हास्य आणि आरोग्य

हास्य आणि आरोग्य

शरीराच्या आरोग्याचे अनेक मापदंड असतात. शरीरबांधा, भूक, तहान, चांगली पचनशक्‍ती, शांत झोप वगैरे अनेक मुद्द्यांच्या मदतीने शरीराचे आरोग्य समजून घेता येते. नाना तऱ्हेच्या तपासण्यासुद्धा शरीरातील बिघाड किंवा शरीराची समस्थिती सांगण्यास सक्षम असतात. मन मात्र शरीरापेक्षा अधिक गुंतागुंतीचे असते. मनाचे आरोग्य दर्शविणारी जी मोजकी लक्षणे त्यातील एक महत्त्वाचे लक्षण आहे हास्य. गालातल्या गालात किंवा खळखळून हसू जर मनापासून आलेले असले, तर ते मनाच्या आरोग्याचे, मनाच्या प्रसन्नतेचे एक कारण असते. ‘प्रसन्न आत्मेन्द्रियमनः’ म्हणजे संपूर्ण आरोग्यासाठी शरीराच्या आरोग्याच्या बरोबरीने मन, इंद्रिये व आत्मा यांची प्रसन्नता अपरिहार्य असते हे जे आयुर्वेदात सांगितले, ते समजण्यासाठी मनापासून हसू महत्त्वाचे होय. 

हसणे हे एकंदर आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे हे अधोरेखित करण्यासाठी दर वर्षी  मे महिन्यातील पहिला रविवार ‘जागतिक हास्य दिन’ म्हणून साजरा केला जातो. हसू आणि रडू या दोन गोष्टी शिकवाव्या लागत नाहीत, प्रत्येकाला त्या जन्मतःच अवगत असतात. छोटे बाळ झोपेतही मध्येच गोड हसते, आपण मात्र जीवनाच्या रहाटगाडग्यात अडकलो की मनापासून हसणे विसरून जातो. असे होऊ नये, यासाठी आज आपण हास्याचे उपयोग, नुकसान यांची माहिती करून घेणार आहोत. 

शरीरात जसे वात, पित्त, कफ हे त्रिदोष आहेत तसेच मनाचेही सत्त्व, रज, तम हे त्रिगुण सांगितले आहेत. वास्तविक त्यातील सत्त्व हा गुण असून, इतर रज व तम हे दोषच आहेत. सत्त्व, रज, तमाच्या तारतम्यानुसार मनाची वृत्ती, मनुष्याचा स्वभाव, त्याची मानसिक स्थिती, विचार करण्याची पद्धत, मनाची शक्‍ती वगैरे गोष्टी ठरत असतात. चरकाचार्यांनी सात्त्विक मनाचे ब्राह्म सत्त्व, आर्ष सत्त्व वगैरे सात प्रकार; राजसिक मनाचे आसुर सत्त्व, राक्षस सत्त्व वगैरे सहा प्रकार तर तामसिक मनाचे पाशव सत्त्व, मात्स्य सत्त्व वगैरे तीन प्रकार वर्णन केलेले आहेत.

या सर्व प्रकारांचे वर्णन पाहिले तर समजते की मनाची प्रसन्नता ही फक्‍त सात्त्विक मनाशीच संबंधित आहे, अर्थातच मनापासून आलेले हसू हे मनाच्या सात्त्विकतेचे निदर्शक आहे. राजसिक मन राग, मोह, चंचलता, ईर्षेने युक्‍त, तर तामसिक मन आळस, लोभ, स्वार्थी वृत्तीने युक्‍त असते. अहंकार टाकल्यानंतर उरते ते हास्य! मनाच्या प्रसन्नतेमुळे हास्य आणि हास्यामुळे मनाची प्रसन्नता अशा दोन्ही तऱ्हेने हास्य प्रसन्नतेशी जोडले जाते. मित्रमंडळी किंवा कुटुंबासह थोडा वेळ हसण्या-खिदळण्याने दिवसभराचा शीण दूर व्हायलाही मदत मिळते. 

खऱ्या हसण्याने मनावरचा ताण कमी झाला की त्याचा फायदा शरीर-मन दोघांनाही होतोच. पण काहीही कारण नसताना प्रमाणाबाहेर हसणे आयुर्वेदाने वर्ज्य सांगितले आहे. वाग्भटाचार्यांनी एक सूत्र सांगितले आहे ते याप्रमाणे,

व्यायामजागराध्वस्त्रीहास्यभाषादि साहसम्‌ । 
गजं सिंह इवाकर्षन्‌ भजन्नति विनश्‍यति ।।

व्यायाम किंवा शारीरिक श्रम, जागरण, चालणे, मैथुन, हसणे व बोलणे यांचा अतिरेक करणाऱ्या व्यक्‍तींचा हत्तीला ओढून न्यायचा प्रयत्न करणाऱ्या सिंहाप्रमाणे नाश होतो.

