शक्तिउपासनेचे नऊ दिवस!

शक्तीबरोबरच त्या शक्तीच्या कार्याची जाणीव व तिचा दुरुपयोग टाळण्यासाठी मिळालेले संरक्षण सर्वांत महत्त्वाचे.
शक्तिउपासनेचे नऊ दिवस!
Summary

शक्तीबरोबरच त्या शक्तीच्या कार्याची जाणीव व तिचा दुरुपयोग टाळण्यासाठी मिळालेले संरक्षण सर्वांत महत्त्वाचे.

प्राचीन भारतीय शास्त्रात शक्तीला देवतास्वरूप मानले आहे. किंबहुना शक्तीच्या विविध स्वरूपांनाच आपण वेगवेगळ्या देवींची नावे दिलेली आहेत. बुद्धी व स्मरणशक्तीच्या संपन्नतेतून साध्य होणाऱ्या विद्येची देवता म्हणजे सरस्वतीदेवी, कर्मशक्तीच्या संपन्नतेतून साध्य होणाऱ्या संपत्तीची देवता म्हणजे लक्ष्मीदेवी, शरीरशक्तीच्या साहाय्याने दुष्ट व अभद्र गोष्टींचे नामोहरण करणारी दुर्गादेवी, संपूर्ण वैश्र्विक शक्तीवर अधिकार असणारी गायत्रीदेवी अशा सर्वच देवता शक्तीशी संबंधित असल्याचे सापडेल. आईवडिलांपासून किंवा पूर्वजन्माच्या इच्छा, आकांक्षांतून निर्माण झालेली कर्मबंधने जनुकांनी साठवलेली असतात आणि त्यामुळे मनुष्य बराचसा परस्वाधीन होतो. या बंधनातून सुटून स्वातंत्र्य व मुक्तीचा मार्ग मोकळा करण्यासाठी पितृपक्षानंतर नवरात्रमहोत्सवाची योजना केलेली दिसते.

आयुर्वेदात दोष-धातू-मलांच्या संतुलनाव्यतिरिक्त इंद्रिय, मन व आत्मा यांची प्रसन्नता हे आरोग्याचे लक्षण सांगितलेले आहे. मात्र हे सर्व घडण्यासाठी शक्ती सर्वांत महत्त्वाची असते. रडण्यापेक्षा हसण्यासाठी अधिक शक्तीची आवश्‍यकता असते, किंबहुना शक्ती नसली की रडू येते. अर्थात या शक्तीचे अनेक प्रकार असतात, यात संख्यात्मक व गुणात्मक असे भेद असू शकतात. या सर्वांपलीकडे शक्तीत काही ‘जाण-समज’ असली तर ती शक्ती वेगळ्याच पातळीवर जाऊन पोचते. शक्ती सर्वच अणुरेणूत असते. तिने केलेल्या कार्यवरून तिचे मोजमाप करता येते. जाणीव असलेल्या शक्तीला ‘देवत्व’ दिलेले असते. माणसाला सर्वप्रथम हवी देवत्वशक्ती.

शक्तीबरोबरच त्या शक्तीच्या कार्याची जाणीव व तिचा दुरुपयोग टाळण्यासाठी मिळालेले संरक्षण सर्वांत महत्त्वाचे. त्याच पाठोपाठ आत्मिक शक्ती, मानसिक शक्ती, शारीरिक शक्ती वगैरे. शारीरिक शक्ती जरी विशिष्ट अन्नातून, पाण्यातून मिळणार असली व ह्या शक्तीत आवाहन करण्याची (म्हणजे ही शक्ती मिळवण्याची) पद्धत विज्ञानाने शोधून काढली असली किंवा आयुर्वेदाने याचे स्वरूप समजावलेले असले तरी शरीरात परिवर्तन घडण्यासाठी शरीरात असलेला वैश्र्वानररूपी अग्नी अनाकलनीयच राहतो व त्याला परमेश्र्वर समजले जाते. आध्यात्मिक क्षेत्रात साडेतीन मात्रात या शक्तीची पूजा होते. शक्तीची पीठे आहेत सात. विज्ञानातील शक्ती सुद्धा साडेतीन स्वरूपात (तीन फेज व न्यूट्रल) अशीच केलेली असते. गर्भात शक्तीचे आवाहन होण्यासाठी नऊ महिने, नऊ दिवस, नऊ तास हा कालावधी सांगितलेला आहे. शारीरिक शक्तीच्या पाठोपाठ मानसिक व अध्यात्मिक शक्तीच्या आवाहनाचा हा उत्सव!

