मिलन शक्‍ती-भक्‍तीचे! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shiva God

प्राण हा परमेश्र्वरी अंश असल्यामुळे तो स्वेच्छेने कार्य करतो आणि तो सर्वशक्तिमान असल्याने त्याच्यावर कोणाचेही बंधन नसते. श्रीराम तेथे हनुमान असे आपल्याला सांगितलेले असते.

मिलन शक्‍ती-भक्‍तीचे!

प्राणशक्ती ही शरीराबाहेर असलेली वातावरणातील शक्ती होय. शरीराच्या आत प्राणशक्ती ही शिवशक्ती म्हणून प्रसिद्ध आहे. प्राणायामाने शिव-शक्तीचे मिलन साधण्यासाठी प्राणाला आत कुंभकाद्वारा जास्त वेळ धरून ठेवणे हे प्राणायामाचे प्रयोजन. जशी आत्मा-प्राण, शिव-शक्ती, श्रीराम-हनुमान ही जोडी तशी शक्ती भक्ती ही कर्मयोगाची जोडी. प्राणाकडून जास्तीत जास्त शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, आत्मिक फायदा मिळवणे हा प्राणायामाचा उद्देश असतो.

प्राण म्हणजेच जीवन. जोपर्यंत प्राण आहेत तोपर्यंत ती व्यक्ती, प्राणी, पक्षी, वनस्पती ‘सजीव’ असते. प्राण निघून गेला की अस्तित्वच संपते म्हणजेच जीवनप्राणावर अवलंबून असले तरी प्राणावर कोणाचीही मालकी असत नाही, प्राण हा स्वतंत्र असतो. तो जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याची काळजी घेणे, त्याला अधिकाधिक शक्तीचा पुरवठा होत राहील यासाठी दक्ष राहणे, शरीरात सर्वत्र प्राणसंचार होत राहील अशी व्यवस्था ठेवणे, शरीरात ज्या ठिकाणी प्राण विशेषत्वाने केंद्रित झालेला असतो त्या अवयवांची काळजी घेणे हे मात्र आपल्या हातात असते. प्राण ही एक संकल्पना आहे, आणि विशिष्ट उपकरणांमध्ये ती प्रकट होत असते. एका योगी व्यक्तीने प्रयोग केला होता तो असा - देहत्यागाच्या वेळी बंद काचेच्या पेटीत ठेवायचे व प्राण गेल्यावर तो बाहेर जात असताना त्याला पकडण्याचा प्रयत्न करायचा. पण प्राण पकडता आला नाही, प्रयोग अयशस्वी झाला.

प्राण हा परमेश्र्वरी अंश असल्यामुळे तो स्वेच्छेने कार्य करतो आणि तो सर्वशक्तिमान असल्याने त्याच्यावर कोणाचेही बंधन नसते. श्रीराम तेथे हनुमान असे आपल्याला सांगितलेले असते. राम ही जर जाणीव असली, ही जर परमेश्र्वरी सत्ता असली, ही जर जीवनशक्ती असली तर त्याच्याबरोबरीने प्राण असावाच लागतो. प्राण रामाच्या पाठोपाठ फिरत असतो, तो रामाच्या बरोबर फिरत असतो, तो रामाशी सतत जवळीक ठेवून असतो. त्यामुळे मृत व्यक्तीला प्राणवायू देऊन जिवंत करता येत नाही. गेलेल्या प्राणाचे पुन्हा आवाहन करता येत नाही. प्राणाचे उपप्राण मृत्यूनंतरही काही वेळ शरीरात असतात. या उपप्राणांच्या माध्यमातून प्राणाला आवाहन करून दोन मिनिटांसाठी पुन्हा शरीरात प्रकट करवता येऊ शकते, अशी उदाहरणे ऐकिवात आहेत. अन्यथा प्राण कोणाच्याही ताब्यात नसतो. म्हणूनच प्राणाचे अनुशासन, प्राणाचा उपयोग करून घेण्याचे नियम म्हणजे ‘प्राणायाम’ याला खूप महत्त्व मिळालेले दिसते.प्राणशक्ती ही शरीराबाहेर असलेली वातावरणातील शक्ती होय. शरीराच्या आत प्राणशक्ती ही शिवशक्ती म्हणून प्रसिद्ध आहे. प्राणायामाने शिव-शक्तीचे मिलन साधण्यासाठी प्राणाला आत कुंभकाद्वारा जास्त वेळ धरून ठेवणे हे प्राणायामाचे प्रयोजन. जशी आत्मा-प्राण, शिव-शक्ती, श्रीराम-हनुमान ही जोडी तशी शक्ती भक्ती ही कर्मयोगाची जोडी. प्राणाकडून जास्तीत जास्त शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, आत्मिक फायदा मिळवणे हा प्राणायामाचा उद्देश असतो.

