मधुर रस

डॉ. श्री बालाजी तांबे  www.balajitambe.com
Friday, 5 January 2018

गोड, आंबट, खारट,  तिखट, कडू व तुरट हे सहाही रस आरोग्यासाठी उचित प्रमाणात घेणे आवश्‍यक असते. पण त्यात गोड चव, अर्थात मधुर रस हा श्रेष्ठ असतो. मधुर रस हा सर्व रसांचा राजा आहे हे कायम लक्षात ठेवून साखर, गूळ, मध योग्य प्रमाणात व योग्य पद्धतीने सेवन केले तर आरोग्य, प्रतिकारशक्‍ती, शरीरशक्‍ती उत्तम राहू शकतील.

अन्नाचा आनंद घेण्यासाठी ‘चव’ महत्त्वाची असते. आयुर्वेदात सहा चवी किंवा सहा रस समजावले आहेत. आहारात या सहाही चवींचा समावेश असावा, असेही सांगितले आहे. 

गोड, आंबट, खारट, तिखट, कडू व तुरट हे सहाही रस आरोग्यासाठी उचित प्रमाणात घेणे आवश्‍यक असते. पण त्यात गोड चव, अर्थात मधुर रस हा श्रेष्ठ असतो.
मधुर रसाची प्रशस्ती चरकाचार्य या शब्दात करतात,

मधुरो रसः शरीरसात्म्याद्रसरक्‍तमांसमेदोऽस्थिमज्जौजः शुक्राभिवर्धन आयुष्यः षडिन्द्रियप्रसादनो बलवर्णकर पित्तविषमारुतघ्नस्तृष्णादाह प्रशमनस्त्वच्यः केश्‍यः कण्ठयोः बल्यः प्रीणनो जीवनस्तर्पणो बृंहणः स्थैर्यकरः क्षीणक्षतसन्धानकरो घ्राणमुखकण्ठौष्ठजिह्वाप्रल्हादनो दाहमूर्च्छाप्रशमनः षट्‌पदपिपीलिकानमिष्टतमः स्निग्धः 

शीतो गुरुश्‍च । ...चरक सूत्रस्थान

मधुर रस जन्मापासूनच शरीरासाठी सवयीचा व अनुकूल असतो, त्यामुळे सातही धातूंचे पोषण करतो, ओज तत्त्व वाढवतो, आयुष्य स्थिर तसेच दीर्घ होण्यास मदत करतो, पंचज्ञानेंद्रिये व मनाला प्रसन्न करतो, केसांसाठी तसेच आवाजासाठी हितकर असतो, धातूंची झालेली झीज भरून आणतो. मोडलेले हाड सांधण्यास मदत करतो, दाह-मूर्च्छा यांचा नाश करतो, गुरु, स्निग्ध व शीत गुणांचा असल्याने शरीरासाठी पोषक असतो.

आहार असो किंवा औषध, गोड चवीसाठी मुख्यत्वे साखर, गूळ किंवा मध वापरला जातो. साखर आणि गूळ या दोन्ही गोष्टी उसापासून बनवल्या जात असल्या तरी बनवण्याच्या पद्धतीमधील फरकामुळे दोघांच्या गुणधर्मात फरक असतो, सर्वांत महत्त्वाचे म्हणजे गूळ उष्ण असतो व साखर थंड असते. 

ततो मत्स्याण्डिकाखण्डशर्करा विमलाः परम्‌ ।
यथा यथैषा वैमल्यं भवेत्‌ शैत्यं तथा तथा ।।
...निघण्टु रत्नाकर

गुळापेक्षा साखर, साखरेपेक्षा खडीसाखर अधिकाधिक स्वच्छ होत जाते आणि अधिकाधिक शीतल होत जाते. 

साखर, खडीसाखर, बत्तासा हे सर्व साखरेचे प्रकार होत. 

साखर 
शर्करा मधुरा शीता बल्या वृष्या सरा मता ।
स्निग्धा कफकरी चैव क्षयकासतृषां जयेत्‌ ।।
विषदोषं मदं श्वासं मोहं मूर्च्छां वमिं तथा ।
अतिसारं रक्‍तदोषं पित्तं वातं कृमींस्तथा ।।
भ्रान्तिं दाहं श्रमं चार्शो नाशयेत्‌ इति कीर्तिता । ...निघण्टु रत्नाकर 

साखरेमुळे ताकद वाढते, शुक्रधातूचे पोषण होते, साखरेमध्ये सारक गुणधर्म असतो. साखर क्षयरोग, खोकला, तृष्णा, विषदोष व मद्यपानामुळे होणारे रोग, दमा, मूर्च्छा, चक्कर, जुलाब, रक्‍तदोष, मूळव्याध यावर औषधाप्रमाणे हितकर असते. साखरेमुळे श्रम दूर होतात. 

साखर जितकी अधिक शुद्ध तितकी अधिक गुणकारी असते म्हणून साध्या साखरेपेक्षा खडीसाखर श्रेष्ठ असते. औषधात सहसा साध्या साखरेऐवजी खडीसाखरच वापरली जाते. साखरेचा पाक बनविताना वरची मळी म्हणूनच काढायची असते. 

खडीसाखर डोळ्यांसाठी हितकर असते, सातही धातूंना विशेषतः शुक्रधातूला वाढवणारी असते, चवीला अतिशय रुचकर असते, ताकद देते, सारक असते, सर्व इंद्रियांचे समाधान करते, तहान शमवते, क्षयरोग, रक्‍तपित्त, चक्कर, मूर्च्छा, संभ्रम, दाह, शोष वगैरेंचा नाश करते.

