Incense: बहुगुणी धूप

भारतीय संस्कृतीचे चार मुख्य स्तंभ म्हणजे चार वेद. आयुर्वेद हा त्यातील अथर्ववेदाचा उपवेद आहे. या सर्व वेदांनी अग्नीला सर्वांत जास्त महत्त्व दिलेले आहे.
Multiple Incense
Multiple Incensesakal

भारतीय संस्कृतीचे चार मुख्य स्तंभ म्हणजे चार वेद. आयुर्वेद हा त्यातील अथर्ववेदाचा उपवेद आहे. या सर्व वेदांनी अग्नीला सर्वांत जास्त महत्त्व दिलेले आहे. घर्षणाने पृथ्वीवर राहणारा अग्नी, वाऱ्यामधून प्रकट होणारा अग्नी, आकाशात राहणारा अग्नी असे अग्नीचे वेगवेगळे प्रकार सांगितलेले दिसतात. जंगलांमध्ये अतिशय जोराने वारा सुटल्यास होणाऱ्या घर्षणातून वणवा पेटून अग्नी प्रकट होतो. तसेच, पाण्यामध्ये अग्नी असेपर्यंतच ते पाणी जिवंत असते व शुद्ध राहते.

तसेच शरीरात जलतत्त्वाबरोबर राहणारा अग्नी रक्ताला गोठू देत नाही, रक्ताला उबदार ठेवतो. शरीरात वेगवेगळी संप्रेरके कार्य करत असतात, त्या संप्रेरकांमार्फत हा अग्नी वेगवेगळी कार्ये करण्यासाठी लागणारी शक्ती पुरवतो.

हाच अग्नी चेतासंस्थेत काम करण्यासाठी विद्युतरूपाने प्रकट होतो. अशा तऱ्हेने आरोग्यासाठी अग्नी खूप महत्त्वाचा आहे. शरीराचे तापमान एका विशिष्ट मर्यादेतच असावे लागते. शरीर थंड पडणे चांगले नाही, तसेच शरीर वाजवीपेक्षा गरम होणेही चांगले नाही.

ज्यावेळी एखादी वस्तू जळते तेव्हा त्यातील बारीक बारीक अति सूक्ष्म कण वातावरणात पसरतात कारण अग्नी त्या वस्तूचे पृथक्करण करून ते बारीक कण वातावरणात पाठवतो.

ज्या वेळी एखाद्या अवघड जागी किंवा त्वचेच्या आत खोलवर शरीरात एखादी वस्तू नेणे अवघड असते तेव्हा विशिष्ट वस्तू जाळून तयार झालेल्या धुराचे कण पाठवले जातात व ईप्सित कार्य साधले जाते. हे तत्त्व लक्षात घेऊन आयुर्वेदाने ‘धूमचिकित्सा’ विकसित केली आहे.

Multiple Incense
स्वास्थ्यपूर्ण जगासाठी आयुर्वेद शाश्वत पर्याय

वेदांमध्ये यज्ञाला अतिशय महत्त्व दिलेले दिसते. यज्ञ ही एक चिकित्सा आहे ज्याच्याद्वारा वातावरणाची शुद्धी होते. वातावरणात बीजस्थापना करता येणे, वातावरणात ईप्सित कण पसरवणे, यज्ञोपचारापासून विशिष्ट प्राप्ती व्हावी अशी अपेक्षा असणाऱ्यांना शरीरस्थ असलेल्या देवताकेंद्रांना विशिष्ट धूमाद्वारा प्रसन्न करून त्यांच्याकडून अपेक्षित कार्य करून घेणे म्हणजे सिद्धी मिळविणे, मनात असणारा मल दूर करून मनःशक्ती वाढवणे ही सर्व कार्ये यज्ञ या संस्थेमार्फत केली जातात.

म्हणून यज्ञ केल्यानंतर सर्व वातावरण धुराने व्यापावे अशीच व्यवस्था केलेली असते. वस्तू एकदम जळून जाऊ नये, विशिष्ट वेळातच जळावी या हेतूने यज्ञातली प्रत्येक अन्न-आहुती तुपात भिजवून अग्नीला प्रदान केली जाते, जेणेकरून ते कण धपरूपाने वातावरणात मिसळावेत.

भारतीय परंपरेत प्रार्थना, पूजा, हवन अशा सर्व काम्य वा आध्यात्मिक प्रक्रियांच्या सुरुवातीला धूप-दीप स्थापन करण्याची पद्धत आहे. यावेळी म्हणण्यात येणारा श्र्लोक असा, ‘वनस्पतिरसोद्भूतो गन्धाढ्यो गन्धः उत्तमः । आघ्रेय सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम्‌ ॥’ वनस्पतीच्या रसापासून उत्पन्न झालेला, सर्व सुगंधी पदार्थात श्रेष्ठ, उत्तम सुगंध असणारा व सर्व देवांना आवश्‍यक असणारी शक्ती पोचविणारा हा धूप देवांनी स्वीकारावा (वनस्पती किंवा धातू हे स्थूल स्वरूप, गंध वा अत्तर हे सूक्ष्म स्वरूप आणि त्यांचा सुगंध किंवा सुगंधित धूप - धूर हे अति अतिसूक्ष्म वायवीय स्वरूप).