हनुमान हे प्राणाचे अवताररूप. प्राण दिसत तर नाही, पण तो हवारूपी घोड्यावर स्वार होऊन कार्य करत असतो, शरीरात प्रवेश करतो, शरीराच्या बाहेर जातो. असे असले तरी हवा म्हणजे प्राण नव्हे. प्राण हवेवर आरूढ झालेला असतो. शरीरात असणाऱ्या दिव्य चेतनाशक्तीला वा जीवनशक्तीला प्राण म्हणायला हरकत नाही. श्रीरामांच्या बरोबर सतत उपस्थित असणारे श्रीहनुमान हे त्या प्राणाचे दृश्‍य स्वरूप आहे असे म्हणायला हरकत नाही. असे असताना हनुमान ही व्यक्तिरेखा होती की नाही असा प्रश्र्न मनात येऊ शकतो. तर हनुमान ही व्यक्तिरेखा होती, हनुमान ही देवता आहे, तिची उपासना करता येते. पण श्रीहनुमंतांच्या मूर्तिवर एक बुटकुलं तेल ओतल्याने ही उपासना होत नाही. हनुमंत तसेच शनिदेवता या वात नियंत्रित करणाऱ्या देवता आहेत. शरीरातील वात बिघडला तर शरीराला तेलाचा अभ्यंग करणे हा उपाय उत्तम लागू पडतो.

पक्षाघातासारख्या गंभीर वातविकारावर सुद्धा तेलाचा मसाज करून शरीरात पुन्हा प्राणाचे आवाहन करता येते. असंतुलित असलेला वायू प्राणाला नाकारतो. आणि वायूला संतुलित करण्याने पुन्हा प्राणाचे आकर्षण करता येते. म्हणून तेल व हनुमंत यांचा तसेच तेल व शनिदेवतेचा संबंध दाखविला जातो. अर्थात बाह्यशिलेवर तेल ओतण्याच्या उपायाबरोबरच आपल्या शरीराला अभ्यंग केला किंवा त्या देवतेला प्रिय असणाऱ्या रुईच्या फुला-पानांचा शेक केला तर वात नियंत्रणात येतो आणि शरीरात प्राणसंचार पुन्हा व्यवस्थित चालू लागतो.श्रीरामांची कथा सांगितली जात असताना, गायन केले जात असताना त्या ठिकाणी एक आसन मोकळे ठेवलेले असते. हे आसन श्रीहनुमंतांचे असते. यातूनही हेच निश्र्चित होते की श्रीरामांचे अवतारकार्य सुरू असताना परमभक्त हनुमान सतत त्याच्या गुरुचरणाशी असे, त्यांना सोडून कधीही जात नसे. आजही श्रीरामकथा चालू असताना श्रीहनुमंतांसाठी आसन ठेवायची पद्धत आहे. ‘मनासि टाकिले मागे, गतीसी तुळणा नसे’ असे श्रीहनुमंतांचे वर्णन केलेले आहे.

मनाची गती अति जलद असते. विचार मनात येतो न येतो तोच मन हजारो योजने दूर असलेल्या स्थानावर जाऊन पोचते. या मनाला योग्य शिक्षण मिळालेले असले, त्यात तशी शक्ती असली तर ते त्या ठिकाणचे दृश्‍य प्रत्यक्ष पाहू शकते. असा अनुभव सांगणारे काही भेटतात. या मनाच्या गतीला मागे टाकणारी हनुमंत ही देवता. म्हणजे श्रीहनुमंतांची गती अफाट आहे याचा अर्थ असा की ते प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक स्थानात, तिन्ही लोकांत, प्रत्येक अणुरेणूत उपस्थित असतात. म्हणजेच त्यांची गती ही परमगती असते. त़े प्रत्येक ठिकाणी असतातच, फक्त त्यांना प्रकट करून घ्यायचे असते.

जसे चुंबकीय क्षेत्र प्रत्येक ठिकाणी असतेच, त्यासाठी योग्य व्यवस्था केली की ते प्रकट होते व त्यातून मनुष्याला कार्य करून घेता येते, तेथे हालचाल उत्पन्न होते. या हालचालीचा उपयोग करून घेऊन अनेक गोष्टी करता येतात; तसेच श्रीहनुमंतांची उपासना करून शिव-शक्तीच्या मिलनाने जीवन सार्थक करावे लागेल. श्रीहनुमंताची उपासना ही प्राणशक्तीची उपासना होय आणि प्राणशक्तीची उपासना ही हनुमंताची उपासना होय. श्रीहनुमंतरायांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यासाठी वेगवेगळे मंत्र म्हटले जातात. यात भीमरूपी महारुद्रा हे स्तोत्र, हनुमान चालिसा, हनुमान बाण वगैरेंचा समावेश आहे. यांचे पठण केल्याने श्रीहनुमंत प्रसन्न होऊ शकतात. हे मंत्र-स्तोत्र संगीतबद्ध करून शुद्ध, स्पष्ट उच्चारांसकट गायल्याने श्र्वासाची गती नियंत्रित होते व त्यामुळे देवता प्रसन्न होऊन ईप्सित कार्य होऊ शकते.

(श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे यांच्या विपुल लेखनातून संकलित)

Web Title: Article Writes Pranayam Shivshakti

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top