उत्सव चंद्रकिरणांचा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Moon Rays

भारतीय सण-उत्सव आणि पौर्णिमा यांची सहसा सांगड घातलेली दिसते. भारतीय कालगणनेनुसार संपूर्ण वर्षात १२, तर कधी १३ पौर्णिमा येतात.

उत्सव चंद्रकिरणांचा!

भारतीय सण-उत्सव आणि पौर्णिमा यांची सहसा सांगड घातलेली दिसते. भारतीय कालगणनेनुसार संपूर्ण वर्षात १२, तर कधी १३ पौर्णिमा येतात. प्रत्येक पौर्णिमेला कोणत्या तरी विशेष सणाची, उपक्रमाची योजना केलेली आढळते. या सर्व पौर्णिमेमधली सर्वांत महत्त्वाची पौर्णिमा म्हणजे शरद पौर्णिमा किंवा आश्र्विन पौर्णिमा, जिला चंद्रकिरणांचा उत्सव असेही म्हणता येईल. भारतात बहुतेक सगळीकडे शरद पौर्णिमेच्या रात्री हा उत्सव साजरा केला जातो. पण या पौर्णिमेनंतर चारच दिवसांनी येणारी चतुर्थी ‘करवा चौथ’ म्हणून अनेक ठिकाणी साजरी केली जाते. या दोन्ही सणांमध्ये चंद्राचे दर्शन करणे, चंद्राची पूजा करणे, चंद्रकिरणांच्या संपर्कात राहणे एवढेच नाही तर चंद्रकिरणांचा संस्कार झालेले दूध किंवा पायस (खीर) सेवन करणे या गोष्टींचा समावेश केलेले दिसतो. आणि हे सर्व चंद्राची शक्ती आपल्यापर्यंत पोहोचावी या उद्देशाने योजलेले दिसते. चंद्राला पर्यायी नाव आहे सोम. आणि सोम याचा अर्थ अमृत असाही आहे. आयुर्वेदात शरद ऋतूत चंद्रकिरणांचा संस्कार झालेले पाणी हे अमृतासमान सांगितलेले आहे. नेमक्या याच ऋतूत आकाशात अगस्ती नक्षत्राचा उदय होत असतो, त्यामुळे पाण्यावर चंद्रकिरणांच्या शीतलतेचा आणि अगस्ती नक्षत्राच्या विषघ्नतेचा असा दुहेरी संस्कार होत असतो.

'शुचिहंसोदकं नाम निर्मलं मलजिज्जलम्‌ । नाभिष्यन्दि न वा रुक्षं पानादिष्वमृतोपमम्‌ ।।....अष्टांगहृदय सूत्रस्थान." शरद ऋतूतील शुद्ध पाण्याला ‘हंसोदक’ असे म्हटले जाते व ते शरीरात अतिरिक्त ओलावाही करत नाही किंवा शरीरात रुक्षताही वाढवत नाही, हे पाणी पिण्यासाठी अमृतोपम समजले जाते. चंद्रशक्तीचा संबंध सर्व प्रकारच्या वनस्पतींशी असतो. वनस्पतींना संस्कृत भाषेत ओषधि असे म्हटले जाते. यातील ‘ओष’ शब्दाचा अर्थ आहे रस. "ओषो नाम रसः सोऽस्यां धीयते इति ओषधिः।" ओष म्हणजे रस, हा रस ज्यांच्यात राहतो त्या ओषधि म्हणजेच वनस्पती होत. औषधी वनस्पती असो किंवा आहार म्हणून सेवन करायच्या भाज्या, फळे, धान्य वगैरे असो, त्यातील रस हाच शक्तिस्वरूप असतो. तांदूळ, गहू वगैरे जरी वाळवून खाण्याची पद्धत असली तरी त्यातील विरी किंवा कस शिल्लक असेपर्यंत सेवन करण्याचा उपयोग असतो. दहा वर्ष जुन्या तांदळातून ही शक्ती मिळू शकत नाही. आयुर्वेदात तर औषध म्हणून वापरायची वनस्पती ताजी असणे सर्वांत चांगले समजले जाते.काही मोजके अपवाद सोडले तर वाळवून ठेवलेल्या सुद्धा सहा महिने- वर्षाच्या आत औषधात वापरणे अनिवार्य असते. आणि या रसभावावर सुद्धा चंद्राचा प्रभाव असतो. आयुर्वेदात, वेदांतही चंद्राला ‘वनस्पतींचा राजा’ असे संबोधलेले आहे.