सिंहामध्ये हत्तीला मारण्याचे सामर्थ्य असले तरी ते त्याच्या कुवतीपेक्षा जास्ती असल्याने नंतर सिंहाच्या नाशालाही कारणीभूत ठरू शकते. तसेच व्यायाम, चालणे, हसणे वगैरे सर्व क्रिया मनुष्य करू शकत असला तरी त्याचा अतिरेक झाल्यास शरीरशक्‍तीचा नाश होण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे जीवन हसत-खेळत अवश्‍य जगावे, हसण्यामुळे स्वतः प्रसन्नतेचा अनुभव घ्यावा, दुसऱ्यालाही द्यावा. पण अकारण आणि अनैसर्गिक हसण्याने आरोग्यापेक्षा अनारोग्यालाच आमंत्रण मिळेल याचे भान ठेवावे. 

अति व जोरात हसल्याने बऱ्याच वेळा ठसका लागतो. वर उचलणारी हवा चुकीच्या मार्गाने कार्यरत होऊन ठसका लागणे, डोळ्यांतून पाणी येणे या क्रिया होतात. हास्य हे उदान वायूचे कार्य आहे. उदान वायू अधिक कार्यरत होण्याने म्हणजेच एकंदरीत अति हसण्याने वातदोषवृद्धी होते. बऱ्याच वेळा मनाच्या असंबद्ध म्हणजे वेड लागण्यासारख्या क्रियेत माणसे अति हसत सुटतात. तसेच ज्या वेळी मनुष्य आक्रमक होऊन दुसऱ्यावर प्रहार करण्याइतपत तामसिक होतो, तेव्हाच वातदोषवृद्धीने विकट हसणे हे लक्षण दिसून येते. कफदोषाचे संतुलन असताना हास्य किंवा स्मित फार लोभस व सुंदर वाटते. 

हास्याचा ‘हास्योपचार‘ म्हणूनही उपयोग होऊ शकतो. ओळखीचा मनुष्य दिसला की स्वतःहून त्याच्याकडे बघून हसणे, मित्रमंडळी, ऑफिसमधील सहकारी यांच्याबरोबर विनोदाची देवाणघेवाण करणे, स्वतः अनुभवलेला विनोदी प्रसंग इतरांना वर्णन करून सांगणे या गोष्टी प्रत्येकालाच प्रयत्नांनी साध्य करता येण्याजोग्या आहेत. यामुळे स्वतःच्या व इतरांच्या चित्तवृत्ती प्रसन्न राहण्यास, कामाचा ताण हलका होण्यास नक्की मदत मिळू शकते. विशेषतः कधी एकाकी वाटू लागले, मनाविरुद्ध घडल्याने दुःखी वाटू लागले तर अशा वेळी हास्योपचाराचा आधार घेणे हा सर्वोत्तम उपाय ठरू शकेल. सध्या नैराश्‍य ही अवस्था मोठ्या प्रमाणात दिसते. सुख-संपत्ती असली, निराश होण्याजोगे कोणतेही कारण नसले, तरी नैराश्‍याची भावना जीवनातील रस हिरावून घेणारी असते. यावरही हास्योपचार हा उपचार प्रभावी ठरू शकतो. 

‘हसण्यावारी नेणे’ असा एक वाक्‌प्रचार वापरला जातो. यात दुर्लक्ष करणे, विषयाकडे गंभीरतेने न बघता उडवून लावणे हा भाव असतो. असे होणे हे सुद्धा चांगले नाही. स्वतःचे काम व्यवस्थित करायला हवेच, यात कोणाचेही दुमत असण्याची शक्‍यता नाही, मात्र कामामुळे फक्‍त गंभीर न होता, मध्ये एखादा हास्यविनोद करता आला तर मन, इंद्रिये प्रसन्न होतील, मनावरचे ओझे हलके होऊन अधिक चांगल्या प्रकारे काम करण्याची प्रेरणा मिळेल.

थोडक्‍यात, प्रसन्न, समाधानी मनाचा आरसा म्हणजे हास्य, हसण्याची युक्‍तिपूर्वक योजना केली तर त्यात मन, पर्यायाने शरीराचा शीण, थकवा दूर होण्याची क्षमता असते. अगदीच न हसण्याने नैराश्‍याला आमंत्रण मिळू शकेल, तर अकारण किंवा अति हसण्याने वातदोष बिघडणे शक्‍य होईल, हे लक्षात घेऊन हसत-खेळत जीवन जगावे हे श्रेयस्कर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com