नवरात्रात दीपज्योती मध्ये ठेवून चक्राकार, सर्पाकार गतीने नाचत गरबा व रास नाचत नाचत शक्तीचे आवाहन केले जाते व शारीरिक स्वच्छतेसाठी उपवास करून जास्तीत जास्त वेळ शक्तीच्या आवाहनात घालवला जातो. असा सर्व खटाटोप करावा तेव्हा कुठे ही जगज्जननी शक्ती प्रसन्न होण्याची शक्यता असते. साध्या शारीरिक व मानसिक शक्ती मिळवण्यासाठीसुद्धा विशेष कष्ट व विशेष प्रयत्न करावे लागतात. तेव्हा या जगज्जननी मातेच्या शक्तीची प्राप्ती सहज होईल अशी अपेक्षा करणे कसे शक्य आहे? विशेष आहार, व्यायाम, योग व प्राणायाम या सर्वांचा उपयोग करूनच शारीरिक व मानसिक शक्ती मिळू शकते. शारीरिक शक्ती मिळवण्याबरोबर ती खर्च कशी करायची हेही शिकावे लागते. कारण शक्ती मिळवण्यापेक्षा शक्ती वाचवणे खूपच सोपे असू शकते. शरीरात तयार होणारा वीर्यधातू रक्त, मांस, मज्जेतूनच तयार होतो, पण गर्भधारणेसाठी जीवनशक्तीचे आवाहन करण्यासाठी या सहा धातूंचा उपयोग होत नाही, त्यासाठी लागतो तो सातवा वीर्यधातू.

म्हणून या वीर्यधातूची जोपासना, संरक्षण व वृद्धीसाठी आयुर्वेदात खूप महत्त्व दिले आहे व शक्तीच्या वर्धनासाठी याचे महत्त्व सांगितले आहे. काय खाण्याने वीर्यवर्धन होते व काय खाल्ल्याने वीर्यनाश होतो हेही आयुर्वेदात स्पष्टपणे समजावलेले आहे. वीर्यनाश होईल अशा सर्व कृती सांभाळून व काळजीपूर्वक निर्णय घेऊन कराव्यात हेही आयुर्वेदात सांगितले आहे. शारीरिक व मानसिक शक्तीविषयी अत्यंत वैज्ञानिक पातळीवर पूर्ण समज आयुर्वेदशास्त्राने नक्कीच करून दिलेली आहे आणि हे विज्ञान आयुर्वेदाने विकसित केलेले आहे. त्याच शक्तीच्या जोरावर मनुष्य शारीरिक वा मानसिक पातळीवर संसारात येणाऱ्या घटनांना सामोरे जाऊन संसार सुखाचा होऊ शकतो, शांतता अनुभवू शकतो. शांत झोपेसाठी सुद्धा शक्तीचीच आवश्‍यकता असते. अशक्त मनुष्य शांत झोपू शकत नाही, तो निपचित होऊन बेशुद्ध होऊ शकतो. जीवनाचे एकही अंग असे नाही, जे शक्तीशिवाय चालेल.

आयुर्वेदशास्त्रात शक्ती मिळवण्याच्या व अधिकाधिक टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने अनेक उपाय सांगितले आहेत. आरोग्यपूर्ण जीवन जगण्यास आवश्‍यक असणाऱ्या सर्व अंगांचा विचार करून आयुर्वेदाने ‘अष्टांग’ संकल्पना समजवली. त्यातील दोन मुख्य अंगे म्हणजे रसायन व वाजीकरण. या दोघांचाही मुख्य उद्देश शक्ती संवर्धन व शक्तिसंरक्षण हाच आहे. कायचिकित्सा या अंगातही स्वस्थवृत्त, सद्वृत्ताच्या माध्यमातून शक्तीचा अपव्यय होणार नाही यासाठी मार्गदर्शन केलेले आहे.