'ओषधयः संवदन्ते सोमेन सह राज्ञा ।....ऋग्वेद. " ओषधि सोम म्हणजेच चंद्राला त्यांचा राजा म्हणून संबोधतात. औषध अधिकाधिक वीर्यवान व्हावे, सर्व शक्तीने परिपूर्ण व्हावे यासाठी जेव्हा वातावरणात चंद्रशक्तीचा प्रभाव सर्वाधिक आहे तेव्हा वनस्पतींचे ग्रहण करण्याची, औषध तयार करण्याचा पद्धत असते. म्हणजेच ज्या नक्षत्रांचा स्वामी चंद्र आहे अशा पुष्य, रोहिणी, मृगशिरा, हस्त वगैरे नक्षत्रांवर वनस्पती तोडणे, औषध सुरू करणे अधिक प्रशस्त समजले जाते. चंद्रकिरणांचा वापर औषध बनविण्यासाठी सुद्धा केला जातो. विशेषतः प्रवाळ व मोती यांचा औषध म्हणून वापर करण्यासाठी त्यांच्यातील शीतगुण वाढविण्यासाठी चंद्रकिरणांचा वापर केला जातो. अगोदर प्रवाळ व मोत्याची शुद्धी केली जाते व नंतर त्यांना खलात घेऊन दिवसभर गुलाबपाणी किंवा चंदन, अनंतमूळ, मोगरा, वाळा वगैरे सुगंधी तसेच शीत द्रव्यांच्या पाण्याबरोबर घोटले जाते व रात्रभर चंद्रप्रकाशात ठेवले जाते. असे सतत २१ वेळा केले की प्रवाळ पिष्टी किंवा मोत्याची पिष्टी तयार होते. ही पिष्टी अतिशय सूक्ष्म, सौम्य व शीतल गुणधर्माची बनते व औषध म्हणून योजली जाते. अग्नीच्या मदतीने तयार केलेले प्रवाळ किंवा मोती भस्म यापेक्षा चंद्रप्रकाशाचा संस्कार करून तयार केलेली प्रवाळ पिष्टी किंवा मोती पिष्टी गुणांनी अधिक सरस असते असा अनुभव असतो.

भारतीय अध्यात्मशास्त्रात ‘सोमदेवता’ व ‘सोमरस’ हा सर्वांत महत्त्वाचा समजला आहे. सोमरस हे नाव मेंदूजलाला दिलेले आहे. मेंदू व आपला संपूर्ण मेरुदंड सोमरसात बुडालेले असतात. सोमरस हाच कर्ता-धर्ता व जीवन चालविणारा महत्त्वाचा घटक असतो. या सोमरसाला कोजागरीच्या दिवशी वृद्धी मिळते. जसे झाडात असलेल्या रसावर पौर्णिमेचा म्हणजेच चंद्राचा परिणाम होतो तसे या दिवशी शरीरातील सोमरसाचीही वृद्धी होते. चंद्रकिरणांचा संस्कार झालेले दूध किंवा खीर घेणे हे या स्थितीला शारीरिक स्तरावर मदत कणारे असते. सर्वांनी एकत्र येणे, आनंदाने एकमेकांशी गप्पा मारणे हे मानसिक स्तरावर सहायक ठरते.

पण याच्याही पलीकडे चंद्रप्रकाशात ध्यानाला बसून सोमाच्या माध्यमातून अतरंगापर्यंत जाता येण्याचीही या दिवशी संधी असते. मनाच्या पलीकडे, आतल्या जीवाला स्पर्श करून, व्यक्तिगत आत्म्याला स्पर्श करून त्यापलीकडे असणाऱ्या परमात्म्यापर्यंत पोचण्याची ही संधी असते, ज्यायोगे आपल्याला आपण सर्व एक आहोत हा विश्र्वबंधुत्वभाव अनुभवता येतो. अशा सर्व दृष्टींनी चंद्रशक्तीचा उपयोग करून घेण्यास प्रेरित करणारी शरद पौर्णिमा दोन दिवसांनी येते आहे. त्या निमित्ताने सर्वांना अनेक शुभेच्छा.

(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित)

टॅग्स :festivalmoonarticleUtsav