esakal | आयुर्वेदिक तपासण्या
sakal

बोलून बातमी शोधा

Ayurvedic test

स्वतःच्या प्रकृतीचा अंदाज घेतला, वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली म्हणजेच अष्टविध परीक्षेच्या साहाय्याने त्याची निश्चिती करून घेतली, की आरोग्याचे रक्षण करणे, रोग होऊ न देणे, रोग झाला तरी त्यातून लवकरात लवकर बाहेर येणे, हे नक्की साध्य करता येते. 

आयुर्वेदिक तपासण्या

sakal_logo
By
डॉ. श्री बालाजी तांबे www.balajitambe.com

स्वतःच्या प्रकृतीचा अंदाज घेतला, वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली म्हणजेच अष्टविध परीक्षेच्या साहाय्याने त्याची निश्चिती करून घेतली, की आरोग्याचे रक्षण करणे, रोग होऊ न देणे, रोग झाला तरी त्यातून लवकरात लवकर बाहेर येणे, हे नक्की साध्य करता येते. 

"आरोग्य'' हा सात्म्यज भाव आहे असे आयुर्वेद सांगतो. सात्म्य म्हणजे जे सतत प्रयत्न करून टिकवून ठेवता येते किंवा मिळविता येते. अर्थात आरोग्य ही प्रयत्न करून मिळविण्याची गोष्ट आहे. एखाद्याची प्रकृती मुळात उत्तम असली तरी त्यामागे त्याच्या आईवडिलांनी आरोग्यासाठी केलेले प्रयत्न, पाळलेले नियम कारणीभूत असतात. जन्मतः आरोग्य चांगले असले तरी नंतर ते कायम टिकवून ठेवणे, काही कारणांनी अनारोग्य आले तरी त्यापासून मुक्‍ती मिळवून पुन्हा निरोगी होण्यासाठी प्रयत्न करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. 

आयुर्वेदातील चरकसंहितेमध्ये "आत्मानम्‌ अभिसमीक्ष्य'' म्हणजे स्वतःची सर्व बाजूंनी समीक्षा करून, सर्व तऱ्हेने परीक्षण करून मग आहार, व्यवहार, उपचार आदींची योजना करावी असे एक सूत्र आलेले आहे. (ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App डाऊनलोड करा) आरोग्य टिकविण्यासाठी उचललेले हे पहिले आणि सर्वांत महत्त्वाचे पाऊल आहे असे म्हणायला हरकत नाही. कारण एकदा आपल्यासाठी काय चांगले, काय वाईट हे समजले तर आरोग्याच्या लक्ष्यापर्यंत पोचणे सोपे होऊन जाईल."आत्मानम्‌ अभिसमीक्ष्य''मध्ये पहिली येते ती प्रकृती. 

प्रकृती समजली की विकृती शोधणे सोपे असते. आयुर्वेदाने एकूण सात प्रकारच्या प्रकृती असतात असे सांगितलेले आहे. समजावताना जरी वातप्रकृती, पित्तप्रकृती आणि कफप्रकृती अशी तीन प्रकृती घेतल्या असल्या तरी सहसा एकदोषीय प्रकृती सापडत नाही. दोन दोषांची मिळून प्रकृती तयार झालेली आढळते.  

प्रकृतीचा वारसा घेऊन आपण जन्माला येतो, त्यानंतर ही प्रकृती जपणे म्हणजेच ती संतुलित ठेवणे, मूळ प्रकृतीनुसार आलेली शक्‍ती अधिकाधिक  सशक्‍त करण्याचा प्रयत्न करणे यासाठी अनुकूल आहार, आचरणे, विचार, व्यायाम, औषधे, रसायने यांची योजना करणे हे आपल्या हातात असते. एकदा प्रकृती समजली की तिच्या अनुषंगाने शरीरातील दोष, धातू, मल यांची स्थिती पाहावी लागते, अग्नीची ताकद विचारात घ्यावी लागते, यासाठी आयुर्वेदाने सांगितलेल्या अष्टविध परीक्षा उत्तम होत. नाडी, मल, मूत्र, जिव्हा, शब्द, स्पर्श, दृष्टी व आकृती या आठ परीक्षा आरोग्य तसेच रोग या दोहोंच्या तपासणीसाठी उत्तम असतात. 

नाडीपरीक्षण तज्ज्ञ वैद्यांकडून करून घ्यायचे असते. दोषांची सद्यस्थिती तसेच मूळ प्रकृती, याशिवाय शरीरातील विविध अवयवांची कार्यक्षमता, एकंदर शक्‍ती वगैरे अनेक गोष्टी यातून वैद्य जाणू शकतात. 

