मंत्र संतुलनाचा!

निसर्गचक्र हे सुद्धा एका विशिष्ट पद्धतीने व एक विशिष्ट अंतर ठेवून चालते. त्यातही बदलाचा आनंद मिळावा म्हणून ऋतुमानाप्रमाणे सूर्य दक्षिणायन-उत्तरायण करतो व मग ऋतुमानाप्रमाणे दिवस-रात्र लहानमोठे होतात.
Couple
Couplesakal
Summary

निसर्गचक्र हे सुद्धा एका विशिष्ट पद्धतीने व एक विशिष्ट अंतर ठेवून चालते. त्यातही बदलाचा आनंद मिळावा म्हणून ऋतुमानाप्रमाणे सूर्य दक्षिणायन-उत्तरायण करतो व मग ऋतुमानाप्रमाणे दिवस-रात्र लहानमोठे होतात.

संतुलन हा आरोग्याचा मंत्र आहे. शरीरातील वात-पित्त-कफाचे संतुलन असो, अग्नी अर्थात शरीरातील हॉर्मोन्सचे संतुलन असो, शरीरधारणाचे काम करणाऱ्या सप्तधातूंचे संतुलन असो, मलविसर्जन प्रक्रियेतील संतुलन असो किंवा शरीर व मनातील संतुलन असो, मनुष्य व निसर्गातील संतुलन असो, ‘संतुलन’ ही अशी एक अवस्था आहे की ती साधल्याशिवाय आपण जगण्याचा आनंद घेऊ शकत नाही. संतुलन साधून जीवन जगणे हाच जीवनाचा राजमार्ग होय. त्याऐवजी वेडीवाकडी वळणे घेत आयुष्य जगणे, सगळ्यांच्या गतीशी स्वतःची गती मिळवून न घेता फार पुढे जाणे किंवा मागे राहणे हे क्षणासाठी सुखावह वाटले तरी त्याचे पर्यवसान दुःखात, रोगात होणारच असते.

ज्याप्रमाणे सर्व वाहने एका विशिष्ट गतीने रस्त्यावरून जात असताना इतर वाहनांना अधिक गतीने जाण्याची ताकद नाही असे समजून स्वतःकडे असलेले छोटे वाहन किती वेगाने पुढे जाऊ शकते हे दाखवायची हौस असल्याने किंवा मी सगळ्यांच्या पुढे जाणार या इच्छेने वेडीवाकडी, डावी-उजवी करत सुसाट वेगाने मोटरसायकल चालवली तर अपघात ठरलेलाच असतो. अशा अपघातात स्वतःबरोबर इतरांनाही त्रास होऊ शकतो.

निसर्गचक्र हे सुद्धा एका विशिष्ट पद्धतीने व एक विशिष्ट अंतर ठेवून चालते. त्यातही बदलाचा आनंद मिळावा म्हणून ऋतुमानाप्रमाणे सूर्य दक्षिणायन-उत्तरायण करतो व मग ऋतुमानाप्रमाणे दिवस-रात्र लहानमोठे होतात. उष्णता, थंडी, आर्द्रता, पाऊस, रुक्षपणा या गोष्टी कधी वाढतात, कधी कमी होतात. परंतु, या सर्वांचा एक विशिष्ट क्रम व नियम निसर्ग पाळतो असे दिसते. आपण मात्र उशिरा झोपणे, उशिरा उठणे, वेळी-अवेळी खाणे-पिणे अशा वागण्याने निसर्गाबरोबर असंतुलन करतो आणि रोगाला जणू आमंत्रणच देत असतो. शिवाय व्यक्तीच्या प्रकृतीला काही गोष्टी मानवतात तर काही गोष्टी मानवत नाहीत. जसे लहान मुलासाठी बनविलेल्या छोट्या खुर्चीवर मोठ्या मनुष्याने उभे राहण्याचा प्रयत्न केला तर खुर्ची हमखास मोडते व तसा प्रयत्न करणाराही खाली पडतो.

तेव्हा आपली ताकद किती आहे याचा अंदाज घेऊन त्या प्रमाणातच काम, जबाबदाऱ्या अंगावर घ्याव्या व पूर्ण पाडाव्या. तसेच आपल्या प्रकृतीनुसार आहार ठेवल्यास त्या आहाराचे रस-रक्तादी शरीरद्रव्यांमध्ये रूपांतर होते व शरीरात ताकद मिळते, आरोग्य टिकून राहते. पण, प्रकृतीला न मानवणारे, ऋतुमानाला अनुकूल नसलेले अन्न सेवन करण्याने रोगाला निमंत्रण मिळते. संपूर्ण निसर्गाकडे लक्ष ठेवून, त्यातील बदलांकडे लक्ष ठेवून भौगोलिक वातावरण लक्षात घेऊन आहार-विहार ठरवावा लागतो. आणि यासाठी आयुर्वेदाचे मार्गदर्शन दीपस्तंभाप्रमाणे मदत करते.

