dr shree balaji tambe
dr shree balaji tambe

अन्नाद्‌  भवन्ति भूतानि

माणसाने एकदा खावे, दोनदा खावे, चारदा थोडे थोडे खावे, उपवास करावा, अमुक वस्तू प्रकृतीसाठी वाईट आहे, अमुक वस्तूचा मुबलक वापर करावा, हे सुपर फूड आहे वगैरे सल्ले मिळण्याचे प्रमाण वाढलेले आहे. या चर्चेच्या गोंधळात सापडून प्रकृती बिघडवण्यापेक्षा आयुर्वेदशास्त्रानुसार प्रकृतीचे निदान तज्ज्ञांकडून करून घेऊन त्यानुसार आहार ठेवला तर असलेले रोग आटोक्‍यात येतील आणि औषध व दवाखान्याचा खर्च कमी होईल हे नक्की.

अन्न-पाणी, वस्त्र, निवारा या मनुष्याच्या प्राथमिक गरज असतात. अन्न म्हणजेच पाणी आणि पाणी म्हणजेच अन्न. तसे पाहता अन्न व पाणी यात फारसा फरक नाही. एक थोडेसे स्थूल आहे व दुसरे प्रवाही आहे. अन्न-पाण्यापासून तयार झालेल्या शरीराला वाचवण्यासाठी व जीवन जगण्यासाठी चांगली जागा देण्यासाठी व  बाह्य वातावरणापासून संरक्षण करण्यासाठी अवकाश प्रदान करण्यासाठी असतो निवारा. 

यातील सर्वांत महत्त्वाचे असते अन्न. देह पंचमहाभूतांपासून म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यांच्यापासून झालेला आहे. मनुष्याच्या शरीरात जलतत्त्वाचे व पृथ्वीतत्त्वाचे आधिक्‍य असल्यामुळे त्याला अन्न-पाणी मिळत राहणे आवश्‍यक आहे. 

अशाही काही पातळ्या आहेत, जेथे असलेल्यांचे देह वायुतत्त्वप्रधान असतात. सद्‌गुरु श्री दत्तात्रेयांसारखे काही व्यक्‍तिमत्व पूर्णतः आकाशतत्त्वाचे देह असलेलेही आहेत. आकाशतत्त्वाचे असल्यामुळे ते दिगंबर, निर्गुण, निराकार महाशक्‍ती धारण करणारे असतात आणि भक्‍ताने आठवण केल्यावर त्वरित प्रकट होऊन मार्गदर्शन करतात.  

पण मनुष्याचे अन्नावाचून चालत नाही. अनेक मंडळी अनेक प्रकारचे नवनवीन खाण्याचे पदार्थ शोधत असतात, नवनवीन पदार्थ तयार करत असतात. साध्या पाण्याच्या बाबतीत वाहत्या नदीचे पाणी चांगले, पावसाच्या पाण्यात आम जास्त असतो, डबक्‍यात साठविलेले पाणी पचायला कठीण असते, असे मार्गदर्शन करणारी अनेक मंडळी भेटतात. पाणी स्वच्छ नसते, गाळल्यावर त्यातील केरकचरा निघून गेला तरी त्यातील सूक्ष्म जंतू जात नसल्याकारणाने पाणी शुद्ध करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या छोट्या-मोठ्या यंत्रणा तयार करण्यात आल्या. असे शुद्ध केलेले पाणी वापरण्याची प्रथा रूढ झाली. परंतु पाण्याच्या शुद्धीकरण करण्याच्या प्रक्रियेमध्ये मनुष्याला आवश्‍यक असलेले घटकही निघून जातात असे लक्षात आले. त्यामुळे अशा शुद्ध केलेल्या पाण्यात मनुष्याला आवश्‍यक असणारे घटक मिसळून बाटलीबंद पाणी तयार करण्याची पद्धत सुरू झाली. परंतु असे करूनही हे पाणी पचतेच असे नाही. त्यामुळे चांगल्या ब्रॅंडचे पाणी बाटलीबंद असले तरी ते उकळून प्यावे असे मार्गदर्शन करण्यात येऊ लागले. सर्व प्रकारचे पाणी उकळूनच प्यावे. उकळताना त्यात वाळा, चंदन वगैरे वनस्पती किंवा ‘जलसंतुलन’ चूर्ण टाकणे उत्तम.

अन्नाच्या गुणवत्तेबद्दल तर काही बोलायला नको अशी परिस्थिती आहे. पृथ्वीच्या पाठीवर अनेक देश आहेत, तेथील वातावरण वेगवेगळ्या प्रकारचे आहे. साहजिकच तेथे उगवणाऱ्या भाजी, फळे, धान्य वगैरेंत खूप फरक असतो. यावर विचार करून वेगवेगळे अन्नाचे प्रकार व करण्याच्या पद्धती केल्या जातात. 

मनाचे-जिभेचे चोचले पुरवण्यासाठी रोज काही तरी नवीन खाल्ले जाते, मग प्रकृतीला ते मानवते की नाही याकडे लक्ष दिले जात नाही. चविष्ट हवे या नावाखाली यम्मी यम्मी अन्नाच्या शोधात भटकणारी मंडळी असतात. यातूनच मग हे खा, हे खाऊ नका असे निर्बंध सुरू होतात. 

