मेरी ख्रिसमस!

आज आहे ख्रिसमस म्हणजे नाताळचा सण. भारतामध्ये आपण जशी दीपावली साजरी करतो, तसाच पाश्र्चिमात्य देशांमध्ये ख्रिसमस मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.
Mery Christmas
Mery ChristmasSakal
Summary

आज आहे ख्रिसमस म्हणजे नाताळचा सण. भारतामध्ये आपण जशी दीपावली साजरी करतो, तसाच पाश्र्चिमात्य देशांमध्ये ख्रिसमस मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.

विश्र्वाचे कार्य सुरळीत चालण्यासाठी भौतिकता व मानवता या दोन्ही गोष्टी तितक्याच आवश्यक असतात. नैतिक मूल्यांचा आधार नसेल तर पैसा, सत्ता, मान-सन्मान यांचा गैरवापर जास्त होतो, निसर्गाचा ऱ्हास होतो हे आज आपण अनुभवतो आहोत. भौतिक विकास अनावश्यक नसतो; पण फक्त भौतिकाच्या मागे लागणे म्हणजे मायेत गुरफटणे. सर्वांगीण विकासासाठी, खऱ्या सुख-समाधानासाठी भौतिकतेला नैतिकतेची, मानवतेची, अध्यात्माची जोड असणे अपरिहार्य होय.

आज आहे ख्रिसमस म्हणजे नाताळचा सण. भारतामध्ये आपण जशी दीपावली साजरी करतो, तसाच पाश्र्चिमात्य देशांमध्ये ख्रिसमस मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. घर-परिसराची साफसफाई, नाना प्रकारे केलेली सजावट, दिव्यांची रोषणाई, चांदणीच्या आकाराचे आकाशदिवे, खाण्या-पिण्यासाठी चविष्ट पदार्थ, प्रियजनांना देण्यासाठी भेटवस्तूंची खरेदी, शुभेच्छांची देवाणघेवाण अशा प्रकारे उत्साहात हा सण साजरा केला जातो. पाश्र्चिमात्य देशांमध्ये एकत्र कुटुंबपद्धती क्वचितच आढळते. ख्रिसमसच्या दिवशी मात्र कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येतात, पारंपरिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतात. दीपावलीप्रमाणे ख्रिसमसही येतो तो ऐन हिवाळ्यात. थंड वातावरणामुळे शरीरातील जाठराग्नी प्रदीप्त झालेला असताना ख्रिसमसच्या निमित्ताने केक, दालचिनी, सुंठ वगैरे मसाल्याच्या गोष्टी वापरून केलेले विशेष श्टोलन, ब्रेड, कूकिज वगैरे सेवन करण्याने हिवाळ्यात आरोग्य चांगले राहण्यासाठी मदत मिळत असते. भारतीय सण असो किंवा इतर कोणत्याही धर्म-पंथाचा सण असो, त्यामागचे विज्ञान, त्यामागचे तत्त्व हे एकच असते. तत्त्व लक्षात घेऊन सण साजरा केला तर त्यातून आनंद तर मिळतोच, बरोबरीने आरोग्य, समाधान, उत्साह यांचाही लाभ होतो. संपन्न जीवन जगण्यासाठी भौतिक समृद्धी आणि आध्यात्मिक उन्नती या दोन्ही गोष्टी आवश्यक असतात. भारतीय शास्त्रांमध्ये माया-ब्रह्म ही संकल्पना सांगितली आहे ती यासाठीच. माया व ब्रह्म हे जोपर्यंत जोडीने, एकत्रित व सुसूत्रतेने राहतात तोपर्यंतच विश्र्व आहे त्या स्थितीत राहते.

