा इतरांसाठी जगू लागतो, दुसऱ्याला मदत करण्याचा आनंद अनुभवू शकतो, नकारात्मक विचारांपासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी प्रवृत्त होतो तेव्हा आपोआप शरीर व मन या दोघांवर चांगले परिणाम होतात आणि नैराश्याच्या अंधकारातून आपण जीवनाच्या प्रकाशाकडे जाऊ लागतो.
(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.