आशुकारी क्रिया - इमर्जन्सी

आशुकारी क्रिया - इमर्जन्सी

इमर्जन्सी, सीरिअस, आय्‌.सी.यू., ॲडमिट हे शब्दच मनात भीती उत्पन्न करतात. खरे तर ही परिस्थिती उद्‌भवू नये यासाठी आयुर्वेदासारखे दुसरे उपयुक्‍त शास्त्र नाही. आयुर्वेदिक जीवनशैली आत्मसात केली तर या विषयांचा स्पर्शही होऊ नये. परंतु काही त्रास असे असतात, की त्यावर तातडीने उपचार करावे लागतात. आयुर्वेदात ही विषयही समाविष्ट केलेला आहे आणि त्याला म्हणतात आशुकारी क्रिया. 

आशुकारी तद्‌ आशुत्वात्‌ धावति अम्भसि तैलवत्‌ । 
... सुश्रुत उत्तर

पाण्यावर तेलाचा थेंब टाकल्यास तो जसा त्वरेने फैलावतो व पाण्याचा संपूर्ण पृष्ठभाग व्यापतो, त्याला आशु म्हणतात.

आशुकारी क्रिया हा शब्द जसा उपचारांच्या बाबतीत वापरला जातो, तसाच औषधांच्या काम करण्याच्या पद्धतीसाठीही वापरला जातो. जी औषधे शरीरात गेल्यावर तातडीने काम करण्यास सुरवात करतात त्यांना ‘आशुकारी’ असे म्हटले जाते. सर्वसाधारण औषधे किंवा आहारद्रव्ये सेवन केल्यानंतर पचणे आवश्‍यक असतात, योग्य पचन झाल्यानंतरच ती आपापले पोषणाचे किंवा कार्यक्षमता सुधारण्याचे काम करू शकतात. मात्र आशुकारी द्रव्ये पचनाची वाट व पाहता शरीराशी संपर्क आल्याक्षणी ताबडतोब कामाला लागतात आणि अपेक्षित काम करून मोकळे होतात.

उत्तम उदाहरण द्यायचे म्हणजे मद्य व विष. जहाल विषाने अर्ध्या मिनिटातही मृत्यू येऊ शकतो यावरून त्याच्या परिणामाचा वेग किती प्रचंड असेल याची कल्पना करता येईल. आयुर्वेदात बिब्बा, चित्रक, वत्सनाभ वगैरे द्रव्ये आशुकारी गुणाची ओळखली जातात.

काही रोग असे असतात, की जे अगोदर फारशी लक्षणे न दाखविता एकदमच आपला झटका दाखवितात. व्यवहारातही आपला हृदयाचा झटका, अर्धांगाचा झटका असेच म्हणतो. बहुधा अशा विकारात वातदोषप्रकोपाचा सिंहाचा वाटा असतो. तसेच आगंतू प्रकारचे विकार म्हणजे बाहेरच्या असंतुलनामुळे किंवा अपघातामुळे झालेला शरीर-मनावरचा परिणामही आशुकारी स्वरूपाचा असते.

ये भूत-विष-वायु-अग्नि-क्षत-भंगादि सम्भवाः । 
... अष्टांग हृदय सूत्रस्थान 

भूत, विष, (अशुद्ध) वायू, अग्नी, जखम, हाड मोडणे वगैरे कारणांमुळे आशुकारी उपचारांची गरज पडते. 

आयुर्वेदामध्ये भूत हा शब्द सहसा बॅक्‍टेरियल, व्हायरल इन्फेक्‍शनसाठी वापरला आहे. तसेच विषबाधा; हवेमध्ये शरीरघातक वायू गेल्यास उद्‌भवू शकणारी अवघड परिस्थिती; भाजणे; मोठी जखम होऊन अति रक्‍तस्राव होणे; मणका, कवटी वगैरे हाडे मोडल्याने जीव धोक्‍यात येणे; शस्त्रकर्मानंतर अनपेक्षित समस्या निर्माण होणे; अत्यंत क्रोध, भयामुळे मानसिक असंतुलन निर्माण होणे वगैरे विविध गोष्टी आजही आपण वाचतो, पाहतो, ऐकतो. या सर्व आत्ययिक अवस्था अर्थात इमर्जन्सी होत, ज्यासाठी क्षणाचाही विलंब न करता उपचार करावे लागतात. 

इमर्जन्सी पूर्वीही होतीच व त्यावर पूर्वीच्या काळापासून यशस्वी उपचार होत आलेले आहेत. थोडक्‍यात, आयुर्वेद शास्त्रालाही आशुकारी अवस्था कशी हाताळायची याचे ज्ञान होते. अचूक निदान, उत्तम औषध व वैद्याची निपुणता यांची सांगड बसली, तर आयुर्वेदिक औषधांनीसुद्धा इमर्जन्सी उत्तम प्रकारे हाताळता येऊ शकते. शुद्ध आयुर्वेदाची औषधे घेणाऱ्यांचा हा अनुभव नक्की असेल. विषबाधा म्हणजे साप, विंचू वगैरे विषारी प्राण्यांच्या दंशानंतर हृदयाचे रक्षण होण्यासाठी घृतपान व सुवर्णकल्प देता येतात व त्यांचा उपयोगही होताना दिसतो. कुठल्याही औषधांनी थांबत नसलेली उचकी मयूरपिच्छा मषीने दोन मिनिटांत थांबू शकते. अनेक वर्षांपासून न भरणारी जखम शुद्ध गंधकयुक्त औषध व बाहेरून जुन्या तुपाच्या लेपाने बघता बघता भरून येते. 