माया-ब्रह्म म्हणा किंवा प्रकृती-पुरुष म्हणा या दोघांच्या एकत्रीकरणातून पंचमहाभूते तसेच इंद्रिये-मन-बुद्धी-अहंकार ही सूक्ष्म तत्त्वेही तयार झालेली असतात. भौतिकतेचा आधारस्वरूप असणारी ती पंचमहाभूते आणि अध्यात्माचा आधार असणारी ती मन-बुद्धी-अहंकार सूक्ष्म तत्त्वे. जीवन उन्नतीकडे नेण्यासाठी या सर्व तत्त्वांचा विकास होणे अभिप्रेत असते आणि विकासासाठी गरजेची असते ती गती. लहान मुले खेळतात तो भोवरा बघितला तर लक्षात येते की त्याच्या अक्षाला गती मिळाली तर भोवरा स्वतःभोवती फिरू लागतो. पृथ्वीसुद्धा थोडीशी लंबगोलाकार असल्याने स्वतःच्या अक्षाभोवती अखंड फिरत राहते. ख्रिश्र्चानिटीमध्ये क्रॉस या चिन्हाला खूप महत्त्व आहे. याचा आकार पृथ्वीतत्त्वाचा किंवा भौतिकतेचा निर्देशक असतो. क्रॉसमध्ये दोन रेषा बेरजेच्या खुणेप्रमाणे मध्यातून एकमेकांना छेदतात. मात्र यातील उभी रेषा आडव्या रेषेपेक्षा लांब असते. या लंबाकारामुळे स्वाभाविकतः उत्पन्न होणारी गती ही भौतिक समृद्धीचे, भौतिक विकासाचा मार्ग प्रशस्त करणारी असते. म्हणून पाश्र्चिमात्य देशांमध्ये भौतिक प्रगती, भौतिकाचे महत्त्व अधिक असलेले दिसते.

विश्र्वाचे कार्य सुरळीत चालण्यासाठी भौतिकता व मानवता या दोन्ही तितक्याच आवश्यक असतात. नैतिक मूल्यांचा आधार नसेल तर पैसा, सत्ता, मान-सन्मान यांचा गैरवापर जास्त होतो, निसर्गाचा ऱ्हास होतो हे आज आपण अनुभवतो आहोत. भौतिक विकास अनावश्यक नसतो, पण फक्त भौतिकाच्या मागे लागणे म्हणजे मायेत गुरफटणे. सर्वांगीण विकासासाठी, खऱ्या सुख-समाधानासाठी भौतिकतेला नैतिकतेची, मानवतेची, अध्यात्माची जोड असणे अपरिहार्य होय. जसे शांत झोप लागण्यासाठी गादीची आवश्यकता असते हे खरे, पण झोप येण्यासाठी फक्त मऊ गादी पुरेशी नसते, बरोबरीने मन शांत असणेही आवश्यक असते. तसेच शरीराला सुख मिळावे, सोयी-सुविधांयोगे वेळ वाचावा, चांगले अन्न, चांगले कपडेलत्ते यांच्यायोगे आनंद मिळावा या अपेक्षांमध्ये गैर असे काही नाही, पण हे सर्व फक्त मलाच मिळावे, माझ्या प्रियजनांनाच मिळावे या मर्यादेला ओलांडून जेव्हा समस्त प्राणीमात्रांना सुख मिळावे, वृक्ष-वेलींचीही सग्या-सोयऱ्याप्रमाणे काळजी घ्यावी असे वाटू लागेल तेव्हा भौतिकता व मानवता यांच्यामध्ये संतुलन साधले असे म्हणता येईल.

भौतिकाकडे, इंद्रियगम्य गोष्टींकडे आकर्षित होणे स्वाभाविक असते, पण भौतिकाच्या पलीकडे असणाऱ्या, अदृश्य गोष्टींचे भान करून देण्यासाठी पृथ्वीवर वेळोवेळी संत-महात्म्यांचा जन्म होत असतो, हे संत-महात्मे समाजाला खऱ्या अर्थाने विकासाचा, सर्वांगीण प्रगतीचा मार्ग दाखविण्याचे काम करत असतात. असाच एक अवतार आहे येशू ख्रिस्तांचा. त्यांनी समाजात सेवा, त्याग आणि प्रेम यांचे महत्त्व रुजवण्याचा प्रयत्न केला. स्वतःच्या जगण्यातूनही हाच संदेश दिला. अगदी शेवटच्या क्षणीही त्यांनी परमेश्र्वराकडे तक्रार केली नाही, उलट मायेत गुरफटलेल्या अज्ञानी जिवांना मला त्रास देण्याबद्दल शिक्षा न करता क्षमा करावी असे मागणे मागितले. प्रेम, सेवा आणि त्याग यांची शिकवण संपूर्ण जगाला देणाऱ्या येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस ख्रिसमस म्हणून साजरा केला जातो. नैतिकता, मानवता, निःस्वार्थ वृत्ती, क्षमाशील स्वभाव अंगी बाणविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी आजचा हा दिवस महत्त्वाचा होय.

(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या विपुल लेखनातून संकलित)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com