आवळीभोजन

आवळीभोजन

विज्ञान नेहमी प्रगतशील असते. नवनवीन प्रयोग करणे व त्यातून मनुष्याला निसर्गाचे कोडे उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करणे हा विज्ञानाचा उद्देश आहे. या वाटेवर विज्ञानाने सध्या क्वांटम सायन्सचा आधार घेतलेला दिसतो. क्वांटम सायन्समध्ये तरंगशक्‍तीचा प्रभाव पाहणे, अणूच्या बारीकात बारीक कणापर्यंत जाऊन त्यात काय आहे हे शोधणे अशा अनेक गोष्टींचा समावेश असल्याचे दिसते. 

तरंगशक्‍तीच्या बाबतीत आपण पाहिले असेल किंवा वाचले असेल की टेलिफोनच्या टॉवर्सच्या आसपास राहणाऱ्या व्यक्‍तींना विशिष्ट प्रकारचे त्रास होऊ शकतात. टेलिफोनच्या टॉवर्स ज्या इमारतींवर लावलेले असतात अशा इमारतींमध्ये लोक राहण्यास तयार नसतात किंवा अशा टॉवर्सजवळ इमारती बांधल्या जात नाहीत. तरंग सर्वदूर पसरत असले तरी टॉवर्सच्या आसपास हे तरंग अधिक शक्‍तिशाली असतात. रात्री उशीच्या जवळ मोबाईल फोन ठेवून झोपू नये किंवा हृदयाजवळ असणाऱ्या खिशात फोन ठेवू नये याचेही कारण हेच आहे. मोबाईलचा फोनचा वापर कमीत कमी करणे व मोबाईल शरीरावर न ठेवता कुठेतरी दूर ठेवणे हेच श्रेयस्कर ठरते. हे तरंग आपल्याला दिसत नसले तरी ते सगळीकडे पसरलेले असतातच. टीव्ही चालू केला की पडद्यावर चित्र दिसायला लागते, म्हणजे तेथे तरंग असतातच, विशिष्ट  यंत्राद्वारे त्या तरंगांचे रूपांतर चित्रात होते. रेडिओवेव्हज्‌, इन्फ्रा रेड अशा अनेक प्रकारचे तरंग सुद्धा आपल्या आसपास असतात. आपण या तरंगांच्या जाळ्यात सापडलेले असतो, साहजिकच या सर्व तरंगांचे परिणाम आपल्या शरीरावर होतो. परिणामतः वेगवेगळ्या प्रकारच्या त्रासांना किंवा रोगांना समोरे जाण्याची वेळ येते. 

परंतु चांगल्या प्रकारच्या तरंगांचा उपयोग करून एखाद्या शांत ठिकाणी जाऊन, एखाद्या झाडाखाली बसून स्वतःच्या शक्‍तीच्या जोरावर, स्वतःच्या योग्य निर्णयाच्या जोरावर, स्वतःच्या सकारात्मक विचारांच्या तरंगांच्या मदतीने आणि वृक्ष, वनस्पती व वातावरणाच्या तरंगांचा प्रभावाने सृजनात्मक कल्पना येऊ शकतात, परमशांती मिळू शकते, बुद्धत्वही प्राप्त होऊ शकते. एकूण काय, या तरंगांचा प्रभाव मनुष्यावर झालेला दिसतो.

हे लक्षात घेता आवळीभोजनाचे महत्त्व समजणे अवघड जाऊ नये. आवळ्याच्या सावलीत बसले असता त्यातून निघणाऱ्या तरंगांमुळे मोठा फायदा होऊ शकतो. आवळे सेवन केल्यावर किंवा आवळ्यापासून योग्य विधीने बनविलेली रसायने सेवन केल्यावर होणारा फायदा द्विगुणित होण्यासाठी आवळ्याच्या झाडाच्या सावलीत बसावे, खेळावे, अन्न खावे अशी योजना भारतीय संस्कृतीत सांगितलेली आहे. यातून आवळीभोजनाची योजना केलेली आहे. ज्या झाडावर आवळे लागले आहेत, आवळे परिपक्व झाले आहेत त्या झाडाची शक्‍ती वेगळी असणारच. या दृष्टीने कार्तिक महिन्यात आवळ्याच्या झाडाचे पूजन, आवळी भोजन केले जाते. आवळ्याच्या झाडातून निघणारे तरंग आपल्या चेतासंस्थेला प्रभावित करून ताकद देणारे असतात, त्या ठिकाणी श्री विष्णूंचा वास असतो असे मानले जाते. श्री विष्णू ही चलनवलनाची, तरंगांची, चेतनेची व वर्तमानकाळाची देवता आहे. श्री विष्णूंचे पूजन करण्याच्या निमित्ताने सकारात्मक होऊन आवळ्याच्या झाडाखाली बसावे, आवळे खावेत. इतर काही पदार्थ झाडाखाली शिजवून खावेत. ‘पॉट लक’ जेवण करावे. प्रत्येकाने आपापल्या धरून काही पदार्थ करून आणावा, सर्वांनी एकमेकांना आपला पदार्थ वाटावा व मिळून जेवण करणे म्हणजे ‘पॉट लक’ जेवण. यामुळे आवळ्याच्या झाडाच्या सान्निध्यात राहण्याचे फायदे तर मिळतातच, बरोबरीने एकमेकांशी मैत्री वाढविण्याचे, सर्वांनी एकरूप होऊन ‘सह वीर्यं करवावहै’चाही फायदा होऊ शकतो. असे आवळ्याच्या झाडाखाली भोजन करण्यामागचे विज्ञान आहे. 

