अन्नपानविधी आहार

डॉ. श्री बालाजी तांबे  www.balajitambe.com
Tuesday, 18 June 2019

आपल्या शरीराला कोणता आहार आवश्‍यक आहे, तसेच योग्य आहे हे जाणायला हवे. एकूण बारा वर्गांमध्ये आहारद्रव्यांचे विभाजन केले आहे.  

आपल्या शरीराला कोणता आहार आवश्‍यक आहे, तसेच योग्य आहे हे जाणायला हवे. एकूण बारा वर्गांमध्ये आहारद्रव्यांचे विभाजन केले आहे.  

चरकाचार्यांनी अन्नपानविधी या अध्यायात आहाराची सविस्तर माहिती दिलेली आहे. त्यांनी आहारद्रव्यांचे एकूण बारा वर्गांमध्ये विभाजन केलेले आहे व प्रत्येक वर्गातील द्रव्यांचे सविस्तर वर्णन दिलेले आहे. आपण चरकसंहितेच्या अनुषंगाने मात्र सध्याच्या काळात उपलब्ध असणाऱ्या, वापरल्या जाणाऱ्या आहारद्रव्यांची माहिती घेणार आहोत. 

चरकसंहितेतील हे बारा वर्ग याप्रमाणे आहेत, 
शूकधान्यशमीधान्यमांसशाकफलाश्रयान्‌।
वर्गान्‌ हरितमद्याम्बुगोरसेक्षुविकारिकान्‌ ।।
दश द्वौ चापरौ वर्गौ कृतान्नाहारयोगिनाम्‌ ।

शूकधान्य, शमीधान्य, मांसवर्ग, शाकवर्ग, फलवर्ग, हरितवर्ग, मद्यवर्ग, जलवर्ग, गोरसवर्ग, इक्षुविकारवर्ग, कृतान्नवर्ग आणि आहारोपयोगी वर्ग या बारा वर्गांमध्ये आहारद्रव्यांचे विभाजन केले जाते. 

शूकधान्य - शूक म्हणजे कुसळ. ज्या धान्यावर कुसळ असते त्याला शूकधान्य म्हणतात. यात मुख्यत्वे तांदूळ, गहू, जव, मका, ज्वारी, बाजरी वगैरे धान्यांचा समावेश होतो. शूकधान्याचे अजून तीन प्रकार पडतात. हेमंत ऋतूत तयार होणारे ते शाली, ग्रीष्मऋतूत तयार होणारे ते षष्ठी आणि शरदात तयार होणारे ते ब्रीही. चरकसंहितेत काही महत्त्वाच्या शूकधान्यांचे वर्णन केलेले आहे, मात्र एकंदर उपलब्ध असणाऱ्या शाली प्रकारच्या हेमंत ऋतूत तयार होणाऱ्या धान्यांचे गुणधर्म पुढीलप्रमाणे दिलेले आहेत, 

शीता रसे विपाके च मधुराश्‍चाल्पमारुताः ।
बद्धाल्पवर्चसः स्निग्धा बृंहणाः शुक्रमूत्रलाः ।।

धान्य, विशेषतः हेमंतात तयार होणारे धान्य शीत वीर्याचे, मधुर चवीचे व मधुर विपाकाचे असते, अल्प प्रमाणात वात वाढविणारे असते. मळ (पुरीष, विष्ठा) कमी प्रमाणात तयार करणारे व बांधून बाहेर काढणारे असते, शरीराला उचित स्निग्धता व पोषण देणारे असते, शुक्रधातू व मूत्र यांना प्रवृत्त करणारे असते. 

शमीधान्य - यालाच शिम्बीधान्य असेही म्हटले जाते. शिम्बी म्हणजे शेंग. शेंगेमध्ये तयार होणाऱ्या धान्याचा म्हणजेच कडधान्याचा या वर्गात समावेश होतो. हे द्विदल असते म्हणजे याच्या बियांचे दोन भाग होणारे असते. मूग, मटकी, मसूर, हरबरा, वाटाणा वगैरे सर्व शमी किंवा शिम्बी धान्य होत. आपण व्यवहारात ज्याला डाळ म्हणतो, ती कडधान्याच्या वरचे टरफल काढून व दोन भागात विभाजित करून तयार केलेली असते. कडधान्य व डाळ यांचे गुणधर्म सारखेच असतात. म्हणून हरभरे किंवा चणे अपथ्यकर सांगितलेले असतील, तर हरभऱ्याची डाळ किंवा बेसन हेसुद्धा आपोआपच अपथ्यात मोडतात. अष्टांगहृदयात एकंदर शमी धान्यांचे गुणधर्म असे सांगितलेले आहेत, 

वैदलं मधुरं कषाय कटु पाकि हिमं रुक्षे वातलं ।
कफपित्तबद्धमूत्रमलं मुद्गमसूराभ्याम्‌ ऋते आध्मानकारि च ।।

द्विदल शमी धान्ये चवीला मधुर, तुरट, विपाकाने कटु, वीर्याने शीतल, शरीरात कोरडेपणा वाढविणारे, कफ-पित्त-मूत्र-मल यांना बांधणारे आणि मूग व मसूर वगळता इतर सर्व कडधान्ये पोटात वायू करणारे असतात.
मांस वर्ग ः यात मासे, अंडी, पशू, पक्षी वगैरे सर्वांचा समावेश होतो. 
शरीरबृंहणे नान्यत्‌ खाद्यं मांसात्‌ विशिष्यते ।
शरीरवृद्धीसाठी मांसासारखा दुसरा कोणताही खाद्यपदार्थ नाही, असे संहितेमध्ये सांगितलेले आहे. 

शाक वर्ग - यात सर्व पालेभाज्या, फळभाज्या व कंदभाज्यांचा समावेश होतो. भाज्यांचे सामान्य गुण याप्रमाणे दिलेले आहेत, 

प्रायः सर्वाणि शाकानि गुरुणि रुक्षाणि विष्टम्भिनि बहुवर्चांसि सृष्टविण्मारुतानि च सन्ति ।

बहुतेक सर्व भाज्या पचायला जड, शरीरात कोरडेपणा उत्पन्न करणाऱ्या, स्रोतसांमध्ये अवष्टंभ (अडथळा) तयार करणाऱ्या, मळ (विष्ठा) अधिक प्रमाणात तयार करणाऱ्या आणि मळाचे तसेच अपानवायूचे निःसारण करणाऱ्या असतात. 

वनस्पतींच्या वेगवेगळ्या भागांपासून भाज्या तयार होतात. 

पत्रं करीरमग्रं फलं काण्डमधिकरुढकं त्वक्‌ पुष्पं छत्रकञ्चेति ।
मूळ, पाने, कोवळे कोंब, शेंडा, फळ, दांडा, मोड, साल, फूल, छत्रक असे भाज्यांचे दहा प्रकार असतात. 
मूळ - यात मुळा, सुरण, गाजर वगैरेंचा समावेश होतो.
पाने - पालक, तांदुळजा, चाकवत, मेथी वगैरे.
कोवळे कोंब - गोड शेवगा वगैरे
शेंडा - बांबूचे शूट्‌स वगैरे 
फळ - कोहळा, भोपळा, काकडी वगैरे
दांडा - कमळाची दांडी वगैरे
फूल - हादग्याची फुले, शेवग्याची फुले वगैरे 
छत्रक - ज्याला मश्रूम नावाने ओळखले जाते ते.
या पुढची आहारवर्गाची माहिती आपण पुढच्या वेळी घेऊया.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: balaji tambe article Diet