सुखसमृद्धीची गुरुकिल्ली...

आयुर्वेदात मेधा, बुद्धी, स्मृती, संयमशक्ती असे बुद्धीचे वेगवेगळे प्रकार समजावलेले आहेत. कोणतीही गोष्ट आकलन करून ध्यानात ठेवायचे काम मेधा करते.
सुखसमृद्धीची गुरुकिल्ली...
Summary

आयुर्वेदात मेधा, बुद्धी, स्मृती, संयमशक्ती असे बुद्धीचे वेगवेगळे प्रकार समजावलेले आहेत. कोणतीही गोष्ट आकलन करून ध्यानात ठेवायचे काम मेधा करते.

‘देवा, सुबुद्धी दे’ अशी आपण नेहमी देवाकडे प्रार्थना करतो, कारण बुद्धीमुळे, ज्ञानामुळे जो आदर मिळतो तो पैशाने, सत्तेने कधीच मिळत नाही. बुद्धिवंताला बुद्धीमुळे समाजात केवळ मानच मिळतो असे नव्हे, तर बुद्धीमुळेच सुख, समृद्धी, आरोग्यही मिळते. बुद्धीचे काम काय, तर बुद्धी चांगल्या-वाईटाची, हवे-नको याची आणि प्रेयस-श्रेयस (मनाला आवडणारे व आत्म्याला कल्याणकारी असणारे) यांची निवड करते. अर्थात, हवे-नको याची निवड करणे सोपे असते, पण प्रेयस-श्रेयसातील एकाची निवड करणे अवघड असते. महत्त्वाचे म्हणजे सर्व इंद्रिये व मन हे प्रेयसाच्या बाजूने उभे राहतात आणि अशा वेळी बुद्धीला मोठा संघर्ष करावा लागतो. म्हणूनच इंद्रियजयाला खूप महत्त्व दिलेले दिसते. मनाला प्रिय असेल असे केले तर आयुष्य योग्य दिशेला वाटचाल करेल याची खात्री नसते. मनुष्याने श्रेयसाची निवड करावी, याचे अधिकार मनुष्याच्या हातात नसतात, कारण इंद्रिये स्वतःच्या स्वभावाप्रमाणे, स्वतःच्या क्षेत्रात काम करतात, मनालाही आपल्या बाजूला सामील करवून घेऊन मनुष्याला भलतीकडेच खेचत राहतात. परमेश्र्वराचा हात, परमेश्र्वराचे साहाय्य, परमेश्र्वराचे आशीर्वाद मिळाल्यासच बुद्धी श्रेयसाचा निर्णय घेऊ शकते. याचाच अर्थ इंद्रियांना, मनाला भगवत्‌दर्शनाची आवड लावून भगवच्चिंतन, संकीर्तन यात गुंतवून म्हणजेच परमेश्र्वरी आशीर्वाद मिळवून बुद्धीला श्रेयसाचा निर्णय घेता यावा, यासाठी प्रयत्न करायचे असतात.

आयुर्वेदात मेधा, बुद्धी, स्मृती, संयमशक्ती असे बुद्धीचे वेगवेगळे प्रकार समजावलेले आहेत. कोणतीही गोष्ट आकलन करून ध्यानात ठेवायचे काम मेधा करते. रोजच्या व्यवहारात किंवा अभ्यास करताना कोणतीही गोष्ट चटकन समजायला हवी असेल आणि डोक्यात रहायला हवी असेल तर ‘मेधा संपन्नता’ आवश्‍यक आहे. यासाठी संस्कार प्रकरणात मेधासंस्कार ही उपाययोजना सुचवली. मेधेच्या जोडीला असते ती ‘स्मृती’ अर्थात स्मरणशक्ती. ‘अनुभवजन्यं ज्ञानं स्मृतिः’ अशी व्याख्या आयुर्वेदाने केलेली आहे. एखादी गोष्ट नुसती समजून किंवा ग्रहण होऊन चालत नाही, तर ती लक्षात राहावी लागते. ऐकलेले, वाचलेले, शिकवलेले किंवा इतर ज्या कोणत्या गोष्टींचा आपण अनुभव घेतो, त्या लक्षात राहण्यासाठी ‘स्मृतिसंपन्नता’ हवी. एकंदर कुशाग्र बुद्धीसाठी मेधा आणि स्मृती या दोन्हीही गोष्टी उत्तम असाव्या लागतात. बुद्धीची व्याख्या आयुर्वेदात केलेली आहे, ‘निश्र्चयात्मिका धीः बुद्धिः... सुश्रुत शारीरस्थान.’ एखाद्या विषयाचे, एखाद्या वस्तूचे निश्र्चित, नेमके व खरे ज्ञान करून देते ती ‘बुद्धी’ होय. एखादा विषय समजावला पण तो तर्कसंगत नसला तर त्यातली विसंगती बुद्धीला समजेल. आकलन झालेल्या दोन परस्परभिन्न गोष्टींमधली नेमकी खरी कोणती, याचा निर्णय फक्त बुद्धीच घेऊ शकते. उदा. अंधारात पडलेली दोरी कितीही सापासारखी भासली, मेधाशक्तीने दोरीचे साप म्हणून आकलन जरी केले तरी अखेरीस तो साप नसून दोरी आहे, हे बुद्धी सांगू शकते. म्हणूनच मेधा- स्मृतिजन्य ज्ञानाला बुद्धीच्या नेमक्या निश्र्चिततेची जोड असणे आवश्‍यक असते. अन्यथा दोरीला साप समजून कारण नसता घाबरण्याची पाळी येऊ शकेल. बुद्धीची व्याप्ती यापेक्षाही मोठी आहे.

