कृपा निद्रादेवीची ! | Sleep | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sleeping
कृपा निद्रादेवीची !

कृपा निद्रादेवीची !

झोपायची खोली स्वच्छ असावी, गादीवर घातलेली चादर स्वच्छ असावी, झोपण्यापूर्वी ३-४ मिनिटे एखादे स्तोत्र, एखादी कविता मनातल्या मनात म्हणावी, म्हणजे झोप यायला मदत होते. भारतीय संगीतशास्त्राने झोपेसाठी विशिष्ट राग, विशिष्ट स्तोत्र व प्रार्थना सांगितलेल्या आहेत. झोपण्यापूर्वी ५ मिनिटे ॐकार म्हणण्यानेही झोप लवकर व गाढ येते. हा ॐकार भ्रामरीसारखा असल्यास अधिक फायदे दिसतात!

जीवनाच्या तीन मुख्य आधारस्तंभांपैकी एक आहे निद्रा, अर्थात शांत, पुरेशी व योग्य वेळी घेतलेली झोप. अन्न, पाणी, निवारा या अत्यावश्‍यक असलेल्या गोष्टी आपल्याला विकत घ्याव्या लागतात. सध्या हवेतील प्रदूषण, जंतुसंसर्ग लक्षात घेता ऑक्सिजनयुक्त हवा विकत घेण्याचीही वेळ आलेली आहे. माणसाला निसर्गाने प्रदान केलेली एकमेव गोष्ट, परमेश्र्वरी कृपा, जी कुणालाही विकत घ्यावी लागत नाही, ती म्हणजे ‘झोप’! कुणी जर मला विचारले की एखादा मनुष्य नशीबवान आहे किंवा नाही हे कसे बघायचे? तर जो कुठल्याही स्थळी, कुठल्याही वेळी ठरवून झोपू शकतो तो खरा नशीबवान, परमेश्र्वराची त्याच्यावर पूर्ण कृपा असल्याचे हे लक्षण आहे. सर्वांना परमेश्र्वराने वाटलेले हे झोपरूपी विश्रांतीचे दान जो सहज स्वीकारू शकतो तो नशिबवान आणि ज्याला हे दान स्वीकारता येत नाही तो खरा कमनशिबी! मालकीचा मोठा बंगला असला, घराबाहेर गाड्या उभ्या असल्या, काहीही विकत घेण्याची ऐपत असली, तरी काही गोष्टी विकत मिळत नसतात. झोप ही त्यातीलच एक गोष्ट! झोपेच्या गोळ्या खाऊन झोपणे हे झोप विकत घेण्यासारखे आहे, पण अशी विकत घेतलेली झोप ही ‘खरी झोप’ नव्हे. स्वतः ठरवून मेंदूने विश्राम अवस्थेत जाऊन दिवसभर केलेल्या प्रसंगांची, घटनांची, कामांची नोंद करणे, मेंदूत आलेल्या माहितीची वर्गवारी करून विवक्षित जागी संग्रहित करणे व खरी विश्रांती घेणे वगैरे सर्व गोष्टी खऱ्या झोपेमुळे साध्य होतात.

गोळी किंवा दारूसारखा नशा करवणारा पदार्थ घेऊन झोपल्यास मेंदू बेशुद्धावस्थेत गेलेला असतो. अशा वेळी मेंदू तणावविरहित अवस्थेत जाऊ शकत नाही, झोपू शकत नाही व कामही करू शकत नाही. तसेच, झोप येण्यासाठी घेतलेल्या गोळीतल्या रसायनामुळे मेंदूवर परिणाम होतो व पुढे पुढे गोळ्यांचे प्रमाण वाढवावे लागते. त्याच्याही नंतर झोप येत नाही म्हणून ५-२५ गोळ्या घेतल्यावर माणसे काळझोपेत उतरल्याचीही उदाहरणे आहेत. तेव्हा गोळी घेऊन झोपणे टाळणेच इष्ट. फार पोट भरलेल्या व्यक्तीला लवकर झोप येत नाही. झोपण्याच्या जागेभोवती जर खूप अडगळ असली तरी झोप चांगली येत नाही. झोपेच्या खोलीत अपरिचित व्यक्तीचे फोटो ठेवण्याने, कुठल्या तरी अँटिक वस्तू ठेवण्याने, खोलीत भलतीच झाडे लावण्याने त्यांच्यातून निघणाऱ्या नकारात्मक तरंगांमुळे झोप येत नाही. असे म्हणतात की दुसऱ्याची संपत्ती हडप करणारा किंवा तशी इच्छा करणारा, सतत यौवनचिंतन करणाऱ्याला लवकर झोप येत नाही व त्यामुळे त्यांना वाईट सवयी लागू शकतात.