आवळ्याला ‘अमृतफळ’ असे म्हणायला हरकत नसावी. आवळ्याच्या झाडाची पाने छोटी असतात आवळ्याचा वृक्ष मोठा झाला तरी त्याला फारशी सावली नसते. आवळ्यापासून लाभ मिळविण्यासाठी वर्षभर झाडाची काळजी घ्यावी लागते. जास्तीत जास्त झाडे लावावी. राहत्या घराशेजारी लावायच्या झाडांमध्ये आवळ्याच्या दोन-चार झाडांचाही अवश्‍य समावेश असावा. 

हेमंत ऋतूत रसायनांचे महत्त्व सर्वाधिक असते. आवळे वर्षांतून काही काळच उपलब्ध असतात. आवळ्याचा लाभ पुढे वर्षभर घेता यावा, या हेतूने च्यवन ऋषींनी योजना केली ‘च्यवनप्राश’ या रसायनाची. छातीच्या विकारांवर या रसायनाचा फायदा होताना दिसतो. जेवढे श्वसन चांगले असेल तेवढे अधिक प्राणशक्‍तीचे आकर्षण होते आणि जेवढी अधिक प्राणशक्‍ती आकर्षित होईल तेवढा अधिक प्राणिमात्रांचा प्राण असलेला प्राण शरीरात आकर्षित होतो. या प्राणामुळे पेशींना आवश्‍यक असणारे रसायन त्यांना मिळाल्यामुळे दीर्घायुष्य प्राप्त होते, मनुष्याला शंभर वर्षे जगणे शक्‍य होते.

आयुर्वेदात अनेक रसायनांचा उल्लेख आहे त्यात आमलकी रसायनांचे विशेष महत्त्व सांगितलेले आहे. च्यवनप्राशचे अनेक फायदे आहेत. आयुर्वेदिक उत्पादनांच्या बाबतीत एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. खूप संशोधन करून च्यवनप्राश हे रसायन कसे बनवायचे, त्यात कुठल्या  गोष्टी वापरायच्या हे आयुर्वेदाच्या ग्रंथात सांगितलेले आहे. योग्य विधीने बनविलेला च्यवनप्राश सेवन केल्याने तारुण्य प्राप्त होते, वृद्धांचा उत्साह वाढतो, त्याला तरुणपणातील ताकद अनुभवता येते. ताजे आवळे उपलब्ध असतात तेव्हा योग्य प्रकारे च्यवनप्राश बनवून ठेवून किंवा योग्य रीतीने बनविलेला च्यवनप्राश बाजारातून विकत आणून वर्षभर सेवन करावा. हा अत्यंत चविष्टही असतो. आवळ्याचे अनेक घरगुती उपयोगही आहेत. हे उपयोग पाहिले तर आवळ्याच्या वृक्षाला कल्पवृक्ष म्हणू शकू. तापामध्ये तोंडाला शोष पडतो, त्यावर आवळकाठी व द्राक्षे तुपासह वाटून तयार केलेली गोळी तोंडात धरण्याने लगेच बरे वाटते.  उष्णता वाढल्याने जननेंद्रियांच्या ठिकाणी, विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत असा विकार झाल्यास आवळ्याचा रस साखर मिसळून घेण्याने बरे वाटते. 

च्यवनप्राश हे रसायन केवळ भारतातच नाही तर परदेशांतही प्रसिद्ध असून अत्यंत लोकप्रिय झालेले आहे. आवळ्याचे व च्यवनप्राशचे गुण लक्षात घेऊन आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com