अग्र्यसंग्रह

डॉ. श्री बालाजी तांबे  www.balajitambe.com
Friday, 6 April 2018

एकच द्रव्य अनेक प्रकारे उपयोगी पडते. तरीही जे काम एखादे द्रव्य नक्की करते, त्याचे भान उपचारांची योजना करताना किंवा आहारनियोजन करताना ठेवावे लागते. 

एक द्रव्य अनेक प्रकारे उपयोगी पडते. व्यवहारातही ही गोष्ट आपण अनुभवत असतो. उदा. कागदाचा उपयोग लिहिण्यासाठी होतो, एखादी गोष्ट गुंडाळण्यासाठी होतो, त्याची पिशवी करता येते, पुस्तकामध्ये खूण म्हणूनही ठेवता येतो, वेळी-अवेळी आसन नसले, तर कागदाच्या घडीवर बसता येते, गाडीच्या खिडकीतून ऊन येत असले, तर वर्तमानपत्राचा पडदासुद्धा करता येतो, मात्र कागद हा मुख्यत्वे लिहिण्यासाठी असतो हे नक्की. तसेच जे काम एखादे द्रव्य नक्की करते त्याचे भान उपचारांची योजना करताना किंवा आहारनियोजन करताना ठेवावे लागते. यासाठी आयुर्वेदाच्या ग्रंथात अग्र्यसंग्रहाची योजना केलेली आहे. मागच्या वेळी आपण झोप आणणाऱ्या द्रव्यांमध्ये म्हशीचे दूध सर्वश्रेष्ठ असते हे पाहिले. आता पुढची माहिती घेऊ. 

अविक्षीरं श्‍लेष्मपित्तजननम्‌ - म्हणजे मेंढीचे दूध कफ आणि पित्त वाढविणाऱ्या द्रव्यांमध्ये अग्रणी असते. मेंढीचे दूध उष्ण असते. त्यामुळे पित्त वाढवते आणि पचायला जड, तसेच स्निग्ध गुणाचे असल्याने कफदोष वाढवते. चरकसंहितेत एका ठिकाणी मेंढीच्या दुधाचा ‘क्षीराणां अहिततमम्‌’ म्हणजे सर्वांत अहितकर दूध म्हणजे मेंढीचे दूध असा उल्लेख केलेला आहे. म्हणून मेंढीचे दूध पिणे टाळणे श्रेयस्कर होय. 

मन्दकं दधि अभिष्यन्दकराणाम्‌ - म्हणजे अदमुरे दही अभिष्यंद करणाऱ्या द्रव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ असते. 

अभिष्यन्द म्हणजे शरीरातील अवाजवी, अतिरिक्‍त प्रमाणातील ओलावा. यामुळे शरीराला जडपणा येतो, अंगावर सूज येते, शरीर जखडल्यासारखे वाटते. कच्चे मीठ, आंबवलेले पदार्थ, दही वगैरे द्रव्ये शरीरात अभिष्यंद वाढविणारे असतात, मात्र नीट न विरजलेले अदमुरे दही सर्वाधिक प्रमाणात अभिष्यंद करते. चरकसंहितेत अजून एका ठिकाणी मन्दक दही तिन्ही दोषांना प्रकुपित करणारे असते असाही उल्लेख केलेला  आहे. त्यामुळे दही नीट लागले आहे, दह्याची नीट कवडी पडते आहे याची खात्री करूनच सेवन करावे. शक्‍यतो दही नीट घुसळून, त्यात पुरेसे पाणी मिसळून तयार केलेले ताक पिणे चांगले. बऱ्याचशा घरात दही गोड असावे म्हणून सकाळी दुधाला विरजण लावून दुपारच्या जेवणात खाल्ले जाते, परंतु दुधाचे नीट दही लागण्यासाठी किमान पाच-सहा तास, थंडीच्या दिवसांत तर नऊ-दहा तास लागत असतात. हा वेळ न देता घाईघाईने दही करण्याचा प्रयत्न केला, तर ते अदमुरे राहून अनारोग्याचे कारण ठरू शकते. 

गवेधुकान्नं कर्शनीयानाम्‌ - गवेधूक नावाचे धान्य शरीराला कृश करण्यामागे सर्वश्रेष्ठ असते. 

गहू, ज्वारी, बाजरीप्रमाणे गवेधूक हे एक तृणधान्य म्हणजे गवताच्या जातीतील एक धान्य असते. हे गवत तीन फूट उंचीचे होते, दिसायला बांबूसारखे दिसते. 

कषायो मधुरो लघुः शीतः कफपित्तघ्नो वातकरः ।
....चरक सूत्रस्थान

चवीला तुरट, गोड, पचायला हलके, वीर्याने शीत असे हे धान्य कफ-पित्तदोष कमी करते, वात वाढवते. म्हणूनच वाढलेले वजन कमी करण्यासाठी, शरीराला कृश करण्यासाठी वापरले जाते. 

पूर्वीच्या काळी गवेधुकाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जात असे. गहू-ज्वारीच्या तुलनेत गवेधुकाच्या वरचे टरफल काढणे अवघड असते, त्यामुळे त्याची लोकप्रियता कमी झाली असावी. मात्र टरफल काढून घेतलेल्या धान्याचे पीठ करून त्याची रोटी करता येते किंवा अख्खे धान्य भाताप्रमाणे शिजवूनही खाता येते. वजन कमी करण्यासाठी डाएट केले जाते, त्यात गवेधूक धान्य उत्तम होय. 

उद्दालकान्नम्‌ विरुक्षणीयानाम्‌ - उद्दालक नावाच्या धान्यापासून तयार केलेले अन्न शरीराला रुक्षता आणणाऱ्या द्रव्यांमध्ये श्रेष्ठ असते.  

उद्दालक हे सुद्धा गहू-ज्वारीप्रमाणे एक तृणधान्य असते. हे मुळात रानावनात सापडणारे धान्य होय. मराठीत याला रानकोद्रव किंवा रानहरिख असेही म्हटले जाते. त्वचारोग असणाऱ्यांसाठी, जुना प्रमेह असणाऱ्यांसाठी, वजन कमी करणाऱ्यांसाठी रानकोद्रव हे एक उत्तम धान्य समजले जाते. 

वीर्येण उष्णो लेखनो वातलो लघुः रुक्षः स्वादुः कषायः श्‍लेष्मजित्‌ बद्धमूत्रविट्‌ च ।।
.....सुश्रुत चिकित्सास्थान

रानकोद्रव वीर्याने उष्ण असतात, शरीरातील अतिरिक्‍त चरबी कमी करणारे असतात, वातूळ असतात, पचण्यास हलके, रुक्ष, चवीला गोड व तुरट असतात, कफदोषाला जिंकतात, मात्र मलमूत्राचा अवरोध करणारे असतात. 

या धान्याचे पीठ करून त्याचे सूप बनवले जाते किंवा अख्खे धान्य तांदळाप्रमाणे शिजवून भात बनविला जातो. हे धान्य गुरांना वैरण म्हणूनही मोठ्या प्रमाणावर वापरले जाते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: balaji tambe article