esakal | वंध्यत्व टाळा!
sakal

बोलून बातमी शोधा

  Avoid infertility

वंध्यत्व टाळा!

sakal_logo
By
डॉ यशवंत माने

वंध्यत्व ही केवळ आरोग्याची समस्या नसते, ती सामाजिक समस्या बनते. वंध्यत्वाची शारीरिक कारणे असतात, पण ती उद्भवण्यात कित्येकदा मानसिक ताण व शारीरिक कारणीभूत असतात. जीवनशैलीतील बदलांमुळे वंध्यत्व येऊ शकते. त्यावर वेळीच उपाय योजले पाहिजेत. 

आरोग्याच्या अनेक समस्यांप्रमाणेच वंध्यत्वही भारतात असंसर्गजन्य विकारांच्या जोडीने वाढत आहे. इंडियन सोसायटी ऑफ असिस्टेड रिप्रॉडक्शनच्या अहवालानुसार, वंध्यत्वाची समस्या वेगाने वाढत आहे. सध्या भारताच्या लोकसंख्येपैकी दहा ते चौदा टक्के जण या समस्येने ग्रासलेले आहेत. वंध्यत्वाचे प्रमाण शहरी आणि ग्रामीण भागात सारख्याच दराने वाढत आहे. हे प्रमाण वाढण्यात अयोग्य जीवनशैली मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. 

सध्याच्या वेगाने धावणाऱ्या जगात आरामदायी व सुखकर जीवनशैली ही एक गरज झाली आहे. त्यामुळे आयुष्य म्हणजे एक शर्यत होऊन गेली आहे. अनारोग्यकारक जीवनशैलीमुळे व्यक्ती व दांपत्य वंध्यत्वाच्या समस्येला बळी पडत आहेत. कमीत-कमी शारीरिक हालचाल असलेली बैठी जीवनशैली, जंक फूडचे सेवन, स्थूलत्व, धूम्रपान, मद्यपान, वाढता ताण, अनियमित झोप, मधुमेह ही वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते वंध्यत्वामागील काही ठळक कारणे आहेत. याशिवाय स्त्रियांमध्ये अनियमित मासिक पाळी, अंडनलिका बंद असणे (ब्लॉक्ड फेलोपियन ट्युब्ज), पोलिसिस्टिक ओव्हरी सिण्ड्रोम (पीसीओडी), गर्भाशय अस्तराचा क्षयरोग (एण्डोमेट्रिअल ट्युबरक्युलॉसिस), लो अँटिम्युलेरियन हार्मोन (एएमएच) आदी क्लिनिकल कारणे आढळतात. पुरुषांमध्ये शुक्राणूंची कमी संख्या, तसेच निकृष्ट दर्जा, कामप्रेरणेचा अभाव आदी कारणे दिसून येतात. या सर्व कारणांमुळे वंध्यत्वाच्या समस्येने ग्रस्त जोडप्यांची संख्या वाढत आहे. वंध्यत्वाच्या समस्येला कारणीभूत ठरणारी क्लिनिकल कारणे हे खरे तर परिणाम किंवा दुष्परिणाम आहेत. या परिणामांमागे मुख्य कारण आहे ते म्हणजे अयोग्य किंवा बिघडलेली जीवनशैली. 