गूळ
स्वयंपाकात साखरेच्या खालोखाल वापरला जातो तो गूळ. 
उसाच्या रसावरची मळी काढून घेतल्यानंतर तयार झालेला गूळ शुद्ध असतो व असा शुद्ध गूळ खाण्यासाठी किंवा औषधासाठी वापरणे चांगले असते. गूळ तयार झाल्यावर वर्षभर ठेवून  द्यायचा असतो व त्यानंतर वापरायचा असतो. तीन वर्षांचा जुना गूळ सर्वोत्तम असतो, नंतर मात्र त्याचे गुण कमी होत जातात. 

एक वर्षाचा जुना गूळ
सच कहायनो रुच्यः पथ्यश्‍चाग्निप्रदीपकः ।
मूत्रविष्ठाशुद्धिकरो हृद्यः स्वादुश्‍च पौष्टिकः ।।
रसायनो लघुः स्निग्धो वृष्यो मेहश्रमापहः ।
त्रिदोषपाण्डुसंतापपित्तवातापहो मतः ।। ...निघण्टु रत्नाकर

एक वर्ष जुना गूळ रुचकर असतो, पथ्यकारक असतो, तसेच अग्नीला प्रदीप्त करणारा असतो, मल-मूत्रप्रवृत्ती सहज होण्यास मदत करतो, हृदयासाठी हितकर असतो, पौष्टिक असतो, श्रमनाशक असतो, प्रमेह, रक्‍त क मी असणे वगैरे रोगात हितकर असतो, रसायन गुणांनी युक्‍त असतो. औषधात वा आसव-अरिष्ट बनवताना असा जुना गूळ वापरणे अपेक्षित असते. 

नवीन गूळ मात्र रक्‍तदोष, पित्तविकारात अपथ्यकर असतो तसेच जंत व मेदधातू वाढविणारा असतो. थोडक्‍यात गूळ उष्ण असतो म्हणून तुपाबरोबर खाण्याची पद्धत असते किंवा अन्न शिजवताना गूळ वापरला जातो. दूध, चहा, सरबत वगैरेंत मात्र साखर वापरणेच चांगले असते. पित्ताची प्रकृती असणाऱ्यांनी किंवा उष्णतेचा त्रास होण्याची प्रवृत्ती असणाऱ्यांनी गूळ प्रमाणातच वापरणेच श्रेयस्कर होय.

मध
मधाच्या नावातच मधुरता लपलेली आहे. मधमाशांनी फुलांमधून गोळा केलेला मध अमृतोपम असतो असे म्हणायला हरकत नाही. मध औषध म्हणून तर वापरला जातोच, पण रोज एक-दोन चमचे मध घेणे आरोग्यासाठी उत्कृष्ट असते. 

आयुर्वेदात मधाचे गुणधर्म पुढीलप्रमाणे सांगितलेले आहेत, 
मधु शीतं लघु स्वादु रुक्षं स्वर्यं च ग्राहकम्‌ ।
चक्षुष्यं लेखनं चाग्निदीपकं व्रणशोधकम्‌ ।।
नाडीशुद्धिकरं सूक्ष्मं रोपणे मृदु वर्णकृत्‌ ।ं 
मेधाकरं च विशदं वृष्यं रुचिकरं मतम्‌ ।।
आनन्दकृच्च तुवरं चाल्पवातप्रदं मतम्‌ ।। ...निघण्टुरत्नाकर

वीर्याने शीत, पचण्यास हलका आणि चवीला गोड असतो, तसेच त्याचा अनुरस तुरट असतो म्हणजे मध खाऊन झाल्यानंतर तोंडात तुरट चव जाणवते. मध शरीरातील अतिरिक्‍त ओलावा, चिकटपणा शोषून घेतो, मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करतो. मध हे कफदोषावरचे सर्वश्रेष्ठ औषध असल्याने डोळ्यांसाठीही अतिशय हितकर असतो. शरीरात साठलेला अनावश्‍यक मेदधातू पचविण्यासाठी मध उत्तम असतो. मध तयार होत असताना मधमाशांमधील पाचक द्रव्यांनी संस्कारित होत असल्याने अग्नी प्रदीप्त करण्यास मदत करतो, तसेच तोंडातील चिकटपणा दूर करून रुची आणण्यासही मदत करतो.

मध जंतुनाशक असतो, त्यामुळे तो खराब, न भरणारी जखम शुद्ध करून भरून आणण्यासाठी उपयोगी असतो. शरीरातील सर्व स्रोतसांची शुद्धी मधामुळे होत असते. मध सूक्ष्म म्हणजे अगदी लहानातील लहान नाडीमार्फत शरीरात सर्वत्र पसरू शकतो. म्हणून मधासह मिसळलेले औषध जिभेच्या संपर्कात आल्या आल्या लगेच कामाला लागते. मध त्वचेची कांती सुधारणारा असतो. मध सेवन करण्याने रक्‍ताची शुद्धी होऊन त्वचारोगांवर हितावह असतो, तसेच बाहेरून लावण्यानेही त्वचा उजळण्यास मदत करतो. मध अग्नीला ताकद देणारा तसेच सर्व नाड्यांची शुद्धी करणारा असल्याने आकलनशक्‍ती सुधारण्यासही सहायक असतो. मध रसायन गुणांनी युक्‍त, विशेषतः शुक्रधातूसाठी हितकर असतो. 

अशा प्रकारे मधुर रस हा सर्व रसांचा राजा आहे हे कायम लक्षात ठेवून साखर, गूळ, मध योग्य प्रमाणात व योग्य पद्धतीने सेवन केले तर आरोग्य, प्रतिकारशक्‍ती, शरीरशक्‍ती उत्तम राहू शकतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: balaji tambe arrticle Sugar jaggery honey