आयुर्वेदातील अग्निसंकल्पना 

डॉ. श्री बालाजी तांबे (www.balajitambe.com)
Friday, 17 February 2017

पचण्यास जड अन्न अर्धे पोट भरेल इतक्‍या प्रमाणातच खावे व हलके अन्न असले तरी भरपेट खाणे टाळावे. जितके अन्न सुखपूर्वक पचेल तितकेच आहाराचे प्रमाण समजावे. आहाराचे प्रमाण प्रत्येक व्यक्‍तीत वेगळे असते. प्रत्येकाने स्वतःचे वय, हवामान, जीवनशैली, भूक, अग्नीची शक्‍ती या गोष्टींचा विचार करून स्वतःला अनुकूल आहार योग्य प्रमाणात सेवन करणे श्रेयस्कर. 

"रोगाः सर्वेऽपि मन्दाग्नौ' म्हणजे मंदावलेला अग्नी सर्व रोगांचे कारण असतो. म्हणून आरोग्य कायम राहण्यासाठी तसेच रोग होऊ नयेत, यासाठी अग्नीला संतुलित ठेवणे अपरिहार्य असते. अग्नी आहारसापेक्ष असतो म्हणजे आहार अनुकूल असला तर अग्नीसुद्धा कार्यक्षम राहतो, याउलट आहारात दोष असला तर त्याचा भुर्दंड अग्नीला सोसावा लागतो. जसे, चांगले तेल असेल तर दिवा नीट तेवतो, मात्र तेलात भेसळ असली, पाणी किंवा इतर अशुद्धी मिसळली गेली तर दिवा नीट तेवत नाही. तसेच अग्नीने नीट काम करायला हवे असेल तर त्याला मिळणारे इंधन म्हणजेच आहार प्रकृतीला अनुकूल शुद्ध, सर्व संस्कार नीट करून तयार झालेला असावा. 

आहारातील विविधता म्हणजे आहारविधी. आहारविधी ही हितकर असते किंवा अहितकर असते, यालाच आहारविधीची विशेषता म्हटले जाते. हे ज्या आठ मुद्द्यांवर आधारलेले असते त्यांना आयुर्वेदात "अष्टआहारविधी विशेषायतने' असे म्हटले जाते. या आठ आयतनांपेकी आतापर्यंत आपण प्रकृती, करण (संस्कार) आणि संयोग हे मुद्दे अभ्यासले. आता यानंतरचे मुद्दे पाहू. 

राशी - म्हणजे मात्रा. आहार सेवन करताना तो योग्य मात्रेत असावा लागतो. अगदी पथ्यकर आणि सर्व संस्कार करून उत्तम प्रकारचे अन्न बनविलेले असले तरी ते जर अयोग्य मात्रेत खाल्ले गेले तर त्यामुळे अग्नीची कार्यक्षमता बिघडू शकते. राशीचे दोन प्रकार असतात, सर्वग्रह व परिग्रह. 

तत्र सर्वस्याहारस्य प्रमाणग्रहमेकपिण्डेन सर्वग्रहः । 
संपूर्ण आहार म्हणजे आमटी, भात, पोळी, भाजी वगैरे सर्व पदार्थांचा एकत्रितरीत्या जे प्रमाण असते त्याला सर्वग्रह राशी म्हटले जाते. 
परिग्रहः पुनः प्रमाणग्रहणमेकैकश्‍येनाहारद्रव्याणाम्‌ । 
आहारद्रव्यांचे वेगवेगळे प्रमाण म्हणजे परिग्रह राशी होय. 

जेवण करणे म्हणजे फक्‍त पोट भरणे नव्हे हे यातून स्पष्ट होते. कोणता पदार्थ किती मात्रेत खावा आणि अशा वेगवेगळ्या पदार्थांचे एकत्रित प्रमाण काय असावे, पोट किती प्रमाणात भरावे हे सर्व ध्यानात ठेवून जेवणे आयुर्वेदाला अपेक्षित आहे. आहार "त्रिविध कुक्षीय' असावा असे सांगितले आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्‍तीने तिच्या पोटाचे तीन भाग आहेत अशी कल्पना करून त्यातील एक भाग घन पदार्थांनी (उदा. पोळी, भात, भाजी, लाडू वगैरेंनी) भरावा, दुसरा भाग द्रव पदार्थांनी (उदा. पाणी, ताक, आमटी, कढी, सूप वगैरेंनी) भरावा आणि तिसरा भाग वायूच्या हलनचलनासाठी, पचनक्रिया होण्यासाठी मोकळा ठेवावा. अर्थातच भरपेट जेवणे किंवा "आता पाणी प्यायलाही पोटात जागा नाही' अशा पद्धतीने जेवणे टाळायला हवे. तसेच जेवणात घन व द्रवपदार्थांचा योग्य प्रमाणात समावेश असणेही आवश्‍यक होय. नुसतीच कोरडी भाजी, फक्‍त सॅंडविच, वडापाव खाणे किंवा भूक लागलेली असताना फक्‍त चहा- कॉफी घेऊन भूक मारणे हे सर्व अग्नीच्या दृष्टिकोनातून पर्यायाने पचनासाठी चांगले नाही. 

जेवण करताना त्यातील प्रत्येक पदार्थाचे एक नियत प्रमाण असते हे सुद्धा ध्यानात ठेवायला हवे. एखादा पदार्थ खूप आवडला म्हणून बाकीच्या गोष्टी न खाता फक्‍त तोच एक पदार्थ पोट भरून खाल्ला तर त्यामुळेही पचनसंस्थेवर ताण येऊ शकतो. उदा. एखाद्या दिवशी जेवणात पुरणपोळी असली तर तिच्याबरोबराने पोटाला मऊपणा देणारा भातसुद्धा खायला हवा. पुरणपोळी आवडते म्हणून भाजी, भात, आमटी वगैरे काहीही न खाणे चांगले नाही. जेवण म्हणून फक्‍त "सॅलड" खाण्याची सध्या पद्धत रूढ होते आहे, परंतु हेसुद्धा आहारविधीच्या नियमांना संमत नाही. एकूण आहाराच्या 10-15 टक्के इतक्‍या प्रमाणात सॅलड खाणे चांगले. 

कोणता पदार्थ किती प्रमाणात सेवन करावा हे सुद्धा त्याच्या गुणांवर, विशेषतः तो पचण्यास जड आहे की सोपा आहे यावर ठरत असते. 

गुरुणाम्‌ अर्धसौहित्यं लघूनां नातितृप्तता । त्राप्रमाणं निर्दिष्टं सुखे यावत्‌ विजीर्यति ।। 
पचण्यास जड अन्न अर्धे पोट भरेल इतक्‍या प्रमाणातच खावे आणि हलके अन्न असले तरी भरपेट खाणे टाळावे. जितके अन्न सुखपूर्वक पचेल तितकेच आहाराचे प्रमाण समजावे. 

थोडक्‍यात आहाराचे प्रमाण प्रत्येक व्यक्‍तीत वेगळे असते. प्रत्येकाने स्वतःचे वय, हवामान, जीवनशैली, भूक, अग्नीची शक्‍ती अशा अनेक गोष्टींचा विचार करून स्वतःला अनुकूल आहार योग्य प्रमाणात सेवन करणे श्रेयस्कर. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ayurveda family doctor