निसर्गचक्राचे संतुलन राहावे यासाठी आपल्या भारतीय परंपरेने काही फार सुंदर गोष्टी सुचविलेल्या दिसतात. आपल्याकडे ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम असे चार आश्रम सांगितलेले आहेत. ज्या ठिकाणाहून मन व भावना यांचे व्यवस्थापन होते; ज्या ठिकाणाहून बुद्धी, विवेक, निर्णयक्षमता यांचे कार्य होते; हृदय, यकृत, मूत्रपिंड वगैरे शरीराच्या अंतर्गत अवयवांवर तसेच बाह्यइंद्रियांच्या कार्यावर ज्या ठिकाणाहून नियंत्रण ठेवलेले असते, त्या ठिकाणाची म्हणजे मेंदूची काळजी घेणे हे ब्रह्मचर्यातील मुख्य काम असते. परंतु ब्रह्मचर्याच्या काळात अभ्यास न करता, ज्ञानसंपादनाचा प्रयत्न न करता, चांगले पौष्टिक अन्न खाण्यावर व व्यायामावर भर न देता, उनाडक्या करण्यात, कुसंगतीमध्ये अनाठायी वेळ घालवला तर संपूर्ण आयुष्य असंतुलित होऊ शकते.

साधारणतः सहा वर्षापर्यंत बाल, नंतर बारा वर्षापर्यंत कुमार, नंतर पौगंडावस्था अशा तऱ्हेने पुन्हा ब्रह्मचर्याच्या कालावधीचे उपभाग पाडलेले असतात. त्यांच्याशी हातमिळवणी करून जीवनक्रम व्यवस्थित राखला तर जीवनाचे आरोग्य चांगले राहते. गृहस्थाश्रम सुरू झाल्यानंतर शरीराच्या गरजा ओळखून लग्न वगैरे करणे आवश्‍यक असते. या काळात ‘तूर्त लग्न नको’ असा धोशा लावत पस्तिशी-चाळिशीपर्यंत वाट पाहण्यानेही असंतुलन होते. गृहस्थाश्रमात न लुटलेला आनंद वानप्रस्थाश्रमामध्ये लुटण्याचा प्रयत्न केला तर तेथेही यश मिळत नाही. वानप्रस्थाश्रमात स्वतःचा आणि स्वतःच्या कुटुंबाच्या पलीकडे जाऊन आपण समाजाचेही काही देणे लागतो आणि या जनताजनार्दनाच्या सेवेतच खरी उपासना आहे हे लक्षात घेणे आवश्यक असते, अन्यथा मायाममतेच्या पाशातून मोकळे होणे अवघड होत जाते. आणि शेवटची संन्यासाश्रम ही तर मुक्त अवस्था असते एवढे केवळ ऐकिवात राहते कारण जर अगोदरचे आश्रम सांभाळले गेलेले नसले तर त्या असंतुलनाने शरीरात विविध रोग उत्पन्न झालेले असतात, सहसा संन्यासाश्रमाच्या वयापर्यंत आयुष्यच संपुष्टात आलेले असते.

शरीर-संतुलनाच्या बरोबरीने मनाच्या संतुलित अवस्थेचा विचारही करावाच लागेल. यासाठी ज्या ठिकाणी मनुष्याचे भौतिक शरीर असेल त्याच ठिकाणी व त्याच्या आसपास मनाला संवेदना देता-घेता याव्यात. मनाचा इंद्रियांवर पूर्ण ताबा असावा, मनात आरोग्याचे, उत्कर्षाचे व समृद्धीचे विचार यावेत, सर्व जण आनंदी होवोत, सर्व जण सुखी होवोत अशा तऱ्हेचे मनात विचार यावेत, हे ढोबळ मानाने मनाचे संतुलन म्हणता येईल. त्या उलट मनात दुसऱ्याचे अकल्याण, शत्रुत्व, ईर्ष्या, असूया याबद्दलचे विचार, किंवा आपण काहीही करू नये असे वाटणे, एकदा बसले की बसून राहावे असे वाटणे अशा गोष्टी घडत असतील, आत्महत्येचे विचार मनात घोळत असेल तर ते मानसिक असंतुलनातच मोडते.

आयुर्वेदातही दिनचर्येच्या अंतर्गत सकाळी लवकर उठावे, वाताच्या काळात मलविसर्जन वगैरे करून शरीर स्वच्छ करावे; त्यानंतर प्रार्थना, ध्यान वगैरे गोष्टी काराव्यात; कफाच्या काळात गण्डुष, अंजन, व्यायाम, उटणे लावून स्नान वगैरे करून दुपारच्या पित्ताच्या काळात भोजनादी कर्मे करावीत; पुन्हा वात, पित्त, कफाला सामोरे जावे हे चक्र जसे एका दिवसापुरते सांभाळावे लागते तसे पूर्ण जीवनाचा काळ सांभाळला व त्यासाठी आखून दिलेली निसर्गाची कार्यक्रमपत्रिका सांभाळली तर जीवनाचे संतुलन साधता येते. तेव्हा सर्व तऱ्हेने जीवनात संतुलन आणण्याचा प्रयत्न केला तरच शारीरिक पातळीवर आरोग्य व ऐश्र्वर्य, मानसिक पातळीवर समाधान आणि आध्यात्मिक पातळीवरच तेजस्विता म्हणजेच आपणही त्या सर्वशक्तिशाली परमपुरुष परमात्म्याचा अंश आहोत याचा अनुभव घेता येतो.

(श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com