रामायणातील आरोग्यसंदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ram Navami
रामायणातील आरोग्यसंदेश

रामायणातील आरोग्यसंदेश

रामनामाचे अखंड चिंतन, स्मरण व उच्चारण मनुष्याला कल्याण देणारे आहे, हे रामायणाने सांगितले. आरोग्यप्राप्ती, दुष्टशक्तीनिवारण आणि आनंदरूप जीवनासाठी श्रीरामरक्षा पठण सांगितलेले आहे. त्यातही ‘शिरो मे राघवः पातु’ पासून ‘पातु रामोऽखिलं वपुः’ पर्यंतच्या भागात प्रत्येक अंगाचे त्या त्या शक्तीप्रमाणे संवर्धन व रक्षण करण्यासाठी उपयोग सांगितलेला आहे. रामायणाची गोडी व रामायणाचे प्रेम यात रामकथेतील आरोग्यसंपदेच्या मार्गदर्शनाचा मोठा वाटा आहे.

पृथ्वीच्या पाठीवर रामायण चिरंतन सुरू राहील, असे विधिलिखित आहे. श्रीराम-सीता हा साक्षात श्रीमहाविष्णु-महालक्ष्मीने पृथ्वीने घेतलेला अवतार. आजच्या कलीयुगातही श्रीरामकथा आवडीने ऐकली जाते, सांगितली जाते हे नक्की. लोक जडवादी आहेत की धार्मिक, त्यांची नैतिक मूल्ये घसरत आहेत की नाहीत या सर्व चर्चा होत असतानाच टी.व्ही. वर जेव्हा रामानंद सागरांचे रामायण सादर झाले तेव्हा लोक सर्व कामधंदा सोडून टी.व्ही. समोर बसत असत, त्यावेळी रस्त्यावर शुकशुकाट असे आणि लोक टी.व्ही. वरील रामाला हार वगैरे अर्पण करून पूजा करत असत. यावरून काय ते समजावे.

रामायणाची कथा अजरामर आहे, कारण आजही शरीरशास्त्र, वैद्यकशास्त्र आणि जीवनशक्तीचे रहस्य समजावून सांगण्यासाठी रामायणातील प्रसंगांचे वर्णन उपयोगी पडते. शरीराचे आरोग्य आणि त्याची दोन्ही प्रकारची सर्जनक्षमता म्हणजे अपत्यप्राप्ती व कर्मपुरुषार्थ तसेच शारीरिक, मानसिक व आत्मिक समाधान व शांती हे सर्व स्वतःच्या आहार, विहार, सवयी, नैतिकता, पर्यावरण व सामाजिक व्यवस्थेवर अवलंबून असते. अजाणतेपणी, खोट्या हट्टापायी, दुसऱ्याला दुःख होईल अशा प्रकारे केलेल्या कृतीमुळे जनुकांमधील संकल्पनेत बदल होऊन ‘शाप’ या मार्गाने रोग होऊ शकतात, सर्जनशक्ती पण कमी होऊ शकते. क्रोध, मत्सर याने पण शारीरिक, मानसिक रोग होऊ शकतात. तसेच रोगाचे कारण जर आनुवंशिकता किंवा मानसिक पातळीवर असले तर त्यावर इलाज करताना औषध, रसायनाबरोबर ग्रहचिकित्सेतील धूमचिकित्सा वगैरे उपाय पण करावे लागतात.

हे सर्व रामायणातील कथेवरून समजून घेता येते. रामजन्मापूर्वी केलेल्या पुत्रकामेष्टी यज्ञाचा चिकित्सेसाठी जाबाली व कामसूत्राचे अधिकारी शृंग ऋषी यांना बोलावून अग्नीने प्रसाद म्हणून दिलेले पायसरूपी रसायन हे एक ‘चिकित्से’चे वर्णन आहे. मेंदू व मेरुदंड ह्यांचा संबंध मेड्यूला मार्फत होतो. मेंदूतील सेरेब्रो स्पायनल फ्लुईड मेरुदंडाकडे सर्व चेतासंवेदना नेते व इंद्रियांच्या संवेदना मेंदूला पोचवते. हे कार्य व्यवस्थित चालण्यावरच सर्व शरीराचे आरोग्य अवलंबून असते. मेरुदंडाच्या खालच्या कमरेतील टोकापासून वर मानेत असणाऱ्या या टोकापर्यंत असणाऱ्‍या चलनवलनाच्या मार्गाचे शरीरावर स्वामित्व राहून शरीर व इंद्रिये त्याच्या ताब्यात राहतात व जीवन व्यवस्थित जगता येते. ह्याच प्रक्रियेला शिवधनुष्यावर प्रत्यंचा चढवून सीता-रामाचे मीलन होते असे वर्णन करून सुचवले आहे. मेंदूतून येणाऱ्या द्रवाबरोबर फक्त संदेशवहन व्हावे परंतु कोणतेही जडद्रव्य त्यात नसावे. संदेशवहन करणारे शुद्ध ब्रह्मजल, मेंदू म्हणजे स्वर्गाकडून, मेरुदंडाकडे म्हणजे पृथ्वीकडे, जाण्याचा मार्ग सुकर होण्याचे महत्त्व आरोग्याच्या दृष्टीने गंगा पार करण्याच्या गोष्टीने सुचवले आहे.

