पाठीच्या वेदनेला बांध

डॉ. अजय कोठारी, डॉ. पराग संचेती
Friday, 18 January 2019

पाठदुखीवर प्रत्येकवेळीच शस्त्रक्रिया करावी लागतेच असे नाही. रुग्णालाही शक्‍यतो शस्त्रक्रिया टाळायची असते. आता ‘पेन ब्लॉक’ पद्धती उपलब्ध झाली आहे. शस्त्रक्रियेविना पाठीच्या वेदनांना बांध घालण्याची पद्धती.

पाठदुखीवर प्रत्येकवेळीच शस्त्रक्रिया करावी लागतेच असे नाही. रुग्णालाही शक्‍यतो शस्त्रक्रिया टाळायची असते. आता ‘पेन ब्लॉक’ पद्धती उपलब्ध झाली आहे. शस्त्रक्रियेविना पाठीच्या वेदनांना बांध घालण्याची पद्धती.

आजच्या या धकाधकीच्या जीवनात अनेकांना पाठदुखीचा त्रास होत असतो. हा सततचा त्रास अनेकदा असह्य असतो. मणक्‍याच्या या दुखण्यामुळे हळूहळू इतर अवयवांनाही इजा पोचून दुखणे वाढू शकते. प्रामुख्याने हातांच्या किंवा पायांच्या वेदना वाढण्याची शक्‍यता असते. अनेक वेळा हे दुखणे औषधोपचार आणि फिजिओथेरपीनेसुद्धा बरे होत नाही. मग हे दुखणे थांबवायचे तरी कसे, असा प्रश्‍न रुग्णांना पडतो. त्याचे उत्तर आता उपलब्ध झाले आहे, ते म्हणजे ‘पेन ब्लॉक!’

आता मुळात पेन ब्लॉक म्हणजे काय हे जाणून घेऊया. अर्थात, मणक्‍याचे दुखणे थांबवण्यासाठी कोणतीही शस्त्रक्रिया न करता विकसित केलेली ही नवीन वैद्यकीय उपचार पद्धती आहे. पाठीचे दुखणे उद्‌भवते ते मुख्यतः मज्जातंतू क्षतिग्रस्त झालेले असल्याने किंवा कण्यामधील फॅसेट कमजोर झाल्यामुळे. या दुखऱ्या, कमजोर झालेल्या मज्जातंतूंवर किंवा फॅसेटवर उपचार केले गेले, तर पाठदुखी कमी होऊ शकते. हेच लक्षात घेऊन जे मज्जातंतू क्षतिग्रस्त झाले आहेत, त्यांच्यामध्ये ‘एसएनआरबी इंजेक्‍शन’ दिले जाते. या इंजेक्‍शनमुळे मज्जातंतूवरची सूज, दुखणे व दाब कमी होतो. साहजिकच वेदना कमी होते. वेदना कमी झाल्यामुळे रुग्णांची कार्यक्षमता व कार्यपद्धती निश्‍चितच सुधारते.

‘पेन ब्लॉक’ या उपचारपद्धतीच्या दोन प्रकार आहेत -
१) ठराविक मज्जातंतूचे रूट ब्लॉक करणे.
२) फॅसेटल ब्लॉक. रुग्णाच्या वैद्यकीय तपासण्या आणि उपचारात्मक पद्धतीमधून दोन्हीपैकी कोणती उपचार पद्धत वापरली जाऊ शकते हे ठरविले जाते. हे थोडे विस्ताराने समजून घेऊ.

ठराविक मज्जातंतूचे रूट ब्लॉक 
क्षितिग्रस्त झालेल्या मज्जातंतूंसाठी ही उपचार पद्धती वापरली जाते. आजारी झालेले मज्जातंतू नेमके लक्षात घेऊन त्या योग्य ठिकाणी इंजेक्‍शनने औषध सोडले जाते. मज्जातंतूंच्या मुळाशी औषध सोडल्यानंतर वेदनेचे शमन होते. विशेषतः ज्या रुग्णांना हाता-पायाच्या वेदना होतात, त्यांना रुट ब्लॉक पद्धती उपयुक्त ठरते. फ्लुरोस्कोपीद्वारे हा उपचार केला जातो, त्यामुळे योग्य मज्जातंतूलाच इलाज मिळतो. हे इंजेक्‍शन जास्तीत जास्त वर्षातून तीन वेळाच दिले जाऊ शकते. 

