अखिलं मधुरम्‌

अखिलं मधुरम्‌

योग्य प्रमाणात खाल्ला तर मधुर रस पचनाला मदत करतो व शरीरपुष्टी करतो. पण याचे अतिप्रमाणात सेवन केले गेले तर तो पचायला जड पडतो व ही न पचलेली साखर रक्‍तात राहून  मधुमेहाकडे वाटचाल सुरू होते.

‘‘आहेत का गुळगुळेसाहेब?’’ असा बाहेरून प्रश्न विचारला गेला.
दार तर उघडेच होते.

पत्नीने आतून सांगितले, ‘‘या आत, बसा. हे आत्ताच थोड्या वेळात येतील.’’ पत्नीने मुलाला सांगितले, ‘‘जा, बाहेर आलेल्या पाहुण्यांना गुळाचा खडा व पाणी दे.’’  

अशा प्रकारचे संभाषण अनेकांनी ऐकलेले असेल. ही एक महाराष्ट्राच्या परंपरेतील मोठी गोष्ट आहे. पाहुणा आल्यावर त्यांचे काम नंतर, आधी आलेल्याला गूळ-पाणी देणे महत्त्वाचे. बाहेरून दमून आलेल्या माणसाला थोडी ऊब, थोडी शक्‍ती मिळण्यासाठी गुळाचा खडा आणि जिवाला बरे वाटण्यासाठी थंड पाणी दिल्यानंतर त्याचे समाधान होते व त्यानंतर कामाची चर्चा शांतपणे पार पडते. 

पूर्वी आपल्याकडे गोडाचे खूप महत्त्व होते. घरातील कुणाला देवाज्ञा झाली तरी त्याच्या तेराव्या दिवसाच्या जेवणाला लाडूच असत. सणावाराला तर पक्वान्न असतेच, पण मृत्यूच्या वेळीही गोड केले जाते याचे मला आश्‍चर्य वाटे. मी ज्यावेळी अनेक देशांमध्ये फिरलो, तेव्हा तेथील वडिलधाऱ्यांकडून त्यांच्या संस्कृतीविषयी माहिती घेत असताना लक्षात आले की, जगात सर्वत्र घरातील व्यक्‍ती मृत्यूू पावल्यानंतर जेव्हा मंडळी येतात किंवा मृत व्यक्‍तीच्या आत्म्याला शांती मिळावी या हेतूने प्रार्थना म्हणण्यासाठी मंडळी येतात, तेव्हा त्यांना काही गोडच दिले जाते, परदेशात वाईन दिली जाते. मृत्यूसारख्या अशुभ प्रसंगाला गोड कसे काय देणार, असे आपल्याला वाटते. पण हा प्रश्न शुभ-अशुभाचा नसून घरातील व्यक्‍तींना बसलेला शॉक, त्याच्या शक्‍तीचा झालेला ऱ्हास कमी करण्यासाठी, त्याच्या शरीराचे सप्तधातू मधुररसामुळे पुष्ट व्हावेत यासाठी गोडाची योजना करण्याची प्रथा आहे. शिवाय गोडामुळे आत्मविश्वास वाढला की झालेला मानसिक आघात मनुष्य सहन करू शकतो. 

मधुर रस हा रसांचा राजा होय. आंब्याचे, त्यातल्या त्यात हापूसच्या आंब्याचे, माधुर्य काही और असल्यामुळे आंबा हा फळांचा राजा ठरला. असे आहे मधुर रसाचे महत्त्व. योग्य प्रमाणात खाल्ला तर मधुर रस पचनाला मदत करतो व शरीरपुष्टी करतो. पण याचे अति प्रमाणात सेवन केले गेले तर तो पचायला जड पडतो व ही न पचलेली साखर रक्‍तात राहून  मधुमेहाकडे वाटचाल सुरू होते. त्यामुळे मधुमेहाचा इलाज हा खरा अन्नपचनाचा इलाज आहे ही कल्पना दृढ होईल, तेव्हा मधुमेहापासून मुक्‍ती मिळेल. 

