आवेग

डॉ. श्री बालाजी तांबे  www.balajitambe.com
Friday, 12 January 2018

कोणताही नैसर्गिक आवेग जबरदस्तीने अडवून ठेवू नये. असा आवेग रोखून धरला किंवा जबरदस्तीने ती कृती केली तर त्याचे दुष्परिणाम शरीरावर होतात. आरोग्याला बाधा पोचते. 

रोग होऊ नये यासाठी मार्गदर्शन करणारे एकमेव वैद्यकीय शास्त्र म्हणजे आयुर्वेद शास्त्र असे म्हटले तर, ती अतिशयोक्‍ती ठरू नये. आयुर्वेदिक जीवनशैली लक्षात घेतली तर त्याचा आधुनिक काळातही अवलंब करता येतो आणि निरोगी दीर्घायुष्याचा आनंद घेता येतो. यातील रोजच्या दिनक्रमात लक्षात ठेवावा असा भाग  वेगधारण न करणे. या ठिकाणी ‘धारण’ शब्द वापरला असला तरी त्यात वेग अडवून न धरणे आणि जबरदस्तीने प्रवृत्त न करणे हे दोन्ही प्रकार येतात. भूक, तहान, शिंक, ढेकर वगैरे बहुतेक सर्व नैसर्गिक वेग अडवून ठेवल्याने काय होते आणि त्यावर काय उपचार करायचे असतात, यांची माहिती आपण घेतली. आज आपण शुक्राचा वेग धरून ठेवण्याने किंवा जबरदस्तीने प्रवृत्त करण्याने काय होते याची माहिती घेऊ या. 

मेढ्रे वृषणयोः शूलर्मे हृदि व्यथा ।
भवेत्‌ प्रतिहिते शुक्रे विबद्धं मूत्रमेव च ।।
...चरक सूत्रस्थान 

शुक्राचा वेग धारण करण्याने मूत्रेंद्रिय व वृषण या ठिकाणी वेदना होतात, अंग दुखते, हृदयात वेदना होतात, मूत्रप्रवृत्ती थांबून थांबून होते. 

मैथुनाच्या वेळी शुक्रप्रवृत्ती होणे स्वाभाविक असते, मात्र उत्तेजना होऊन, भीतीपोटी किंवा अन्य कोणत्याही कारणाने प्रवृत्त होऊ पाहणाऱ्या शुक्राचा अवरोध केला तर ही लक्षणे उद्भवू शकतात. यावर उपचार पुढीलप्रमाणे समजावलेले आहेत.

तत्र अभ्यंगोऽवगाहश्‍च मदिरा चरणायुधाः ।
शालिः पयो निरुहश्‍च शस्तं मैथुनमेव च ।।
...चरक सूत्रस्थान

वातनाशक द्रव्यांनी संस्कारित तेलाचा अभ्यंग, अवगाहन (टब बाथ किंवा कटि स्वेद), औषधीयुक्‍त मद्याचे विधिपूर्वक सेवन, निरुह बस्ती आणि नियमपूर्वक मैथुन हे उपचार शुक्रवेगधारणावर उपयोगी पडतात. 

अभ्यंग - यात स्थानिक अभ्यंग आणि संपूर्ण शरीराला केला जाणारा अभ्यंग असे दोन प्रकार असतात. वेगधारणामुळे प्रकुपित झालेल्या वाताला शांत करण्यासाठी अभ्यंग हा उत्तम उपचार असतो. स्थानिक अभ्यंगासाठी पुरुषम्‌ तेल तर, एकूण अभ्यंगासाठी अभ्यंग सिद्ध तेल, नारायण तेल, बला तेल, प्रसारिणी तेल वापरता येते. 

अवगाहन : म्हणजे छोट्या टबमध्ये औषधी काढा किंवा तेल भरून त्यात बसून शेक घेणे किंवा मोठ्या टबमध्ये झोपून शेक घेणे, वातशमनासाठी हा एक उत्तम उपाय असतो. दशमुळाचा काढा किंवा दशमूळ सिद्ध तीळ तेल यासाठी वापरता येते. शुक्रस्थानाला  ताकद देणाऱ्या वनस्पती उदा. शतावरी, अश्वगंधा, विदारी कंद, भुईकोहळा, गोक्षुर वगैरे वनस्पतींचा काढा किंवा या वनस्पतींनी संस्कारित तेलसुद्धा यासाठी वापरता येते. 

औषधी मद्यपान - पुनर्नवासव, द्राक्षासव, दशमूलारिष्ट, सारस्वतारिष्ट वगैरे आसवारिष्टे किंवा धान्यापासून बनविलेले मद्य नियमपूर्वक सेवन करण्यानेही वातदोष संतुलित होण्यास मदत मिळते. 
कोंबडीचे मांस वातनाशक तसेच शुक्रवर्धक असते, त्यामुळे या ठिकाणी हितावह असते.

ज्या व्यक्‍ती केवळ शाकाहारी असतात, त्यांच्यासाठी यालाच तोडीला तोड म्हणून कुष्मांडावलेह, मुशली पाक  किंवा साठेसाळी तांदळाचा भात व दूध एकत्र करून तयार केलेले पायस खाणे चांगले असते. 

निरुह बस्तीची योजनासुद्धा वातशमनाच्या दृष्टिकोनातून केलेली असते. यासाठीसुद्धा दशमुळासारखी वातशामक द्रव्ये किंवा शतावरी, अश्वगंधासारखी शुक्रधातूला पोषक द्रव्ये वापरता येतात. 

नियमपूर्वक मैथुन : म्हणजे वय, ऋतुमान, प्रकृती, शरीरशक्‍ती वगैरे मुद्द्यांचा विचार करून मैथुन करणे, योग्य वेळी, योग्य ठिकाणी तसेच जोडीदाराच्या संमतीने मैथुन करणे, मैथुनापूर्वी व मैथुनानंतर शुक्रपोषक रसायनांचे सेवन करणे वगैरे. अशा प्रकारच्या म्हणजे संयमपूर्वक व शास्त्राने सांगितलेल्या नियमांचे पालन करून केलेल्या मैथुनाने आयुष्य वाढते, म्हातारपण उशिरा येते, उत्तम शरीर, वर्ण, बल यांची प्राप्ती होते, मांसादी धातू उत्तम अवस्थेत राहतात व यशस्वी आयुष्याची प्राप्ती होते, असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. 

अशा प्रकारे मूत्र, मल, वायू, उलटी, शिंक, ढेकर, जांभई, भूक, तहान, अश्रू, झोप, परिश्रमाने लागणारा दम आणि शुक्र असे एकूण तेरा वेग असतात, ज्यांचे धारण किंवा प्रवृर्तन न करणे आरोग्यासाठी चांगले असते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: balaji tambe article