बाळाचा आहार

बाळाचा आहार

स्तन्यपान ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. बाळाचा जन्म झाल्यानंतर तासाभरात मातांनी स्तन्यपान सुरू करणे हितकारक असते. बाळाच्या जन्मानंतर सुरवातीला तीन-पाच दिवसांपर्यंत येणाऱ्या दुधाला कोलोस्ट्रम म्हणतात. कोलोस्ट्रम ही बाळाने घ्यावयाची पहिली लस असते असे म्हणतात आणि बाळाने ते पिणे आवश्‍यक असते, कारण त्यात अनेक प्रतिकारक गुणधर्म असतात आणि हे दूध बाळाचे अनेक गंभीर संसर्गांपासून संरक्षण करते.

बाळासाठी स्तन्यपान हे पूर्णान्न असते आणि पहिले सहा महिने बाळाला पाण्याचीही आवश्‍यकता भासत नाही. त्यामुळेच युनिसेफ, डब्ल्यूएचओ आणि आरोग्यविषयक सर्व महत्त्वाच्या संस्था बाळाला पहिले सहा महिने केवळ स्तन्यपान देण्याची शिफारस करतात. संशोधनानुसार, ज्या बाळांनी पहिले सहा महिने केवळ स्तनपान केले आहे त्यांना न्यूमोनिया, ॲलर्जी, पोटाला आतड्याला आणि श्वसनमार्गाला संसर्ग होण्याची शक्‍यता कमी असते आणि ते अधिक बुद्धिमान असतात. स्तन्यपान मातांसाठीही चांगले असते. कारण गरोदरपणात साचलेली अतिरिक्त चरबी दुधावाटे बाहेर पाडते आणि स्तनांचा कर्करोग होण्याची शक्‍यताही कमी असते.

असे असले तरी बाळ जरा मोठे झाल्यावर, सहा महिन्यांचे झाल्यानंतर केवळ स्तन्यपान पुरत नाही आणि त्याला दैनंदिन आहाराची गरज भागविण्यासाठी इतर पदार्थांचीही आवश्‍यकता भासते. म्हणून सहा महिन्यानंतर स्तन्यपानासह बाळाला पूरक अन्न म्हणून वरण-भात, खिचडी, भाज्या घालून केलेली खिचडी, भरड किंवा आंबिल आणि फळे कुस्करून द्यावीत. हे पूरक पदार्थ घरी तयार केलेले, ताजे, पूर्ण शिजलेले असावेत.

सुरवातीला पातळ पदार्थ द्यावेत, त्यानंतर त्याची घनता वाढवत नेऊन सेमीसॉलिड (अर्धघन) आणि घन पदार्थ (सॉलिड) खाऊ घालावेत. सुरवातीला जेवण दिवसातून दोन वेळा द्यावे त्यानंतर जसजसे वय वाढत जाईल, तसतसे दिवसातून तीन ते चार वेळा जेवण द्यावे. दोन वर्षे पूर्ण होईपर्यंत स्तन्यपान सुरू ठेवावे. अंड्याचा पांढरा भाग आणि गायीचे दूध हे बहुधा नऊ ते बारा महिन्यांदरम्यान सुरू करावे. ते लवकर केले असता बाळाला ॲलर्जी होण्याची शक्‍यता असते. खूप द्रव पदार्थ म्हणजे डाळीचे पाणी, भाताची पेज, फळांचे रस देणे टाळावे. कारण त्यामुळे बाळाला पुरेसे तंतू मिळत नाहीत. चणे/सुका मेवा हेसुद्धा पावडरच्या रूपात अथवा शिजवून द्यावेत. नवजात बालकाच्या आहारात साखर, मीठ आणि मसाले अत्यंत कमी प्रमाणात घालावेत.

भारतात बाळांना बिस्कीट आणि दूध भरविण्याची परंपरा आहे, जी बाळाच्या आरोग्यासाठी अजिबात चांगली नाही. पोषणाच्या दृष्टीने तो अत्यंत निरुपयोगी असतो कारण त्यात क्षार, मायक्रो न्यूट्रिअंट्‌स आणि तंतू समाविष्ट नसतात. त्यामुळे बाळामध्ये लोहाची कमतरता आणि बद्धकोष्ठता होते. भारतात त्याला ‘मिल्क-बिस्कीट’ सिंड्रोम म्हणतात. तो आता सिद्ध झाला आहे आणि जे बाळ हा आहार घेते त्याला रक्तक्षय होण्याची ही शक्‍यता असते. पहिली दोन तीन वर्षे मुलांना बिस्किटे देणे टाळावे.

वयानुसार द्यावयाचा आहार :
  पहिले सहा महिने : केवळ स्तनपान
  सहा ते सात महिने : लिक्विड आणि सेमी सॉलिड डाळी, भरड, भाज्यांचे सूप (गाळून)
  आठ ते नऊ  महिने : भाताची खीर, उकडलेला बटाटा, बीटरूट आणि गाजराचे सूप, हंगामी फळे, रोजचे आंबिल, इडली, उपमा
  दहा ते बारा महिने : अंड्याचा बलक आणि भात, भाज्यांचे सूप, ज्वारीचे आंबिल, ओट्‌स, नाचणी
  बारा ते चोवीस महिने : विविध पिठांचा पराठा/घावन, थालीपीठ, कढी इत्यादी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com