व्यवहारात, रोजच्या जीवनक्रमात अनेकदा ‘द्विधा’ परिस्थिती उत्पन्न होते. मन एका क्षणी एक म्हणते तर दुसऱ्या क्षणी भलतीकडेच धावते. अशा वेळेला मोहाच्या आहारी न जाता योग्य निर्णय देण्याचे काम बुद्धीचे असते. अगदी साधे उदाहरण द्यायचे झाले तर तापातून नुकत्याच उठलेल्या व्यक्तीला समोर आइस्क्रीम दिसले तर खायची इच्छा होईल, मन आइस्क्रीमच्या मोहात पडेल, पण त्याच वेळेला बुद्धी त्याला ‘आत्ता आइस्क्रीम खाणे बरोबर नाही’ हा निर्णय देईल. आइस्क्रीमचे हे उदाहरण अगदीच सर्वसाधारण आहे, पण आपल्या आयुष्यातल्या सगळ्याच लहान-मोठ्या गोष्टी, दिनक्रम, व्यवसाय वगैरे गोष्टीं ठरवताना, नातेसंबंधातून जाताना, आयुष्याची दिशा ठरवताना बुद्धी आपल्याला योग्य निर्णय देत असते. मात्र बुद्धीने निर्णय घेतला तरी तो अंमलात आणण्याची ताकद तिची नाही. त्याला जबाबदार असते संयमशक्ती मनावर संयम ठेवणारी, बुद्धीने घेतलेल्या अचूक निर्णयाला प्रत्यक्षात आणणारी ती संयमशक्ती होय.

मेधेने कितीही चांगले आकलन केले, स्मृतीच्या साहाय्याने बुद्धीने अगदी अचूक निर्णय घेतला व मनाला ‘असेच कर’ म्हणून अगदी बजावले तरी धृतीला मन कह्यात आणता आले नाही तर चुकीचे आचरण होते, ज्याचे परिणाम कधी ना कधी भोगावेच लागतात. आपण चुकतो आहोत हे बहुतेक वेळेला आपल्याला माहिती असते तरीही आपण आपल्यालाच थांबवू शकत नाही. असे जेव्हा होते तेव्हा धृतीची ताकद कमी पडत असते. प्रत्येक व्यसनी व्यक्तीला व्यसनामुळे आपल्याला त्रास होणार आहे हे माहिती असते, सिगारेटच्या प्रत्येक पाकिटावर ‘धूम्रपान आरोग्याला धोकादायक आहे’ हे लिहिलेले असते, पण धूम्रपानाच्या आहारी गेलेल्या व्यक्तीला त्यामुळे काहीही फरक पडत नाही. अशा वेळेला धृतीची शक्ती वाढवायला हवी असते, संयम अंगी बाणवायला हवा असतो. अशा प्रकारे संपन्न जीवनासाठी सर्वार्थाने यशस्वी आणि परिपूर्ण जीवन जगण्यासाठी पहिल्यापासून बुद्धिसंपन्नतेसाठी प्रयत्न करावे लागतात. हे उपायही आयुर्वेदाने सुचवले आहेत.

‘गर्भसंस्कार’ म्हणजेच गर्भधारणेपूर्वीच स्त्री-पुरुषांनी आहार-आचरणात घ्यायची काळजी, वीर्यशक्ती, बीजशक्ती व ओजतत्त्वाची ताकद वाढवण्यासाठी रसायनांचे सेवन, गर्भारपणात ‘प्रज्ञा’ साकार होत असताना स्त्रीने घ्यायचा विशेष आहार, प्रज्ञावर्धक घृते, रसायने यांचे सेवन, विशिष्ट संगीत, मंत्र यांचे श्रवण हा प्रज्ञावर्धनाचा एक उत्तम उपाय सांगता येईल. यानंतर बाळ जन्माला आल्यानंतरच्या पहिल्या काही महिन्यांतही मेधा, बुद्धी, स्मृती वगैरेंचा विकास होण्याचे काम सुरू असते. तेव्हाही आयुर्वेदाने सुवर्णप्राशनसंस्कार सुचवला आहे. बालक पाच वर्षांचे होईपर्यंत बालामृतसारखे रसायन घेणे, त्यानंतर सुवर्ण, केशर, शतावरी वगैरेंपासून बनविलेले संतुलन अमृतशर्करासारखे रसायन घेणे, नियमित पंचामृत घेणे हे सर्व उपाय बुद्धिसंपन्नतेसाठी उत्तम असतात. मेधा-बुद्धी-स्मृतिसंपन्नतेसाठी कितीही प्रयत्न केले तरी या सर्व गोष्टींना प्रगट करणारे मन हे एक माध्यम आहे. जसे कॉम्प्युटरच्या स्क्रीन वर सर्व गोष्टी दिसतात, प्रगट होतात, तसेच व्यवहारात सर्व गोष्टी मनाच्या द्वारे प्रकट होतात. तेव्हा संस्कारांनी मनाला शुद्ध केल्यानेच योग्य निर्णय घेता येतात व आयुष्यात सुख, समृद्धी, यश व समाधान अनुभवता येते.

(श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे यांच्या विपुल लेखनातून संकलित)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com