फॅसेटल ब्लॉक
कण्यामध्ये ‘फॅसेट जॉइंट’ची जोडी असते. याच्या पृष्ठभागावर कार्टिलेज आणि सभोवती कुपी असते. फॅसेट जॉइंटचा संधीवात उद्भवल्यास किंवा पाठदुखीमुळे फॅसेट जॉइंट निकामी झाल्यामुळे कार्टिलेजलाही इजा पोहोचते. अशा रुग्णाला पाठदुखीबरोबरच विविध ठिकाणी वेदना होतात. अशा वेळी योग्य दुखरा फॅसेट जॉइंट निवडला जातो. या फॅसेट जॉइंटवर इंजेक्‍शन दिले जाते. त्यानंतर वेदना थांबते. 

या उपचारांसाठी रुग्णांला रुग्णालयात दाखल होण्याची गरज नसते. साधारण पंधरा मिनिटांमध्ये हा उपचार होतो. मात्र काळजी घेण्याच्या दृष्टीने एक दिवस डे केअर सेंटरमध्ये रुग्णाला थांबवून घेतले जाते.   

पेन ब्लॉक द्यायच्या आधी रुग्णासाठी महत्त्वाच्या सूचना
१) ‘पेन ब्लॉक’ उपचार करण्याआधी रुग्ण उपाशीपोटी असावा.
२) मधुमेहाची औषधे पेन ब्लॉकच्या दिवशी घेऊ नयेत.
३) हायपरटेन्सिव्ह औषधे घेत असलेल्या रुग्णांनी उपचाराच्या दिवशी औषधे अवश्‍य घ्यावीत.
४) उपचारदरम्यान रुग्णाला पूर्ण भूल दिली जात नाही. उपचारापुरती स्थानिक भूल भूलतज्ज्ञांकडून दिली जाते.
५) उपचाराच्या दिवशी रुग्णांनी चार-सहा तासांसाठी ‘पेन किलर’ घेऊ नये.
६) उपचाराच्या दिवशी कोणतेही जड काम करू नये.
७) उपचाराच्या किमान पाच दिवस अगोदरपासून ॲस्प्रीन किंवा क्‍लोपीर्टेब यासारखी औषधे घेऊ नयेत.

पेन ब्लॉक दिल्यानंतरच्या सूचना
१) उपचारानंतर रुग्णांना वीस-तीस मिनिटांसाठी विश्रांती दिली जाते, त्यानंतर डॉक्‍टर काही हालचाली करून घेऊन तपासणी करतील.
२) काही रुग्णांना लगेचच आराम मिळतो, तर काही रुग्णांना आराम काही तासांनंतर मिळू लागतो. त्यामुळे उपचारांसंबंधी लगेच कोणतेही अनुमान काढून अस्वस्थ होऊ नये.
३) उपचाराच्या दिवशी रुग्णांनी गाडी चालवू नये.
४) इंजेक्‍शन दिलेल्या ठिकाणी वेदना झाल्यास रुग्णांनी त्यावर बर्फाचा शेक घ्यावा. 
सांगायचे एवढेच की, आता दुखीने पाठ धरलीच तर लगेच दुखीपुढे पाठ टेकू नका. मणक्‍याच्या दुखण्यावर शस्त्रक्रिया आता टाळता येऊ शकते किंवा लांबवता तरी येऊ शकते. पेन ब्लॉक उपचार पद्धतीमुळे रुग्णांना शस्त्रक्रियेवाचून पाठीच्या वेदनेला बांध घालता येणे शक्‍य झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Back Pain Treatment