वेद मनुष्याच्या उत्पत्तीपासून ते आजपर्यंत आहेत. जीवन म्हणजे काय, ते कसे जगावे, जेव्हा जीवन संपते तेव्हा शरीर पंचमहाभूतांत कसे विलीन होते, त्याचे अस्तित्व कसे राहते या सगळ्यांचे मार्गदर्शन वेदांत केलेले आढळते. या शास्त्राने हजारों वर्षांपूर्वी आहारासंबंधी सांगतिलेल्या शास्त्रात आजही काहीही बदल करावा लागत नाही. हे शास्त्र विशिष्ट देशासाठी किंवा विशिष्ट पाककृतीपुरते सांगितलेले नाही. प्रत्येक वस्तूचा गुणधर्म, त्यात असलेले सप्तधातूंचे भाव आणि वात-पित्त-कफादी गुण सांगितले. शिवाय व्यक्‍तीची प्रकृती, रोग वगैरेंचा विरार करून मार्गदर्शन केलेले आहे. 

जगभर फिरायला हरकत नाही, जगभरातील अन्न खायलाही हरकत नाही, परंतु ते खात असताना त्या अन्नाचा स्वभाव व आपल्या शरीराचा स्वभाव लक्षात घेऊन ते अन्न आपल्या शरीराला मानवणारे आहे का, ते आपल्या शरीरासाठी सुखकर होणार आहे का, याचा विचार करणे आवश्‍यक आहे. 

म्हणून अन्नाचे वात-पित्त-कफादी गुण सांगितले आहेत, त्यात असणारे घटक मनुष्याच्या शरीरातील रस, रक्‍त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र यापैकी कुठल्या धातूला उपयोगी आहे, शरीरात असणाऱ्या कुठल्या प्राणाला-उपप्राणाला उपयोगाचे आहे याचा विचार या शास्त्रात केलेला आहे. अन्न खाताना आनंद व्हावा, ते चविष्ट असावे या हेतूने अन्न शिजवताना त्याचे संतुलन कसे करायचे, मूळ वस्तूत असलेले दोष कसे घालवायचे व गुण कसे वाढवायचे, घरातील प्रत्येकाच्या प्रकृतीला (कोणाला मोठा त्रास असल्यास त्याला सोडून) मानवेल यासाठी काय करावे याचा विचार आयुर्वेदशास्त्राने केला. तेव्हा कुठल्या पदार्थात काय मिसळावे, पदार्थ किती वेळ शिजवावा, पाणी घालून शिजवावा की दूध घालून शिजवावा, शिजवण्यापूर्वी पदार्थ धुवून घ्यावा की भाजून घ्यावा वगैरे अनेक प्रकारचे मार्गदर्शन या शास्त्रात केलेले आढळते. उदा. मुगाच्या डाळीचे वरण करताना फोडणी कशाची द्यावी, कशी द्यावी या मार्गदर्शनाबरोबरच तेल कुठले वापरावे, तेलात फोडणी केव्हा टाकावी, कुठल्या तापमानाला भाजी वा धान्य टाकावे, पदार्थ शिजत असताना त्यावर झाकण ठेवावे की नाही वगैरेंबद्दलही मार्गदर्शन केलेले असते. या शास्त्रात अमुक देशासाठी किंवा अमुक व्यक्‍तीसाठी असे मार्गदर्शन न करता सर्वांना उपयोगी पडेल असे मार्गदर्शन केलेले असते. 

माणसाने एकदा खावे, दोनदा खावे, चारदा थोडे थोडे खावे, उपवास करावा, अमुक वस्तू प्रकृतीसाठी वाईट आहे, अमुक वस्तूचा मुबलक वापर करावा, हे सुपर फूड आहे वगैरे सल्ले मिळण्याचे प्रमाण वाढलेले आहे. या चर्चेच्या गोंधळात सापडून प्रकृती बिघडवण्यापेक्षा आयुर्वेदशास्त्रानुसार प्रकृतीचे निदान तज्ज्ञांकडून करून घेऊन त्यानुसार आहार ठेवला तर असलेले रोग आटोक्‍यात येतील आणि औषध व दवाखान्याचा खर्च कमी होईल हे नक्की.

‘‘मी काय खाऊ नको?’’ असा प्रश्न अनेक वेळा विचारला जातो. पण मी काय खाऊ नये हे विचारण्यापेक्षा प्रथम ‘आपण काय खाऊ शकतो'' हे माहिती करून घ्यावे. असे केले की "नको''ची यादी आपसूक तयार होईल. ती यादी एका विशिष्ट भौगोलिक प्रदेशात असतानासाठी वा विशिष्ट वेळेसाठी नसून ती यादी संपूर्ण जगात कोठेही गेले तरी वापरता येईल. मांसाहार सगळ्यांनाच अनुकूल नसतो. सध्या जगात मोठ्या प्रमाणात माणसे मांसाहार सोडून देत आहेत.

आपण अनेक गोष्टी शिकतो, पण अन्न शिजविण्यापासून खाण्या-पिण्यापर्यंतचे विज्ञान एक-दोन दिवसांच्या अभ्यासक्रमात शिकून घेणे आवश्‍यक असते. शेवटी जीवनाचा आनंद उत्तम व आरोग्यवान शरीरानेच घेता येतो हे लक्षात ठेवणे आवश्‍यक असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com