बेशुद्धावस्था, मानसिक गोंधळ, अर्थहीन बडबड यांसारख्या परिस्थिती हाताळावयाचे ज्ञान त्या काळी होते, आजही त्यांचा उपयोग होताना दिसतो, मात्र आधुनिक शास्त्राने या विषयात केलेली प्रगती वाखाणण्याजोगी आहे यात संशय नाही. 

आयुर्वेदातील ‘तातडीचे’ असे काही उपचार - 
१) विषारी प्राण्यांनी दंश केल्यास काय करावे हे सांगताना चरकसंहितेत सांगितले आहे,
तरुरिव मूलच्छेदात्‌ दंशच्छेदान्न वृद्धिमेति विषम्‌ । 

आचूषणमानयनं जलस्य सेतुर्यथा तथाऽरिष्टाः ।। ....चरक चिकित्सास्थान

ज्या प्रमाणे मूळ कापले असता वृक्ष वाढत नाही, उलट नाश पावतो, त्या प्रकारे दंशस्थानी तीक्ष्ण शस्त्राने चिरा देऊन तेथील दूषित रक्‍त ओढून काढले तर विष नाहीसे होते. ज्या प्रमाणे वाहत्या पाण्याला थांबविण्यासाठी पाण्याला बांध घालतात, त्या प्रमाणे शरीरात पसरणाऱ्या विषाला थांबविण्यासाठी अरिष्ट-बंधन केले जाते. यात हृदयाच्या रक्षणासाठी सर्वप्रथम प्रयत्न करायला सांगितले आहेत. 

आदौ हृदयं रक्ष्यं तस्यावरणं पिबेत्‌ यथालाभम्‌ । ...चरक चिकित्सास्थान

विषप्रयोग झालेल्या व्यक्‍तीने सर्वप्रथम भांडेभर तूप प्यावे. जर विष रक्‍तात गेले असेल तर रक्‍तविस्रावण (म्हणजे दूषित रक्‍त काढून टाकणे) करावे. विष पोटात जाऊन फार वेळ झाला नसल्यास वमन (उलटी) करवावे किंवा काही वेळ उलटून गेला असल्यास विरेचन (जुलाब) करवावे. सुवर्णाचा उपयोगही विषचिकित्सेत आवर्जून केला आहे. 

न सज्जते हेमपो विषं पद्मदलेऽम्बुवत्‌ । ...चरक चिकित्सास्थान
ज्या प्रकारे कमळाच्या पानावर पाणी राहात नाही त्या प्रमाणे सुवर्णाचे सेवन करणाऱ्या व्यक्‍तीच्या शरीरावर विषाचा परिणाम राहात नाही.

विषामुळे जेव्हा मनुष्य निचेष्ट होतो, बेशुद्ध होतो तेव्हा सुश्रुताचार्य याप्रकारची आत्ययिक चिकित्सा सांगतात, 

कुर्यात्‌ काकपदाकारं व्रणमेव स्रवन्ति ताः । चर्मवृक्षकषायं वा कल्कं वा कुशलो भिषक्‌ ।...सुश्रुत चिकित्सा

शस्त्रवैद्याने मनुष्याच्या मस्तकावर कावळ्याच्या पायाच्या आकाराचा त्रिकोणाकार छेद करावा व रक्‍त वाहत असेपर्यंत त्यावर चर्मवृक्षाच्या कल्काचा लेप करावा.

जखमांवरच्या उपचारांमध्येही या प्रकारचे तातडीने करावयाचे उपचार सांगितलेले आहेत,

रुधिरेऽतिप्रर्वृत्ते तु ...... कर्माग्ने संप्रशस्यते। ...चरक चिकित्सा

जखमेतून फार अधिक प्रमाणात रक्‍तस्राव होत असल्यास व ती जागा सुन्न झाली असल्यास त्यावर अग्निकर्म करावे. आजच्या आधुनिक काळातही जखमा भरून येण्यासाठी व रक्‍त थांबवण्यासाठी कॉटरायझेशन केले जाते.

याचप्रमाणे हेमगर्भ, मृतसंजीवनी रस, महागन्धहस्ती अगद याप्रकारची औषधे गंभीर व तातडीने उपचार करायला लागतील अशा परिस्थितीत वापरली जातात. 

अपघात, अटॅक, तब्येतीत अकस्मात बदल कुणालाच नको असतात मात्र त्यासाठी अगोदरपासून काळजी घ्यायची तयारी मात्र नसते. अपघात जरी खरोखरच अकस्मात होत असला तरी बहुसंख्य वेळा त्यासाठी कोणाची तरी बेपर्वाई कारणीभूत असतेच. ॲटॅक जरी अचानक आला तरी त्याची पूर्वतयारी शरीरात किती तरी आधीपासून होत असते. आणि ही पूर्वतयारी तेव्हाच होऊ शकते जेव्हा आपण ती होण्याला वाव देतो. शारीरिक व्यायामाचा अभाव, आहारासंबंधातल्या चुका, एकूणच बेशिस्त जीवनपद्धती अशा खत-पाण्यावरच अनारोग्य पोसले जाते आणि अचानक आकस्मिक परिस्थिती उद्‌भवली की धावाधाव करण्याची पाळी येते. आयुर्वेदीय जीवनशैली स्वीकारली आणि नियमपूर्वक जीवन जगायचे ठरविले तर इमर्जन्सीचा अनुभव येण्याची शक्‍यता नगण्य होईल हे नक्की.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com