झोपायची खोली स्वच्छ असावी, गादीवर घातलेली चादर स्वच्छ असावी, झोपण्यापूर्वी ३-४ मिनिटे एखादे स्तोत्र, एखादी कविता मनातल्या मनात म्हणावी, म्हणजे झोप यायला मदत होते. भारतीय संगीतशास्त्राने झोपेसाठी विशिष्ट राग, विशिष्ट स्तोत्र व प्रार्थना सांगितलेल्या आहेत. झोपण्यापूर्वी ५ मिनिटे ॐकार म्हणण्यानेही झोप लवकर व गाढ येते. हा ॐकार भ्रामरीसारखा असल्यास अधिक फायदे दिसतात. गाढ झोप येण्याचा फायदा नुसता शरीरालाच मिळतो असे नाही, तर गाढ झोपेत आपली जाणीव एका विशिष्ट तरंगावस्थेत गेल्यामुळे नाना तऱ्हेच्या कल्पना, विचार व योजना सुचू शकतात. सर्व जीवनाला लागणारी संकल्पनाही झोपेत मिळू शकते.

‘या देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता । नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।’ भारतीय संस्कृतीत निद्रेला साक्षात देवीचे स्वरूप मानलेले आहे. लहान मूल जसे आईने कुशीत घेतल्या घेतल्या विश्र्वासाने झोपून जाते, तसे आपल्याला निद्रादेवीच्या कुशीत शिरून झोपता आले पाहिजे. ‘योगनिद्रा’ ऐकणे हा एक झोप येण्यासाठी रामबाण उपाय आहे. असा अनुभव आहे की योगनिद्रा घेतल्यावर कमी झोप पुरते. योगनिद्रेमुळे मिळणारी गाढ झोप ही सामान्य झोपेपेक्षा अधिक विश्रांती देणारी व मेंदूला शक्ती देणारी असल्याने, कमी वेळ आवश्‍यक असते. योगनिद्रेचा तयार केलेला प्रयोग व विशेष संगीत यावर मी अनेक वर्षे संशोधन केलेले आहे व त्याचे उत्तम परिणाम मिळालेले आहेत.

आयुर्वेदामध्ये झोपेसाठी चूर्ण, गोळ्या, अवलेह वगैरे गोष्टींचा उपयोग सांगितला आहे. या सर्व गोष्टी मेंदूची ताकद वाढवून मेंदूला रक्त व प्राणशक्ती अधिक प्रमाणात पुरवून झोपेचे कार्य सुकर करतात. कानात श्रुती तेल, नाकात घरचे साजूक तूप, टाळूवर ब्राह्मी तेल, झोपण्यापूर्वी सॅन रिलॅक्स सिरप किंवा निद्रासॅन गोळ्या यांसारख्या गोष्टी वापरता येतात; परंतु झोप गाढ व स्वस्थ निश्र्चितच यायला हवी. शांत झोप मिळाल्याने मनुष्य केवळ शारीरिक आरोग्य व सुख अनुभवणार नाही, तर त्याची सृजनशक्ती, जाणीव, प्रज्ञा जागृत होऊन जीवनात काही तरी केल्याचे सुखही अनुभवता येईल.

(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या विपुल लेखनातून संकलित.)

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :article
loading image
go to top