कोणत्याही प्रकारच्या रोगमुक्तीसाठी प्राणशक्ती आवश्यक असते. आणि ज्या ठिकाणी अवधान म्हणजे लक्ष केंद्रित असेल त्याठिकाणी प्राणांचे चलनवलन होते हे हनुमंताच्या गोष्टीवरून सांगितले. हनुमंत हा प्राण आणि सर्व वानर जणू शरीरातील अनेक पेशी. यांच्याच मदतीने सेतुबंधनही होऊ शकते, दूरचे दिसणे, आकाशगमन आदि सिद्धी मिळू शकतात आणि कर्करोगासारख्या रोगातही इलाज होऊ शकतो. ज्यावेळी शरीरातील एखादा भाग मृतप्राय होतो त्यावेळी प्राणशक्तीने त्याला पुन्हा कार्यरत करता येते. फक्त आवश्यकता असते ती विशिष्ट स्थळी प्राणशक्तीला आवाहन करण्याची!

रोग निवारण्याचे काम असो किंवा आरोग्य टिकविण्याचे काम असो त्याला शक्ती लागतेच. त्यासाठी ‘रं’ शक्तिबीजाचा उपयोग म्हणजे रामनामाचे अखंड चिंतन, स्मरण व उच्चारण मनुष्याला कल्याण देणारे आहे हे रामायणाने सांगितले. आरोग्यप्राप्ती, दुष्टशक्तीनिवारण आणि आनंदरूप जीवनासाठी श्रीरामरक्षा पठण सांगितलेले आहे. त्यातही ‘शिरो मे राघवः पातु’ पासून ‘पातु रामोऽखिलं वपुः’ पर्यंतच्या भागात प्रत्येक अंगाचे त्या त्या शक्तीप्रमाणे संवर्धन व रक्षण करण्यासाठी उपयोग सांगितलेला आहे. हजारो वर्षांनंतर आज टिकून राहिलेली रामायणाची गोडी व रामायणाचे प्रेम यात रामकथेतील आरोग्य संपदेच्या मार्गदर्शनाचा मोठा वाटा आहे.

प्रज्ञापराध म्हणजेच रावण आणि हा रावणरूपी रोग त्याच्या इतर सहकाऱ्याबरोबर शरीररूपी सीतेला जीवापासून दूर आपल्या ताब्यात ठेवून, शरीर व मन दोघांनाही यातना भोगायला लावते. बारीक सारीक राक्षसांचा वध करण्याने किंवा भरकटलेल्या मनःस्थितीत सतराशे साठ उपाय करण्याने काहीच साधणार नाही. एक रोग दूर केला की त्या जागी नाव बदलून दुसरा रोग पुन्हा त्रास देण्यास हजर! दहा मस्तके उडवली तरी जोपर्यंत हृदयस्थानी मर्मात बाण मारत नाही तोपर्यंत हा रावण मरणार नाही. स्वतःच्या जीवनशैलीत बदल करून नैसर्गिक राहणीमान व आहार याला वनवास न समजता त्यांचा स्वेच्छेने स्वीकार करून रोगापासून होणाऱ्या या त्रासासाठी तात्पुरती व्यवस्था केली तरी त्याचे मूळ केंद्र कुठे आहे ते शोधून त्यावर व्यवस्थित इलाज केला तरच ह्या रावण रोगाचा निःपात होईल व शरीर व जीव यांचे मीलन होऊन आनंदात जगता येईल.

(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या विपुल लेखनातून संकलित.)

Web Title: Article Writes Ramayan Health Message

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top