मल - मलप्रवृत्ती रोज दिवसातून एक किंवा दोन वेळा होणे स्वाभाविक असते, मलप्रवृत्ती बांधून व विनासायास व्हावी. खूप पाणी पिण्यानंतर वा रोज रात्री त्रिफळा, हिरड्यासारखे रेचक घेण्यानंतरच मलप्रवृत्ती होत असल्यास पचनसंस्थेत बिघाड होतो आहे असे समजण्यास हरकत नाही.

मूत्र - दिवसातून पाच-सहा वेळा मोकळी मूत्रप्रवृत्ती व्हायला हवी. वारंवार मूत्रप्रवृत्तीची भावना होणे, पण दर वेळेला थोडे थोडे मूत्रप्रवर्तन होणे किंवा मूत्रप्रवर्तन पूर्णपणे झाले नाही अशी भावना होणे चांगले नाही. मूत्रप्रवृत्ती अडखळत होणे, जळजळ, खाज येणे, वारंवार मूत्रसंरंभ (इन्फेक्‍शन) होणे, स्त्रियांच्या तसेच पुरुषांच्या बाबतीत मूत्रावाटे धातू जाणे ही लक्षणे असल्यास योग्य उपचार घेणे आवश्‍यक होय. त्यासाठी अधून मधून मूत्रतपासणी करून घ्यावी. आयुर्वेदिक पद्धतीने मूत्रपरीक्षण करून घेणे तर उत्तमच, अन्यथा "यूरिन- रुटिन'' ही मूत्रतपासणी वर्ष-दीड वर्षातून एकदा करून घ्यावी. वयाच्या ४०-४५ नंतर अधून मधून विशेषतः मधुमेहग्रस्त व्यक्‍तींनी मूत्रपिंडाची कार्यक्षमता व्यवस्थित असल्याची खात्री करून घेणे आवश्‍यक आहे. स्त्रियांच्या बाबतीत अंगावरून पांढरे किंवा लाल पाणी जाणे यावर ताबडतोब उपचार करणे आवश्‍यक असते. 

जीभ - जीभ हा पचनसंस्थेचा आरसा समजला जातो. रोज सकाळी जीभ स्वच्छ करताना जिभेचे अवलोकन करणे उत्तम. जिभेवर पांढरा थर जमणे हे शरीरात आम वाढण्याचे व अनेक रोगांना आमंत्रण असल्याचे निर्देशक आहे. 

शब्द - आवाजातील ताकद, बोलण्याचा स्टॅमिना यावरही आरोग्याचा निर्देशांक ठरत असतो. आवाज एकाएकी खोल जाणे, क्षीण होणे, कारणावाचून आवाज बदलणे, थोडे बोलण्याने थकवा जाणवणे, बोलताना दम लागणे यांसारखी लक्षणे असल्यास वैद्यकीय मार्गदर्शन घेणे चांगले. याशिवाय एकाएकी छातीचे ठोके स्वतःला ऐकू येणे किंवा पोटातून गुडगुड आवाज येणे, कानात आवाज येणे, हालचाल करताना वा चालताना सांध्यांमधून कटकट आवाज येणे वगैरे लक्षणेही निर्देशांक घसरत असण्याची नांदी असू शकते.

स्पर्श - त्वचा कोरडी पडणे, केस निर्जीव दिसू लागणे, एखाद्या ठिकाणी त्वचा अधिक संवेदनशील होणे, हातापायाला भेगा पडणे, ओठ फुटणे वगैरे लक्षणांवरून शरीरात वातदोष वाढतो आहे हे समजते आणि वर पाहिल्याप्रमाणे वातदोष वाढला की निर्देशांक घसरत असल्याने या लक्षणांवर वेळीच योग्य उपाययोजना करावी. 

दृष्टी - डोळे निरोगी व सतेज असणे, नजर चांगली असणे हे एकंदर आरोग्य चांगले असल्याची सूचना देणारे लक्षण आहे. पापणी लवणे, संध्याकाळी डोळे थकणे, डोळ्यांची जळजळ होणे, डोळ्यातून पाणी येणे, लाल होणे तसेच अस्पष्ट दिसणे वगैरे त्रास होत असल्यास लगेच वैद्यकीय सल्ला घेण्याची व योग्य उपचार करण्याची आवश्‍यकता असते. 