त्यातल्या त्यात गूळ उष्ण असतो व साखर थंड असते. गुजरात, राजस्थान वगैरे उष्ण प्रदेशात गुळाचा चहा घेतला तर डोळे चिकटणे, शौचाला आग होणे या गोष्टी हमखास अनुभवाला येतात. तेव्हा या दोन्हीत साखर अधिक चांगली. लिंबाचे सरबत साखर घालूनच केले जाते, जे शरीराला, मूत्रमार्गाला शांतता प्रदान करते, जळजळ कमी करते. साखर जेवढी शुद्ध म्हणजेच साखरेतील जेवढा लालपणा काढून टाकला जातो, तेवढी ती थंड होत जाते. लाल रंग हा अग्नीचा रंग, गूळ साखरेच्या तुलनेत लाल असतो व त्या मर्यादेत तो साखरेपेक्षा उष्ण असतो. उसाची  साखर ही सर्व साखरेंमध्ये श्रेष्ठ. ती पचायला सोपी असते, ती शरीराला उत्तम दर्जाचा मधुर रस देते. जमिनीतील मधुर भाव वर ओढून घ्यायचे, सूर्याकडे घेऊन जाण्याचे काम ऊस करतो असतो. हा मधुर रस उसाच्या पेरांमध्ये असणाऱ्या गाठींचे टप्पे पार करत वरपर्यंत आलेला असतो त्यामुळे तो सूक्ष्म होतो. त्यामुळे कुठल्याही पदार्थात उसाची साखर घातली की तो पदार्थ पचायला सोपा होते. याची उत्तम उदाहरणे आहेत मोतीचूर लाडू, मोहनथाळ वगैरे गोड पदार्थ. हे पदार्थ साखरेमुळे पचायला सोपे होतात. हे पुढे शरीरात सर्वदूर पोचवण्यासाठी त्यात घातलेल्या शुद्ध भारतीय पद्धतीच्या आयुर्वेदिक परंपरेच्या साजूक तुपाचे योगदान मोठे आहे. कपभर दुधात अर्धा-एक चमचा साखर घातली किंवा पचवायची ताकद असली तर चार-पाच चमचे (खडी चम्मच) घातली तरी कफ गुणाचे दूध पचायला सोपे होते. उदा. तूप-साखर लावून पोळी खाल्ली तर त्यातील साखर पोळी पचवते, स्वतःही पचते, शरीरातील रक्‍तात शिल्लक राहात नाही. शरीराला मधुर रसाची नितांत आवश्‍यकता असते. मधुमेह किंवा जाड होण्याच्या भीतीने जे साखर सोडतात त्यांची ताकद कमी होते, आयुष्य कमी होते. पुढे पचन खराब झाले की ती व्यक्‍ती अजिबात साखर खाऊ शकत नाही. 

गुळाचा खमंगपणा चांगला. मिरचीच्या तिखटपणामुळे पदार्थाला चव येते, तसे गोडाच्या पदार्थांना गुळामुळे चव येते. शिरा करताना त्यात साखरेबरोबर थोडा गूळ टाकला तर शिरा अधिक खमंग लागतो. याचा अर्थ अग्नीचे तेज चव वाढवते. पण असे करताना गूळ उष्ण पडणार नाही याकडे लक्ष ठेवावे लागते. काही लोकांचा समज असा असतो की, साखर खाण्यापेक्षा गूळ खाल्ला तर तो पचतो आणि त्यामुळे तो मधुमेह्यांनाही चांगला असतो. पण असे काही नसते. मधुमेह्यांच्या रक्‍तात साखर राहते, त्यांच्या शरीरातील पेशी साखरेसाठी भुकेल्या असतात, पण त्यांच्यापर्यंत साखर पोचू शकत नाही. कुठल्याही पदार्थातील साखर, अगदी कडू पदार्थातील साखर सुद्धा, पेशींपर्यंत न पोचता रक्‍तात शिल्लक राहते. तेव्हा मधुमेह झाला की, त्यांच्या रक्‍तातील साखर पचविण्यासाठी प्रथम अन्नपचनाची व्यवस्था करावी लागते, बरोबरीने थोडी साखर सेवन करणेही गरजेचे असते (ही साखर गुळाच्या रूपात असो वा साखरेच्या रूपात असो). असे केले तर मधुमेह कमी होऊ शकतो आणि शरीराला साखर मिळत राहते. बीट रूट किंवा अन्य कंदांपासून बनविलेल्या साखरेचे गुण वेगळे असतात. जे कंद जमिनीच्या आत दलदलीत असल्याने सूर्यप्रकाशापासून वंचित राहतात त्यांच्यापासून बनविलेली साखर पचायला अति जड असते, ती खाल्ल्यास पचनाला त्रासच होतो. अशी साखर मधुमेहाच्या रोग्यांनी सेवन केल्यास मधुमेह अजूनच वाढतो. 

मध पचण्यासाठी त्यात विशेष घटक असतो. मध शीतवीर्याचा आहे. मधामध्ये काही विशिष्ट संप्रेरके असतात. या संप्रेरकांमुळे अन्नाचे धातूंमध्ये रूपांतर व्हायला मदत होते. त्यामुळे खाल्लेल्या वस्तूचे सातही धातूंपर्यंत रूपांतर व्हायला मदत होते. म्हणून मधाला योगवाही म्हटले जाते. मध गोड असल्याने त्याची तुलना साखरेशी करता येणार नाही तर मधाचे असे विशेष गुणधर्म आहेत. तूप व मध यांचे मिश्रण अमृतासारखे समजले जाते. तूप, मध घालून केळे खाल्ले तर केळ्याचा कफ नडत नाही, तर केळ्याचे सौम्यत्व कामाला येऊन शौचाला साफ होते. 

मधुर रसाविषयी असा साकल्याने विचार केला तर त्यांचा आपल्या शरीराला मोठा उपयोग होऊ शकतो, फक्‍त कोणते गोड पदार्थ खावे व किती खावे हे भान ठेवणे आवश्‍यक असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com