Multiple Incense
आध्यात्मिक वारशाचा जिवंत करार! अनुराधपूर (श्रीलंका)चे बोधी वृक्ष

वनस्पतींचा सारभाग म्हणजे धूप किंवा चीक. म्हणून बऱ्याच वेळा वनस्पतीला पेटवून त्याच्या मुळातून गळणारा रस धूप म्हणून वापरायला सांगितलेला दिसतो. असा उत्तम सुगंध व ज्यात वनस्पतीचा आत्मा आहे, असा सुगंध देवतांना म्हणजे शरीरातील शक्तिकेंद्रांना अत्यंत प्रिय असल्यामुळे त्यांना अर्पण करण्याची पद्धत दिसते.

प्रत्येक वेळी यज्ञ, याग, हवन, इष्टी करणे शक्य नसते, अशा वेळी गाईच्या शेणाची गवरी वा कोळसा पेटवून त्यावर धूप जाळून निर्माण होणारा धूर घरभर पसरेल अशी योजना करता येते.

असा विशेष धूप बाळ-बाळंतिणीला, ज्या मुलांची वाढ नीट होत नाही त्यांना, रोग झालेल्यांना द्यावा असे सांगितलेले आहे. यश, समृद्धी प्राप्तीसाठीही धुपाचा उपयोग करावा असे सांगितलेले आहे. त्याचप्रमाणे व्यक्तीसाठी रोगपरिहारार्थ धूपोपचार-गंधोपचार पद्धती सुचविली, ज्यामुळे अनेक रोगांवर मात करता येते.

जेव्हा रोगाचे कारण स्पष्टपणे कळू शकत नाही किंवा रोगाची व्याप्ती जगाच्या सामान्य नियमांच्या पलीकडे असते त्यावेळी हे धूपोपचार-गंधोपचार अधिक सक्षमपणे कार्य करताना दिसतात. त्यासाठी आयुर्वेदाने अनेक पद्धतीचे धूप सुचविले आहेत.

वेगवेगळ्या व्यक्तींच्या प्रकृतीसाठी, बारा राशीच्या व्यक्तींसाठी, वेगवेगळ्या स्त्रीरोग, बालरोग यांच्यासाठी धूप बनवून त्यांचा उपचार केला असता अत्यंत उत्तम गुण येतो, हे सिद्ध झालेले आहे.

याचाच परिपाक म्हणून सुटसुटीत उदबत्ती प्रचारात आलेली आहे, पण याचा सोपेपणा वाढवत वाढवत नुसते कोळशाचे वा चिखलाचे चूर्ण काडीवर लावून त्यावर कुठलातरी रासायनिक सुगंध चढवलेल्या उदबत्त्या किंवा अशाच तऱ्हेने बनविलेल्या धुपाच्या सोंगट्या अस्तित्वात आलेल्या दिसतात, पण या गोष्टी अत्यंत चुकीच्या, किंबहुना रोग वाढविणाऱ्या आहेत.

खरे तर ज्या कारणासाठी (रोग हटविण्यासाठी, ग्रहबाधानिवारणासाठी, ग्रहाला किंवा देवतेला प्रसन्न करण्यासाठी) आपल्याला धुपाचा उपयोग करायचा आहे, त्याच्या विपरीत परिणाम यातून मिळतो.

ज्यावेळी अवर्षणाची वेळ येते किंवा इतर नैसर्गिक प्रकोप होतात त्यावेळीही वातावरणाच्या शांतीसाठी व जनपदोध्वंस-निराकरणासाठी (निसर्गाने मांडलेल्या विध्वंसाच्या निराकरणासाठी) वेगवेगळ्या प्रकारचे धूप व यज्ञ आयुर्वेदात सुचविलेले दिसतात. मीठ, नवसागर जाळून त्यांचे ढगांवर प्रक्षेपण करून पावसाला आमंत्रण देता येते, असे प्रयोग करून या संकल्पनेला सध्या विज्ञान पाठिंबा देत आहे.

भारतीय परंपरेत आहे म्हणून व धार्मिक रूढींशी जोडला गेला आहे म्हणून धूप वा यज्ञ याकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा याच्या संशोधनाचा प्रकल्प हाती घेणे आवश्‍यक आहे. असे केल्यास पर्यावरणात झालेला बिघाड दुरुस्त करणे शक्य होईल.

तसेच मुळात रोग होऊ नये, चांगले आरोग्य मिळावे, समृद्धी असावी, एकमेकांना मदत करावी, शांतीने सहजीवन जगावे असे सगळ्यांचे विचार असावे यासाठीही याचा फायदा होऊ शकेल.

अशा तऱ्हेचे प्रयोग एकट्या-दुकट्या वैद्याने किंवा व्यक्तीने करण्यासारखे नसल्यामुळे त्यासाठी लागणारे मनुष्यबळ, आर्थिक बळ सर्वांच्या साहाय्याने एकत्रित करणे आवश्‍यक आहे. प्रयोगांती या गोष्टीचा फायदा लक्षात येईल आणि सर्वांना उपयोगी पडणारी एक मोठी सिद्धी हाती येऊन ‘धूपगंधचिकित्सा’ प्रभावीपणे उपयोगाला आणता येईल.

(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com