कौमारभृत्यतंत्रात गर्भसंस्कारांद्वारे गर्भाची मूळ शक्ती अधिकाधिक विकसित होण्याच्या दृष्टीने अनेक उपाय सांगितले आहेत, ग्रहचिकित्सा या अंगात अभौतिक शक्ती, अदृश्‍य जीवाणू, विषाणू, ग्रह वगैरेंपासून रक्षण मिळून शक्तिव्यय होण्यास प्रतिबंध होण्याच्या दृष्टीतून विविध उपाय सुचवलेले आहेत. ‘शक्ती’ची विविध स्वरूपे असू शकतात. एकदा मूळ शक्ती मिळाली की विविध रूपात रूपांतरित होऊ शकते, उदा. रसायन म्हणजे शुक्रधातू, ओजस वाढवणारा विशिष्ट ‘औषध योग’ असे समजले तर त्यापासून शक्ती मिळू शकते, वर्ण उजळू शकतो. रोग बरा होऊ शकतो, आयुष्य वाढू शकते; स्मृती, बुद्धी, प्रज्ञासंपन्नता मिळू शकते. एवढेच नाही तर ‘सौभाग्यवर्धन’, ‘अलक्ष्मीनाश’, ‘वाचासिद्धी’ या गोष्टीही मिळू शकतात असे आयुर्वेदात स्पष्ट सांगितले आहे.

'परं देहेन्द्रियबलं वाक्‌सिद्धिः प्रणतिः कान्तिश्र्च ॥...चरक चिकित्सास्थान." रसायनाचा परिणाम केवळ शारीरिक, मानसिक किंवा बौद्धिक स्तरावरच होतो असे नाही तर भाग्य, लक्ष्मी-संपत्ती, वाचासिद्धीसारख्या सहसा जन्मजात किंवा दैवजात समजल्या जाणाऱ्या गोष्टीही मिळू शकतात. जीवनशक्ती, प्राणशक्ती उत्तम राहावी यासाठी रसायनांच्या बरोबरीने आहार संतुलित असणे आणि सातही धातूंचे पोषण करणारा असणे हे सुद्धा महत्त्वाचे होय. आहाराची योजना उत्तम केली तरी त्याचे पचन करणारा अग्नी सुस्थितीत असणेही गरजेचे असते, त्यादृष्टीने वयाच्या पस्तिशी-चाळिशीला शास्त्रोक्त पद्धतीने म्हणजे आभ्यंतर स्नेहन, अभ्यंग, स्वेदन वगैरे पूर्वतयारी करून नंतर पंचकर्माच्या मदतीने शरीर शुद्ध करून घेणे आवश्‍यक. याला उत्तम जोड मिळू शकते ती प्राणायामादी श्र्वसनक्रियांच्या योगे.

नियमित दीर्घश्र्वसन, अनुलोम-विलोम, ॐकार यांच्या मदतीने प्राणशक्ती अधिक प्रमाणात आकर्षित करता येते. वेळेवर व पुरेशा प्रमाणात झोप घेणे हे सुद्धा शक्तीसाठी साहायक असते. उगवत्या सूर्याचे दर्शन, सूर्योपासना, सूर्यनमस्कार हे सुद्धा शारीरिक मानसिक शक्तीसाठी मदत करतात. "श्रीसूक्तेन नरः कल्ये ससुवर्णं दिने दिने ।...सुश्रुत चिकित्सास्थान. " संतुलित सात्त्विक आहार, प्रकृतीनुरूप आचरण, शांत व पुरेशी झोप, संयमपूर्ण स्वभाव, नियमित व्यायाम, योग, ध्यान, स्वास्थ्यसंगीतादी गोष्टींचा रोजच्या दिनक्रमात समावेश आणि सरतेशेवटी सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुरुजनांचे, परमशक्तीचे आशीर्वाद या सगळ्या गोष्टी मिळाल्या तर शक्ती व त्या पाठोपाठ संपन्न जीवन मिळू शकेल.

(श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com