आकृती - वजन एकाएकी कमी होणे किंवा पोट-नितंब, दंड वगैरे ठिकाणी मेदसंचय सुरू होणे, शरीरधातूंचा उपचय म्हणजे शरीराचा घट्टपणा कमी होणे या गोष्टी आकृतीवरून समजतात, त्यांच्यावरूनही आरोग्याचा निर्देशांक घसरणार ओह असे समजते 

अष्टविध परीक्षेतील मुख्यत्वे नाडी व आकृती या दोघांच्या मदतीने व्यक्‍तीची प्रकृती समजून घेता येते. 

वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली एकदा स्वतःची प्रकृती समजून घेणे हे सर्वोत्तम असतेच, परंतु साधारणतः आपला कल कोणत्या दोषाकडे आहे, निदान सद्यःस्थितीत आपल्या शरीरात कोणता दोष वाढलेला आहे हे जरी समजले तरी त्यानुसार थोडेफार बदल करता येतात. 

वातप्रकृती - वातप्रकृतीच्या व्यक्‍ती स्वभावतःच हालचाली अधिक प्रमाणात करणाऱ्या असतात. त्यांचा बोलण्याचा, काम करण्याचा वेग जास्ती असतो, हातापायांच्या तसेच गळा-कपाळावरच्या शिरा स्पष्ट दिसतात आणि त्या फुगलेल्या असतात. वातप्रकृतीच्या व्यक्‍तींची त्वचा, केस, नखे, खरखरीत व लगेच फुटू, तुटू शकणारी असतात. सांध्यातून कटकट आवाज येतो. वातदोषाचा मूळचा स्वभाव शीत असल्यामुळे वातप्रकृतीच्या व्यक्‍तींना थंडी सोसवत नाही, उलट ऊबदार कपडे, गरम पेय, गरम अन्नपदार्थ हवेसे वाटतात. नखे, दात, डोळे कोरडे तर व आकाराने लहान असतात. डोळे निस्तेज, थकलेले आणि झोपेतही अर्धवट उघडे असतात. या व्यक्‍ती कृश व उंच असण्याची प्रवृत्ती अधिक असते. आवाज घोगरा, कर्कश व एकंदर ऐकू नये असे वाटणारा असतो. अशा व्यक्‍तींची झोप शांत नसते, झोपेत दात खाण्याची, बोलण्याची व चालायचीही सवय असू शकते.

अधीरता, त्वरा आणि असहत्व (कमी सहनशीलता) हे तिन्ही गुण वातप्रकृतीच्या ठायी असल्यामुळे राग चटकन येतो, वैताग पटकन येतो, एखादी गोष्ट जशी पटकन आवडते तसेच एखाद्या गोष्टीबद्दल गैरसमजही पटकन केला जातो. पूर्ण विचार न करताच कामासाठी प्रवृत्त होण्याची प्रवृत्ती वातप्रकृतीत असते. पण नंतर ते काम तडीला न्यायचा धीर नसल्याने बहुतेक सर्व कामे अर्धवट राहतात. या व्यक्‍तींचा स्वभावही फार चंचल असतो.

वातप्रकृतीच्या व्यक्‍तींना प्रवास करायला, बागबगीच्यात फिरायला जाणे आवडते, गाणे, नाच, वगैरे विषयात त्यांना रुची असते. या लोकांना स्वप्नेही फार पडतात. 

पित्तप्रकृती - पित्तप्रकृतीची माणसे नाजूक प्रकृतीची, मध्यम बांध्याची असतात. बहुधा या व्यक्‍ती गोऱ्या वर्णाच्या असतात आणि या गोरेपणाला लालसर-गुलाबीसर छटा असते. यांच्या हाता-पायाचे तळवे लालसर, नाजूक व मऊ असतात; नखे गुलाबी-लालसर असतात; डोळे थोडेसे पिंगट रंगाचे असतात; थोडेही उन्हात जाणे झाले किंवा जागरणे झाल्यास आरक्‍त होतात; राग आला की लगेच नाक लाल होते, कानशिले गरम व लाल होतात. एकंदरच पित्ताचा, अग्नीचा लाल रंग पित्तप्रकृतीच्या माणसांमध्ये ठायी ठायी प्रकट होत असतो.

पित्तप्रकृती लोकांचे केस मऊ, कोमल पण विरळ असतात, तसेच केस गळण्याची आणि अकाली पांढरे होण्याची प्रवृत्ती या प्रकृतीमध्ये स्वभावतःच असते. चेहऱ्यावर वांग येणे, अंगावर काळे-लाल तीळ जरा जास्तच प्रमाणात असणे हेही पित्तप्रधान प्रकृतीचे लक्षण होय. यांना फार शारीरिक श्रम सोसत नाहीत व मानसिक ताणही सहन करण्याची क्षमता यथा-तथाच असते. सांधे, मांसल भाग शिथिल होण्याची प्रवृत्ती असते. मांस-मेदधातूतील घट्टपणा यांच्यात स्वभावतःच कमी असतो. 