वंध्यत्वाचे आव्हान 
बाळाचा जन्म हा जोडप्याच्या आयुष्यातील प्रमुख घटनांपैकी एक असतो. मात्र, अनेक जोडपी अनेकविध कारणांसाठी बाळाला जन्म देणे पुढे ढकलत राहतात. ती त्यांची वैयक्तिक कारणे खोटी असतात असे म्हणणार नाही, मात्र त्याचे होणारे परिणाम दुर्लक्षिता येणार नाहीत. स्त्रियांमधील अंड्यांचा साठा वयासोबत कमी होत जातो, तसेच पुरुषांमध्येही वाढत्या वयासोबत शुक्राणूंची संख्या कमी होते, हालचाल मंदावते आणि आकार बिघडतो. आज वंध्यत्व ही उपचार करण्याजोगी आरोग्य समस्या समजली जाते. वंध्यत्वाला सामाजिक कलंक मानण्याची गेली अनेक शतके चालत आलेली मानसिकता हळूहळू मागे पडत चालली आहे. वंध्यत्व केवळ स्त्रियांमध्येच असते असे नाही, हे आता पटू लागले आहे. तंत्रज्ञानात्मक प्रगतीमुळे औषधे, शस्त्रक्रिया किंवा असिस्टेड रिप्रॉडक्टिव टेक्नोलॉजीच्या (एआरटी) माध्यमातून वंध्यत्वावर उपचार होऊ शकतात. आयव्हीएफच्या यशस्वीता दरामध्ये गेल्या काही वर्षांत उत्तम वाढ झाली आहे. 


प्रारंभिक टप्प्यात जोडप्यांचे समुपदेशन केल्यास वंध्यत्वासाठी किंवा गर्भधारणेस होणाऱ्या विलंबासाठी कारणीभूत घटकांचे विश्लेषण करण्यात, तसेच अनावश्यक घटक बाद करण्यात मदत होते. मुळात वंध्यत्वावर उपचार करण्याआधी वंध्यत्वास कारणीभूत ठरणाऱ्या परिस्थितीवर उपचार करणे ही आदर्श उपचारपद्धती आहे. अंडमोचन (ओव्हलेशन) होत नसल्याच्या समस्येवर औषधे, इंजेक्शन्स किंवा दोन्ही मार्गांनी उपचार करता येतात; फायब्रॉइड्स किंवा एण्डोमेट्रिअल पॉलीप्सवर शस्त्रक्रियेच्या सहाय्याने उपचार केले जातात. ज्या रुग्णांच्या समस्येत वैद्यकीय किंवा शस्त्रक्रियात्मक उपचार शक्य नसतात किंवा वंध्यत्वामागील कारण स्पष्ट होऊ शकत नाही, त्यांना आययूआय (इंट्रा-युटेराइन इन्सेमिनेशन), आयव्हीएफ (इन-व्हायट्रो फर्टिलायझेशन) किंवा आयसीएसआय (इंट्रासायटोप्लाज्मिक स्पर्म इंजेक्शन) या उपचारांचा सल्ला दिला जातो. 

आधुनिक उपचारपद्धती 
या उपचारांहून वेगळी अशी अंडी गोठवणे (एग फ्रीजिंग) ही आधुनिक उपचारपद्धती आहे. आपल्या जीवशास्त्रीय घड्याळाच्या (बायोलॉजिकल क्लॉक) विरुद्ध धावण्यात ही उपचारपद्धती उपयुक्त आहे. जागतिक स्तरावर काही मोजक्या कंपन्या एग फ्रिजिंगची सुविधा देऊ करत आहेत, जेणेकरून त्यांचे कर्मचारी सांगोपांग विचार करून बाळाच्या जन्माचे नियोजन करू शकतील. आज मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या बहुतेक आजारांपैकी हे जीवनशैलीतील काही बदलांच्या माध्यमातून टाळले जाऊ शकतात किंवा नियंत्रित होऊ शकतात. अतिमद्यपान टाळणे, धूम्रपान सोडणे आणि संतुलित आहार व नियमित व्यायाम अत्यंत आवश्यक आहे. जोडप्यांनी दरवर्षी संपूर्ण तपासणी करून घेणेही चांगले. त्यामुळे काही वैद्यकीय समस्या असेल, तर तिचे वेळीच निदान होते व व्यवस्थापन सुलभ होते. 

प्रगत तंत्रज्ञानाने युक्त अशा आधुनिक उपचारपद्धतींमुळे वंध्यत्वावरील उपचार अधिकाधिक लोकांना उपलब्ध होत आहेत आणि या उपचारांची सुरक्षितता तसेच यशस्वीतेचा दरही काळासोबत सुधारत आहे.