अग्र्यसंग्रह (श्रेष्ठत्व) क्षयरोग

अग्र्यसंग्रह (श्रेष्ठत्व) क्षयरोग

सर्व जुनाट रोगांमध्ये त्वचारोग अग्रणी असतात हे आपण मागच्या अंकात पाहिले. आज या पुढची माहिती घेऊया.

राजयक्ष्मा रोगसमूहाणाम्‌ - पुष्कळ लक्षणे असणाऱ्या, अनेक रोगांचा समूह असणाऱ्या रोगांमध्ये क्षयरोग हा मुख्य असतो. 

रोगाची अनेक लक्षणे असतात. तसेच रोग बऱ्याचदा एकटे येत नाहीत, तर बरोबरीने अनेक रोगांना घेऊन येतात. राजयक्ष्मा म्हणजेच क्षयरोग हा यातीलच एक रोग. 

आयुर्वेदात क्षयरोगाची विशेष अशी ओळख करून दिलेली आहे, 

अनेकरोगानुगतो बहुरोगपुरोगमः ।
राजयक्ष्मा क्षयः शोषो रोगराड्‌ इति स्मृतः ।।
...अष्टांगसंग्रह निदानस्थान

ज्याप्रमाणे राजाबरोबर अनेक अनुचर असतात, त्याचप्रमाणे  क्षयरोगासोबतही अनेक रोग असतात. राजाची स्वारी निघाली की स्वारीपूर्वी काही लोक येतात, स्वारीनंतर काही लोक येणार असतात, त्याचप्रमाणे क्षयरोग होण्यापूर्वी सर्दी-खोकला-ताप वगैरे  बरेचसे रोग होऊ शकतात व नंतरही अशक्‍तपणा, वजन कमी होणे वगैरे त्रास राहू शकतात. म्हणूनच आयुर्वेदात क्षयरोगाला ‘रोगांचा राजा’ अशी उपाधी दिलेली आहे. क्षयरोगाबद्दल समजावताना चरकसंहितेत एक कथा सांगितलेली आहे.

दक्षप्रजापतीच्या २८ कन्यांचा विवाह चंद्राशी झाला होता. या २८ पैकी रोहिणीवर चंद्र विशेष आसक्‍त होता. शरीरशक्‍तीची पर्वा न करता रोहिणीसह अतिप्रमाणात रत झाल्याने शुक्रक्षय होऊन चंद्र अत्यंत क्षीण झाला. आपल्या इतर मुलींचा चंद्राने स्वीकार न केल्याचे जेव्हा दक्षप्रजापतीला समजले तेव्हा तो अत्यंत क्रोधित झाला. त्याचा हा क्रोध निःश्वासरूपाने बाहेर पडून देह धारण करता झाला व रोहिणीशी रत असलेल्या क्षीण चंद्रामध्ये शिरला व चंद्राला क्षयरोग होऊन त्याचे तेज नाहीसे झाले. असा राजयक्ष्म्याने पीडित निष्प्रभ चंद्र इतर देवदेवतांसह दक्षप्रजापतीला शरण आला. तेव्हा पश्‍चात्ताप झालेल्या चंद्रावर दक्षप्रजापती प्रसन्न झाले व अश्विनीकुमारांनी चंद्राला ओज वाढवण्यासाठी औषध देऊन बरे केले.

या गोष्टीवरून एक गोष्ट स्पष्ट होते की शरीरशक्‍तीचा ऱ्हास क्षयासाठी कारणीभूत असतोच. क्षयाच्या बाबतीत शरीरशक्‍तीचा ऱ्हास पुढील कारणांमुळे होऊ शकतो. 

रस, रक्‍तादी शरीरधातूंचा क्षय होत जाणे.
मल, मूत्र, वायू वगैरे वेगांची संवेदना होऊनही अडवणे.
अवेळी जेवणे, अत्यंत कमी प्रमाणात किंवा अत्याधिक प्रमाणात जेवणे.
स्वशक्‍तीपेक्षा अधिक परिश्रम करणे.

या सर्व कारणांनी शरीराची शक्‍ती कमी होत गेली, रोगप्रतिकारक्‍ती कमी झाली की क्षय होऊ शकतो. 

तीव्रतेवरून क्षयाचे तीन प्रकार पडतात. 
१. त्रिरूपक्षय - या प्रकारच्या क्षयात बरगड्या व खांदे दुखणे, ताप येणे आणि हात-पायाच्या तळव्यांची आग होणे अशी तीन लक्षणे असतात.

२. षड्‍रूपक्षय - या प्रकारच्या क्षयात खोकला येणे, तोंडाला चव नसणे,  ताप येणे, बरगड्या दुखणे, आवाज फुटणे, जुलाब होणे अशी सहा लक्षणे दिसतात.

३. एकादशरूपक्षय - या प्रकारच्या क्षयात डोके जड होणे, खोकला येणे, दम लागणे, आवाज फुटणे, कफाची उलटी होणे, थुंकीतून रक्‍त पडणे, बरगड्या दुखणे, खांद्यात वेदना होणे, ताप येणे, जुलाब होणे, तोंडाला चव नसणे अशी अकरा लक्षणे दिसतात. हा प्रकार बरा होण्यास अवघड असतो. 

म्हणून अग्र्यसंग्रहात या ठिकाणी म्हटलेले आहे की, क्षयरोग रोगसमूहाला एकत्र घेऊन येतो.

अग्र्यसंग्रहातील या पुढची माहिती आपण पुढच्या वेळी पाहू. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com