पित्त साक्षात अग्निस्वरूप असल्याने यांची भूक आणि तहान तीव्र असते, अंगभूत उष्णता असल्याने पित्तप्रकृतीच्या व्यक्‍तींना थंड पदार्थ खायला आवडतात, थंड स्पर्श हवाहवासा वाटतो. या प्रकृतीच्या माणसांना नीटनेटके, टापटीप राहण्याचा सोस असतो. कपडे अगदी मॅचिंग, व्यवस्थित फिटिंग असलेले, छान इस्त्री केलेलेच लागतात. सुगंधी अत्तर, परफ्युम लावायला किंवा एखादे तरी सुवासिक फूल, गजरा घालायला मनापासून आवडते. यांचा काम करण्याचा वेग जास्ती असतो व कामात कमालीचा व्यवस्थितपणा, नीटनेटकेपणा असतो. या व्यक्‍ती खूप हुशारही असतात. झटपट निर्णय घ्यायची क्षमता यांच्यात सर्वाधिक असते. या व्यक्‍तींना राग पटकन येतो. ''नाकावरचा राग" पित्तप्रकृतीच्या व्यक्‍तींमध्ये बघावा, रागाबरोबरच ईर्षा व असूयाही यांच्यात असते.

कफप्रकृती - या प्रकृतीच्या व्यक्‍तीचा वर्ण अतिशय प्रसन्न आणि तेजस्वी असतो. शरीरबांधा रेखीव असतो, सर्व अवयव जागच्या जागी आणि व्यवस्थित बसवलेले, भरदार आणि आकर्षक असतात. कपाळ मोठे असते, हात लांब असतात, मांड्या पुष्ट असतात, छाती विस्तीर्ण आणि पुष्ट असते, केस काळेभोर आणि दाट असतात. डोळे तेजस्वी मोठे व आकर्षक असतात. पापण्याही मोठ्या असतात. विशेष म्हणजे डोळे शांत व प्रसन्न असतात. यांचा आवाजही दमदार आणि भारदस्त असतो. कफप्रकृतीच्या व्यक्‍तीही डौलात चालतात. या प्रकृतीमध्ये भूक, तहान सहन करण्याची ताकद सर्वाधिक असते. शरीराच्या मानाने आहार कमी असतो, पण तरीही शरीरबल मात्र चांगले असते. मनाने शांत व सोशिक असणाऱ्यांच्या प्रकृतीत कफाचा सहभाग अवश्‍य असतो. कितीही कष्ट असले तरी ही माणसे माघार घेत नाहीत वा नाऊमेद होत नाहीत. यांचे ओज, शुक्र व रोगप्रतिकारशक्‍ती चांगली असते. या व्यक्‍तींना सहसा मोठे आजारपण येत नाही व काही रोग झाला तर त्यातून बाहेर येणे तुलनेने सोपे असते.

कफ हा पथ्वी आणि जल महाभूताच्या संयोगातून बनत असल्याने ''मंदता" हा या महाभूतातील प्रमुख गुण कफप्रकृतीतही आल्यावाचून राहात नाही. कफप्रकृतीच्या व्यक्‍ती काम तडीला नेतात हे नक्की, पण त्यांच्या कामाचा वेग कमी असतो. घाईघाईने, पटकन काही काम करायचे असते तर ते कफप्रकृतीसाठी जरा अवघड असते. 

या प्रकृतीचे लोक खरे बोलणारे असतात. सात्त्विकता, धार्मिकता, भक्‍ती, मर्यादाशील आचरण या सर्व गोष्टी कफाशिवाय येत नाहीत. यांना राग फार क्वचित येतो, ते क्षमाशील असतात, कृतज्ञ असतात आणि नशीबवान असतात. यांना मित्रमंडळी भरपूर असतात, समाजात प्रतिष्ठा असते, लोकांकडून आदर, प्रेम आपसूकच मिळत जाते. 

अशा प्रकारे स्वतःच्या प्रकृतीचा अंदाज घेतला, वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली म्हणजेच अष्टविध परीक्षेच्या साहाय्याने त्याची निश्चिती करून घेतली की आरोग्याचे रक्षण करणे, रोग होऊ न देणे, रोग झाला तीर त्यातून लवकरात लवकर बाहेर येणे हे नक्की साध्य करता येते.

loading image